लेह लडाख हे काही लंडन न्यूयॉर्कसारखं प्लेझर डेस्टिनेशन नाही. पण शहरांच्या झगमगाटाला विसरत हिमालयातील ह्या खडतर भूभागातील स्थानिकांची आयुष्याशी चाललेली झुंज जेव्हा आपण बघतो, अत्यल्प सुविधांमध्ये आनंदी आणि शांत कसं रहायचं हे जाणतो तेव्हा जागतिक स्पर्धेची शिकार बनलेल्या-एव्हरीथिंग इज वाँटेड यस्टरडे! वाल्या आपल्या अशांत मनाला थांबवावसं वाटतं. शरीराला-विचारांना- कामांना थोडा ब्रेक द्यावासा वाटतो. मेडिटेशन ह्यापेक्षा वेगळं काय असतं बरं!
हुश्यऽऽऽ! आज तेवीस जून म्हणजे प्रॅक्टिकली आम्ही समर व्हेकेशनच्या सुपर पीक सीझनमधून बाहेर आलो. तसं बघायला गेलं तर संपूर्ण ट्रॅव्हल इंडस्ट्री ह्या तीन महिन्यांसाठी काम करीत असते. ह्यावर्षी पुलवामा अटॅक, ऐन सीझनमध्ये जेट एअरवेजचं भारतीय विमान-अवकाशातून संपूर्णपणे नाहीसं होणं, निवडणूकांच्या रणधुमाळीत सर्वच व्यवसायांमध्ये आलेली आर्थिक उदासिनता ह्यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणे आमचंही पर्यटनक्षेत्र स्लो डाऊनचं शिकार बनलं. काय कसं काय? असं कुणी विचारलं की म्हणायचं, सर्वाइव्हड्! ट्रायल टाईम म्हणजे काय ते ह्या सीझनने दाखवून दिलं. अर्थात ऑल्ज् वेल दॅट एन्डज् वेल असं म्हणायला हरकत नाही कारण आपल्या भारताच्या केंद्रस्थानी एकहाती सत्ता एकवटत बळकट सरकार आलं, प्रो-टूरिझम सरकार आलं, त्यामुळे पर्यटनक्षेत्राला चांगले दिवस येतील, इतर देशांप्रमाणे आपल्याही देशात टूरिझम फोफावेल आणि देशाच्या विकासात टूरिझम अग्रस्थानी येईल ही आम्हा सर्वसामान्यांची फार दिवसांची इच्छा पूर्ण होईल ही आशा बाळगून आम्ही उज्ज्वल भविष्याकडे नजर लावीत पुढच्या कामाला सुरुवात केली. सीझनच्या सुरुवातीला ज्यावेळी एकापाठोपाठ एक धक्के बसत होते तेव्हा, जो होगा सो होगा, लेट्स कीप काल्म! असा लेख लिहिला होता, आणि खरंच बर्यापैकी सीझन पार पडला. भारतात काश्मीरपासून अंदमानपर्यंत, लेह लडाख हिमाचलपासून नॉर्थ ईस्ट अरुणाचलपर्यंत आणि परदेशात अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत, जपानपासून जोहान्सबर्गपर्यंत आणि युरोपपासून साऊथ ईस्ट एशियापर्यंत सर्व सहली व्यवस्थित पार पडल्या. पर्यटकांचं सहकार्य, देशविदेशातील असोसिएट पार्टनर्सची साथ, संपूर्ण वीणा वर्ल्ड टीमची अहोरात्र मेहनत आणि वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्सचा सहलीवरचा दणदणीत परफॉर्मन्स ह्यामुळे पर्यटकांना त्यांच्या हॉलिडेचा आनंद आम्ही देऊ शकलो. नव्याण्णव टक्के खडा परफॉर्मन्स असंच म्हणता येईल ह्याला. एक टक्का मुद्दाम राखून ठेवते कारण कुठेतरी काहीतरी वाव असणारच आहे सुधारणेला. आता एक फळी त्यावर काम करेल. काय चांगलं झालं ह्यात अडकून पडण्यापेक्षा ह्या सीझनच्या ताज्या इतिहासातून शिकत पुढे निघालोय. कारण वीणा वर्ल्डकडून चांगल्याचीच अपेक्षा आहे, ते केलं तर त्यात काय मोठ्ठं? इट्स एक्सपेक्टेड! ह्याची कल्पना आम्हाला आहे. स्वत:ची पाठ थोपटण्यात-त्यात मशगूल राहण्यात वेळ न घालवता लागलीच पुढच्या सीझनची तयारी सुरू केलीय.
वुमन्स स्पेशलच्या निमित्ताने दरवर्षी तीन वेळा मी लेह लडाखला भेट देते. जून सुरू झाल्या झाल्या त्यातली पहिली वारी मी केली. ह्यापुढे कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने 26 जुलै दरम्यान निघणार्या आणि पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे च्या वुमन्स स्पेशलसाठी मी तिथे जाऊन आमच्या ह्या मैत्रिणींना भेटेन. दरवर्षी तीन वेळा लेह लडाखला जाते म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात. बरोबरच आहे कारण लेह लडाख हे काही लंडन न्यूयॉर्कसारखं प्लेझर डेस्टिनेशन नाही. इथे ऑक्सिजन लेव्हल कमी आहे, रस्ते अधूनमधून आहेत, अॅकोमोडेशन आणि अॅमिनिटिज बेसिक आहेत, इंटरनेट कधी कधी मिळतं... हे सगळं माहित असूनही आम्ही दरवर्षी जे हजारो पर्यटक लेह लडाखला घेऊन जातो त्यांना सलाम म्हणून त्यांचं प्रातिनिधित्व करणार्या वुमन्स स्पेशल सोबत आलेल्या सात ते सत्तर वर्षाच्या महिलांना-मुलींना भेटणं मला कर्तव्य वाटतं. लेह लडाख हे कोणत्याही तीर्थक्षेत्राहून कमी नाही. शहरांच्या झगमगाटाला विसरत हिमालयातील ह्या खडतर भूभागातील स्थानिकांची आयुष्याशी चाललेली झुंज जेव्हा आपण बघतो, अत्यल्प सुविधांमध्ये आनंदी आणि शांत कसं रहायचं हे जाणतो तेव्हा जागतिक स्पर्धेची शिकार बनलेल्या- एव्हरिथिंग इज वाँटेड यस्टरडे! वाल्या आपल्या अशांत मनाला थोडंसं थांबवावसं वाटतं. आपल्या शरीराला-विचारांना- कामांना थोडा ब्रेक द्यावासा वाटतो. मेडिटेशन ह्यापेक्षा वेगळं काय असतं. वुमन्स स्पेशलला भेटणं हा बहाणा झाला, खरंतर मी ह्या मेडिटेशनसाठी-स्वत:च्या स्वार्थासाठी लेह लडाखला जाते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
पर्यटकांच्या लेह लडाखला जाण्यामध्ये तेथील अद्वितीय, अप्रतिम आणि अवाढव्य हिमालयाचं रांगडं रूप आहेच पण त्याहीपेक्षा आणखी एक अत्युच्च आणि अतुल्य गोष्ट लेह-लडाखला आहे आणि ज्यासाठी अनेक पर्यटक इथे येतात, ते म्हणजे आपले जवान. हीमवर्षाव, थंडी, वारा, पाऊस, ऊन, हीमवादळं ह्या कशाचीही पर्वा न करता खडतर-डोंगराळ-पहाडांमध्ये खडा पहारा देत आपल्या सरहद्दीचं रक्षण करणारे, वेळप्रसंगी जीवाची बाजी लावणारे जवान जेव्हा आपण खार्दुंगला पास किंवा चांगला पास ओलांडताना ठिकठिकाणी बघतो तेव्हा तर नतमस्तक व्हायला होतं. काही पर्यटक आपल्या जवानांना साष्टांग दंडवत घालताना मी पाहिलेयत. पैसा-अत्याधुनिक सुखसुविधा- मौजमजा-पॉवर ह्या सगळ्याच्या पुढे किंवा ह्या सगळ्याला खुजं ठरवत आयुष्यात स्वत:च्या पलीकडे एक मोठा मकसद असू शकतो हे तिथला प्रत्येक सेल्फलेस जवान आपल्याला दाखवून देत असतो. पँगाँगकडे वा नुब्रा व्हॅलीकडे जाताना अनेक छावण्यांमधून गस्त घालणारे असंख्य जवान आपल्याला आयुष्यभर पुरेल इतकी शिकवण देऊन जातात. माईंड कंट्रोल वा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला मिळणार नाही इतकं मोठं शिक्षण आपल्याला ह्या भारताच्या शीरावर विराजमान झालेल्या लेह लडाखच्या भूभागात मिळू शकतं. अर्थात हे आगळं मेडिटेशन करण्यासाठी मन सजग हवं, दृष्टीकोन विशाल हवा आणि डोकं शांत असावं. मग घेशील किती दो कराने अशी अवस्था होईल. म्हणूनच म्हटलं की मी माझ्या स्वार्थासाठी स्वत:ला शांत करण्यासाठी लेह लडाखला जात असते.
लेह लडाख म्हणजे खरंतर राकट रागंडा काहीसा रुक्ष संपूर्ण वेगळा पण तरीही आकर्षक दिसणारा हिमालय. भारतातील सर्वात उंचावरचे (बहुतेक भाग दहा हजार फूटांवर) पठार म्हणून लडाख ओळखला जातो. हिमालयाच्या उत्तुंग शिखरांमुळे इथे पावसाच्या ढगांना जणू नो एंट्री असते, त्यामुळे इथे वर्षभरात फक्त नव्वद मिलीमिटरच पाऊस पडतो. मात्र हिवाळ्यात इथले तापमान कायम उणे अंशांवर असते, म्हणून तर लडाखला कोल्ड डेझर्ट म्हणतात. या भागाच्या भौगोलिक स्थानामुळे अगदी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून हा भाग व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा होता. चायनामधून युरोपकडे जाणारे व्यापारी तांडे लडाखमधूनच जायचे. आजही त्या काळाच्या खुणा नुब्रा व्हॅलीतल्या टू हम्प्ड कॅमल्सच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
लडाखला हिमालयातील वनश्रीचे हिरवे सौंदर्य लाभलेले नाही, पण या हिरवाईची उणीव इथे झळाळत्या निळाईने भरुन काढलेली आहे. ही निलमण्याची निळी छटा आपल्यासमोर मूर्तीमंत अवतरते ती पँगाँग लेकमध्ये. 14,270 फूटांवरील हे सरोवर म्हणजे लडाखच्या सौंदर्यातील सफायर आहे. 134 कि.मी.चा परिसर व्यापणारा हा तलाव भारत आणि तिबेट (चीन) असा मिळून पसरलेला आहे. हिवाळ्यात हा तलाव गोठतो आणि त्याच्या निळ्या निळ्या पाण्याचे रुपांतर बर्फात होते. आमीर खानच्या थ्री इडियट्स चित्रपटाचे शूटिंग या तलावाच्या काठावर झाल्यानंतर भारतीय पर्यटकांना या ठिकाणाचे विशेष आकर्षण वाटू लागले. या हिमालयातील वाळवंटात खर्याखुर्या वाळवंटासारख्या वाळूच्या टेकड्याही आहेत. या सँड ड्युन्स पाहायला मिळतात नुब्रा व्हॅलीमध्ये. हिमालयातील हे वाळवंट बघायला जाताना, जगातल्या हायेस्ट मोटरेबल रोडवरून, म्हणजेच खार्दुंगला पासवरनं (17,582 फूट) प्रवास करावा लागतो. नुब्रा व्हॅलीमध्ये तिथल्या वाळूच्या टेकड्यांवर डबल हम्प्ड कॅमलची सफारी करण्याचा अनोखा अनुभव घेता येतो. इथल्या डिस्कीट मॉनेस्ट्रीबाहेर उभारलेला, 32 मीटर उंचीचा भव्य मैत्रेय बुध्दाचा (फ्युचर बुध्दा) पुतळा लांबूनच लक्ष वेधून घेतो. लडाखच्या भेटीचे आणखी एक आकर्षण म्हणजे सिंधू नदी. आपल्या भारतीय परंपरेतील सर्वात महत्वाची ही नदी, याच नदीकिनारी आपल्या पूर्वजांनी प्रागैतिहासिक काळात मोठमोठी नगरे उभारली होती, याच नदीच्या आश्रयाने भारतीय संस्कृतीचा श्रीगणेशा झाला होता. त्यामुळे ही नदी बघण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात असते, जी लडाखच्या सहलीत पूर्ण होते. इथे सिंधू आणि झंस्कार या नद्यांचा संगम पाहायला मिळतो. लेह शहरात जशा ऐतिहासिक वास्तू आहेत, त्याचप्रमाणे आधुनिक काळात निर्माण झालेले लँडमार्क्सही आहेत, त्यातला एक म्हणजे जपानच्या पीस पॅगोडा मिशनच्या अंतर्गत उभारण्यात आलेला शांती स्तुप. यामध्ये मध्यभागी बुध्दाची सुवर्ण प्रतिमा पाहायला मिळते. तसेच भगवान बुध्दांचा जन्म, निर्वाण आणि त्यांनी केलेले दुष्ट शक्तींचे निर्दालन याच्या शिल्पाकृती पाहायला मिळतात. लेह शहराजवळच 555 वर्षांपूर्वी बांधलेला श्येय पॅलेस आहे. इतिहासकाळात लडाखचा राजा उन्हाळ्यात या पॅलेसमध्ये निवास करत असे. आता या पॅलेसचे रुपांतर मॉनेस्ट्रीमध्ये करण्यात आले आहे आणि इथे लडाखमधील बुध्दाची सर्वात मोठी सुवर्ण प्रतिमा आहे.
लेह-लडाखच्या सहलीत जेव्हा ठीक-ठिकाणी, रस्त्यांवर, मोक्याच्या जागांवर, उंच पहाडांमध्ये, निर्मनुष्य भागात आपले जवान कर्तव्यदक्षपणे गस्त घालताना, पहारा देताना, आपली बॉर्डर सांभाळताना दिसतात तेव्हा आपोआप कानात लक्ष्य सिनेमातल्या कंधो से मिलते है कंधे, कदमों से कदम मिलते है या गाण्याचे सुर घुमू लागतात. लडाखच्या टोकाच्या विषम हवामानात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जराही न थकता, न कंटाळता अतिशय निष्ठेनं आणि कणखरपणे आपलं कर्तव्य बजावणारे भारतीय जवान पाहिल्यावर ते खरोखरच हिमालय से ऊँचा असल्याची खात्री पटते. या हिमालयाहून उंच असलेल्या भारतीय सैनिकाचे आणि त्याच्या शौर्याला आपल्या खडतर वातावरणाचे कोंदण देणार्या हिमालयाचे जवळून दर्शन घडते ते वीणा वर्ल्डच्या लेह-लडाख टूर्समध्ये. तर मग येताय ना? यावर्षी शहरांच्या झगमगाटापासून, अत्याधुनिक सुखसोईंपासून थोडे दूर जाऊया, नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी बघूया, अनुभवूया आणि जय जवान म्हणत नतमस्तक होऊया.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.