भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे...’ एकोणिसशे बासष्ट पासून तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव ह्यांनी जन्माला घातलेली, देशपातळीवर सर्व राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेत अनुवादित झालेली, पाठ्यपुस्तकाचा अविभाज्य भाग बनलेली ही प्रतिज्ञा आजही शालेय जीवन सोडून दशकं लोटली असली तरी तनामनात एकप्रकारची उर्जा जागवते, देशाप्रतीच्या कर्तव्याची जाणीव करुन देते.
नशिबाने आम्ही अशा व्यवसायात आहोत की जेे काही ह्या प्रतिज्ञेत लिहिलं आहे ते सारं आम्हाला जगायला मिळतं. बंकिमचंद्र चॅटर्जींनी लिहिलेलं ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगान आणि रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं ‘जन गन मन’ हे राष्ट्रगीत ह्या दोन गोष्टी सुद्धा भारतात पर्यटन करताना कुठे ना कुठे सतत कानावर पडत राहतात आणि धन्य व्हायला होतं. हल्ली ‘वंदे मातरम’ थोेडं दूर्मिळ झालंय पण आमच्या गावी लहानपणी आम्ही ज्या शाळेत जायचो तिथे एक बरं होतं. आमचे वैद्य गुरुजी सकाळी शाळेची सुरुवात ‘जन गन मन’ ने करायचे आणि संध्याकाळी शाळा सुटताना ‘वंदे मातरम’ सर्वांकडून एकसुरात म्हणून घ्यायचे. वो भी क्या दिन थे! टोटल नॉस्टॅल्जिया!
भारत देशाची ओळख पर्यटनाद्वारे प्रत्येक भारतीयाला तसेच एनआरआय व विदेशी नागरीकाला करुन देणे, त्याला जगाचीही सैर घडवणे हा आमचा व्यवसाय. कार्यक्षेत्रच इतकं छान मिळालंय की कुणालाही त्याचं आकर्षण वाटावं. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातूर्य येतसे फार’ ह्यातलं ‘केल्याने देशाटन’ हे आम्हाला म्हणजे वीणा वर्ल्ड टीमला विनासायास व्यवसायाच्या निमित्तानेच करायला मिळतं. पर्यटकांना ह्यासाठी पैसे मोजावे लागतात. देशातील प्रत्येक राज्याची सैर पर्यटकांना घडविताना तेथील संस्कृती परंपरांचा जवळून अनुभव घेत असताना, पर्यटकांना त्याचा आनंद मिळवून देत असताना आमचाही व्यक्तिमत्व विकास घडत राहतो. प्रत्येक राज्य वेगळं, लोकं वेगळी, सवयी वेगळ्या, भाषा वेगळ्या. ह्या सर्वांशी दैनंदिन व्यवहार करताना अनुभवविश्व संपन्न होऊन जातं. आजकाल भारतात सर्वत्र हिंदी आणि इंग्लिशचा सर्रास वापर होत आहे त्यामुळे आमच्या टूर मॅनेजर्सचं जीणं सोप्पं झालंय म्हणायला हरकत नाही. पूर्वी म्हणजे सुपरमार्केट्स व गुगलपूर्व जमान्यात साऊथ इंडिया सहली करताना बर्याचशा सप्लायर्सना किंवा ग्रोसरी स्टोअर्समध्ये एखादी वस्तू मागताना आम्ही सॅम्पल्स घेऊन जायचो किंवा चित्र काढून दाखवायचो. आता वाण्याशी संवादच बंद झालाय, सगळं काही मोबाईलवर उपलब्ध झाल्याने माणसं एकमेकांशी बोलेनाशी झालीयेत. ‘जन्म-मृत्यू- सणवार-अभिनंदन’ ह्या सर्व संवादाची जागा इमोजी ने व्यापलीय त्यामुळे वातावरणात कितीही आवाज आरडाओरडा कोलाहल असला तरी माणूस मात्र एकदम ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोड मध्ये गेलाय. इथेही आम्ही भाग्यवान आहोत. आमचा आणि पर्यटकांचा संवाद अखंड सुरू आहे. आम्हाला एकमेकांशी बोलायला मिळतं आणि तसं बोलायला मिळावं म्हणूनही आमचे पर्यटक ग्रुप टूर्सचा पर्याय निवडतात. आत्ताच्या सहली तर आणखी अनुभवसंपन्न झाल्या आहेत कारण भारतातल्या विविध राज्यांमधून पर्यटक सहलीला येतात आणि ती सहल सार्या भारतीय देशबांधवांचं एक अनोखं आनंदी स्नेहसंम्मेलन बनून जातं. सहलीत विविधांगी भारताच्या अनेक गोष्टींचं ज्ञान मिळून जातं. एकमेकांशी बोलण्याने व अनुभव कथनाने प्रवासही चैतन्यमय बनून जातो. हे ही एक कारण आहे इंटरनॅशनल टूर्सवर आम्ही बसेसमध्ये वायफायला मज्जाव केल्याचं. जरा कल्पना करा ऑस्ट्रियामध्ये बसप्रवास सुरू आहे, रस्त्याच्या कडेला दिसणारी हिरवीगार टुमदार गावं आपलं लक्ष वेधून घेताहेत, किती बघू आणि काय बघू अशी आनंदमय स्थिती झालीय. डोळे दीपविणारं हे स्थलदर्शन बसमधून करणं हाही त्या सहलीतल्या स्थलदर्शनाचा भाग आहे. अशावेळी जर वायफाय सुरु केलं तर मला खात्री आहे ऐंशी ते नव्वद टक्के मंडळी हा बाहेरचा देखावा सोडून आपल्या मानेला त्रास देत त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतील, मानसिकरित्या दमतील. खूपच मोठा प्रवास असेल तर एखादा चित्रपट लावायला आम्ही परवानगी दिलीय अन्यथा इन्फॉर्मेशन शेअर करुया, एक्स्पीरियन्सेस् एक्सचेंज करुया, रंगतदार बनवूया आपला प्रवास...हा वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्सचा फंडा झालाय .
जर टूर मॅनेजर्सना बसप्रवास असा लाईव्हली करायचा असेल किंवा सहलीवरचं वातावरण प्रफुल्लित ठेवायचं असेल तर त्यांना स्वत:ला त्यासाठी तयार असावं लागतं, त्याचं ट्रेनिंग हा आमच्याकडे सततचा उपक्रम असतो. आम्ही प्रथम तुम्ही कसं बोलता, काय बोलता, तुमचा टोन ऑफ व्हॉईस कसा आहे ह्याची माहिती करुन घेण्यासाठी, ‘कौन कितने पानी में’ हे जाणण्यासाठी आणि त्याप्रमाणे ट्रेनिंगची दिशा ठरविण्यासाठी त्यांना तीन-तीन मिनिटांचं प्रेझेंटेशन द्यायला सांगतो. ही प्रेझेंटेशन्स आम्हाला आमच्या टीम मधले चांगले वक्त,े स्टोरी टेलर्स, विनोदवीर ह्यांचीही ओळख करुन देतात. ही सगळी प्रेझेंटेशन्स हिंदीमधून असतात. कारण संपूर्ण देशातून पर्यटक टूरवर येत असतात. भारतातील व्यवहाराची भाषा हिंदी आणि इंग्लिश ठरवली गेली ते बरंच झालं नाहीतर आपल्या देेशातील बावीस-पंचवीस भाषा शिकणं जड गेलं असतं. त्यामुळे आपली प्रत्येकाची मातृभाषा, आपल्या देशाची भाषा हिंदी, आणि आंतरराष्ट्रीय भाषा इंग्लिश ह्या तीन भाषा आम्ही वीणा वर्ल्ड कम्युनिकेशनचा महत्त्वाचा हिस्सा बनवून टाकल्या. सारे भारतीय जिथे एकत्र असतात तिथे देशविदेशातील सहलीवर हिंदी फारच सोयीची भाषा ठरली.
अगदी नवीन असलेल्या एका मुलाने रोहतांग पासवर प्रेझेंटेशन दिलं. ह्यामध्ये रोहतांग पास कसा खतरनाक आहे? तो बनवताना मजुरांचे कसे प्राण गेले? हिमवादळात एकदा आपले जवान कसे शहीद झाले ह्याचं इतकं डरावनं वर्णन केलं की माझ्या शेजारी जज म्हणून बसलेली एच. आर मॅनेजर रजिथा कानात म्हणाली, ‘क्या सच्ची में इतना स्केअरी है क्या रोहतांगपास?’. एका ट्रेनीने दिल्लीत बसला पडदे किंवा सनफिल्मस् का नसतात हे सहलीच्या पहिल्या दिवशीच्या संभाषणात सांगताना एका हृद्यद्रावक हत्याकांडानंतर दिल्ली सरकारने हा नियम आणल्याचं सांगितलं, ज्याची गरज नव्हती असं काही पहिल्याच दिवशी आठवायची. त्यासाठीच संवादाची भाषा फार महत्त्वाची. काही टूर मॅनेजर्स मात्र त्यांच्या संवाद शैलीने, स्टोरी टेलिंगने आम्हाला चकीत करुन टाकत होते. त्यामुळे आमची ट्रेनिंगची दिशा ठरविताना नेहमीच आठवतो तोे शिवाजीराव भोसलेंनी शिवचरित्रावर दिलेल्या व्याख्यानातील शिवाजी महाराजांविषयी एक संदर्भ...‘झोपलेल्याला जागं करा, जागं असलेल्याला उभं करा, उभं असलेल्याला चालायला लावा, चालणार्याला धावायला लावा आणि धावणार्याच्या खांद्यावर यशाचं निशाण द्या’. त्याप्रमाणेच आम्हाला ह्या प्रत्येक टूर मॅनेजरच्या नैपुण्याला पुढे न्यायचं होतं, त्यांना त्यासाठीच्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती करून द्यायची होती. काहींच्या संभाषणात हिंदी, उर्दूतले शुक्रगुजार, तहे दिलसे... असे अनेक भारदस्त शब्द येत होते, ज्याचं वजन त्यांनाच पेलता येत नव्हतं.
सध्या दिशा देण्याचंच काम आहे त्यामुळे मी सुरुवात केली. ‘आपण एक भारतीय पर्यटनसंस्था आहोत. सर्व भारतीयांची पर्यटनसेवा हे आपलं व्यावसायिक कर्तव्य आहे. त्याआधी आपण एक महाराष्ट्रीयन संस्था आहोत. आपण मराठी असल्याचा आणि पर्यटनक्षेत्रात मल्टिनॅशनल्सना नाकीनऊ आणीत पुढे असण्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आपल्या कार्यालयातही पंचाण्णव टक्के टीम मेंबर्स महाराष्ट्रातील आहेत. आपण सर्वजण संपूर्ण भारताशी आणि जगाशी हिंदी-इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करीत असलो तरी आपल्या ऑफिसमध्ये आपण मराठीत बोलतो जी आपली मातृभाषा आहे, आणि त्यात आपल्याला कोणालाही कमीपणा वाटत नाही किंवा ज्याला इंग्लिश येतं तो उच्च आणि मातृभाषेत बोलणारा गावंढळ अशातर्हेचा भ्रमही आपल्याकडे नाही. आपली मातृभाषा वाचविणारे आपणच आहोत आणि आपण आपल्या घरात व कार्यालयात तिचा वापर ठेवला तर ती वाचेल. त्यामुळे ते आपलं कर्तव्य आहे. मात्र जेव्हा आपण सहलीवर असतो तेव्हा महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोपर्यातून आलेल्या पर्यटकांसाठी आपण हिंदीचा वापर करायचा. बॉलीवूड सिनेमांमुळे हिंदी बहुतेकांना कळतं आणि त्यामुळेच आपण आपल्या सहलीत सर्वांना एकत्र आणू शकतो. आता जगात संचार करणार्या आणि जगाशी व्यवहार करणार्या आपल्यासाठी आपली मातृभाषा, हिंदी आणि इंग्लिश अशा भाषा आहेत. आणि त्या आपल्याला चांगल्या तर्हेने बोलता आल्या पाहिजेत. त्यासाठी अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन, प्रमोद महाजन, शिवाजीराव भोसले, राज ठाकरे आदि अनंत वक्त्यांची भाषणं त्यांची संवादफेक आपण ऐकली पाहिजे, अभ्यासली पाहिजे. बोलणं, विचारणं, सांगणं, पुटपुटणं, ओरडणं, भाषण, संभाषण, संवाद, सूचना, माहिती, इत्यादींमधला सुक्ष्म फरक आपल्याला कळला पाहिजे. पर्यटकांना कळेल-आवडेल अशा स्वरुपात उगाचच मोठमोठे अलंकारिक शब्द न वापरता आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. थ्री इडियट्स सिनेमातल्या चतुरसारखं नाही तर रँचोसारखं आपल्याला अर्थपूर्ण हवं तेवढं सोप्या पद्धतीने बोलता आलं पाहिजे. प्रत्येक शब्द स्पष्ट असला पाहिजे. तुमचं बोलणं इतकं परिपूर्ण हवं की तुम्ही बोलल्यानंतर समोरच्या पर्यटकांच्या मनातले सर्व प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही पाहिजे. बोलताना कुठे आवाज कमी करायचा, कुठे वाढवायचा, कशावर जोर द्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे त्याने आपलं बोलणं पर्यटकांना ऐकत रहावं असं वाटणार आहे. आणि मी हे तुम्हाला सांगतेय ते मी ही स्वत: माझ्या पंधरा वर्षांच्या टूर मॅनेजर कारकिर्दित शिकले आहे. आपल्या बोलण्याने वाईट शब्दही चांगले झाले पाहिजेत आणि गढुळ वातावरण आनंदी बनलं पाहिजे. ही सगळी किमया शब्द करू शकतात जर त्यापाठी आपली तळमळ असेल तर. भाषा श्रेष्ठ कनिष्ठ नसते, आपण ती कशी वापरतो त्याने तिची किंमत वाढते किंवा घटते. रोहतांग पास काय किंवा जगातलं कोणतंही स्थलदर्शन आपल्या बोलण्याने सुंदर झालं पाहिजे. त्याविषयीचं सगळं चांगलं आधी सांगा, भयावह गोष्टी जर असतील तर त्याचं प्रमाण भाजीतल्या मीठाएवढं ठेवा. सोप्प बोला, आयुष्यही सोप्प होऊन जाईल. पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा प्रत्येकजण आज आहे त्यापेक्षा कितीतरी पुढे असला पाहिजे ह्याची खूणगाठ बांधत आजचं सेशन संपवूया. पुन्हा भेटूच. हॅव अ हॅप्पी संडे!’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.