Published in the Saturday Lokasatta on 22 June, 2024
घुसमट हा प्रकार फारच वाईट. कुठेही अशी घुसमट जाणवायला लागली की त्याला SOS चा बोर्ड लावायचा आपला आपणच आणि त्यातून तात्काळ बाहेर येण्यासाठी प्रयत्न करायचा...
गेला दीड महिना चतुरंगच्या ह्या ॲडव्हर्टेोरियल मधून मी सुट्टी घेतली होती. अचानक गायब झाले. वाचकांनीही इमेलद्वारे विचारणा केली, `कुठे आहात तुम्ही?‘ थँक्यू! कुणीतरी आपल्याला मिस् करतंय ही भावनाच आपल्याला शक्ती देते, आपल्या जगण्याला अर्थ आणते. सर्वजण बाहेर पर्यटनाला निघण्याचा हा कालावधी. समर व्हेकेशन. आमच्यासाठी मात्र समर व्हेकेशन म्हणजे `ऑन अवर टोज्’ टाईम. अतिदक्षता विभागात काम केल्यासारखे आम्ही असतो. आमच्यापासून कुणालाही एप्रिल मे जून मध्ये सुट्टी घ्यायला परवानगी नाही. देशविदेशात अनेक ठिकाणी टूर्स सुरू असतात, आम्ही अगदी डायरेक्टली डे टू डे मध्ये बघत नसलो तरी कुठे काय चालू आहे ह्यावर सक्त नजर असते. आणि टीमच्या सपोर्टला आम्ही ऑफिसमध्येच असतो. कधी कुठेतरी फ्लाइट कॅन्सल होतात तर कुठे रस्ता बंद होतो. कुठे एखादी मेडिकल इमर्जन्सी येते तर कुठे एखादं मुख्य साइटसीईंंग काही कारणास्तव बंद होतं. मागे बघानं दुबईत पाऊस पडला आणि विमानं कॅन्सल झाली पूर्ण पाच दिवस. टोटल केऑस. अशावेळी कुणालाही हडबडायला होतं, त्यावेळी आम्ही सगळे एकत्र असलो की एकमेकांच्या साथीने त्यातून मार्ग काढायला बरं असतं. जूनच्या मध्यापर्यंत ही सुपर डुपर पीक सीझनची धावपळ सुरू असते. मग पर्यटनस्थळांची गर्दी ओसरते आणि आम्हीपण थोडे शांत निवांत होतो. आणि तेच कारण होतं चतुरंगच्या ह्या कॉलममधून थोडंसं बाहेर जाण्याचं, लिखाण कितीही आवडत असलं तरी. गणपती दिवाळी ख्रिसमस अशावेळी एखादा शनिवार मी कॅज्युअल लीव्ह टाकते. पण अशी महिना दीड महिन्याची सुट्टी ही समर व्हेकेशनच्याच वेळी. सो आज पुन्हा आपल्याशी हा संवाद सुरू करताना आनंद वाटतोय. लेट्स कीप कम्युनिकेटिंग.फेब्रुवारीत जयपूरला गेलो होतो एका लग्नासाठी. राजस्थानचे राजवाडे आणि हवेल्या हे लग्नासाठीचे बेस्ट व्हेन्यूज ठरले आहेत. अशाच एका हवेलीत हे लग्न होतं. नेमकी आमची युएसए वारी पण त्याच वेळी आल्याने आम्ही फक्त एका रात्रीसाठीच गेलो होतो. लग्नाचा सेटअप अगदी वाखाणण्यासारखाच होता. आजचा एक दिवस यादगार ठरणार हे गेल्यागेल्याच लक्षात आलं. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं जोर शोर से स्वागत होत होतं तसंच आमचंही झालं, आणि आम्हाला आमच्या रूमपर्यंत नेण्यात आलं. त्यांना थँक्यू म्हणत आम्ही आमच्या रूममध्ये स्थानापन्न झालो. कॉर्नर स्वीट होता त्यामुळे त्या टिपिकल राजस्थानी खिडकीमधून समोरच्या सोहळ्याचा व्ह्यू संपूर्णपणे दृष्टीपथात होता. `सुधीर समथिंग नीड्स टू चेंज हियर’. `आता काय चेंज करायचंय हिला’ म्हणत सुधीरने नेहमीसारखा कटाक्ष टाकला. `अगं आपण फक्त बारा तासांसाठी इथे आहोत, आता इथे बदलाबदली करीत बसू नकोस. मी जातो आंघोळीला, आपल्याला एक तासात तयार व्हायचंच हे लक्षात ठेव’. मी तिथल्या सोफ्यावर शांत बसले. काय खटकतंय मला इथे? तो स्वीट किंवा ती रूम खूपच मोठी होती. जागा भरपूर होती. पण त्यात जी सोफा अरेंजमेंट होती ती त्या टिपिकल राजस्थानी बेडला लागून होती. आधीच तो उंच आणि आपल्या मुंबईतल्या छोट्या छोट्या घरातल्या छोट्या बेडरूममधल्या बेडच्या साइजच्या मानाने खूपच मोठा बेड होता. त्याला लागून एक थ्री सीटर सोफा, दोन चेअर्स आणि मध्ये एक मोठ्ठ कॉफी टेबल. आता ही सीटिंग बेडच्या समोर होती. त्यामुळे बेडच्या एका साइडने दुसऱ्या साइडला जायला ही सीटिंग अरेंजमेंट पार करून जावं लागत होतं. त्या रूममधला मोठा प्रवासच होतो तो. नॉर्मली बेड वेगळा आणि सुटा असतो, तर सीटिंग मग ते एका चेअरचं असो वा संपूर्ण सोफा चेअर्स सेटिंग, वेगवेगळं असतं. रूममध्ये व्यवस्थित फिरता आलं पाहिजे. बेड आणि सोफा सेटिंग वेगवेगळ केलं तर रूममध्ये मोकळेपणाने फिरता येईल. रूम आणखी छान दिसेल. जरी आम्ही फक्त काही तासच तिथे असलो तरी तो वेळ चांगला जाईल. सुधीर बाथरूममध्ये होता त्यामुळे मला आडकाठी करणारंही कुणी नव्हतं. मी माझ्यात भीमाचं बळ भरलं आणि बेड आणि सोफा सिटिंग मध्ये फूट पाडली, अलग अलग करून टाकलं दोघांना. आता बेड मोकळा झाला, सोफा सीटिंग सुद्धा चारही बाजुंनी मोकळी झाल्याने मुव्हमेंट इझी झाली, आणि मी त्या क्लॉस्ट्रोफोबिक फीलिंगमधून बाहेर पडले. माझ्यासाठी खऱ्या अर्थाने ते हुश्यsss होतं. सुधीर बाहेर आल्यावर अर्थातच, `एखाद्या दिवशी कंबर लचकली, पाठीत उसण भरली तर काय करशील? थोडावेळ थांबायचं तर, हॉटेल हाऊसकीपिंगला बोलवायचं‘. हे सगळं मुकाट ऐकून घ्यावं लागलं. पण त्या ओरडा खाण्याच्या वेदनेपेक्षा ती रूम सुटसुटीत झाल्याचा आनंद जास्त होता. सुधीरनेही ते मान्य केलं कारण त्या आधीच्या अरेंजमेंटमध्ये आम्हाला दोघांनाही थोडं घुसमटायलाच झालं होतं. आणि घुसमट हा प्रकार फारच वाईट. कुठेही अशी घुसमट जाणवायला लागली की त्याला आपला आपणच SOS चा बोर्ड लावायचा आणि त्यातून तात्काळ बाहेर येण्यासाठी प्रयत्न करायचा.घरात तर माझं कायमचं काहीतरी नाविन्य आणण्याचं प्रकरण सुरू असतं. मात्र ह्यात मोठ्ठा खर्च करून नवीन काही आणत बसायचं नाही हाही दंडक मी घालून घेतलाय. जे आहे त्यातच अधिक सौफ्लदर्य खुलवायचं. कधी एखादं टेबल इथलं तिथे केलं, बैठक थोडीशी बदलली तर आपलं रोजचं घर आपल्याला थोडं वेगळं, उत्साही किंवा वेलकमिंग वाटायला लागतं. आमच्या व्यवसायामुळे वर्षातले अर्धे दिवस आम्ही भटक्यांचं जीणं जगतो. टोटल जिप्सी. कधी भारताच्या ह्या राज्यात तर कधी जगाच्या टोकावरच्या कुठच्यातरी देशात. म्हणजेच ज्या काही हॉटेल रिसॉर्टमध्ये आम्ही राहतो ते आमचं घर बनून जातं त्या दिवसांसाठी. मग माझं काम करायचं आणि लिखाणचं टेबल हे सेंटर पॉईंट बनून जातं. रूममधलं ते टेबल जर खिडकीसमोर करता आलं तर मला स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद होतो. पुर्वी वुमन्स स्पेशल सोबत मी कधी पूर्ण टूर तर कधी किमान एक दोन दिवस जात असे. पहिल्या पहिल्यांदा बऱ्याच सहली थायलंडच्या असायच्या आणि बँकॉकच्या मोंतियन रिव्हरसाईड ह्या हॉटेलमध्ये वास्तव्य असायचं आणि ते कॉर्नर स्वीट रूम राखून ठेवायचे माझ्यासाठी. तेव्हा पहिली गोष्ट मी करायचे ती म्हणजे तिथलं वर्क डेस्क मी खिडकीकडे हलवायचे. बाहेर दिसणारी नदी आणि तिच्या काठावर पसरलेलं बँकॉक बघायला मजा यायची आणि मुख्य म्हणजे काम करताना प्रसन्न वाटायचं. एक दोन वेळा मी त्यांच्या त्या रूमचं इंटिरीयर बदललेलं बघून पुढच्या वेळेपासून रूम देताना आधीच ते टेबल खिडकीकडे करून ठेवायचे. कधी कधी कुणाच्या घरी गेले तरी मला प्रश्न पडतात, `अरे अमूक एक गोष्ट अशी का ठेवलीय, अशी ठेवली तर किती छान होईल’. इंटिरियर डिझायनिंगची आवड हीही रूटकॉज असू शकते ह्याची. ट्रॅव्हलमध्ये आले नसते तर नक्कीच आर्किटेक्चर हे क्षेत्र निवडलं असतं.फर्निचरची अदलाबदल करणं हा माझा छंद आहे हे मात्र निश्चित. सुधीरच्या मते हा त्रास आहे. माझ्या मुलांच्या मते मम `ऑबसेसिव्ह कम्पल्सिव्ह डिस्ऑर्डर’ (OCD) ची केस आहे. सासूबाई आणि टीमच्या मते माझं डोकं फिरलंय. हा हा हा... माझं व्यक्तिमत्व सर्वांगाने फुललंय असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी काहीही म्हणो, मी मात्र ह्याला, `माय क्वेस्ट फॉर एक्संलन्स’ असं म्हणते. जे आहे जसं आहे ते आपल्याला भाग्याने वा नशिबाने मिळतं. पण ते आणखी सुंदर करणं आपल्या हातात आहे. मग ती आपली बाथरूम असो वा रूम, आपलं घर वा आपलं ऑफिस, आपली माणसं वा आपलं मित्रमंडळ, आपलं राज्य वा आपला देश किंवा अगदी `वसुधैव कुटुम्बकम्’. आपण नेहमी, जे आहे जसं आहे, ते आहे त्यापेक्षा आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. `लेट्स डू अवर बिट, बट डू इट’. तक्रार करीत बसायचं नाही. हो म्हणजे किती सोप्पं आहे बघा नं. दोनच गोष्टी असतात, विसंवादी वातावरण निर्माण झालं तर त्यातून पूर्णपणे बाहेर पडायचं किंवा जर ते शक्य नसेल तर विसंवाद संवादात बदलायचा अगदी पराकोटीचा प्रयत्न करायचा. तक्रारीचा सूर आळवत बसायचं नाही. आपल्या आयुष्याची संपूर्ण महफिल उधळवून टाकण्याची ताकद त्या पहिल्या तक्रारीच्या सूरात आहे. तेव्हा वेळीच सावध होणं गरजेचं आहे. मागे एकदा उल्हास लाटकरांच्या अमेय प्रकाशन द्वारे मी व्हर्जिन ॲटलँटिकच्या रिचर्ड ब्रॅनसनचं `स्क्रृ इट, लेट्स डू इट’ ह्या पुस्तकाचं भाषांतर केलं होतं. आता हा ना माझा छंद होता ना व्यवसाय पण ब्रॅनसनच्या मॅनेजमेंट थीअरीवाल्या त्या छोट्याशा पुस्तकाचं भाषांतर करण्याचा आग्रह त्यांनी धरला आणि मीही ते करून दिलं, कारण मूळ इंग्लिश पुस्तक मला आवडलं होतं. त्याचं नावंच खूप काही सांगून जातं. पुस्तकाचा मतितार्थ असा की, काहीही करायला घेतलं की त्यात रिस्क असतेच, घ्या ती रिस्क आणि कामाचा शुभांरभ करा. जस्ट डू इट, कधी कधी वुई विल स्क्रृ इट, छोटा मोठा गोफ्लधळ होईल, नेव्हर माईंड, बाहेर या त्यातून पण भीतीने काही करायचंच नाही असं करू नका. आता ते पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे की नाही माहित नाही पण संग्रही ठेवण्यासारखं नक्कीच आहे. असो; एक मात्र मी माझ्यासाठी ठरवून टाकलंय, आयुष्यात अजिबात तक्रार करीत बसायचं नाही आणि पुढे जाऊन पश्चाताप करावा लागेल असं काम आपल्या हातून होऊ द्यायचं नाही.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरीता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.