आमची बाईक उलट्या लेनवरून थोडी निर्जन रस्त्यावर जाताना दिसली आणि आता वेगळीच भीती वाटायला लागली. देशोदेशी पर्यटकांना एकटं गाठून कसं लुटलं जातं त्या सगळ्या कहाण्या आठवायला लागल्या. मनी पर्स काढून त्याच्या हातात देऊया, पासपोर्टसह मला जाऊदे अशी रीक्वेस्ट करूया इथपर्यंत माझ्या मनात भीतिदायक विचारांची गर्दी झाली. दोन तीन मिनिटं ह्या रस्त्यावरून प्रवास केल्यावर गाडी थांबली.
ये रे ये रे पावसा... यावर्षी लेट होणार म्हणता म्हणता पाऊस महाशय तसे वेळेवर आले. आपल्या आणि सभोवतालच्या तापलेल्या अणू- रेणूंना दिलासा देऊन गेले. सुरुवात चांगली झालीय, आता हातचं काहीही न राखता त्याने मनसोक्त बरसावं आणि कोरड्या विहिरींना-शुष्क जमिनींना जीवनदान द्यावं ही इच्छा. आपल्या भारतात काही राज्यांमध्ये एक बरं आहे, उन्हाळा- पावसाळा-हिवाळा हेे ऋतुचक्र ठरलेलं आहे. उन्हाळ्यापूर्वीची तयारी-उन्हाळ्यात करायच्या गोष्टी, पावसाळ्यात घ्यायची खबरदारी-त्यासाठी करायची बेगमी तसंच हिवाळ्याचं वेलकम करताना घरातल्या कपाटात होणारी कपड्यांची आनंदी उलथापालथ हे सगळं आपण एन्जॉय करीत असतो. एखादा उत्सव आल्यासारखं आपण ह्या प्रत्येक ऋतचिं स्वागत करतो. दर चार महिन्यांनी निसर्ग आपल्या त्याच- त्याच रूटीन बनलेल्या आयुष्यात ह्या बदलांमुळे एक वेगळा उत्साह निर्माण करतो. आपण खरंच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जेव्हा जेव्हा मी काश्मीरला गेले तेव्हा तेव्हा तिथले आमचे हॉटेलियर्स दोन गोष्टींसाठी आश्चर्य व्यक्त करताना दिसले, एक आपल्याला इथे मिळालेला अथांग समुद्र आणि दुसरं म्हणजे चार-चार महिन्यांनी बदलणारं- शिस्तीत काम करणारं ऋतुचक्र. त्यांच्याकडे पाऊस कधीही पडतो आणि पावसामुळे साथीला कडाक्याची थंडीही येते. आता गुगल वेदर प्रीडिक्शन्स मदतीला आलंय अन्यथा प्रत्येक दिवस बेभरवशाचा. आपल्या आयुष्याला मात्र ह्या ठरलेल्या ऋतुमानाने एक आगळी शिस्तच लावलीय. वुई शूड मेक द मोस्ट ऑफ इट! आपल्याला हिमालयाचं पहिलं दर्शन घडतं तेव्हा आपल्या डोळ्यात आनंदाश्रू येतात तसं समुद्र पाहिल्यावर इच्छापूर्तीच्या अतिआनंदाने ढसाढसा रडलेले नॉर्थ इंडियन्स मी पाहिलेयत. तुझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आणि माझ्याकडे जे आहे ते तुझ्याकडे नाही म्हणून तर आपली एकमेकांना गरज आहे, आपण एकमेकांकडे जातो- येतोय. निर्सगाने समतोल साधून दिलाय, आपणाकडून त्याचा तोल ढासळता कामा नये ही खबरदारी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे.
सध्या पावसाळा एन्जॉय करूया. एक छत्री और हम है दो वाला मूड जगूया. रस्त्यावरचे खड्डे, त्यात साचलेलं पाणी आणि जाता जाता त्यात पचाक पचाक करीत पाय बुडवूया. एवढं लहान होऊ शकू का आपण? लेट मी एन्जॉय माय चाइल्डहूड! कुणी बघेल, कपडे खराब होतील, घरी गेल्यावर आई पट्टी घेऊन पूजा करेल अशी कसलीही चिंता नसायची तेव्हा. तेवढं बिनधास्त बनता येईल का? लेट्स ट्राय.
पावसाळा आला म्हणजे ट्रॅफिक जॅम ठरलेला. डोकं न तापवता त्याचाही आनंद लुटूया. दोन आठवड्यांपूर्वी बँकॉकमध्ये बेभरवशाच्या पावसाने शहराची दाणादाण उडवली. सकाळी सूर्य माथ्यावर तळपत होता, अंगाची लाही-लाही करीत होता. पावसाचं कोणतंही चिन्ह नव्हतं. माझं रात्रीचं फ्लाइट होतं बँकॉक दिल्ली सॅनफ्रान्सिस्को. प्रवास मोठा होता त्यामुळे व्यवस्थित विश्रांती घेतल्यानंतर दुपारी एखाद्या जापनीज रेस्टॉरंटमध्ये सुशेगाद जेवण घेऊन एअरपोर्टकडे निघूया असा विचार केला. माझी गाईड रोझीने निवडलेलं रेस्टॉरंट खूपच छान होतं, साधं होतं पण अगदी आत्ता बनवलेले ताजे पदार्थ बघून तबीयत खूश झाली. आम्ही दोघींनी यथेच्छ ताव मारला आणि जेवण झाल्यावर रेस्टॉरंट्समध्येच थोडा वेळ बसलो. तेवढ्यात तिला मेसेज आला. प्रचंड पावसामुळे बँकॉकमध्ये सर्वच रस्ते पाण्याखाली गेलेयत आणि सगळीकडे ट्रॅफिक जॅम झालाय लगेच एअरपोर्टला निघा. चेक इन टाईम सुरू व्हायला अजून साडेचार तास होते पण रिस्क नको कारण युएसए टूरची कमिटमेंट होती, आम्ही लागलीच बाहेर आलो. पहिला दणका बसला तो उतरल्या उतरल्याच. तिथे एक तास आधी येऊन प्रवासी उभे होते त्यांच्या गाडीची वाट बघत. ट्रॅफिक जवळ-जवळ ठप्प होतं किंवा मुंगीच्या पावलाने हलत होतं. जसा वेळ जात होता थोडी घालमेल व्हायला सुरुवात झाली. सव्वा तासाने आमची गाडी घेऊन ड्रायव्हर आला. एकदाचे विराजमान झालो आणि निघालो एअरपोर्टकडे. अजून तीन तास होते हातात, सरकेल ट्रॅफिक असा विचार करीत देवाचं नाव घेत मी सोबत नेलेल्या वृत्तपत्रातील अग्रलेखांची पानं वाचायला सुरुवात केली. करणार काय? कसे पोहोचू? पोहोचू की नाही? नाही पोहोचले तर अल्टरनेटिव्ह काय? ही चिंता सुरू करायला अजून एक दीड तास होता, त्यात ट्रॅफिक सुटला तर सोन्याहून पिवळं. आणि माझी गाईड रोझी होती नं चिंता करायला. ती चांगल्या तर्हेने पॅनिक व्हायला सुरुवात झाली होती. सो, व्हाय आय ऑल्सो शूड वरी? मी हसून तिला शांत रहायला सांगत होते. तासाभरात बर्यापैकी वाचन झालं आणि त्या पेपर्सचं ओझं हलक झालं. रोझी आत्तापर्यंत हवालदिल झाली होती कारण तिच्यावर मला एअरपोर्टला पोहोचवायची जबाबदारी होती. ती म्हणाली, कॅन यू ट्रॅव्हल बाय ट्रेन? वुई विल गो बाय मेट्रो मी म्हटलं, नो प्रॉब्लेम! हॅन्डबॅग आणि पर्सच आहे, काही इश्यू नाही. ओके, ट्रेन स्टेशन आलं की मी तुम्हाला सांगते असं म्हणत ती कोणतं मेट्रो स्टेशन जवळ आहे ते बघू लागली. आता मलाही चिंता वाटायला लागली होती. कधीही उतरायच्या तयारीतच बसले. गाडी काही हलेना. मोबाईलवर इमेल बघायला सुरुवात केली पण चित्त मात्र एअरपोर्ट-मिस्ड फ्लाइट-पुढचं काय? ह्याकडे लागलेलं. रोझी एव्हाना रस्त्त्यावर स्थानिकांशी मोठ्याने काहीतरी बोलताना दिसली. थोड्या वेळाने माझ्याकडे बघून म्हणाली, लेट्स गेट डाऊन, आपण ट्रेनने जाऊया. लागलीच खाली उतरले आणि तिला विचारलं, कुठे आहे, ट्रेन स्टेशन? रस्ता क्रॉस करायचा का? तर म्हणाली, नाही. ह्यावर बसा ते आपल्याला स्टेशनला सोडतील. दोन बाईकवाले तिने गोळा केले होते. हॅन्डबॅग तिने घेतली व ती एका बाईकवर आणि पर्स सांभाळत मी दुसर्या बाईकवर बसले. रोझी म्हणाली, डोन्ट वरी, मी मागे आहे तुमच्या. वीसेक वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात हार्ले डेव्हिडसनची राईड मी घेतली होती त्यानंतरची ही बाईक राईड असावी. तो बाईकवाला मात्र सुपरमॅन निघाला. कधी फूटपाथवरून, कधी दोन गाड्यांमधून, कधी उलट्या रस्त्यावरून त्याने अशी काय बाईक चालवली की विचारू नका. ट्रॅफिक रूल्सची ऐशी की तैशी झाली होती. सॉल्लिड मजा वाटत होती. फ्लाइट मिस होण्याची भिती होती पण राईड मी एन्जॉय करीत होते. ह्या पॅनिक अवस्थेतही तिला म्हटलं, माझा फोटो काढ. तिनेही लागलीच चार-पाच फोटो काढले. हो, माझं बाइक स्टेटस सगळ्यात महत्त्वाचं नाही का ह्या सोशल मीडियाच्या फोटो जगतात. थोड्या वेळाने मला रोझी मागे दिसेना. आमची बाईक उलट्या लेनवरून थोडी निर्जन रस्त्यावर जाताना दिसली आणि आता वेगळीच भीती वाटायला लागली. देशोदेशी पर्यटकांना एकटं गाठून कसं लुटलं जातं त्या सगळ्या कहाण्या आठवायला लागल्या. मनी पर्स काढून त्याच्या हातात देऊया, पासपोर्टसह मला जाऊदे अशी रीक्वेस्ट करूया इथपर्यंत माझ्या मनात भीतिदायक विचारांची गर्दी झाली. दोन तीन मिनिटं ह्या रस्त्यावरून प्रवास केल्यावर गाडी थांबली. समोर बघितलं तर वर एक जिना जात होता आणि स्टेशनचं स्ट्रक्चर दिसत होतं. हुश्श्य. उगाचच ह्या भल्या माणसाविषयी मी नको ते विचार मनात आणले, मलाच माझी लाज वाटली. त्याला मनापासून हात जोडून थँक्यू म्हटलं. तोपर्यत रोझी आली आणि आम्ही दोघी धावतच स्टेशनवर गेलो. वाटलं आता सुटलो, कारण इथून मेट्रोने एअरपोर्ट फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर होता. नऊचं फ्लाइट, आठच्या आधी मी पोहोचणार होते. पण पुढचं चॅलेंज वेगळंच होतं. स्टेशनवर मोठमोठ्या बॅगा घेऊन एअरपोर्टला निघालेल्यांची ही गर्दी. सगळीकडे अर्धा अर्धा किलोमीटरची रांग. आता शंभर टक्के मला फ्लाइट मिळणार नव्हतं. मी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचू शकणार नव्हते. रांगेतला प्रत्येकजण कासावीस झाला होता, सर्वांचाच खोळंबा ह्या पावसाने केला होता. प्रत्येकाने एअरपोर्टला जायला मेट्रोचा आधार घेतला होता. रांगेत कुणी घुसू देणार नव्हतं आणि तसं करणं हे मनालाही पटणारं नव्हतं. पण नेव्हर से डाय अॅटिट्यूड मला स्वस्थ बसू देत नव्हता. एक शेवटचा प्रयत्न करूया म्हणत मी तिथल्या ऑफिशियलला माझं एअर तिकिट दाखवून जेन्यूइन रीक्वेस्ट केली. भला माणूस होता, त्याने स्वत: येऊन प्लॅटफॉर्मवर जायचं गेट ओपन केलं. आम्ही एस्कलेटर घेऊन खाली आलो तर तिथे ट्रेनमध्ये घुसण्यासाठी प्रत्येक दारासमोर मोठमोठ्या शिस्तशीर रांगा. त्यांच्या त्या शिस्तीचं कौतुक वाटलं. त्या ऑफिशियलने मदत केल्यावर माझा कॉन्फिडन्स वाढला होता. आता माझी नजर तिथल्या सिक्युरिटीला शोधू लागली. डायरेक्ट त्या फ्लोरोसन्ट जॅकेट घातलेल्या गार्डकडे गेले आणि त्याला परिस्थिती कथन केली. त्याला इंग्लिश कळत होतं की नाही माहीत नाही पण परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन त्याने एका लाईनमध्ये आम्हाला पहिलं नेऊन उभं केलं. तिथे पहिला नंबर असलेल्या माणसाला परिस्थिती सांगितली, त्यानेही नो प्रॉब्लेम म्हटलं आणि हुश्य झालं. जी पहिली मेट्रो आली ती पूर्ण पॅक, आत जायला थोडीही जागा नाही. अशावेळी तो गार्ड आणि हा रांगेतला पहिला माणूस आमच्या मदतीला आला आणि त्यांनी आम्हाला त्या गाडीत अक्षरश: ढकललं. जपानमध्ये काही ट्रेन रूट्सवर पॅसेंजर्सना ट्रेनमध्ये आत ढकलायला पगारी माणसं ठेवलेली असतात ते व्हिडीयोज आठवले. ट्रेनचं दार बंद झालं आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला. नऊचं फ्लाइट, आठ वाजता आम्ही सुवर्णभूमी मेट्रो ट्रेन स्टेशनवर उतरलो. तिथून एस्कलेटर्स, जीने, लिफ्टच्या साह्याने वर खाली करीत दहा मिनिटांत चेक इन काऊंटरला पोहोचलो. काऊंटर पर्सनने बोर्डिंग पास रेडी ठेवला होता. ती म्हणाली, नाऊ रीलॅक्स आज बरीच माणसं पोहोचली नाहीयेत. फ्लाइट अर्धा तास लेट झालंय. सोबत अटेंडंटही दिला आणि मी निघाले युएसएला.
ट्रॅफिक जॅमला आपल्या प्रत्येकाला कधीना कधी सामोरं जावं लागतंच. कधी लँड स्लाईड, कधी वादळ, कधी मोर्चे, कधी फेस्टिवल्स तर कधी रोड कन्स्ट्रक्शन्स. जगात मेक्सिको सिटी, बँकॉक, इस्तंबूल, रिओ दी जनिरो, बिजिंग, लॉस एंजिलिस, मॉस्को, न्यूयॉर्क, लंडन अशा अनेक मोठ्या शहरांना ट्रॅफिकच्या समस्येने पछाडलं आहे. टोकियो सुद्धा तसंच पण जपानने रिंग रोड्स, इलेक्ट्रॉनिक्स टोल पेमेंट, एकदम एफिशियंट रेल्वे-सबवे ऑप्शन्स आणून ट्रॅफिक समस्या बर्यापैकी आटोक्यात आणली. सिंगापूरसारख्या शहराने आधीच भविष्याचा अंदाज घेऊन स्थानिकांना गाड्या घेण्यावरच प्रचंड रेस्ट्रिक्शन्स आणले. गाडी घेणं इतकं डोकेदुखीचं आणि खर्चिक केलं की लोकं अगदी गरज असेल तरच गाडी घेतात. एका घरात शक्यतो एक वा दोन गाड्या. आपल्याकडेही असं काहीतरी करायला हवं. ट्रॅफिक जॅमची हाइट म्हणजे चायनामध्ये एक पन्नास लेनचा रोड आहे तो एकदा बारा दिवस बासष्ट मैलांचा ट्रॅफिक जॅम लागून ठप्प झाला होता. फ्रान्समध्ये लियॉन-पॅरिस असा एकशे नऊ मैलांचा जॅम लागला होता. गेल्यावर्षी सेंट पीटर्सबर्ग ते मॉस्को रोडवर हिमवादळामुळे तीन दिवसांचा ट्रॅफिक जॅम झाला तेव्हा सरकारला रस्त्याच्या कडेला टेंट्स बांधून द्यावे लागले आणि ड्रायव्हर्स व फॅमिलिजना कौन्सिलिंग करावं लागलं. सो, ट्रॅफिक जॅम इज नॉर्मल. आमच्या टूर्सवर दररोज एकतरी टूर ट्रॅफिक जॅमची शिकार होते पण हॅटस ऑफ टू अवर टूर मॅनेजर्स, ते वल्हवून नेतात, सर्व स्थलदर्शन पूर्ण करायची पराकाष्ठा करतात. आता पावसाळ्यात अशा ट्रॅफिक जॅम्सना आपल्यालाही सामोरं जायचंय तेव्हा तो वेळ स्वत:मधला पेशन्स वाढविण्यासाठी वापरायचा. रोडवरचा ट्रॅफिक जॅम चालेल हो पण मनातल्या विचारांचा, पोटातल्या अन्नाचा आणि डोळ्यातल्या आसवांचा टॅ्रफिक जॅम परवडणारा नाही तो सतत मोकळा असावा. सो, लेट्स एन्जॉय द ट्रॅफिक! हॅव अ हॅप्पी संडे!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.