पस्तीस वर्षांच्या ह्या पर्यटन आयुष्यात इतक्या गोष्टी बघितल्या, आणि आता त्याविषयी सगळेच देश इतके आग्रही बनलेत की जर असं काही झालंच तर मानसिक आर्थिक सामाजिक असा सर्वच प्रकारचा मनस्ताप आपल्याला होतो. रांगेची शिस्त पाळणं, आपल्याला सर्व्हिस देणार्या ऑफिशियल्सना थँक्यू म्हणणं, सामानाचं ओझं कमीत कमी करून एक स्मार्ट ट्रॅव्हलर अशी आपली छबी निर्माण करणं, ग्रुप टूरमध्ये असू तर एकमेकांच्या वेळेची कदर करणं, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत. त्या अंगी बाणवाव्या लागतातच.
मागच्या आठवड्यात आम्ही कोल्हापूरला होतो. निमित्त वीणा वर्ल्डची सेल्स पार्टनर अबोली निलेश रावळच्या नवीन प्रशस्त कार्यालयाचं उद्घाटन. सहा वर्षांपूर्वी वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा ह्या नव्या संस्थेचं भविष्य काय असेल? जागतिक स्पर्धेत ही संस्था जगू शकेल का? असे प्रश्न पडले असताना महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून जी काही पर्यटन प्रेमी मंडळी पुढे आली हम तुम्हारे साथ है म्हणत, त्यातली एक अबोली. तिने जॉब सोडून वीणा वर्ल्ड मिशनमध्ये उडी घेतली. निलेशच्या ऑफिसमध्ये छोट्याशा जागेत तिने प्रवास सुरू केला. त्यावेळची आमची मानसिक स्थिती अशी होती की, ही मंडळी एवढ्या विश्वासाने आपल्यासोबत येताहेत, त्यांचं भविष्य काही अंशी किंवा संपूर्णपणे आपल्यावर अवलंबून असणार आहे, त्यामुळे वीणा वर्ल्ड जगलीच पाहिजे, वाढलीच पाहिजे. त्या दिवसापासून आजपर्यंत वीणा वर्ल्डमधल्या प्रत्येकाने मेहनत केली आणि संस्था उभी राहिली. टुगेदर वुई गो च्या न्यायाने जोडलेल्या प्रत्येकाची प्रगती होत राहिली. मध्ये चढ-उतार आले, नाही असं नाही पण भारतीय पर्यटन क्षेत्रात ही संस्था चांगल्या रेप्युटेशनने आपलं स्थान निर्माण करू शकली. अबोलीचा गेल्यावर्षी फोन आला, मला ऑफिस कमी पडतंय, येणार्या आपल्या गेस्टना बसायला जागा नाहीये, बरं वाटत नाही ते, टीमपण वाढवावी लागणार, त्यामुळे मी नवीन ऑफिस घ्यायचं म्हणतेय, हे पाऊल उचलताना थोडी भीतीही आहे मनात, तुम्हाला काय वाटतं? जाऊ पुढे? घेऊ रिस्क? अबोलीने अॅक्चुअली पहिला माईलस्टोन पार केला होता. मेहनतीवर तिने स्वत:ला कोल्हापूरमध्ये-तेथील पर्यटकांमध्ये एस्टॅब्लिश केलं होतं, त्यांच्या मनात प्रेमाचं आणि आपुलकीचं स्थान निर्माण केलं होतं. वीणा वर्ल्डला मिळणारा पर्यटकांचा पाठिंबा सतत सहा वर्ष चढत्या क्रमानेच होता. आम्हीसुद्धा मुंबईमध्ये दहा ठिकाणी आणि पुण्यात दोन ठिकाणी सेल्स ऑफिसेस उघडण्याचा आणि पर्यटकांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा विचार करीतच होतो. त्यामुळे तिला म्हटलं, वुई आर ऑन द सेम ट्रॅक! वीणा वर्ल्ड वाढणार, वाढवायचंच कारण आता हा संसार त्याला जोडल्या गेलेल्या सहाशे टीम मेंबर्सचा, चारशे टूर मॅनेजर्सचा, पाचशे सेल्स पार्टनर्स टीम्सचा आणि जगभरातील कमिटेड डेडिकेटेड पार्टनर्सचा झालाय, आता मागे वळून पहायचं नाही. आधी केलेलं सगळं शून्य समजायचं आणि रोज नव्या दमाने उत्साहाने, आनंदाने कालच्यापेक्षा जास्त मेहनत करायची. वीणा वर्ल्डवर आणि स्वत:वर विश्वास आहे नं, मग हो पुढे, घे रिस्क आणि स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध कर. व्यवसायातून मिळालेल्या पैशाचा काही भाग हा पुन्हा व्यवसायवृद्धीसाठी टाकायचा असतो, आणि तू ते करतेयस. जस्ट डू इट! कोल्हापूरच्या चांगल्या वस्तीत, मेन रोडवर द एम्पायर ह्या नवीन बिल्ंिडगमधलं अबोलीच्या ड्रीम हॉलिडेजचं सुसज्ज ऑफिस बघितलं अनं मला आणि सुधीरला दोघांनाही अक्षरश: भरून आलं. टुगेदर वुई ग्रो हे घडताना समोर दिसत होतं, वाटलं याचसाठी केला होता अट्टाहास! आपला प्रत्येक सेल्स पार्टनर असा वाढला पाहिजे. आणि मेहनत करणारा सकारात्मक दृष्टीकोन ठेवणारा प्रत्येकजण यशस्वी होतोच कितीही अडथळे मग येवोत.
अबोलीला, तिच्या ड्रीम हॉलिडेला आणि पर्यायाने वीणा वर्ल्डला उभं करण्यात आणि मोठं करण्यात सिंहाचा वाटा असलेली कोल्हापूरातील पर्यटक मंडळी ह्या शुभ सोहळ्याला आवर्जून उपस्थित होती. त्यांच्याशी भेटल्यावर, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केल्यावर आम्हालाही खूप बरं वाटलं. अबोलीने छोटासा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम ठेवला होता. व्यावसायिक म्हणून नावलौकिक कमावलेले आणि कोल्हापूरच्या मीडियातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेले चारूदत्त जोशी आमच्याशी संवाद साधत होते. त्यांनी प्रश्न केला की, पर्यटक देशविदेशात ज्यावेळी पर्यटनाला जातात तेव्हा त्यांनी कोणत्या तीन गोष्टी टाळाव्यात असं तुम्हाला वाटतं? खरंतर पर्यटनाला निघताना त्यात समाविष्ट असलेल्या प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते. पर्यटनसंस्था म्हणून आम्ही पर्यटकांना जे प्रॉमिस केलंय ते पाळायचं असतं, आमचे जे देशविदेशातील लोकल पार्टनर्स असतात त्यांनी आम्हाला दिलेलं प्रॉमिस पाळायचं असतं, एअरलाईन्स-कॉन्स्युलेटच्या अखत्यारित येणारा भाग त्यांनी पर्यटकांसाठी जेवढा सोपा करता येईल तेवढा तो करायचा असतो. आणि शेवटी महत्त्वाचा असतो तो आमचा पर्यटक, त्याच्या सहकार्याने आणि आमच्या संबंधित सर्व घटकांच्या व्यवस्थित आयोजनाने सहलीचा ऑर्केस्ट्रा खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊ शकतो. आणि तसा तो देतोय ह्याचा सार्थ अभिमानही आहे. माझ्या पस्तीस वर्षांच्या पर्यटन आयुष्यात वीस वर्ष मी टूर मॅनेजर म्हणून भारतात आणि परदेशात सहली आयोजित केल्या आहेत. आता काम बदललंय तरीही वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशलच्या काही सहलींना मी एक दिवसाची हजेरी लावते, पर्यटकांशी संवाद सुरू ठेवते. टूर मॅनेजर म्हणून पर्यटकांना जवळून जाणल्यावर, त्यांचं निरीक्षण केल्यावर काही गोष्टी दिसल्या की ज्या टाळल्याच पाहिजेत, ज्याविषयी मी तिथे संवाद साधला.
देशात किंवा परदेशात जेव्हा आपण पर्यटनाला निघतो तेव्हा आपण आपल्या देशाचे, आपल्या राज्याचे, आपल्या समाजाचे, आपल्या कुटुंबाचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवतेचे प्रतिनिधी म्हणून जात असतो. हे प्रतिनिधित्व खूप चांगल्या तर्हेने पार पडता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याची आठवण आणि जाणीवही असली पाहिजे, थोडक्यात काय करायचं? काय करायचं नाही? ह्यावर प्रत्येकाचा कंट्रोल असायला पाहिजे. फक्त तीनच गोष्टी सांगा असं सांगितल्यामुळे मी ही तीन गोष्टीच सांगितल्या. एक-भारताला म्हणजेच आपल्या देशाला नावं ठेवायची नाहीत. दोन-तुलना करायची नाही. तीन-आपल्या इमोशन्सना कंट्रोलमध्ये ठेवायचं.
आपण परदेशी जातो तेव्हा तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, शिस्त, चकचकाट बघून भारावून जातो आणि आपल्या देशाला नावं ठेवायला लागतो. मोठ्या बसप्रवासात अशातर्हेचा संवाद सुरू होतो. इथे आपण प्रत्येकाने स्वत:ला कंट्रोल केलं पाहिजे. एखाद्या देशाची महती सांगताना आपल्या देशाला नावं कशाला ठेवायची? आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतंय, काही वर्षांमध्ये आपल्याला ते बदल चांगल्या तर्हेने जाणवतील. पण प्रश्न नुसता इन्फ्रास्ट्रक्चरचा नाहीच आहे, आपण शिस्त पाळतो का? नियम बरहुकूम चालतो का? हे प्रश्न आपणच स्वत:ला विचारले पाहिजेत. प्रत्येक बाबतीत जुगाड ने आपल्याला ग्रासलंय त्यातून बाहेर येणं ही आपली जबाबदारी आहे. खंडप्राय देश आहे, पाच हजार वर्षांची परंपरा आहे, गोष्टी बदलायला वेळ लागणार आणि त्यासाठी आपलं प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. म्हणूनच आमच्या टूर मॅनेजर्सच्या मिटिंगमध्ये आम्ही एक ठरवलंय की, भारताला दुषणं देणारा संवाद सहलीवर सुरू झाला तर विनंती करा तो थांबविण्याची किंवा शिताफीने विषयांतर करा. देशविदेशात आपल्या भारतीयांना चिकटलेला आणि आपल्याला वेदना देणारा एक शब्द ऐकायला मिळतो तो म्हणजे इंडियन टाईम. आपणातले कुणीतरी वेळ पाळत नाहीत किंवा दुसर्यांच्या वेळेचं महत्त्व त्यांना कळत नाही म्हणून आपल्या देशाला हे बिरुद चिकटलं. आता मला सांगा आपल्या ह्या करणीमध्ये देशाचा काय दोष. आपल्यामुळे देशाचं नाव का खराब करायचं. आता जसं हे नाव खराब होत गेलं आपल्यामुळे ते आपण सुधारुही शकतो एक एक करून नाही का. आमचा प्रत्येक टूर मॅनेजर ह्यासाठी दक्ष असतो.
दुसरी गोष्ट आहे ती तुलना. एका देशाची दुसर्या देशाशी, एका पर्यटनस्थळाची दुसर्या पर्यटनस्थळाशी किंवा एका सहलीची दुसर्या सहलीशी तुलना करायची नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक देश, राज्य, पर्यटनस्थळ वेगळं आहे. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथली डेव्हलपमेंट, तिथला निसर्ग ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्या-त्या ठिकाणचं जे काही चांगलं आहे, जे सहलखर्चात पॉसिबल आहे ते द्यायचा आमचा किंवा कोणत्याही पर्यटनसंस्थेचा प्रयत्न असतो. पण अमेरिकेला गेल्यावर यापेक्षा युरोप जास्त चांगलं आहे, ऑस्ट्रेलियाला गेल्यावर अमेरिका जास्त बरं होतं किंवा लेह लडाख-नॉर्थ ईस्टच्या निसर्गरम्य पण सुखसुविधांच्या दृष्टीने अजून बर्यापैकी अनडेव्हलप्ड असलेल्या ठिकाणांची तुलना आपण केरळ राजस्थानशी किंवा आधी केलेल्या परदेश सहलीशी नाही करू शकत. त्यामुळे आपण चालू सहलीची मजा कीरकिरी करतो. साऊथ ईस्ट एशियामध्ये हॉटेल्स बर्यापैकी मोठी असतात. तीच युरोपमध्ये गेलो तर तुलनेने छोटी असतात, जपानमध्ये रूम्स आणखी लहान असतात ह्या गोष्टी आम्हीही आधी पर्यटकांना सांगायला पाहिजेत आणि पर्यटकांनीही त्या समजून घेतल्या पाहिजेत.
आपल्या इमोशन्सवर कंट्रोल असणं फार महत्त्वाचं आहे. इतक्या वर्षांमध्ये अशा काही प्रसगांना आम्ही सामोरे गेलोय की ते लिहीतानाही त्रास होतोय. पण त्याबाबतीत डायरेक्ट जेल होऊ शकते, मोठा भूर्दंड भरावा लागतो, सहल मध्येच सोडावी लागते, स्वत:च्या पैशाने भारतात परत यावं लागतं. कोणत्याही पब्लिक प्लेसमध्ये पती-पत्नीमधलं द्वंद्व, धक्काबुक्की ही गोष्ट तेथील एनव्हार्यमेंटला डिस्टर्ब करणारी ठरते तसेच ते पती-पत्नी एकमेकांसोबत राहणे सुरक्षित नाही या कारणाखाली त्यांना अडवलं जातं आणि नंतर ज्या काही सोपस्कारांतून त्यांना जावं लागतं त्याचा विचारही न केलेला बरा. बेटर कंट्रोल द इमोशन्स. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणच्या स्थानिक महिला, हॉटेलमध्ये काम करणार्या ऑफिशियल्स ह्यांच्या बाबतीत जर चुकून किंवा मुद्दामहून काही घडलंच तर मग सरळ देवाचंच नाव घ्यायचं एवढ्या प्रचंड मानहानीतून त्या व्यक्तीला जावं लागतं. ह्यामुळे वैयक्तिक नुकसान होतंच पण पर्यटनसंस्थेच्या नावाला धक्का बसतो तसंच भारताविषयी आणि भारतीयांविषयी नाव खराब होतं. तिसरी गोष्ट आहे, दुकानातून पैसे न भरता आपल्या पर्समध्ये एखादी वस्तू येणं, हे चुकून झालं तरी यासाठी डायरेक्ट तुरुंगवास आहे. आता तुम्ही म्हणाल असे पर्यटक येतात टूरवर?, तर तसं नाहीये. पस्तीस वर्षांत दहा पेक्षा कमी केसेस आहेत पण आता सर्वत्र नियम खूप कठीण झालेयत. आपल्या इमोशन्सना आवरणं आपल्या हातात आहे.
आज माझा लेख थोड्या वेगळ्या अंगाने गेला पण अनुभवांनी आपल्या पर्यटकांना काही गोष्टी माहीत करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. बाकी डोन्ट वरी, तुमची सहल उत्कृष्टरित्या पार पाडायला आम्ही आहोत कंबर कसून. हॅव अ हॅप्पी संडे!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.