Published in the Saturday Lokasatta on 01 March, 2025
...आय ॲम द क्वीन! आय वॉन्ट टू ब्रेक द बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड ! या संकल्पनेतून मी वुमन्स स्पेशल टूर्स सुरू केल्या आणि अक्षरशः हजारो महिलांनी स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं. त्यांच्यासोबत मी सुद्धा प्रगल्भ झाले. 'केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार हे आम्ही अनुभवलं.....
‘डर के आगे जीत है’ ही एक छान टॅगलाईन आहे कोणत्या तरी सॉफ्टड्रिंकच्या जाहिरातीतली. हल्ली आपण आरोग्यासाठी हेल्दी फूडच्या पाठी असल्याने सॉफ्ट ड्रिंक्स किंवा पॅकेज्ड फूड वर्ज्य करतो आणि ते चांगलंच आहे म्हणा. आरोग्य उत्तम ठेवणं हे बऱ्यापैकी आपल्या हातात आहे, हे तसं बऱ्याच उशिरा कळलं. पण ज्याक्षणी कळलं त्या क्षणापासून आम्ही आमच्यात बदल करायला सुरुवात केली. शरीराने आणि मनाने म्हणजेच विचारांनी हेल्दी रहायचं हे ठरवून टाकलं आणि हाच आमच्या वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल टूर्सचाही पाया आहे. काळजी, चिंता, विवंचना तर आहेतच पण त्यांच्याशी सामना करायचा तर मन प्रसन्न हवं, मनात आनंदाची लहर फिरायला हवी आणि समाधानाचे तरंग उमटायला हवेत. जर घरातल्या महिलेचं मन प्रसन्न नसेल, जर तिच्या चेहऱ्यावर हसू उमटत नसेल तर ते घर तरी प्रसन्न, समाधानी असेल का? तर नाही. म्हणूनच तिला हे आनंदाचे बहाणे, हसण्याचं निमित्त मिळवून देणारी सहल म्हणजे आपली वुमन्स स्पेशल. हसूया, नाचूया, गाऊया, बागडूया, नटूया, सजूया, घराची गावाची शहराची राज्याची देशाची सीमा ओलांडूया, आत्मविश्वासाने एकेक पाऊल पुढे टाकूया, आयुष्य आनंदी बनवूया. घराघरात उत्साहाची कारंजी लावूया.
पूर्वी बऱ्याचदा वुमन्स स्पेशल टूर्सवर महिलांना भेटायला लेहलडाखपासून लंडनपर्यंत, शिमल्यापासून सॅनफ्रान्सिस्कोपर्यंत, ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कुठेही जिथे वुमन्स स्पेशल सुरू असेल तिथे मी जात असे. प्रचंड प्रवास केला पण कधी दमले थकले नाही. कारण या प्रत्येक टूरवर महिला ज्या तऱ्हेने एन्जॉय करायच्या, सहलीवर जो काही सळसळता उत्साह दिसायचा, तो बघून मला शक्ती मिळायची. नऊवारीतून पाचवारी, पाचवारीतून प्लाझो, चुडिदार मधून जीन्स, जीन्समधून स्कर्ट आणि चक्क स्विमिंग कॉश्च्यूम घालून पूलमध्ये मनसोक्त डुंबणाऱ्या महिलांची ट्रान्सफॉर्मेशन्स बघून मला मिळणाऱ्या आनंदाला परिसीमा नव्हती.
आज खरंतर मला ह्या सर्व महिलांचे आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी मला उर्जा दिली. माझ्या आयुष्याला आणि व्यवसायाला अर्थ दिला. कमर्शियली व्यवसाय होत असतो. पण तो करीत असताना जे एक प्रकारचं समाधान मिळावं लागतं ते या वुमन्स स्पेशलने दिलं. इतक्या वर्षांमध्ये महिलांना चौकटीबाहेर येऊन मुक्त आनंद घेताना बघून आपण समाजाची एक गरज भागविण्यामध्ये छोटंसं का होईना योगदान दिल्याचं समाधान मिळालं. ‘मी एकटी कशी बाहेर फिरायला जाऊ? लोक काय म्हणतील? मुलांना आणि पतीला सोडून एकटी मजा कशी करू?’ ह्या टॅबू मधून बाहेर यायलाच बरीच वर्षं लागली. अचानक असं कोणी तरी सांगायला लागलं की चला मज्जा करा, धम्माल करा, तरी आपण एकट्यानेच कशी धम्माल करायची? हा प्रश्न अनेकींच्या मनात यायचा. टूरवर पहिल्याच दिवशी घरातल्यांच्या, मुलांच्या आठवणीनं कावऱ्याबावऱ्या झालेल्या सगळ्याजणी पुढच्या चार-पाच दिवसात इतक्या मोकळ्या व्हायच्या आणि टूरवर मिळालेल्या नव्या मैत्रिणींच्या गराड्यात खुलायच्या की त्यांना आणायला एअरपोर्टवर आलेल्या त्यांच्या पतींच्या चेहऱ्यावर आपली टूरवर गेलेली पत्नी हीच होती का? असा प्रश्न उमटलेला मी पाहिला आहे.
ही सगळी किमया असते वुमन्स स्पेशलच्या जादुई वातावरणाची. बघा ना, नेहमी कोणती तरी जबाबदारी घेणारी, कोणाची तरी काळजी करणारी, कोणासाठी तरी मागे राहणारी महिला जेव्हा एकटीच जगाचा अनुभव घ्यायला बाहेर पडते, तेव्हा तिच्यावर कसलीही जबाबदारी नसते. सकाळी नाश्ता काय बनवायचा किंवा ऑफिसच्या प्रोजेक्टची डेडलाईन तर मिस होणार नाही? यातले कोणतेही प्रश्न मनात न ठेवता जेव्हा ती जैसलमेरच्या वाळवंटात किंवा केरळच्या बॅकवॉटरमध्ये नाहीतर मॉरिशसच्या सागर किनाऱ्यावर किंवा पॅरिसच्या सीन क्रुझवर इतर महिलांसोबत असते, तेव्हा खऱ्या अर्थानं त्या सगळ्याजणी आपलं लाईफ एन्जॉय करत असतात.
प्रत्येक टूरवर माझ्या आणि महिलांच्या संवादात माझं एकच सांगणं असायचं, ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ हे आपल्याला माहीत आहे पण ‘मुलगी आनंदी झाली तर घर आनंदी होतं सर्वार्थाने’ हे लक्षात घेऊया. म्हणून या मुलीला पर्यटनाच्या माध्यमातनं आनंद देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा स्वत:ला गिल्टमध्ये टाकू नका. तुम्ही घराबाहेर येताय, धम्माल करताय ही तुमची गरज आहे. पर्यटन हा आपला चार्जर आहे. तेव्हा जमेल तसं तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून किमान एकदा तरी असं स्वत:ला चार्ज करायचं आणि मग हसतहसत आयुष्याला सामोरं जायचं. काही वर्षांनी महिला हळूहळू त्या अपराधी वाटण्याच्या मानसिकतेतून बाहेर आल्या. नंतरचं आमचं लक्ष्य होतं ते घरच्यांना महिलांच्या ह्या पर्यटनाकडे सहृदयतेने बघण्यासाठी प्रवृत्त करण्याचं, कारण इथे दबंगशाही नव्हती. जे काही करायचं ते प्रेमाने. ‘केल्याने देशाटन... मनुजा चातुर्य येतसे फार’ ह्या उक्तीप्रमाणे महिला एकट्या पर्यटन करू लागल्या. त्यांच्यातल्या स्वागतार्ह बदलाचे पडसाद घरात उमटू लागले. घरातला आनंद वाढायला लागला आणि मग, ‘तू एकटी जाणार?’, ‘तू आम्हाला सोडून कशी जाऊ शकतेस?’, ‘आम्ही नाही बाबा असे मुलांना आणि नवऱ्याला सोडून भटकायला जात’, ‘काय मेलं ते भटकायचं खूळ डोक्यात भरलंय’, ‘असे पैसे उधळायला लाज नाही वाटत?’... अशा आणि याहून टोकाच्या कमेंट्स कमी व्हायला लागल्या. टोमणे मारणाऱ्या शेजारणी किंवा नातेवाईक महिलाही हळूहळू वुमन्स स्पेशलवर यायला लागल्या. घरातल्या मंडळींना वुमन्स स्पेशलच्या टॉनिकची महती कळली. घरातली चिडचीड वाढायला लागली की, ‘अगं तुला आता वुमन्स स्पेशलला जायची गरज आहे’ असं घरातलेही म्हणायला लागले आणि आम्ही भरून पावलो. आतातर घरातली मंडळीच तिला वुमन्स स्पेशलची टूर गिफ्ट देताहेत.
2006 साली म्हणजे अठरा वर्षांपूर्वी पहिली वुमन्स स्पेशलची संकल्पना मी राबवली, यशस्वी केली आणि वीणा वर्ल्ड झाल्यानंतर तर आत्ता दर आठवड्याला किंवा दररोज वुमन स्पेशलद्वारे महिला देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात मुक्त विहार करीत असतात, धम्माल करतात, मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण करून घेतात. हवे तसे मस्त मस्त कपडे घालतात, सिनेस्टार्सप्रमाणे मोठ्ठे गॉगल्स लावतात, असंख्य फोटोज काढतात, स्वत:वर प्रेम करतात. आय ॲम ब्युटीफुल, आय ॲम बोल्ड, आय ॲम द क्वीन अँड आय लव्ह मायसेल्फ हा आमच्या वुमन्स स्पेशलचा कन्सेप्ट आहे. मी माझं आयुष्य आनंदात जगतेय, तू तुझं आयुष्य आनंदात जग आणि त्यासाठी दोघींनी एकमेकींना मदत करूया आणि जीवनाच्या आनंदी सफरीवर निघूया हा सिधासाधा मामला आहे, जो वुमन्स स्पेशलवर जगला जातोय, पण पुढे तो आयुष्यातही कामी येतो. आयुष्य छोटं आहे, ते सगळ्यांनाच तेवढंच सोप्पं आहे किंवा तेवढंच अवघड, ते झेलायचंच आहे. त्यातले खाचखळगे कुणालाही चुकले नाहीत पण ते हसतहसत लीलया पेलण्यासाठीची सकारात्मक मनोवृत्ती जागृत करण्याचं बळ हे वुमन्स स्पेशलला एकमेकींकडून एकमेकींना मिळत राहतं. निर्धास्त-बिनधास्त-बोल्ड हा नारा आम्ही लावत असलो तरी इतक्या वर्षांत वुमन्स स्पेशल कधीही ‘चीप’ झाली नाही तसंच डिसेन्सी आणि एलिगन्सची पातळी कधी सोडली नाही म्हणूनच वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलच्या एवढ्या सहली भारतात आणि जगात सतत सुरू आहेत.
आठ मार्च येतोय. आपला वुमन्स डे! म्हणजे प्रत्येक दिवस आपलाच असतो, पण पर्यटनाला निघायला काहीतरी बहाणा पाहिजे नं. मग आम्ही ‘वुमन्स डे’ च्या निमित्तानं जास्तीत जास्त महिलांना या आनंदाच्या नव्या रंगात न्हाऊन निघायला सांगतो. त्यासाठी अथक तयारी करतो. आमच्या ऑफिस टीम्स आणि टूर मॅनेजर्स सज्ज असतात ही ‘दे धम्माल’ घडवून आणायला. ह्या वुमन्स डे ला महिलांनी चक्क 48 टूर्स हाऊसफुल्ल केल्या आहेत. हा वर्ल्ड रेकॉर्डच म्हणता येईल. आता महिला त्यांचं युरोप अमेरिकेला जायचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण करू शकताहेत, ऑस्ट्रेलियाच्या महाखंडाची वारी करू शकताहेत, जपान कोरियाची अद्भुत दुनिया बघू शकताहेत किंवा आपल्या इनक्रेडिबल इंडियाच्या ट्रॅव्हल मिशनमधली अनेक राज्य पाहू शकताहेत.
दोन वर्षांपूर्वीपासून वुमन्स स्पेशलच्या टूर्समध्ये आम्ही काही आणखी चांगले बदल करायला सुरुवात केली. जिथे शक्य आहे तिथे राफ्टिंग, कायाकिंग, हायकिंग, ट्रेकिंग, डेझर्ट सफारी, वाइल्ड लाइफ सफारी, जेटबोट राइड, सनसेट क्रुझ, सायंटिफिक मसाज ह्या गोष्टींचा समावेश केला. भारतीय भोजनासोबत लोकल फूडचाही आस्वाद द्यायला सुरुवात केली. पूर्वी आम्ही भारतीय भोजन सर्वत्र द्यायचा आग्रह करायचो, पण आता आपल्या भारतातच जगभराचं क्विझिन उपलब्ध झाल्यामुळे आपली टेस्ट डेव्हलप झाली आहे. त्यामुळे मग ‘लोकल फूडही द्या आम्हाला त्या त्या ठिकाणचं’ याची डिमांड वाढायला लागली आणि आम्ही ते बदलही केले. वेगवेगळे एक्स्पिरियन्सेस, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटिज्, फॅशन शो, रॅम्प वॉक या ॲक्टिव्हिटिज्नी वुमन्स स्पेशल टूर्स आणखी हॅपनिंग झाल्या. टूरवर येणाऱ्या मैत्रिणी मैत्रिणी आणि फॅमिली गर्लगँगचे ग्रुप्स वाढू लागले आणि वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल लक्झरी न राहता महिलांची गरज बनली. वुमन्स स्पेशल सहलीचे हे सात-आठ दिवस म्हणजे ह्या सगळ्या मुलींसाठी (हो ! वुमन्स स्पेशलवर सगळ्या मुलीच असतात बरं !!) एक अनोखा ब्रेक ठरतो. वेगवेगळ्या शहरातल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि वेगवेगळ्या वयोगटाच्या महिलांच्यात होणारी संवादाची आणि संस्कृतीची देवाणघेवाण मजेदार असते. तर असा आहे आमचा म्हणजेच वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलचा फंडा. आनंदाचा, उत्साहाचा, प्रेरणेचा, आत्मविश्वासाचा, सहकार्याचा आणि सकारात्मकतेचा.
सो, चलो गर्ल्स, ह्या वुमन्स डे ला किंवा पुढे वर्षभरात कधीही मिळून साऱ्याजणी देश विदेश पालथे घालूया, दृष्टीकोन व्यापक बनवूया, धम्माल करूया, भविष्यासाठी अनमोल आठवणींची साठवण करूया आणि आयुष्य हसत-खेळत जगूया... कधी मॉरिशसच्या निळ्याशार समुद्रावर तर कधी लेह लडाखच्या हिमालयी उत्तुंगतेसोबत, कधी अमेरिकेच्या फ्रीडम लँडमध्ये तर कधी इंग्लंडच्या राणीच्या दिमाखात, कधी युरोपच्या अद्वितीय सौंदर्यासोबत तर कधी थायलंडच्या फेसाळत्या समुद्रावर.. चला बिनधास्त! लेट्स ब्रेक बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड! वुई आर अनस्टॉपेबल!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.