Published in the Saturday Lokasatta on 13 January, 2024
चला, स्वत:ला वेळ देऊया. स्वत:वर आणि आयुष्यावर प्रेम करूया. कारण आपण खुश म्हणजे सारं घर खुश. सो लेट्स गो! ट्रॅव्हल! एक्सप्लोर! सेलिब्रेट लाइफ! सेलिब्रेट वुमनहूड!
एकतीस डिसेंबरला काय करायचं किंवा एक जानेवारीला आपण कुठे आहोत हा आमचा प्रश्न नसतो. कारण त्यावेळी आम्ही शांत निवांत हॉलिडेवर असतो. आणि आमचं डेस्टिनेशन असतं, आमचं स्वत:चं घर. वर्षभरात इतका प्रवास होतो की नव्या वर्षाचं स्वागत आपल्या घरात देवघरातल्या देवाला नमस्कार करून करायला बरं वाटतं. ह्यावर्षीतर आम्ही गेल्या पाच महिन्यांत तीन महीने प्रवासात होतो. त्यामुळे घर हेच डेस्टिनेशन अप्रतीम होतं. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ख्रिसमस न्यू इयरला किमान पाच हजार पर्यटक देशविदेशात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन करीत असतात. वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्स त्यांच्या दिमतीला असतातच आणि त्यांच्या पाठीशी असते सतत चोवीस तास ऑफिस टीम, त्यामुळे आम्हाला डे-टू-डे काही करावं लागलं नाही तरी अशा सुपरपीक सीझनला म्हणजे समर व्हेकेशन एप्रिल मे जून, दिवाळी आणि ख्रिसमसला आम्ही मुंबईतच ऑफिसमध्ये असतो. कुठेही काहीही प्रॉब्लेम आला तर तातडीने एकमेकांच्या साथीने तो सोडवायला बरं असतं. अडीअडचणींच्याच वेळी जास्त गरज असते एकमेकांची आणि म्हणूनच आम्ही सर्वांसोबत असतो. आणि त्यामुळेच घरी होतो. रोज रात्री साडेनऊ दहा वाजता झोपायची सवय त्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत करायला बारा वाजेपर्यंत जागं कसं रहायचं हा प्रश्न होता. नेटफ्लिक्सवर ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट लावला. इतक्या वर्षांनीही हा चित्रपट तेवढाच फ्रेश वाटला. स्पेनच्या बॅकग्राऊंडवर सर्व फिल्मिंग झाल्याने तो कायमच जवळचा वाटतो. छान वाटतो. आयुष्य आनंदात जगा, अगदी रसरसून त्याचा आस्वाद घ्या, मनावर कोणतंही ओझं ठेवू नका, घाबरू नका हा संदेश देणार्या ह्या चित्रपटातलं एक वाक्य मला नेहमीच आवडतं ते म्हणजे ’डर के आगे जीत है’. भीतीला सामोरं जाऊया आणि आपल्या आयुष्यातून त्या भीतीला कायमचं घालवून टाकूया. लेट्स फेस इट अँड ओव्हरकम इट!
खरंतर ’डर के आगे जीत है’ ही एक छान टॅगलाईन कोणत्यातरी सॉफ्टड्रिंकच्या जाहिरातीतली. हल्ली आपण आरोग्याकडे किंवा हेल्दी फूडच्या पाठी असल्याने सॉफ्ट ड्रिंक्स वा पॅकेज्ड फूड वर्ज्य करतो आणि ते चांगलंच आहे म्हणा. आरोग्य उत्तम ठेवणं हे बर्यापैकी आपल्या हातात आहे, हे तसं बर्याच उशीरा कळलं पण ज्याक्षणी कळलं त्या क्षणापासून सुरुवात करायला हवी तशी आम्ही केली. सर सलामत तो पगडी पचास. शक्यतोवर औषधाविना आयुष्य जगायचा प्रयत्न करायचा. हेल्दी रहायचं शरीराने आणि मनाने म्हणजेच विचारांनी आणि हाच आमचा पाया आहे वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल टूर्सचाही. हसूया, नाचूया, गाऊया, बागडूया, नटूया, सजूया, घराची गावाची शहराची राज्याची देशाची सीमा ओलांडूया, आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकूया, आयुष्याला आनंदी बनवूया. घरातही उत्साहाचं कारंजं लावूया.
पुर्वी बर्याचदा वुमन्स स्पेशल टूर्सवर महिलांना भेटायला लेहलडाखपासून लंडनपर्यंत, शिमल्यापासून सॅनफ्रान्सिस्कोपर्यंत, ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कुठेही जिथे वुमन्स स्पेशल सुरू असेल तिथे मी जात असे. प्रचंड प्रवास केलाय पण कधी दमले थकले नाही कारण ह्या प्रत्येक टूरवर महिला ज्या तर्हेने एन्जॉय करायच्या, सहलीवर जो काही सळसळता उत्साह दिसायचा तो बघून मला शक्ती मिळायची. नऊवारीतून पाचवारी, पाचवारीतून पलाझो, चुडिदार मधून जीन्स, जीन्समधून स्कर्ट आणि चक्क स्विमिंग कॉश्च्युम घालून पूलमध्ये मनसोक्त डुंबणार्या महिलांची ट्रान्सफॉर्मेशन्स बघून मिळणार्या आनंदाला परिसीमा नव्हती.
खरंतर मला ह्या सर्व महिलांचे आभार मानावेसे वाटतात कारण त्यांनी उर्जा दिली. माझ्या आयुष्याला आणि व्यवसायाला अर्थ दिला. कमर्शियली व्यवसाय होत असतो. पण तो करीत असताना जे एक प्रकारचं समाधान मिळावं लागतं ते ह्या वुमन्स स्पेशलने दिलं. इतक्या वर्षांमध्ये महिलांना चौकटीबाहेर येऊन मुक्त आनंद घेताना बघून आपण समाजाची एक गरज भागवण्यामध्ये छोटंसं का होईना योगदान दिल्याचं समाधान मिळालं. मी एकटी कशी बाहेर फिरायला जाऊ? लोक काय म्हणतील?’ ह्या टॅबू मधून बाहेर यायलाच बरीच वर्ष लागली. प्रत्येक टूरवर माझ्या आणि महिलांच्या संवादात एकच सांगणं असायचं, ’मुलगी शिकली प्रगती झाली’ हे आपल्याला माहित आहे पण ’मुलगी आनंदी झाली तर घर आनंदी होतं सर्वार्थाने’ तेव्हा ह्या मुलीला पर्यटनाच्या माध्यमातनं आनंद देण्याचा हा प्रयत्न आहे. स्वत:ला गिल्टमध्ये टाकू नका. तुम्ही घराबाहेर येताय, धम्माल करताय ही तुमची गरज आहे. पर्यटन हा आपला चार्जर आहे. जमेल तसं तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून किमान एकदातरी असं स्वत:ला चार्ज करायचं आणि मग हसतहसत आयुष्याला सामोरं जायचं.
महिला हळूहळू त्या अपराधी वाटण्याच्या मानसिकतेतून बाहेर आल्या. नंतरचं आमचं लक्ष्य होतं ते घरच्यांना महिलेच्या ह्या पर्यटनाकडे सहृदयतेने बघण्यासाठी प्रवृत्त करण्याचं कारण इथे दबंगशाही नव्हती. जे काही करायचं ते प्रेमाने. ‘केल्याने देशटन.. मनुजा चातुर्य येतसे फार’ ह्या उक्तीप्रमाणे महिला एकट्या पर्यटन करू लागल्या. त्यांच्यातल्या स्वागतार्ह्य बदलाचे पडसाद घरात उमटू लागले. घरातला आनंद वाढायला लागला आणि मग, ’तू एकटी जाणार?’, ’तू आम्हाला सोडून कशी जाऊ शकतेस?’, ’आम्ही नाही बाबा असे मुलांना आणि नवर्याला सोडून भटकायला जात’, ’काय मेलं ते भटकायचं खूळ डोक्यात भरलंय’, ’असे पैसे उधळायला लाज नाही वाटत?’... अशा आणि ह्यापेक्षा टोकाच्या कमेंट्स घराघरातून कमी व्हायला लागल्या. टोमणे मारणारी शेजारीण किंवा रिश्तेदारही हळू हळू वुमन्स स्पेशलवर यायला लागल्या. घरातल्या मंडळींना वुमन्स स्पेशलच्या टॉनिकची महती कळली आणि घरातली चिडचीड वाढायला लागली की, ’अगं तुला आता बाहेर जायची गरज आहे’ असं घरातले म्हणायला लागले आणि आम्ही भरून पावलो. आता घरातली मंडळी वुमन्स स्पेशलची टूर गिफ्ट देताहेत.
दोन हजार सहा साली म्हणजे सतरा वर्षांपूर्वी पहिली वुमन्स स्पेशलची संकल्पना मी राबवली, यशस्वी केली आणि वीणा वर्ल्ड झाल्यानंतर तर आत्ता दर आठवड्याला किंवा दररोज वुमन स्पेशलद्वारे महिला देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपर्यात मुक्त विहार करीत असतात, धम्माल करतात, मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण करून घेतात. हवे तसे मस्त मस्त कपडे घालतात, सिनेस्टार्सप्रमाणे मोठ्ठे गॉगल्स लावतात, असंख्य फोटोज काढतात, स्वत:वर प्रेम करतात आणि ’आय अॅम द क्वीन’ ’मीच माझी राणी’ चा रुबाब मिरवतात. हे सगळं करीत असताना आणि होत असताना वुमन्स स्पेशल कधीही चीप झाली नाही. डीसेन्सी आणि एलिगंसची पातळी कधी सोडली नाही म्हणूनच वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलच्या एवढ्या सहली भारतात आणि जगात सतत सुरू आहेत.
आठ मार्च येतोय. आपला वुमन्स डे! म्हणजे प्रत्येक दिवस आपलाच असतो, पण पर्यटनाला निघायला काहीतरी बहाणा पाहिजे नं. मग आम्ही वुमेन्स डे‘ च्या निमित्तानं जास्तीत जास्त महिलांना ह्या आनंदाच्या नव्या रंगात न्हाऊन निघायला सांगतो. त्यासाठी अथक तयारी करतो. आमच्या ऑफिस टीम्स आणि टूर मॅनेजर्स सज्ज असतात ही ’दे धम्माल’ घडवून आणायला. ह्या वुमेन्स डे ला आम्ही घेऊन आलोय देशविदेशातले पन्नासहून अधिक टूर ऑप्शप्स. ह्यामध्ये महिला युरोपला जायचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण करू शकतात किंवा ऑस्ट्रेलियाच्या महाखंडाची वारी करू शकतात किंवा जपान कोरियाची अद्भुत दुनिया बघू शकतात किंवा चक्कं आपल्या इनक्रेडिबल इंडियामधली काही राज्य आपल्या ट्रॅव्हल मिशनमधून पूर्ण करू शकतात.
सतरा वर्षांनंतर म्हणजे अॅक्च्युअली गेल्या वर्षी वुमन्स स्पेशलच्या टूर्समध्ये आम्ही काही आणखी चांगले बदल करायला सुरुवात केली. जिथे शक्य आहे तिथे राफ्टिंग, कायाकिंग, हायकिंग, ट्रेकिंग, डेझर्ट सफारी, वाइल्ड लाइफ सफारी, जेटबोट राइड, सनसेट क्रुझ, सायंटिफिक मसाज ह्या गोष्टींचा समावेश केला. भारतीय भोजनासोबत लोकल फूडचाही आस्वाद द्यायला सुरुवात केली. पुर्वी आम्ही भारतीय भोजन सर्वत्र द्यायचा आग्रह करायचो पण आता आपल्या भारतातच जगभराचं क्विझिन उपलब्ध झाल्यामुळे आपली टेस्ट डेव्हलप झाली आणि मग ’लोकल फूडही द्या आम्हाला त्या त्या ठिकाणचं’ ह्याची डिमांड वाढायला लागली आणि आम्ही ते बदलही केले. वेगवेगळे एक्स्पीरियन्सेस, अॅडव्हेंचर अॅक्टिविटिज्, फॅशन शो, रॅम्प वॉक ह्या अॅक्टिविटिज्नी वुमन्स स्पेशल टूर्स आणखी हॅपनिंग झाल्या. टूरवर येणार्या मैत्रिणी मैत्रिणी आणि फॅमिली गर्लगँग वाढू लागल्या. आणि हो एकट्या असलात तरी डोन्ट वरी, कारण तुम्हाला रूम पार्टनर द्यायची गॅरंटी वीणा वर्ल्डची, त्यामुळे नो एक्स्ट्रॉ चार्ज.
आता आम्हाला वुमन्स स्पेशलच्या काही टूर्स आणखी अॅडव्हेंचरस करायच्या आहेत. मी वर म्हटलंनं की मनातल्या सुप्त इच्छांना मूर्त स्वरूप द्यायचंय. आता महिला देश विदेशात पर्यटन करू लागल्या आहेत, पण २०२४ मध्ये पुढची पायरी गाठायचीय आणि ती आहे जरा हटके काही गोष्टी करायची. आणि म्हणूनच ह्या वुमेन्स डे ला आम्ही स्वित्झर्लंडची एक अफलातून टूर करतोय. आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टींचा विचारही केला नव्हता अशी ही टूर. इथे आपल्यासोबत असेल एक हॅवरसॅक आणि एक छोटीशी सुटकेस, रोजचा वेश असणार आहे थर्मल्स जीन्स वा वुलन ट्राऊजर्स, एकावर एक दोन वुलन टॉप्स (लेअर्ड क्लोदिंग) जॅकेट वा ओव्हरकोट, वुलन कॅप, थंडीपासून संरक्षण करणारे स्टाइलिश शूज वा बूट. एकदम स्मार्ट ट्रॅव्हलर बनायचं. मार्चच्या पहिल्या आठवड्यात स्वित्झर्लंड मस्त असणार आहे. सभोवताली बर्फाच्छादित स्नो व्हाइट माउंटन्स आणि त्याच्या साथीने आपण वेगवेगळ्या अॅक्टिविटीज् आणि साइटसीईंगने धम्माल आणतोय. आत्ताच मी स्वित्झर्लंडला जाऊन आले आणि तिथेच ह्या टूरची संकल्पना मनात आली. ज्या गोष्टी मी केल्या त्या आमच्या समस्त महिला वर्गाला करता आल्या तरच माझ्याही प्रवासाला अर्थ आहे नं.
सो, चलो गर्ल्स, ह्या वुमन्स डे ला मिळून सार्याजणी देश विदेश पालथे घालूया, आत्मविश्वास वाढवूया, दृष्टीकोन व्यापक बनवूया, धम्माल करूया, भविष्यासाठी अनमोल आठवणींची साठवण करूया आणि आयुष्य हसत-खेळत झेलूया... कधी मॉरिशसच्या निळ्याशार समुद्रावर तर कधी लेह लडाखच्या हिमालयी उत्तुंगतेसोबत, कधी अमेरिकेच्या फ्रीडम लँडमध्ये तर कधी इंग्लंडच्या राणीच्या दिमाखात, कधी युरोपच्या अद्वितीय सौंदर्यासोबत तर कधी थायलंडच्या फेसाळत्या समुद्रावर.. चला बिनधास्त! लेट्स ब्रेक बॅरिअर्स अॅन्ड रॉक द वर्ल्ड!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.