पैसा-अत्याधुनिक सुखसुविधा-मौजमजा-पॉवर ह्या सगळ्याच्या पुढे किंवा ह्या सगळ्याला खुजं ठरवत आयुष्यात स्वत:च्या पलीकडे एक मोठा मकसद असू शकतो हे तिथला प्रत्येक जण आपल्याला दाखवून देतो. माईंड-बॉडी कंट्रोल वा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला मिळणार नाही इतकं मोठं शिक्षण ह्या ठिकाणी मिळतं. म्हणूनच म्हटलं की मी माझ्या स्वार्थासाठी, स्वत:ला शांत करण्यासाठी तिथे जात असते.
हुश्यऽऽऽ! आज सोळा जून म्हणजे प्रॅक्टिकली आम्ही समर व्हेकेशनच्या सुपर पीक सीझनमधून बाहेर आलो. तसं बघायला गेलं तर संपूर्ण ट्रॅव्हल इंडस्ट्री ह्या तीन महिन्यांसाठी काम करीत असते. ह्यावर्षी पुलवामा अटॅक, ऐन सीझनमध्ये जेट एअरवेजचं भारतीय विमान-अवकाशातून संपूर्णपणे नाहीसं होणं, निवडणूकांच्या रणधुमाळीत सर्वच व्यवसायांमध्ये आलेली आर्थिक उदासिनता ह्यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणे आमचंही पर्यटनक्षेत्र स्लो डाऊनची शिकार बनलं. काय कसं काय? असं कुणी विचारलं की म्हणायचं, सर्वाइव्हड्! ट्रायल टाईम म्हणजे काय ते ह्या सीझनने दाखवून दिलं. अर्थात ऑल्ज् वेल दॅट एन्डज् वेल असं म्हणायला हरकत नाही कारण आपल्या भारताच्या केंद्रस्थानी एकहाती सत्ता एकवटत बळकट सरकार आलं, प्रो टूरिझम सरकार आलं त्यामुळे पर्यटनक्षेत्राला चांगले दिवस येतील, इतर देशांप्रमाणे आपल्याही देशात टूरिझम फोफावेल आणि देशाच्या विकासात टूरिझम अग्रस्थानी येईल ही आम्हा सर्वसामान्यांची फार दिवसांची इच्छा पुर्ण होईल ही आशा बाळगून आम्ही उज्ज्वल भविष्याकडे नजर लावित पुढच्या कामाला सुरुवात केली. सीझनच्या सुरुवातीला ज्यावेळी एकापाठोपाठ एक धक्के बसत होते तेव्हा, जो होगा सो होगा, लेट्स कीप काल्म! असा लेख लिहिला होता, आणि खरंच बर्यापैकी सीझन पार पडला. भारतात काश्मीरपासून अंदमानपर्यंत, लेह लडाख हिमाचलपासून नॉर्थ ईस्ट अरुणाचलपर्यंत आणि परदेशात अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत, जपानपासून जोहान्सबर्गपर्यंत आणि युरोपपासून साऊथ ईस्ट एशियापर्यंत सर्व सहली व्यवस्थित पार पडल्या. पर्यटकांचं सहकार्य, देशविदेशातील असोसिएट पार्टनर्सची साथ, संपूर्ण वीण वर्ल्ड टीमची अहोरात्र मेहनत आणि वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्सचा सहलीवरचा दणदणीत परफॉर्मन्स ह्यामुळे पर्यटकांना त्यांच्या हॉलिडेचा आनंद आम्ही देऊ शकलो. नव्याण्णव टक्के खडा परफॉर्मन्स असंच म्हणता येईल ह्याला. एक टक्का मुद्दाम राखून ठेवते कारण कुठेतरी काहीतरी वाव असणारच आहे सुधारणेला. आत एक फळी त्यावर काम करेल. काय चांगलं झालं ह्यात अडकून पडण्यापेक्षा ह्या सीझनच्या ताज्या इतिहासातून शिकत पुढे निघालोय. कारण वीणा वर्ल्डकडून चांगल्याचीच अपेक्षा आहे, ते केलं तर त्यात काय मोठ्ठं? इट्स एक्सपेक्टेड! ह्याची कल्पना आम्हाला आहे. स्वत:ची पाठ थोपटण्यात - त्यात मशगूल राहण्यात वेळ न घालवता लागलीच पुढच्या सीझनची तयारी सुरू केलीय.
वुमन्स स्पेशलच्या निमित्ताने दरवर्षी तीन वेळा मी लेह लडाखला भेट देते. जून सुरू झाल्या झाल्या त्यातली पहिली वारी मी केली. ह्यापुढे कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने 26 जुलै दरम्यान निघणार्या आणि पंधरा ऑगस्ट इंडिपेन्डंस डे च्या वुमन्स स्पेशलसाठी मी तिथे जाऊन आमच्या ह्या मैत्रिणींनी भेटेन. दरवर्षी तीन वेळा लेह लडाखला जाते म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात. बरोबरच आहे कारण लेह लडाख हे काही लंडन न्यूयॉर्कसारखं प्लेझर डेस्टिनेशन नाही. इथे ऑक्सिजन लेव्हल कमी आहे, रस्ते अधूनमधून आहेत, अॅकोमोडेशन आणि अॅमिनिटिज बेसिक आहेत, इंटरनेट कधी कधी मिळतं... हे सगळं माहित असूनही आम्ही दरवर्षी जे हजारो पर्यटक लेह लडाखला घेऊन जातो त्यांना सलाम म्हणून त्यांचं प्रातिनिधित्व करणार्या वुमन्स स्पेशल सोबत आलेल्या सात ते सत्तर वर्षाच्या महिलांना-मुलींना भेटणं मला कर्तव्य वाटतं. लेह लडाख हे काणेत्याही तीर्थक्षेत्राहून कमी नाही. शहरांच्या झगमगाटाला विसरत हिमालयातील ह्या खडतर भूभागातील स्थानिकांची आयुष्याशी चाललेली झूंज जेव्हा आपण जाणतो, अत्यल्प सुविधांमध्ये अत्यंत आनंदी आणि शांत कसं रहायचं हे जेव्हा बघतो तेव्हा जागतिक स्पर्धेची शिकार बनलेल्या - एव्हरिथिंग इज नीडेड यस्टरडे! वाल्या आपल्या अशांत मनाला थोडंसं थांबवावसं वाटतं. आपल्या शरीराला - विचारांना- कामांना थोडा ब्रेक द्यावा असं मनात येऊन जातं. मेडिटेशन ह्यापेक्षा वेगळं काय असतं. वुमन्स स्पेशलला भेटणं हा बहाणा झाला, खरंतर मी ह्या मेडिटेशनसाठी - स्वत:च्या स्वार्थासाठी लेह लडाखला जाते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पर्यटकांच्या लेह लडाखला जाण्यामध्ये तेथील अद्वितीय, अप्रतीम आणि अवाढव्य हिमालयाचं रांगडं रूप आहेच पण त्याहीपेक्षा आणखी एक अत्युच्च आणि अतुल्य गोष्ट लेह-लडाखला आहे आणि ज्यासाठी अनेक पर्यटक इथे येतात, ते म्हणजे आपले जवान. हीमवर्षाव, थंडी, वारा, पाऊस, ऊन, हीमवादळं ह्या कशाचीही पर्वा न करता खडतर-डोंगराळ- पहाडांमध्ये खडा पहारा देत आपल्या सरहद्दीचं रक्षण करणारे, वेळप्रसंगी जीवाची बाजी लावणारे जवान जेव्हा आपण खारडुंगला पास किंवा चांगला पास ओलांडताना ठिकठिकाणी बघतो तेव्हा तर नतमस्तक व्हायला होतं. काही पर्यटक आपल्या जवानांना साष्टांग दंडवत घालताना मी पाहिलेयत. पैसा - अत्याधुनिक सुखसुविधा- मौजमजा - पॉवर ह्या सगळ्याच्या पुढे किंवा ह्या सगळ्याला खुजं ठरवत आयुष्यात स्वत:च्या पलीकडे एक मोठा मकसद असू शकतो हे तिथला प्रत्येक सेल्फलेस जवान आपल्याला दाखवून देत असतो. पँगाँगकडे वा नुब्रा व्हॅलीकडे जाताना अनेक छावण्यांमधून गस्त घालणारे असंख्य जवान आपल्याला आयुष्यभर पुरेल इतकी शिकवण देऊन जातात. माईंड-बॉडी कंट्रोल वा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला हे मिळणार नाही इतकं मोठं शिक्षण आपल्याला ह्या भारताच्या शीरावर विराजमान झालेल्या लेह लडाखच्या भूभागात मिळू शकतं. अर्थात हे आगळं मेडिटेशन करण्यासाठी मन सजग हवं, दृष्टीकोन विशाल हवा आणि डोकं शांत असावं. मग घेेेशील किती दोे कराने अशी अवस्था होईल. म्हणूनच म्हटलं की मी माझ्या स्वार्थासाठी स्वत:ला शांत करण्यासाठी लेह लडाखला जात असते.
जसं लेह लडाखला गेल्यावर अशांत मनाला, टू बी ऑर नॉट टू बी च्या विळख्यात सापडलेल्या चित्ताला शांत व्हायला होतं तसंच प्रत्येक प्रवास बरंच काही शिकवतो. केल्याने देशाटन... मनुजा चातुर्य येतसे फार हे शंभर टक्के खरं आहे. मागच्या आठड्यात सॅनफ्रान्सिस्कोवरून दिल्ली मार्गे मुंबईला येत होते. एक तास विमान लेट निघणार आहे ही खबर मिळाली होती. दिल्ली-मुंबई विमान त्याप्रमाणे अॅडजस्ट करून दिलं तिथल्या ऑफिशियलने, त्यामुळे मुंबईत पोहोचण्याच्या नवीन वेळेनुसार मी माझा पुढचा प्लॅन करीत होते. सतरा तासांचा मोठा प्रवास होता त्यामुळे आठ तास झोप आणि उरलेल्या वेळात जेवण खाणं सांभाळून रविवारची आर्टिकल्स लिहूया असा विचार करून विमानात बसले खरी पण विमान उडण्याचं कोणतंही चिन्ह दिसेना. विमानात बसल्यावर जप करण्याची माझी सवय आहे. तोेही आरामात करून झाला. मेन्यु कार्ड आणि फ्लाइट मॅग्झीन अथपासून इतिपर्यंत वाचून झालं पण रुसून बसल्यासारखं फ्लाइट काही ढिम्म हलेना जागचं. शेवटी एक अनाऊंसमेंट झाली. चार व्हॉलिंटीयर्स हवे होते, ज्यांना ह्या विमानातून उतरवलं जाईल आणि सात तासांनी असलेल्या पुढच्या विमानात त्यांना अॅकोमोडेट केलं जाईल आणि बिझनेस क्लासऐवजी त्यांना फर्स्टक्लासने प्रवास दिला जाईल. आधीच फ्लाइट लेट झालेलं, त्यात अनेकांची पुढची कनेक्शन्स, बॅगेजचं काय? ते कसं बाहेर काढणार? आणि ते पुढे गेलं तर ते पुन्हा व्यवस्थित मिळेल नं ह्याची चिंता. तिथल्या ऑफिशियलला विचारलं नेमकं काय झालंय तर तो म्हणाला, नियमानुसार क्रु ला विश्रांती मिळणं गरजेचं आहे ह्या सतरा-अठरा तासांच्या प्रवासात, पण त्यांची जी कॅबिन आहे झोपण्याची तिचा प्रॉब्लेम झालाय, त्यांना विश्रांतासाठी चार बिझनेस क्लास सीट्स हव्या आहेत. म्हणून आम्हाला चार पॅसेंजर्सना ह्या विमानातून उतरवून पुढच्या विमानाने न्यायचंय, जर ह्या सीट्स मिळाल्या नाहीत तर एअरपोर्ट ऑथॉरिटीज परवानगी देणार नाहीत आणि हे फ्लाईटच रद्द होईल. तुम्ही सिंगल पॅसेंजर आहात का? तुमच्याकडे बॅगेज आहे? मला पुढची कल्पना आली. जर मी हे फ्लाइट न घेता पुढच्या फ्लाइटने गेले असते तर सकाळऐवजी मध्यरात्री पोहोचणार होते मुंबईत म्हणजे दुसर्या दिवसाची आणि आधी करून ठेवलेल्या प्लॅनिंगची वाट लागणार होती. एव्हरीथिंग इज नीडेड यस्टरडे वाल्या मानसिकतेला हे कसं पटणार? पण तिथेच स्वत:ला आवरलं, प्रश्न केला व्हाय नॉट? लेट्स कीप काल्म! कुणीतरी बाहेर जायलाच हवं आणि मी त्यादृष्टीने एकदम आयडियल पॅसेंजर होते. सिंगल ट्रॅव्हलर - नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड, माझ्याकडे बॅगेज नव्हत - फक्त हँडबॅग आणि पर्स, मला उतरायला कहीच हरकत नव्हती. त्यांना म्हटलं, ओके आय अॅम रेडी! फ्लाइटमध्ये झोपायची तयारी केलेली मी एअरलाईनने दिलेल्या नाइटडे्रसच्या पोशाखात माझी हँड बॅग आणि पर्स घेऊन बाहेर आले. थोड्या वेळाने आणखी एक भारतीय मुलगी बाहेर आली, ती सुद्धा सिंगल होती. अजून दोन जणांचा शोध सुरू होता. आता ते आम्हाला हॉटेलला घेऊन निघाले होते. नवीन दोघं कोण येताहेत ह्याची वाट बघत आम्ही बाहेर थांबलो होतो. पंधरा-वीस मिनिटांनंतर तोच ऑफिशियल आला आणि आनंदी चेहर्याने म्हणाला, प्रॉब्लेम इज सॉलव्हड्, थँक्यू फॉर कोऑपरेशन, ह्याच फ्लाइटने तुम्ही निघू शकता? हुऽऽऽरेऽऽऽ! नो न्यू अॅडजस्टमेंट्स, आता माझा पुढचा कार्यक्रम ओरिजिनल प्लॅनप्रमाणे होणार होता. इथे एक मात्र बदल माझ्यात दिसला की वेळ-कामं-प्लॅनिंग ह्याबद्दलची जी सतत घाई-घाई सुरू असते, एक प्रकारची एँग्झायटी असते त्याला थोडा ब्रेक दिला होता. एक दिवस लेट गेल्याने जगात काहीही उलथापालथ होणार नाहीये, माझ्या उशीरा जाण्याने ऑफिसचीही कामं थांबणार नाहीयेत, हे मी मान्य केलं होतं, जस्ट रीलॅक्स! अॅडजस्ट युवरसेल्फ! कीप काल्म! जस्ट डू समथिंग अनप्लॅन्ड! त्या लेट झालेल्या फ्लाइटने मला अॅक्चुअली शांत केलं होतं.
प्रत्येक प्रवास असंच सतत काहीतरी देऊन जातो, शिकवतो, अनुभवसंपन्न करतो, विचारांना चालना देतो आणि म्हणूनच आवडतो. लेट्स कीप ट्रॅव्हलिंग, कीप लर्निंग!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.