चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग ग्रीक तत्ववेत्ता हेराक्लायटस हे कधी काळी बोलून गेला पण आजही आपण त्या विचारातलं सामर्थ्य जळी-स्थळी अनुभवतो. थांबला तो संपला हे कधीही नव्हे इतकं जहाल सत्य बनलंय. एखादं प्रोडक्ट बनवलं की झालं, त्यावर वर्षानुवर्षाची बेगमी झाली हे दिवस आता कोणत्याही उद्योगधंद्यात राहिलेले नाहीत. सतत ऑन युवर टोज हे वास्तव आहे, मग आमचंही क्षेत्र त्यापासून अलिप्त कसं राहणार?
गेली पस्तीस वर्ष पर्यटनात असल्याने, पर्यटनक्षेत्राशी एकरुप झाल्याने ह्या क्षेत्रात घडणारे बदल, येणार्या नवनवीन संकल्पना, तांत्रिकदृष्ट्या प्रगत होणारा आसमंत, ग्राहक म्हणजे मग तो प्रवासी असो वा पर्यटक त्याच्या वाढत्या अपेक्षा, पर्यटन व्यवसायातील चढउतार, राजकीय - नैसर्गिक - अतिरेकी घडामोडींचा एकूणच पर्यटनावर होणारा परिणाम हे सगळं अगदी डोळ्यासमोर घडत गेलं, त्याच्या निरीक्षणातून - आकलनातून अनेक गोष्टी शिकता आल्या.
पस्तीस वर्ष दटे रहो, लगे रहा हे आमच्या बाबतीत झालं पण आमच्या टीममध्ये आता अशी मंडळी आहेत की तीसुद्धा वीस ते पंचवीस वर्ष ह्या क्षेत्रात वावरताहेत. रोज तेवढ्याच उत्साहाने सकाळी ऑफिसला येत आहेत, संध्याकाळी समाधानाने घरी परत जाताहेत. हे चक्र अव्याहत सुरू आहे, त्यामध्ये रोज अनेकांची भर पडतेय आणि चक्राचा परीघ वाढत चाललाय. इतक्या एकसे एक चॅलेंजेसनी हे क्षेत्र भरलेलं आहे की इथे लेट मी डू इट, लेट मी हँडल इट, लेट मी फेस इट, वुई कॅन अँड वुई विल ची गँग वाढतेय आमची. आमच्यापैकी बहुतेक सगळेच जण सकाळी घरुन निघताना चला आज आपल्याला किती चॅलेंजेसना सामोरं जायचंय ते बघूया ह्या मानसिकतेनेच ऑफिसात प्रवेश करतात. बसच्या बस चोरीला जाण्यापासून ते काठमांडूला जाणारं विमान अहमदाबादला उतरविण्यापर्यंत आणि न्यूझीलंडला पोहोचल्यावर एक सफरचंद पर्समध्ये चुकून राहिल्यामुळे पाचशे पौंडाचा दंड होण्यापासून एखाद्या पर्यटकाचं बॅगेज एअरलाईनकडून मिसिंग होऊन ते सहलीनंतर मिळेपर्यंत अनंत क्लासिक केस स्टडीज् आम्हाला ऑन अवर टोज ठेवत असतात, नव्हे आम्हाला जिवंत ठेवीत असतात. एखादी केस आली की ती आधी सर्वप्रथम सोडवायची. नंतर ती का झाली? आपली चूक होती की एखादा एक्स्टर्नल फॅक्टर, म्हणजेच आपल्या कंट्रोलच्या बाहेरची गोष्ट होती त्याचा अभ्यास करायचा. आपल्याकडून काही कमतरता असेल तर ती लागलीच सुधारायची, संबंधितांना ती ब्रॉडकास्ट करायची आणि पुन्हा ती होणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची. एक्स्टर्नल फॅक्टर असेल तर असं घडल्यावर काय करायचं ह्याची नोंद करून ती टीमसाठी माहिती म्हणून ठेवायची. ही पद्धत सुरू आहे. अशा काही क्लासिक गोष्टी रोज हाताळायला मिळतात की काही विचारु नका. त्या सोडविल्यावरचं समाधानसुद्धा तेवढंच ऊर्जा देणारं असतं. म्हणूनच रोज घरी जाताना एक समाधान असतं असं जे मी आधी म्हटलं ते उगाच नाही. एकूणच आम्ही एका अतिशय उत्साहवर्धक क्षेत्रात आहोत ह्याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमानही.
जेव्हा आपली मानसिकता आणि मनःस्थिती जो भी होगा सो देखा जायेगा अशी असते, कोणतंही चॅलेंज स्विकारायची आणि हसत खेळत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्यावर मात करण्याची आपली वैचारिक बैठक बनत जाते तेव्हा आणि तेव्हाच आपल्यामध्ये नव्याने काही निर्माण करण्याची, नव्या संकल्पनांची उत्पत्ती आपल्याकडून होण्याची, प्रवाहाविरुद्ध पोहोण्याची, जे आहे त्यात अधिक काही चांगलं करण्याची क्षमता वाढायला लागते. आणि ह्यात आपल्याकडे असलेला वेळ जर कमी असेल तर गोष्टी आणखी वेगाने घडत जातात. मानसिक बळ, शारिरीक शक्ती, भावनिक कणखरता ह्या गोष्टींची वृद्धी आपल्याला अधिक कॉन्फिडंट बनवते. आमचं आणि वीणा वर्ल्डच्या टीमचं असंच काहीसं झालं. कमी दिवसात जास्तीत - जास्त गोष्टी घडवून आणण्याचं चॅलेंज आम्हाला मिळालं, बेटर-चीपर-फास्टरच्या जमान्यातच आमचा पुनर्जन्म झाला त्यामुळे मल्टिनॅशनल्स किंवा ग्लोबलायझेशन ही चॅलेंजेस वाटली तरी त्याची भीती वाटली नाही. आपल्यात दम असेल, आपल्यासोबत माणसं असतील. भूतकाळापासून शिकत, वर्तमानकाळावरची पकड घट्ट ठेवीत, भविष्यावर नजर ठेवून आपण मार्गक्रमणा करीत राहिलो तर मल्टिनॅशनल्सना आपण आव्हान निर्माण करू शकतो. बीलिव्हिंग, प्लॅनिंग, फोकसिंग, कॉन्सनट्रेटिंग ही पथ्य पाळत पुढे जात राहिलो तर काय बिशाद आहे रीझल्ट न मिळण्याची. इट्स बाउंड टू हॅपन!
आमच्याकडे एक पद्धत आहे किंवा आमची टीम नेहमी मला चिडवत असते की, आज काही रेकॉर्ड ब्रेकिंग अचिव्ह केलं तरी उद्या तुम्ही म्हणणार, कालपर्यंत जे काही केलं ते शून्य समजूया आणि पुन्हा त्या शून्यातून नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने कामाला लागूया, शून्य ही माझी आवडती फिलॉसॉफी. आपल्या डोक्यात हवा जाऊ द्यायची नसेल तर हे शून्य सतत आपल्या काखोटीला बांधून ठेवायचं. अंतराळातील असंख्य ग्रहतार्यांच्या मालिकेतील पृथ्वी हा एक छोटा ग्रह, त्यावर दोन तृतियांश पाणी, उरलेल्या फक्त एक चतुर्थांश भागात जमीन त्या जमिनीवर सात खंड, त्या सात खंडांतील एक आपला आशिया खंड, त्या खंडात 48 देश, त्यातला आपला भारत, ह्या भारतात 29 राज्य, त्यातलं आपलं एक राज्य महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रात 37 शहरं त्यातलं आपलं एक शहर मुंबई, त्या मुंबईत अनेक पोटशहरं, त्यामध्ये अनेक विभाग, त्यातील एका विभागात अनेक सोसायट्या-बिल्डिंगज्, त्यातल्या एका बिल्डिंगमध्ये आपलं छोटंसं साम्राज्य. टिपका नव्हे तर अणू-रेणू बनून जातो आपण. पण त्याच अणूमधून शक्तीशाली असं काहीतरी निर्माण होऊ शकतं. डोक्यात हवा जायला लागली की ही युनिव्हर्स थिअरी आठवायची आणि जेव्हा आपण किती सूक्ष्म आहोत ह्याने आपल्याला जर निराश व्हायला झालं, लो वाटायला लागलं तर अणूतून परमाणू मैं बहुत कुछ कर सकता हूँ, बुरा भला जो भी किया वो झिरो समझ के नयी शुरुवात, नयी उम्मीद के साथ. आपला स्वतःचा जोश हाय ठेवणं आपल्याला सतत, दररोज, प्रत्येक क्षणी जमलं पाहिजे की आपण बाजी मारलीच म्हणून समजा. आमच्या छोट्याशा किंगडममध्ये आम्ही हे कल्चर रुजवायला घेतलंय किंवा ते आपोआप रुजतंय. ऑर्गनायझेशन फ्लॅट ठेवण्याचा प्रयत्न आहे, बॉसविरहीत स्ट्रक्चर. आपल्याला एकमेकांची गरज आहे. आनंदात एकमेकाला साथ देत प्रगती करूया, कुणीही कुणावर उपकार करीत नाही. तशी भावना वा उच्च-नीचताही काही नको. पर्यटन सेवा क्षेत्रात येतं, सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस ही मोडेन पण वाकणार नाही ह्या बाण्याने देता येत नाही त्यासाठी वाकावं तर लागतंच. पण आमच्याकडे त्यालाही आम्ही एन्ड पॉईंट ठेवलाय आणि तो आहे, नम्र आहोत पण लाचार नाही. नम्रपणा आणि पाय सतत जमिनीवर असणं ह्यावर मात्र आमचा भर आहे आणि कटाक्षही. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक वाटतो तो ह्या खंबीर मानसिक जडणघडणीमुळेच.
एकदा का ही टूवर्डस् गूड ह्युमन बिइंग कडे वाटचाल सुरू झाली, त्याची सवय झाली की आयुष्य रोज नवीन वाटायला लागतं, नवीन काही करावसं वाटतं, वीणा वर्ल्डमध्ये असंच रोज नवीन काहीतरी निर्माण करण्यात प्रत्येकाला उत्साह वाटत असतो. अंडर द रूफ ऑफ टूरिझमजे काही आहे ते वीणा वर्ल्डमध्ये असलं पाहिजे, पूर्वी एकाच पध्दतीने भ्रमंती करणारा पर्यटक आता आमुलाग्र बदललाय. त्याच्या मागण्या चहूबाजूने घेर धरून उभ्या आहेत. ग्लोबलवरून लोकलवर, लोकलवरून इन्डिव्हिज्युअलवर आणि इन्डिव्हिज्युअलवरून त्याच्या स्वभावातील प्रत्येक पैलूवर आता कोणत्याही प्रकारच्या व्यवसायिकाला आणि व्यवसायाला काम करावं लागतंच. आमच्या पर्यटनक्षेत्राचंच बघानं, पूर्वी फक्त यात्रा सहली असायच्या. काशी, रामेश्वर, उज्जैन, त्र्यंबकेश्वर इथेच काय ते पर्यटन चालायचं. त्याआधी शिकार, लूट, शोध ह्यासाठी प्रवास घडायचा. त्यानंतर सुरू झालं निसर्गरम्य स्थळी ग्रुप टूर्सच्या माध्यमातून फिरणं, डोंगर- दर्या-जंगलं- बर्फ-नद्या अशा अनेक गोष्टी पर्यटनाचं आकर्षण बिंदू ठरल्या. त्यासोबतच ऐतिहासिक गोष्टी, पूर्वजांचा इतिहास ह्याची क्युरियॉसिटी वाढायला लागली आणि आपलं राजस्थान किंवा इजिप्त, इटली, फ्रान्ससारख्या देशांनी बाजी मारली पर्यटनस्थळांमध्ये आघाडीवर राहण्यासाठी. शहरं, राज्य, देश, खंड, उत्तर ध्रुव-दक्षिण ध्रुवापर्यंत पर्यटक पोहोचले आणि आता स्पेस टूरिझम आणि चंद्रावरचं पर्यटन आपल्या उंबरठ्याबाहेर उभं आहे. एव्हरीथिंग इज सो अमेझिंग!
पर्यटन करण्यासाठी ठिकाणं वाढत असताना पर्यटकही अनेक गोष्टींनी बदलत होता, त्याच्या त्या बदलानुसार आम्ही आम्हाला बदलत होतो. ग्रुप टूरिझम प्रचंड प्रमाणात वाढत असतानाच, पर्यटकांना एकट्याने किंवा कुटुंबासह फिरण्याची आस वाढायला लागली, ज्यासाठी आम्ही आणले कस्टमाईज्ड हॉलिडेज्. ग्रुप टूर झाल्यावर त्या शेवटच्या शहरात थोडा आराम करूया ही डीमांड आल्यावर आम्ही आणले, पोस्ट टूर हॉलिडेज्. महिला आता एकट्या घराबाहेर पडायला तयार आहेत हे दिसल्याबरोबर आली वुमन्स स्पेशल. सीनियर्सना जग पालथं घालायचंय हे लक्षात आल्यावर आल्या कॉन्फिडन्स बूस्टर-सीनियर्स स्पेशल, सिंगल्सची वाढती संख्या लक्षात घेऊन आणल्या सिंगल्स स्पेशल, भारतातले आजी आजोबा आणि परदेशातली त्यांची नातवंडं ह्यांच्यासाठी आणली ग्रँड पॅरेंटस- ग्रँड चिल्ड्रन स्पेशल (ग्रँड मीलन) सहल, सुरक्षिततेच्या भावनेतून आल्या हनिमून टूर्स, त्यानंतर मोठमोठ्या कॉर्पोरेट-मल्टिनॅशनल कंपन्यांकरीता आम्ही करू लागलो माईस (मीटिंग्ज् - इन्सेंटिव्हज् - कॉन्फरन्सेस - एक्झीबिशन्स) म्हणजे कॉर्पोरेट टूर्स. डेस्टिनेशन वेडिंग हा सध्याचा हॉट मामला, त्यासाठी आम्ही आणली डेस्टिनेशन वेडिंगची वीणा वर्ल्ड डिव्हिजन. एवढं सगळं करीत असताना आपला भारत आपल्याच परदेशस्थ नागरिकांना - NRIs ना तसंच फॉरिनर्सना दाखविण्यासाठी आमची इनबाउंड डिव्हिजन स्ट्राँग बनली. आपल्या भारताची छान ओळख परकीयांना आणि आपल्याच दूरदेशीच्या पुढच्या पिढीला करून देणं आमचं कर्तव्य आहे. पूर्वी आम्ही सहली करायचो परदेशातल्या तेव्हा ब्रेकफास्ट डिनरची पद्धत असायची. पण आपल्या भारतीय मनाला लंचची सवय म्हणून आम्ही लंच ऑल्सो इन्क्ल्युडेडच्या जाहिराती केल्या पंचवीस वर्षांपूवी. आता पर्यटक म्हणताहेत हल्ली आम्ही दोनदाच जेवतो, डॉक्टर दिक्षित क्रांती म्हणायची ह्याला. मग आम्ही आत्ता सुरू केल्या ब्रेकफास्ट डिनरवाल्या सहली. पंचवीस वर्षांपूर्वी जो विकनेस होता लंच नसण्याचा तो आता स्ट्रेंन्थमध्ये बदललाय. पर्यटकांचा छोटा समूह म्हणतोय, नो लंच प्लीज! जमाना बदलतोय, आपल्यालाही बदलायला हवं! अॅज फास्ट अॅज पॉसिबल!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.