किलीमंजारो पादाक्रांत केल्यावर आणखी मोठं शिखर काबीज करण्याची इच्छा होणं हे ओघाने आलंच, मग डायरेक्ट एव्हरेस्ट का नको? आयुष्यात ध्येय असावं तर ते असंच उंच असावं, सहज पार करण्यासारखं नसावं. खस्ता खात, अनेक वेळा धडपडल्यावर, कित्येक वेळा हा नाद सोड अशी मनःस्थिती होऊनही दटे रहो और एक बार, और एक बार असं म्हणत, प्रयत्नांची अखंड पराकाष्ठा केल्यावर जेव्हा ते हासिल होतं त्याला ध्येय म्हणायचं. साध्या गोष्टी सगळेच करतात, त्या कराव्या लागतात.
आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी असतात ज्याकडे आपण डोळे लावून बसलेलो असतो. आम्ही तसं बघायला गेलो तर सगळे मी, सुधीर, सुनिला, नील आणि राज एकाच ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसतो, वेगवेगळी कामं करतो. दिवस-दिवस भेट होत नाही कामांच्या एकूणच धकाधकीमुळे आणि म्हणूनच जेव्हा केव्हा सगळे मुंबईत असतील तेव्हा वुई लूक फॉरवर्ड टू अवर लंच टाईम. हा आमचा ऑफिसमधला अड्डा. कामाचे विषय न काढता इतर अनेक गोष्टींवर चर्चा करायला, बालीवूड गॉसिप्स चघळायला मिळण्याचं हे ठिकाण आणि वेळ, त्यामुळे दुपारचा दीड वाजला की कोणत्याही मिटिंगमध्ये लक्ष लागत नाही. आणि वह्या-पुस्तकं, कॉम्प्युटर-लॅपटॉप बंद करुन आम्ही पिटाळतो स्वतःला आणि सगळ्यांनाच लंच अड्ड्यावर. साराची दहावीची परीक्षा कशी सुरू आहे? शिल्पाची नॉदर्न लाइट्सी टूर कशी झाली? माझ्या मागच्या आठवड्यातल्या दुबई वारीतले नवीन फाइंडिंग्ज काय? असे एकापाठोपाठ एक विषय आदळत असताना सुनिलाचे डोळे बोलायला लागले आणि मागून शब्द आले, मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचं निश्चित केलंय. काय म्हणतेस? आता सगळ्यांचे डोळे विस्फारले कारण अजून सप्तखंडाला प्रदक्षिणा घातलेल्या आम्हा सर्वांमध्ये एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्याचा विचार कुणीच केला नव्हता. ही गोष्ट आजच्या लंच टाईमची ताजा खबर होती. पण सुनिला तिथेच थांबली नाही, ती म्हणाली, आणि माझं एव्हरेस्ट बेस कॅम्पचं स्वप्न जर पूर्ण झालं तर आय विल लूक फॉरवर्ड टू कॉन्करिंग माऊंट एव्हरेस्ट आता आमच्या विस्फारलेल्या डोळ्यात आ वासलेल्या तोंडाची भर पडली. बेस कॅम्पर्यंत ठीक होतं पण एव्हरेस्टला माथ्यावर जायचं म्हणजे जरा जास्तच बोललीस सुनिला असं नाही वाटत! आमच्यातनं थोडा जळका सूर बाहेर पडला. शेवटी आम्हीही माणसंच आहोत नं, आमच्या विचार करण्याआधी तिने हे जाहीर करून टाकलं होतं त्यामुळे थोडी जलन होणं साहजिक आहे, साधीसुधी नाही, एव्हरेस्ट सर करण्याची गोष्ट होती. सुनिलाने तिच्या अनेक प्रकारच्या ध्येयामध्ये हे एक अतिउच्च ध्येय आपल्या नजरेसमोर ठेवलं होतं. असं काहीतरी सहजासहजी साध्य न होणारं ध्येय आपल्या प्रत्येकाच्या समोर सतत असायलाच हवं, ज्यामुळे आयुष्यातल्या अडचणी छोट्या वाटायला लागतात आणि ती चॅलेंजेस सोडवायला त्या उमेदपूर्ण मनाने उत्साह जागृत होतो. सुनिला तू भले एव्हरेस्ट सर कर, मी चाळीशीच्या आत शंभर देश पूर्ण करणार. नीलने त्याची इच्छा टेबलावर मांडली. मी कशी मागे राहणार, मी म्हटलं, आपण वीणा वर्ल्ड सुरू केलं तेव्हाच मी जाहीर केलंय, मला चंद्रावर जायचंय, सो सर्वांपेक्षा उंचावरचं माझं डेस्टिनेशन, राज ही चढाओढ बघून गालातल्या गालात हसत होता. प्रियाका आणि प्रणोती म्हणाल्या, सुधीर सर तुमचं काय? सुधीर म्हणाला, हे सगळे हवेत आणि उंचावर उडत असतील तर कुणीतरी इथे बेसला किल्ला सांभाळत बसायला नको. ते काम माझ्याकडे चालूनच आलंय असं दिसतेय. फादर ऑफ द ऑर्गनायझेशनने रास्त मत मांडलं. एकूणच आमची चर्चा हाय लेव्हल ग्राऊंडवर झाली.
सुनिलाने गेल्या वर्षीच किलीमंजारो ह्या टांझानियातल्या शिखराला गवसणी घातली. ते ही तसं कठीण शिखर पण ते एकदा पादाक्रांत केल्यावर आणखी मोठं शिखर काबीज करण्याची इच्छा होणं हे ओघाने आलंच मग डायरेक्ट एव्हरेस्ट का नको? आयुष्यात ध्येय असावं तर ते असंच उंच असावं, सहज पार करण्यासारखं नसावं. खस्ता खात, अनेक वेळा धडपडल्यावर, कित्येक वेळा हा नाद सोड अशी मनःस्थिती होऊनही दटे रहो और एक बार, और एक बार असं म्हणत, प्रयत्नांची अखंड पराकाष्ठा केल्यावर जेव्हा ते हासिल होतं त्याला ध्येय म्हणायचं. साध्या गोष्टी सगळेच करतात, त्या कराव्या लागतात. उठणं, आंघोळ करणं, ऑफिसला जाणं, परत येणं, जेवणं, झोपणं हे रूटिन आहे, त्यात उत्साह भरायला हवा असेल तर किमान एक ध्येय आपल्या सर्वांनाच असं सतत समोर ठेवायला हवं की उठता बसता झोपता आपल्याला ते दिसायला हवं. आज आपण काहीही असो, कुठेही असो पण लक्ष मात्र त्या लक्ष्यावर असावं तर ते अगदी शंभर टक्के हासिल होतं. मला हे एकाच आयुष्यात दोनदा करायला मिळालं. आत्ता त्याच्या पुढचं ध्येय समोर ठेवायचंय.
सुनिलाने एव्हरेस्ट सर करण्याचं लक्ष्य ठेवलंय, आणि एव्हरेस्ट दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रयत्न ह्याच्या जोरावर साध्य करता येतं हे अरूण्णिमा सिन्हा ने आपल्याला दाखवून दिलंय. आपणा सर्वांनाच एव्हरेस्टची ओढ असते आणि आहे. काठमांडूला पर्यटक जेव्हा सहलीला येतात तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, आम्हाला एव्हरेस्ट बघायला मिळेल का? पण खरंखुरं एव्हरेस्ट सर करता येणं सर्वांनाच शक्य नाही ही वस्तूस्थिती आहे. ते तेव्हढं सोप्पं नाही म्हणून ते एक सर्वोच्च ध्येयाच्या यादीतलं आहे. एव्हरेस्ट मला तरी ध्येयतीर्थ वाटतं. पर्यटनाचा विचार करायचा तर आम्हा पर्यटकांचंही एक एव्हरेस्ट असतं, आम्ही एक कॅम्पेन ह्यावर केलं होतं, त्याचं टायटल होतं, माझं एव्हरेस्ट मला ते कुठे सापडेल? दोन अर्थांनी आम्ही हे कॅम्पेन बनवलं होतं, एक म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक लाँग टर्म बिग गोल ठरवला पाहिजे आणि तो एव्हरेस्टसारखा असावा उंच, अढळ आणि कठीण. आयुष्याला ऊर्जा, उत्साह आणि शक्ती देण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. दुसरा अर्थ होता तो म्हणजे प्रत्येक पर्यटकाला असलेली एव्हरेस्ट शिखराची ओढ. ते बघायला आपल्याला काठमांडूला-नेपाळला जावं लागतं. पण एव्हरेस्ट हे शेवटी अवाढव्य पसरलेल्या हिमालयाचं एक उंच शिखर आहे. काश्मिरपासून नॉर्थ ईस्टपर्यंत आपल्या भारतावर पसरलेला हिमालय त्याची संपूर्ण लांबी इतर देशातलीही धरली तर गोवा ते जम्मू हे अंतर जेवढं आहे तेवढी आहे आणि त्याची रुंदी ही सर्वात जास्त चारशे किलोमीटर्स एवढी आहे. त्याची शिखरं आपल्याला अनेक ठिकाणाहून दिसतात. काराकोरम, पिर पंजाल, मणिमहेश, कैलाश, धौलाधार, शिवालिक, नंदादेवी, कांचनजुंघा, मनास्लु, अन्नपूर्णा ह्या नावांनी आपण त्याचं दर्शन घेत असतो, मग ते दार्जिलिंगच्या टायगर हिलवरून असेल, मनालीच्या पहाडांतून असेल, नैनितालच्या टेकड्यांमधून आपल्याला दिसेल, डलहौसीवरून किंवा धरमशालावरून हे आपल्याला दिसत राहतं. ज्या ज्या वेळी वातावरण एकदम स्वच्छ असतं त्या त्या वेळी पाढंर्याशुभ्र बर्फाने मढलेली शिखरं दिसायला लागतात आणि आम्हा पर्यटकांना एव्हरेस्ट गवसल्याचा आनंद देतात. त्या सहलीपुरतं आम्हाला आमचं एव्हरेस्ट सापडलेलं असतं. ते समाधान वेगळंच असतं.
ह्या कॅम्पेनपासून मला सवयच लागलीय अधुनमधून स्वतःलाच प्रश्न विचारायची. माझं एव्हरेस्ट? काय आहे ते? कुठे आहे ते? कधी मला ते सापडेल? एव्हरेस्ट हे जसं गिर्यारोहकांसाठी सर्वोच्च शिखर आहे तसंच आपला एक लाँग टर्म गोल किंवा पर्पज ठरवून ठेवायचा, आणि मग दुसरे एव्हरेस्टच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मोठ्या शिखरांसारखे गोल ठरवायचे. एक गोल ठेवून चालत नाही सध्याच्या मल्टिटास्किंगच्या जगात. एका लाँग टर्म गोलवर कॉन्सनट्रेट करताना छोट्या मोठ्या गोलांना विसरून चालत नाही. आता आमच्या बाबतीत विचार केला तर आमचा एव्हरेस्टसदृश गोल आहे तो म्हणजे, चलो बनाए भारत की सबसे बडी ट्रॅव्हल कंपनी, मोस्ट अॅडमायर्ड ट्रॅव्हल कंपनी आता हा गोल साध्य करायला अजून काही वर्ष लागणार आहेत, त्यादृष्टीने चालत असलेली मार्गक्रमणा बरोबर दिशेने चालू आहे का? कुठे कुणी दमलं-थकलं नाही ना? कुणाच्या मनात आपल्या पात्रतेविषयी किंवा क्षमतेविषयी साशंकता तर निर्माण झाली नाहीये ना? त्या मोठ्या गोलाचे जे छोटे छोटे माइलस्टोन आहेत ते वेळेत पार पाडले जाताहेत का? हे सगळं ठराविक कालावधीनंतर चेक करावं लागतं, गाडी कुठे डीरेल झाली असेल तर ती पुन्हा रूळावर आणून ठेवायला लागते. हा झाला एव्हरेस्ट गोल, सगळ्यात मोठा, सगळ्यात कठीण पण तरीही अशक्यप्राय नसलेला. तो आयुष्याचा मकसद बनून जातो आणि जळी स्थळी पाषाणी तो आपल्याला दिसायला लागतो. पण माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपल्यावर अनेक जबाबदार्या असतात. कुटुंबाप्रती-समाजाप्रती-देशाप्रती आपण काही देणं लागतो. त्याचा विसर पडता कामा नये. ही झाली आपली छोटी एव्हरेस्टस्. प्रत्येक दिवसाचं, महिन्याचं, तिमाईचं, सहामाहीचं, वर्षाचं, आयुष्याचं, माणसांचं, आईवडिलांचं, मुलांचं, शिक्षणाचं, सामाजिकतेचं एव्हरेस्ट ठरवून ठेवायचं आणि ते सर करायचं. हे प्रत्येक छोटं एव्हरेस्ट सर केल्यावर जो काही आनंद होतो तोच ऊर्जास्त्रोत बनतो मोठ्या एव्हरेस्टला, आयुष्याच्या मकसदला हासिल करण्याचा. तो आपला आपल्यातच करायला लागतो, उसना मागून नाही घेता येत त्यामुळेच रोजच्या रोज स्वयंप्रेरित होऊन आपण अनेक छोटी छोटी शिखरं पादाक्रांत करीत राहूया. आणि मग आयुष्यातल्या त्या मोठ्या एव्हरेस्टवर लिलया स्वारी करुन त्याला काबीज करूया.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.