Published in the Sunday Sakal on 17 March, 2024
जेव्हा आम्ही कॉपोरेट ऑफिस बनवलं तेव्हा ‘संदीप शिक्रे आणि असोसिएट्स‘च्या अल्पा शिक्रे आणि त्यांच्या टीमसोबत बर्याच मिटिंग्ज केल्या. अर्ध्या मिटिंग्ज आम्हाला नक्की काय हवंय ते त्यांनी जाणण्यासाठी होत्या तर अर्ध्या मिटिंग्ज ऑफिस कसं दिसलं पाहिजे ह्यासाठी. हे स्क्रिप्ट लिहिणं होतं, ते जेवढं व्यवस्थित करू तेवढा रीझल्ट चांगला मिळणार होता. मी, सुनिला, सुधीर अनेक गोष्टी शिकत होतो त्यातून. पर्यटन व्यवसायाच्या बाबतीत आम्ही अनेक नवनवीन प्रयोग यशस्वी केले होते, पण इंटिरियर्स एक्सटीरियर्स ह्याची आवड असली तरी आमच्याकडे ज्ञान आणि अनुभव हे काहीच नसल्यामुळे ऑफिस बनविण्याचा तो प्रवास संस्मरणीय आणि आनंददायी झाला. आम्हाला हवं होतं एक ‘ओपन ऑफिस‘ जिथला कोणताही कोपरा किंवा केबीन, ‘इथे बंद दाराआड काहीतरी शिजतंय‘ किंवा ‘सेफ डीपॉझिट व्हॉल्टमध्ये काहीतरी सिक्रेट लपलंय‘ असं सांगणार वा दर्शविणार नाही आणि कुणाला तसं वाटणार नाही असं पाहीजे. ‘जो है जैसा है वो सबके सामने है।‘ असं वातावरण ऑफिसमध्ये असलं पाहिजे आणि तसं दिसलंही पाहिजे हा आमचा छोटासा आग्रह होता. कारण ‘वुई आर ओपन ऑर्गनायझेशन‘ असं म्हणायचं आणि ऑफिसमध्ये अनेक सिक्रेट केबीन्स, लॉक्ड एरियाज, ‘ओन्ली फॉर मॅनेजमेंट‘ अशा पाट्या हा विरोधाभास आम्हाला नको होता. आपलं वागणं, आपलं बोलणं ह्याच्याशी संलग्न असलं पाहिजे आपलं कार्यालय आणि आपलं घर सुद्धा. आणि आमचं हे कॉर्पोरेट ऑफिस तसंच बनलं, कधीही आम्हाला एकदाही वाटलं नाही की कुठेतरी एखादी केबीन असायला हवी होती काही खलबतं करण्यासाठी किंवा सिक्रेट स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी. मला असं वाटतं की ऑफिस इतकं ओपन असल्यामुळे, भरपूर डे लाइट संपूर्ण ऑफिसभर खेळत असल्याने इथलं वातावरणसुद्धा सतत उत्साही असतं. मुख्य म्हणजे सकाळी जाग आल्यावर ऑफिसला यावंसं वाटतं, ऑफिसमध्ये जाऊन ‘चलो आज कुछ अच्छा करते हैं!‘ ही मनस्थिती असते. हा रीझल्ट मिळण्याच्या अनेक कारणांमधलं एक कारण हे ‘ओपन ऑफिस‘ आहे हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते. आतातर जगंच एवढं ओपन झालंय की आपल्या खाजगी आयुष्यातही काही लपू शकत नाही अशी परिस्थिती आहे. वेगळ्या अर्थाने स्टीव्ह जॉब्जचं वाक्य मला इथे आठवलं, ‘यू आर ऑलरेडी नेकेड‘. त्याचा म्हणण्याचा अर्थ जरी वेगळा असला तरी इथे ते मला समर्पक वाटतं. पूर्वी एखादी गोष्ट गावभर झाली की जेष्ठ मंडळी म्हणायची, ‘घरातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर नाही आल्या पाहिजेत‘ पण आत्ताच्या डिजिटल एज मध्ये आपल्याला प्रत्येकाला कुणीतरी डिजिटल गॉड आब्झर्व करतोच आहे. आपण म्हणायचो नं ‘देव सगळं बघत असतो‘. तो देव आता ‘टेक्नॉलॉजीच्या रूपात आपल्यावर मानसिक आर्थिक सामजिक अशा सगळ्या स्तरांवर सूक्ष्म लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच किमान आपण सर्वसामान्यांच्या बाबतीत म्हणायचं तर देअर आर नो सिक्रेट्स आणि वुई आर ऑलरेडी नेकेड. मग का नाही ओपन माईंड, ओपन हाऊस, ओपन ऑफिस ह्या गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनवून टाकायच्या!
एकदा आम्ही ऑफिस ओपन असावं ह्यावर शिक्कामोर्बत केल्यावर दुसरी महत्वाची गोष्ट होती ऑफिसच्या भींतींवर काय असावं. ट्रॅव्हल कंपनी म्हटल्यावर जगभरातले वेगवेगळे लँडस्केप्स भिंतींवर लावणं हा एक ऑप्शन होता. दुसरा संपूर्ण जगाचा वा भारताचा नकाशा वेगवेगळ्या रूपात लावणं. आणि तिसरा होता आम्ही जर काही व्हॅल्युज, प्रिन्सिपल्स फिलॉसॉफीज् फॉलो करीत असू तर त्या भिंतींवर स्थानबद्ध करण्याचा. भारतातले किंवा जगातले वेगवेगळ्या ठिकाणांचे लँडस्केप्स लावले तर कालांतराने आपल्याला त्याचा कंटाळा येऊ शकतो आणि ‘जे जाऊनच बघायचं आहे, तिथलं त्याचं जिवंत चित्र जर मनाच्या पटलावर एका आठवणीच्या स्वरूपात कोरायचं आहे तर मग ते फोटोच्या रूपात कशाला डोळ्यासमोर सतत ठेवायचं?‘ असा विचार करूण आम्ही ऑप्शन वन वर फूल्ली मारली. वेगवेगळे नकाशे लावण्याचा नंबर दोनचा ऑप्शन चांगला वाटला पण सगळीकडे नकाशे लावले तर त्याचा अतिरेक होईल म्हणून फक्त काही ठिकाणी नकाशे लावू शकतो हा विचार केला. आता तिसरा ऑप्शन होता तो म्हणजे जीवनाविषयक मूल्य, तत्व, नियम अशा काही गोष्टी लावण्याचा. तो आम्हाला चांगला वाटला. पण प्रश्न होता ‘आपण अशा गोष्टींचं सातत्याने पालन करतो का?‘ हा प्रश्न अनेक प्रश्नांमध्ये भर टाकणारा होता. म्हणजे आम्ही आयुष्याचा आणि व्यवसायाचा प्रवास चांगल्या मार्गाने करतोय एवढंच माहीत होतं पण ‘आम्ही नेमकी कोणती मूल्य जपतोय?‘, ‘एखादी अडचण आली तर ती कशा तर्हेने सोडवतोय?‘, ‘एखादा डीसीजन घ्यायची वेळ आली तर कशाप्रकारे तो घेतो?‘, ‘स्वत:ला सतत कसं अपग्रेड करतो?‘, ‘आपण नेहमी कोणत्या व्हॅल्युज प्रिन्सिपल्स आणि फिलॉसॉफीजचा आधार घेतो! हे प्रश्न आम्हीच आम्हाला विचारले आणि आठवत गेलो आपण कधी काय कशासाठी वापरत गेलो. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या होत्या, त्यांना एकत्र एका कॉर्पोरेट ऑफिसच्या त्या मोटीत बांधायचं होतं, आणि आम्ही झिरो डाऊन करायला सुरुवात केली. एक एक गोष्टी लिहीत गेलो, त्यावर खूप विचारविमर्षही केला. कारण जे काही त्या भिंतींवर विराजमान होणार होतं ते ऑर्गनायझेशनचा महत्वाचा भाग बनणार होतं. त्यावर फक्त ऑर्गनायझेशन नव्हे तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल म्हणजे एकेका टीम मेंबरची ती प्रोफेशनल लाइफस्टाईल समृद्ध करणारी दिशादर्शक गोष्ट बनणार होती.
आमची पहिली भिंत सजली ती ‘सिक्स थिंकिंग हॅट्स‘ ह्या फिलॉसॉफर एडवर्ड दे बोनो च्या प्रिन्सिपल्सनी, कोणताही निर्णय घेताना सर्वांगाने विचार कसा करावा तसेच निर्णय चुकीच्या दिशेने कसे जाऊ नयेत हे अतिशय सोप्या तर्हेने सांगणारी ही एकमेव तत्वप्रणाली आम्ही गेली अनेक वर्ष वापरतोय. एखादा नवीन प्रोजेक्ट अथपासून इतिपर्यंत करण्यासाठी आम्ही ब्रिटिश लेखक आणि कवी रूडयार्ड किपलिंगच्या ‘द एलिफंट्स चाइल्ड‘ ह्या कवितेचा आधार घेतला. 5W+1H ला आम्ही थोडंस आमच्यासाठी मॉडिफाय केलं आणि 6W+2H ही थिअरी सातत्याने वापरली. अनेक प्रोजेक्टस्, सध्याच्या पिटर थीअलच्या भाषेत सांगायचं तर ‘झिरो टू वन‘ सारखे पूर्ण केले. कधी कधी चुकाही झाल्या मग पुन्हा 6W2H जोखून पहायचं की नक्की आपण कुठे आणि का फेल गेलो वा नेमक्या कोणत्या पायरीवर आपण चूक केली. एका मोठ्या वॉलवर आम्ही तेहतीस कोटी देवतांना आपल्या पोटात सामावणार्या गाईला सेंटर ऑफ अट्रॅक्शन केलं ‘काऊ प्रिन्सिपल‘ ह्या उपाधीने. एक जुनं पुस्तक होतं, त्यात जगातल्या वेगवेगळ्या सीईओज् नी ते कुणापासून काय शिकले ह्याविषयी छोटे छोटे किस्से सांगितले होते त्यातला हा किस्सा. एक सीईओ एका पार्टीत आणखी एका अधिक अनुभवी सीईओ ला भेटला ज्याने त्याला सल्ला दिला, ‘जेव्हा कधी तू एखादा प्रॉब्लेम फेस करशील तेव्हा हे लक्षात ठेव, फस्ट टेक द काऊ आऊट ऑफ द डिच... सेकंड चेक व्हाय द काऊ वेंट इन टू द डिच...थर्ड, डू व्हॉटएव्हर यू कॅन सो दॅट द काऊ डझन्ट गो इन टू द डिच अगेन‘. ज्यावर आमचे एक वेलविशर कै. श्री बी. पी. वैद्य म्हणाले, ‘वीणा, नॉट ओन्ली दॅट काऊ बट एनी अदर काऊ शुड नॉट गो इन्टू द डिच अगेन.‘ एका पुस्तकातल्या ह्या एका छोट्या सल्ल्याचा आम्ही एवढा वापर केलाय आणि करतोय की काही विचारू नका. एका वेळी किमान शंभर आणि कमाल तीनशे टूर्स सुरू असतात, कुठेतरी काहीतरी उणं दुणं घडतंच असतं, त्यावेळी एखादी जर चूक जर निदर्शनास आली तर ‘कुणी केलं? का केलं?‘ हे शोधत बसण्यात वेळ घालविण्यापेक्षा पहिल्यांदा तो प्रॉब्लेम सोडवणं महत्वाचं, गाय खोल खड्ड्यात पडलीय तर तिला बाहेर काढून तिचा जीव वाचवणं महत्वाचं. एकदा का गाय वाचली किंवा प्रॉब्लेम सोडवला तातडीने, की मग शोधायचं गाय खड्ड्यात पडलीच कशी किंवा प्रॉब्लेम का झाला? आणि एकदा त्याचं मूळ शोधून काढलं की मग जो काही उपाय असेल त्याची अंमलबजावणी करायची जेणेकरून ती गाय किंवा कोणतीही दुसरी गाय त्या खड्ड्यात पडणार नाही किंवा जो प्रॉब्लेम होता किंवा चूक झाली होती ती घडणार नाही. ‘कुणी केलं?‘ ह्या पेक्षा ‘का झालं?‘ हे महत्वाचं. एकदा का अशा तर्हेच्या विचारांची सवय झाली की एकमेकांना दोष देण्यापेक्षा, डूख धरण्यापेक्षा, आरडाओरडा करण्यापेक्षा मोठे मोठे प्रॉब्लेम्स सर्वांच्या साथीने सोेडविले जातात. ऑर्गनायझेशनच्या भविष्यासाठीही ते बरं असतं. सो हे ‘काऊ प्रिन्सिपल‘ आमच्या फायद्याचं ठरलं. प्राजेक्ट प्लॅनिंग, डिसीजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्या तीन गोष्टी कोणत्याही ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने अतिमहत्वाच्या आणि तिथे ही तीन मार्गदर्शक तत्व किंवा ह्या पद्धती आम्हा सर्वांना एकाच मार्गाने चालायला शिकवतात. आम्हाला आजपर्यंत त्यात काही बदल करावा किंवा नवीन पद्धत आजमाऊया असं कधी वाटलं नाही एवढी ती इफेक्टिव्ह आहेत.
आज इन्फर्मेशन ओव्हर डोसच्या काळात आपल्याला प्रत्येक ठिकाणी ‘झिरो डाऊन‘ करणं फार महत्वाचं आहे अन्यथा गोंधळाची परिसीमा ठरलेली. नुस्तं आयडिअल डाएट काय असावं हेे गुगलला वा यु ट्यूबवर विचारून बघा, इतके सल्ले मिळतील आणि इतका गोंधळ उडेल की काय नेमकं करायचं हे कळेनासं होईल. तिच गोष्ट मॅनेजमेंट मेथड्सच्या बाबतीत, तिच गोष्ट औषधांच्या बाबतीत.. सो आपल्याला नक्की काय करायचंय? आपल्याला काय रुचेल? आपल्याला काय झेपेल? आपली क्षमता किती? आणि त्याला काय योग्य हे आपणच ठरवायचंय. कोणत्यातरी एका पद्धतीचा अभ्यास करून आपल्याला ती स्विकारावी लागेल आणि एकदा स्विकारल्यावर शांतपणे संयमाने त्यात मार्गक्रमणा करायची. यश मिळणारच. कर्मण्य वाधिकारस्ते...
अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...
गेल्या काही वर्षात जगभरातल्या मनोरंजन उद्योगांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर उमटवणार्या मालिका, सिनेमा आणि म्युझिक कोणतं? या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे ईस्ट आशियातल्या ‘साउथ कोरिया’ या चिमुकल्या देशात. जगभरातल्या लोकांना के-पॉप, के-ड्रामाची क्रेझ लावणार्या या देशाची भाषा सुध्दा जगातल्या अनेकांना कळत नाही पण आज नेटफ्लिक्सच्या २२१ दशलक्ष प्रेक्षकांपैकी साठ टक्के प्रेक्षक ‘के ड्रामा’चे चाहते बनले आहेत. तर या आजच्या कोरियाचं खरं नाव होतं ‘गोरियो’ जे ५व्या शतकातील गोरियो साम्राज्य होतं, मात्र १६व्या शतकात आलेल्या युरोपियन्सनी त्याचे रुपांतर केलं ‘कोरिया’ आणि मग तेच कायम झालं. या देशाच्या पूर्वेला सी ऑफ जपान तर पश्चिमेला यलो सी आहे. भारतातील तेलंगणा राज्यापेक्षाही आकाराने लहान असलेला साउथ कोरीया आयात निर्यातीच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर आहे. किमची सलाड याच देशाची देणगी मानलं जातं, त्यामुळे इथल्या प्रत्येक जेवणात तर किमची असतंच पण फोटो काढतानाही कोरियन लोक ‘चीज’ ऐवजी ‘किमची’ असं म्हणतात! जगातलं दुसर्या क्रमांकाचं सर्वात मोठं खडं लष्कर म्हणजे आर्मी या देशाकडे आहे. सेऊल ही या देशाची राजधानी आहे. या देशाची अर्धी लोकसंख्या याच शहरात वास्तव्य करते. 14व्या शतकापासून या शहराला राजधानीचा मान मिळाला आहे. सॅमसंग, एल जी, ह्युंदाई या कंपन्यांची मुख्यालयं याच शहरात आहेत. आठ टेकड्यांनी वेढलेल्या सेऊल शहरातून हान नदी वाहते. कोरिया हा देश इतिहासकाळात अखंड होता. मात्र दुसर्या महायुध्दाच्या शेवटी कोरीयावरील जपानी राजवट संपुष्टात आली आणि या देशाची विभागणी झाली. या देशाचा उत्तर भाग कम्युनिस्ट रशियाने व्यापला तर दक्षिणेला अमेरिकेने आपले बस्तान बसवलं. शीत युध्द ऐन भरात असताना कोरीयाच्या उत्तर आणि दक्षिण भागात युध्दाचा भडका उडाला. १९५० ते ५३ या काळात सुमारे तीस लाखांचे बळी घेऊन हे युध्द थांबलं. तेव्हा उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये एक सिमारेषा ठरवण्यात आली. हा भाग डी.एम.झोन (DMZ) म्हणजे डी-मिलिटराइज्ड झोन म्हणून ओळखला जातो. ४ किलोमीटर रुंदीचा हा पट्टा २५० किलोमीटर लांब आहे. या पूर्ण पट्ट्यात सैन्याचा मागमूसही नसला तरी हा भाग संपल्यावर लगेच दोन्हीकडे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सैन्य खडा पहारा देताना पाहायला मिळतं. डी. एम. झेड. मध्ये मानवी वस्ती वा हस्तक्षेप अजिबातच नसल्याने या प्रदेशाचे रुपांतर अभयारण्यात झाले आहे. कोरीयातील धोक्यात आलेल्या १०० जातींचे प्राणी इथे सुखाने नांदतात. अडीच हजारपेक्षा अधिक प्रकारच्या वनस्पती या प्रदेशात आहेत. आता डी.एम.झेड. हे कोरियाला भेट देणार्या पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरलं आहे. सेऊल या राजधानीच्या शहरातून डी. एम. झेड. च्या खास सहली आयोजित केल्या जातात. वीणा वर्ल्डबरोबर कोरीयाची सहल करून या जगावेगळ्या पर्यटन आकर्षणाला नक्की भेट द्या सोबत तैवान वा जपानही बघा.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
पोलार बेअर आणि आर्क्टिक सर्कल
सध्या मार्च महिना सुरू आहे आणि मला वेध लागले आहेत ते जून महिन्याचे, कारण जून २०२४ मध्ये मी एका अद्भुत सफरीवर जाणार आहे. माझ्यासारख्या जगभरातले ८७ देश बघितलेल्या व्यक्तीलाही ज्या सहलीची उत्कंठा वाटतेय ती सहल कुठली? तर वीणा वर्ल्डची ‘आर्क्टिक क्रुझ-पोलार बेअर एक्सप्रेस’. जगाच्या उत्तर टोकावरील ध्रुवीय वर्तुळाची ही सहल केली की मग जगाची दोन्ही टोकं पाहिल्याचं ‘पुण्य’(!) माझ्या खात्यात जमा होईल, कारण २०१८ मध्ये मी वीणा वर्ल्डसोबतच ‘साउथ अमेरिका विथ अंटार्क्टिका ’ ही २९ दिवसांची सहल केली आहे. मुळात मला प्रवासाची आवड असल्याने मी आपल्या देशापासून म्हणजेच भारतातल्या राज्यांपासून सुरुवात केली. आता भारतातील फक्त सिक्कीम आणि लक्षद्वीप ही दोन ठिकाणं माझी पाहायची शिल्लक आहेत. आजपर्यंत मी वीणा वर्ल्डबरोबर जगभरातल्या १९ सहली केल्या आहेत. माझी प्रवासाची भूक इतकी मोठी आहे की मी अनेकदा वीणा वर्ल्डच्या टीमला नवनवीन देश, जे माझे अजून पाहून झाले नाहीत ते सुचवत असतो. पण खरंच सांगतो वीणा वर्ल्डसोबत जग बघताना अतिशय कम्फर्टेबल वाटतं कारण वीणा वर्ल्ड ही जरी व्यावसायिक कार्यक्षमतेनं काम करणारी प्रवासी संस्था असली तरी इथलं वातावरण मात्र अतिशय घरगुती असतं, त्यामुळे तुम्ही परिवारातल्या सदस्यांबरोबरच प्रवास करताय असं वाटतं.
वीणा वर्ल्डची ऑल इन्क्लुसिव्ह टूर प्राइस ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. मला वाटतं वीणा वर्ल्डच्या सहलींचं रहस्य त्यांच्या टूर मॅनेजर्समध्ये दडलेलं आहे. वीणा वर्ल्डच्या अतिशय तत्पर, कर्तव्यदक्ष, जाणकार टूर मॅनेजर्समुळे तुमच्या सहलीची रंगत अधिक वाढते हा माझा अनुभव आहे. या सगळ्या टूर मॅनेजर्समधील विवेक कोचरेकरला मी कधीच विसरू शकणार नाही. मी त्याच्यासोबत साउथ अमेरिका अंटार्क्टिकासह पाच सहली केल्या. त्याच्या इतका जाणकार टूर मॅनेजर मी दुसरा पाहिला नाही. आज विवेक या जगात नाही पण त्याचा वारसा वीणा वर्ल्डचे इतर टूर मॅनेजर्स नक्कीच चालवत आहेत. वीणा वर्ल्ड सोबत मी माझं देशांचं शतक पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे.
कायबाई खाऊ कसं गं खाऊ!
आज जगभरात ज्या राज्यपध्दतीचे गोडवे गायले जातात ती ‘लोकशाही’ जिथे जन्माला आली तो देश म्हणजे ‘ग्रीस‘. पाश्चिमात्य संस्कृतीचा पाळणा याच देशात हलला असे मानले जाते. राज्यशास्त्र, तत्वज्ञान, गणित, नाट्यशास्त्र... ग्रीसचे योगदान लाभलेल्या विषयांची यादी मोठी आहे. हिपोक्रेट्सच्या वैद्यकशास्त्रापासून ते अॅरिस्टॉटलच्या काव्यशास्त्रापर्यंत ग्रीसने अनेक मौल्यवान देणग्या जगाला दिल्या आहेत. मात्र ग्रीसच्या देणग्या फक्त म्युझियममधील कलाकृती आणि शासन यंत्रणेपुरत्या मर्यादित नाहीत तर जेवणाच्या टेबलावरही ग्रीसची आठवण निघतेच कारण ‘ग्रीक सलाड’सारखा आरोग्यदायी, चविष्ट पदार्थ याच देशाने दिला आहे. ग्रीसची खाद्य संस्कृती ही ‘मेडिटेरिनिअन’ खाद्य संस्कृती मानली जाते. गहू, वाइन आणि ऑलिव्ह ऑइल हे या खाद्य परंपरेचे तीन प्रमुख स्तंभ आहेत. सागर किनारा असल्याने जेवणात मासे असतातच.
ग्रीसवर इसवी सनाच्या पहिल्या शतकात राज्य करणार्या रोमन लोकांनी त्यांच्याबरोबर ग्रीसचे पदार्थ जगभरात नेले आणि त्यामुळेच ग्रीक सलाडही लोकप्रिय झाले. पारंपरिक पध्दतीने बनविल्या जाणार्या ग्रीक सलाडमध्ये टोमॅटो, काकडी, कांदा, ऑलिव्ह आणि फेटा चीज वापरले जाते. फेटा चीज हे खास ग्रीसमध्ये बनवले जाते मेंढीच्या दुधापासून किंवा शेळी आणि मेंढीचे दुध एकत्र करून ब्लेन्ड करून ते तयार केले जाते, त्यामुळे त्याला एक खारट, आंबट चव असते. ग्रीक सलाडवर ग्रीक ओरेगॅनो, मिठ, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइलचे ड्रेसिंग करतात. यात काही वेळा ग्रीन बेल पेपर, केपर बेरीज्ही घालतात. ग्रीक सलाड हे स्थानिक शेतकर्यांच्या आहाराचा मुख्य भाग मानले जाते, कारण यात वापरले जाणारे घटक पदार्थ ग्रीक शेतकर्यांना सहज उपलब्ध असतात.
ग्रीसच्या बाहेर हे सलाड बनवताना त्यात अनेकदा लेट्युस वापरला जातो. तर जिथे फेटा चीज बनतच नाही तिथे अन्य प्रकारचे चीज वापरले जाते. अमेरिकन ग्रीक सलाडमध्ये मुळा वा सार्डिन मासे यांचाही वापर केला जातो. मग वीणा वर्ल्डच्या ग्रीस सहलीत सहभागी होऊन ओरिजिनल ग्रीक सलाडचा स्वाद नक्की घ्या. देश विदेशातील अशाच विविध खाद्य परंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.
नेपाळ
आज परदेशात जाणं हे तसं अप्रुप राहिलेलं नाही. प्रत्येक घरातला वा नातेवाईकांमधला कुणीना कुणी, कधीना कधी, कुठेनाकुठे परदेशवारी करून आलेला असतो आणि त्याच्या प्रवासाच्या रंजक कथा आपण सर्वांनी ऐकलेल्या असतात. पण, पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीचा विचार केला तर परदेशप्रवास तेवढा अगदी कॉमन झाला नव्हता. एक कुणी परदेशी जायचं म्हटलं की संपूर्ण घर वा पूर्ण गाव विमानतळावर दाखल व्हायचं जाणार्याला निरोप देण्यासाठी. त्यावेळी ‘फॉरिन रीटर्न्ड‘ ह्या गोष्टीला वेगळं वलय होतं. जो कुणी फॉॅरिनला जाऊन आला असेल त्याला वेगळा मान असायचा. त्यामुळेच एकतरी बाहेरचा देश आपण बघितलेला असला पाहिजे ही प्रत्येकाच्या मनातली सुप्त इच्छा असायची. आणि मग आपल्या शेजारचा नेपाळ देश प्रत्येकासाठी ‘फॉरिन रीटर्न्ड‘ ही उपाधी लागण्यासाठी एक इझी टार्गेट होता. वाराणसी गोरखपूर सारख्या ठिकाणांहून बाय रोड जाता यायचं किंवा कलकत्ता वाराणसीहून एअर इंडियाचं फ्लाइट असायचं, तिथून लोक नेपाळची वारी करायचे. काळ बदलला, परदेशवारी ही बर्यापैकी नित्याची बाब बनली जनमानसात. आता लोक नेपाळला जातात ते नेपाळ बघण्यासाठी, नेपाळची अनेकविध आश्चर्य स्वत: अनुभवण्यासाठी, आपल्या ट्रॅव्हल मिशनमध्ये असलेल्या नेपाळ देशाला भेट देऊन पन्नास पंचाहत्तर वा शंभर देशांमधला एक देश पूर्ण करण्यासाठी. तसं बघायला गेलं तर नेपाळ आपल्या भारतातल्या एखाद्या राज्याच्या आकाराचा लहानसा हिमालयाच्या पायथ्याशी असलेला देश. भारत, पाकिस्तान, चीन, नेपाळ व थोडासा अफगानिस्तान ह्या पाच वा सहा देशांना हिमालयाची कुस लाभली आहे. भूतान आणि नेपाळ हे दोन देश जवळजवळ हिमालयातच आहेत म्हणायला हरकत नाही आणि त्यातला नेपाळ हिमालयावर मालकी सांगणारा देश असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण जगातले आठ सर्वात उंच माउंटन पीक्स माउंट एव्हरेस्टसह एकट्या नेपाळमध्ये आहेत. जगाला शांतीचा संदेश देणार्या भगवान बुद्धांचा जन्मही नेपाळमधला, लुंबिनी ह्या एक छोट्या गावातला. नेपाळला माउंटेनियर्स, हायकर्स, ट्रेकर्स, अॅडव्हेंचरर्सचं पॅराडाइज म्हटलं जातं तसंच नेपाळ सुप्रसिद्ध आहे सर्व प्रकारच्या पर्यटकांमध्ये कारण अप्रतिम निसर्गसौंदर्याने हा देश सजलेला आहे. नेपाळची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नेपाळवर कधीच कोणत्याही राजवटीने म्हणजे मुघल, चायनीज, ब्रिटिश, पोर्तुगिझ, स्पॅनिश लोकांनी राज्य केलं नाही. कुणाचाही अंकित न झालेला हा देश जास्तीत जास्त हिंदू लोकांचा देश आहे. नेपाळी, मैथिली ह्या भाषा प्रामुख्याने बोलल्या जात असल्या तरी नेपाळमध्ये हिंदूंचे शंभरहून आधिक वंशिक गट आहेत जे १२३ बोलीभाषा बोलतात. ह्या छोट्याशा देशात दहा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. पशुपतीनाथ, स्वयंभूनाथ, बौद्धनाथ, मुक्तीनाथ ही त्यातली आपण पाहिलेली ऐकलेली मंदिरे तसेच भक्तपूर पाटण व काठमांडू हे दरबार स्क्वेअर आपल्या पर्यटनाच्या यादीतील अग्रस्थानी असलेली ठिकाणं. सो, अनेक हायेस्ट-डीपेस्ट चे रेकॉर्ड असणार्या नेपाळला तुम्ही अजून गेला नसाल तर ठरवा आत्ताच आणि बघून घ्या आपल्या शेजारचा हा एक अफलातून देश वीणा वर्ल्डसोबत.
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्
बॉन व्होयाज...बॉन क्रुझिंग
कोणत्याही टूरवर सर्वात जास्त दगदग कसली वाटते तर दर दोन दिवसांनी एका हॉटेलमधून सगळं लगेज घेऊन चेक आऊट करायचं आणि दुसर्या ठिकाणी चेक इन करायचं. पण जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखाद्या आठ दहा बारा दिवसांच्या लांबलचक टूरवर हा आपलं लगेज ‘पॅक-अनपॅक’ करण्याचा खेळ न खेळता जाऊ शकता, तर! खरंच असा पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे ‘क्रुझ हॉलिडे’. आता क्रुझ हॉलिडे म्हटल्यावर लगेच ‘दिल धडकने दो’ आठवला ना? त्यात कसे सगळे अनिल कपूरची वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला क्रुझवर जमलेले असतात. क्रुझवरच्या फॅसिलिटीजचा आनंद घेत घेत ते युरोपमधील साइटसीइंगही करतात. तर अशीच मजा तुम्ही जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी करू शकता. जुन्या जमान्यातल्या शीप्सनी क्रुझच्या रुपानं नवा अवतार धारण केला आणि पर्यटकांना एक आरामदायी, लक्झरी हॉलिडेज्चा नवा मार्ग मिळाला.
आज जगभरात अगदी अंटार्क्टिकापासून ते साउथ ईस्ट एशियापर्यंत सगळीकडे क्रुझ टूरिझम रुजलेलं पाहायला मिळतं. बर्फाळ अलास्कापासून ते इतिहास, संस्कृतीचे रंग दाखवणार्या युरोपपर्यंत क्रुझ टूर्सचे पर्याय उपलब्ध आहेत. कॅरिबियन, मेडिटेरिनियन, पॅसिफिक अशा वेगवेगळ्या समुद्रातल्या क्रुझेस पर्यटकांना आकर्षित करीत असतात. ओशन क्रुझ, रिव्हर क्रुझ, एक्सपिडिशन क्रुझ असे क्रुझ हॉलिडेज्चे वेगवेगळे प्रकार आहेत. कार्निव्हल क्रुझ लाइन, रॉयल करिबियन इंटरनॅशनल, नॉर्वेजियन क्रुझ लाइन, प्रिन्सेस क्रुझेस अशा काही क्रुझ कंपन्या जगप्रसिध्द आहेत. कंपनीनुसार क्रुझवरील सुविधा बदलतात आणि अर्थात त्यांचे बजेटही बदलते. तुम्हाला अतिशय लक्झुरियस अनुभव हवा असेल तर क्रिस्टल क्रुझेस, सी बॉर्न, सिल्व्हर सी अशा कंपन्यांची निवड करू शकता. ठरलेल्या मार्गावर आरामात प्रवास करताना तसंच किनार्यांवरील पर्यटन आकर्षणांना-शोअर एक्सकर्शन्सना भेट देत क्रुझचा प्रवास सुरू असतो. या क्रुझेसवर राहाण्यासाठी बाल्कनी केबीन, स्विट केबिन, ओशनव्ह्यू केबिन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुखसुविधांनी युक्त केबिन्स असतात. तुम्ही कोणती केबिन निवडता यावरही तुमच्या हॉलिडेची रंगत अवलंबून असते, कारण केबिन्सच्या जागेनुसार दिसणारे दृश्य, बसणारे हेलकावे यात नक्कीच फरक पडतो. क्रुझवर पर्यटकांच्या दिमतीला स्पा, बार, थिएटर, स्विमिंग पूल, जीम, सनडेक, कसिनो सज्ज असतातच शिवाय म्युझीकल शो, मॅजिक शो, डान्स शो अशी लाइव्ह एन्टरटेनमेंटही असते. त्यामुळे जेव्हा क्रुझ भर समुद्रातून प्रवास करत असते तेव्हा पर्यटकांचा वेळ अगदी मजेत जातो. बरं फक्त युरोप, अमेरिका, हवाई, स्कँडिनेव्हिया, बहामाज या परदेशातल्या डेस्टिनेशन्स साठीच क्रुजेस नाहीत तर भारतातील लक्षद्वीप, गोवा, अंदमान आणि आपल्या शेजारच्या श्रीलंकेसाठीसुध्दा क्रुझेस आहेत. कोणत्या कंपनीची क्रुझ बूक करायची हे तुम्ही नक्की कशासाठी हॉलिडेवर जाताय म्हणजे फक्त रिलॅक्स व्हायला की भरपूर साइटसीइंग करायला त्यावर ठरवावं. मात्र क्रुझचं बुकिंग लवकर करावं लागतं, कारण एअरलाइन्सप्रमाणेच क्रुझचे रेट्सही डायनॅमिक असतात आणि पटापट वाढतात. कोणत्या कंपनीची क्रुझ टूर बुक करायची? कोणत्या क्रुझ टूरवर काय काय सुविधा आहेत? या सगळ्यासाठी वीणा वर्ल्डचा कस्टमाईज्ड हॉलिडे विभाग आहेच. आमच्या मदतीने एक झकास क्रुझ टूर नक्की बूक करा आणि ‘दिल धडकने दो’ म्हणत तुमच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित करा. बॉन क्रुझिंग !!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.