...पस्तीस वर्षांनी का होईना आमचे विचार जुळले म्हणायचे. आणि आम्ही वॉर्डरोबची उचलबांगडी केली. रूम मोकळी झाली, खिडकी उघडली गेली, रूम सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाली...
जग बदलतंय, वेगाने बदलतंय आणि त्यामुळे आपल्या गरजाही. पूर्वी माझ्या कामाच्या टेबलावर किती वस्तू असायच्या, आता त्यातल्या एक चतुर्थांशही नाहीत. कोविडमध्ये आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमधला एक मजला भाड्याने दिला होता थोडीफार आमदनी होईल म्हणून. तिथे एक फिनटेक कंपनी आली तीन वर्षांसाठी, त्यांनी आमच्या ऑफिसमधले स्टोअरेज युनिट्स काढून तिथे वर्कडेस्कस् बनवले. त्यांचं म्हणणं आमचं सगळं काम लॅपटॉपवर, एक छोटी हॅवरसक घेऊन आमची टीम येते, त्यांना स्टोअरेजची गरजच नाहीये. आम्हाला त्यांचं एवढं अप्रूप वाटलं होतं त्यावेळी. अर्थात आमच्या नवीन होणाऱ्या ऑफिसेसमध्ये स्टोअरेज ही संकल्पना आता फारच आऊटडेटेड झालीये. एका पेडेस्टलने काम चालतं. घरातसुद्धा तांदूळ, कांदे, मसाले यांची वर्षभराची साठवण करण्याचं स्टोअरेजही रिकामं झालं. ‘दहा मिनिटात’ म्हणत जग दाराशी हात जोडून उभं असताना गरजच काय असल्या साठवणूकीची. खचाखच भरून असलेली कपाटं मोकळी झाली. वस्तूंना श्वास घ्यायला जागा झाली.
आपलं घरही कसं टप्याटप्याने बदलत असतं. सुधीरने त्याच्या मुख्याधापक वडिलांसोबत अनेक शाळा बदलल्या, तर मी अजून चांगली शाळा हवी म्हणून शाळांसोबत जागा बदलत राहिले. अर्थात शिक्षण आणि शहाणपण किती मिळवलं ती गोष्ट वेगळी, पण त्यामुळे जिप्सी म्हणजेच डोक्यावर गाठोडं बांधून जिथे जाऊ तिथे आनंदात जगण्याची सवय लागली. नंतर तर प्रवास आणि पर्यटन जीवनाचं अविभाज्य अंग बनलं आणि बॅगांमध्ये गरजा बंदिस्त झाल्या. मुंबईत रहायला आल्यावरचा आमचा प्रवास ‘नो बेडरूम हाऊस’ पासून सुरू होऊन प्रत्येकासाठी स्वतंत्र बेडरूम पर्यंत जाऊन पोहोचला. पहिल्या घरात सर्वांसाठी एक वॉर्डरोब आणि घरात ढीगभर, नव्हे डझनभर माणसं, त्यामुळे त्या वॉर्डरोबचा एक खण काय तो वाट्याला यायचा. अर्थातच एवढ्या खच्चून भरलेल्या गोष्टी असायच्या त्यात की दारही जपून उघडायला लागायचं वस्तू पडतील म्हणून. माझ्या मैत्रिणीने, शर्मिलाने एकदा हा आमचा वॉर्डरोब पाहिला आणि त्याला ‘हरप्पा मोहेंजोदरो’ नाव दिलं. हळूहळू ‘प्रत्येक वस्तूला जागा आणि जागेवर प्रत्येक वस्तू’ प्रमाणे आमच्या घरातल्या कुटुंबांना स्वतःची घरं मिळाली आणि प्रत्येक माणसाला एक खोली आणि खोलीत प्रत्येक माणूस’ म्हणत सर्वांनाच स्वतःची स्पेस वा प्राइव्हसी मिळाली, आणि आमची घरघर थांबली. प्रत्येकाची रूम, वॉर्डरोब, डेस्क सगळं काही साग्रसंगीत झालं आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा झाला कोविडमध्ये. कैदखान्यात असल्यासारखा प्रत्येकजण आपापल्या खोलीत. आजारी पडले तरी तिथेच बंदिस्त. जेवण काय ते दाराबाहेर नेऊन ठेवायचं. कोविड संपला आणि मुलं त्यांच्या त्यांच्या घरी गेली आणि घर सुनं झालं. नीलने त्याची रूम ब्लॅक अँड व्हाइट बनवली होती तर राजने निळी. नील हेताला मुलगी झाली, आम्ही आजी-आजोबा झालो रायाचा अधूनमधून वावर व्हायला लागला आणि नीलची ब्लॅक ॲन्ड व्हाइट रूम फारच नीरस वाटायला लागली. आम्ही त्या रुमचा कायापालट करायचं ठरवलं. मुंबईतली घरं आणि त्या घरातल्या रुमच्या साईजेस. त्यामुळे करून करून तरी काय कायापालट करणार अशी अवस्था. दोन मोठ्या वॉर्डरोबनी रूम अर्धी भरलेली. बेड आणि रायटिंग टेबल. फार काही करता येण्यासारखं नव्हतं, तरीही करायचं होतं. काहीतरी बदल व्हायलाच हवा होता. ‘सुधीर आपण एक वॉर्डरोबच कमी करूया का? मग आपल्याला बेडची दिशा बदलता येईल, गेली दहा वर्षं बंद असलेली ती बेडच्या बाजूची खिडकीही उघडता येईल’ सुधीरने थोडा विचार केला आणि म्हणाला, ‘करून टाक.’ मी आश्चर्यात. पस्तीस वर्षांनी का होईना आमचे विचार जुळले म्हणायचे. आणि आम्ही वॉर्डरोबची उचलबांगडी केली. रूम मोकळी झाली, खिडकी उघडली गेली, रूम सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाली. हे सगळं सुरू असताना माझ्या मनात खतरनाक विचार डोकवायला लागले. आमच्याही रूममध्ये दोन वॉर्डरोब होते, त्यातला एक कमी केला तर? पण हे जरा धाडसाचं काम होतं. सुधीरला विचारणं भाग होतं कारण तो अर्धा भागीदार होता रूमचा. भल्या सकाळी माणसाचं मन प्रसन्न असतं असं म्हणतात, त्यातच आपलं काम करून घ्यावं. कारण जर वॉर्डरोब काढायचा असेल तर आजचाच दिवस होता, कार्पेंटर्स उद्यापासून येणार नव्हते. मी सुधीरला रुममध्ये बोलावलं. ‘हा वॉर्डरोब पण काढूया का? रूम मोकळी होईल. हल्ली आपल्या गरजा कमी झाल्यात, आपण फारसं शॉपिंग वगैरेही करीत नाही. एका वॉर्डरोबमध्ये मावतील कपडे.’ धाडसाने बोलले मी. ‘काढून टाक.’ सुधीरने एका वाक्यात पुन्हा एकदा परवानगी दिली आणि संध्याकाळपर्यंत आमचीही रूम एका वॉर्डरोबने कमी झाली. नव्हे, मोकळी झाली. आठ दिवसांनी सगळी रंगरंगोटी वगैरे झाल्यावर असं लक्षात आलं की दोन वॉर्डरोब कमी करूनही वस्तू राहिल्या सगळ्या, अर्थात काही कमीही केल्या. पण ते दोन वॉर्डरोब कमी झाल्याने खूप हलकं वाटायला लागलं. घर आणखी प्रसन्न वाटायला लागलं. आठ-दहा वर्षांनी आपल्या सवयी आणि गरजांमध्ये बदल होतात त्याप्रमाणे घरातही बदल करायला पाहिजेत ह्या विचारावर माझं मी शिक्कामोर्तब करून टाकलं.
ह्या रूम्सचा मेकओवर होत असताना घरात नजर टाकली, अजून काही गोष्टी कमी करता येतील का? तर लक्षात आलं की घरात खूप डिव्हिडीज आणि सीडीज होत्या स्मारकाच्या स्वरूपात. मागे एकदा त्यातल्या बऱ्याच काढूनही टाकल्या होत्या. पण ह्या काढायचं धाडस झालं नव्हतं, कारण त्यासोबत अनेक आठवणी जोडलेल्या होत्या. किती आनंद दिला होता त्या गाण्यांनी, ऑडियो बुक्सनी, PS3-PS4 डीव्हिडीज तर मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होत्या. फ्रेंडस सिरियल, चांदणे शिंपीत जाशी वा गीतरामायण अशा कितीतरी गोष्टी आज ऑनलाइन यू ट्यूूबसारख्या माध्यमाद्वारे उपलब्ध आहेत, पण त्या डीव्हिडीजचे किंवा सीडीजचे बरेच सेट्स घराबाहेर जायला तयार नाहीत. त्यासाठी मोठी मानसिक तयारी करावी लागेल आणि ती केलीच पाहिजे, कारण तोच फ्यूचरिस्टिक मुद्दा आहे.
मी मलाच समजावत होते. ब्लॉकबस्टर व्हिडिओ सीडीज आणि नेटफ्लिक्सच्या उदाहरणाने. खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर व्हिडिओज्ने राज्य केलं जगावर, अगदी नावाप्रमाणे हिट होती कंपनी. पण काय येऊ घातलंय भविष्यात त्याकडे तिचं दुर्लक्ष झालं. ब्लॉकबस्टरच्या स्टोअरमधून रेंटवर आणलेली एका सिनेमाची डीव्हिडी परत द्यायला उशीर झाला आणि रीड हेस्टिंगला चाळीस डॉलरचा दंड झाला. त्याला राग आला आणि तो विचार करू लागला, ‘स्टोअरमधून का रेंट करायच्या डीव्हीडीज वा मुव्हीज? त्या घरातच टीव्हीवर लोकांना दिसल्या तर?’ आणि नेटफ्लिक्सचा जन्म झाला. जगप्रसिद्ध ब्लॉकबस्टर कंपनी आपल्या विस्मरणात गेली. पण रीड हेस्टिंगचे उपकार आहेत कारण आपल्या घरातली स्टोअरेज स्पेस वाचली की त्याच्यामुळे. नाहीतर अजून कपाटं वा शोकेसेस कराव्या लागल्या असत्या.
पूर्वी कुणाच्या घरी गेल्यावर व्हीएचएस डीव्हिडी व्हिसिडीजनी भरलेल्या शोकेस बघायला मिळायच्या. त्या आधी एलपी रेकॉर्डस् असायच्या. टेक्नॉलॉजी एक वरदान आहे हे खरं आहे. तिच्यामुळे घरं मोकळी झाली आणि त्यामुळे मनंही.
पंधरा एक दिवसांनी आमच्या घरच्या वर्षा आणि श्रुतीला विचारलं, ‘हे दोन वॉर्डरोब कमी झाले म्हणून तुमची काही अडचण नाही नं झाली?’ तर म्हणताहेत, ‘अजिबात नाही.उलट आमच्या आवराआवरीची दोन कामं कमी झाली. आता वाटतंय की कशाला होती ती कपाटं?’ चला, एकूणच सर्वांचा फायदा झाला होता. जेव्हा पंधरा पंधरा दिवस किंवा वर्षातले सहा महिने आम्ही प्रवासात असतो तेव्हा तर एका बॅगेत सगळ्या गरजा सामावलेल्या असतात. मग घरात असतानाच गरजा एवढ्या कशा वाढतात हा माझा अजूनही न सुटलेला प्रश्न आहे. म्हणजे पझेशन्स आणि ॲटॅचमेंट्स हे त्या गरजा वाढण्यामागचं कारण आहे हे कळतंय, पण वळत नाही.
हिमालयात वाघाचं कातडं पांघरून एक त्रिशूल हातात घेऊन, वास्तवातल्या मोहमायेपासून लांब राहून तटस्थपणे भगवान भोलेनाथ जय जय शिव शंकर आपल्याला चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् असं म्हणत अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत तोच संदेश देत आहेत. पण आपण ‘हम नहीं सुधरेंगे’ चा जणू चंगच बांधलाय.
एक जैन साधू आपल्या मातीच्या भांड्यातून पाणी पीत असत. एक शिष्य एक दिवस त्यांना पाणी पिण्यासाठी सुंदरसा चांदीचा पेला देतो. आणि त्या दिवसापासून ‘कोणी तो चांदीचा पेला चोरून नेईल की काय’ या विचाराने त्या साधूंचं मनःस्वास्थ्य बिघडतं. तो छोटासा प्याला त्यांच्या काळजी आणि चिंतेचं घर बनतो. आपण या चांदीच्या मोहजालात अडकलोय हे साधूंना कळून चुकतं. ते त्यांच्या शिष्याला प्रेमाने तो चांदीचा पेला परत करतात आणि पुन्हा एकदा आपलं मातीचं भांडं जवळ करतात.
आणखी एक उदाहरण द्यायचं तर, जगज्जेता अलेक्झांडर भारतावर स्वारी करायला आला तेव्हा एका साधूला भेटायला गेला. मोठ्या गर्वाने तो त्याला म्हणाला, ‘मी जगज्जेता आहे. काहीही माग.’ साधूने त्याला बाजूला हटवले आणि म्हणाला, ‘बाजू हो, तू माझा सूर्यप्रकाश झाकतो आहेस.’ अलिप्ततेचं त्याचं रूप बघून अलेक्झांडरला उपरती झाली असं म्हटलं जातं.
‘जापनीज तातामी रूम्स म्हणजे फर्निचररहित संपूर्ण मोकळ्या खोल्या.’ गरजेच्या वस्तू हव्या तेव्हा अंथरायच्या, काहीही आणि कसलीही साठवणूक नाही. स्टीव्ह जॉब्ज जपानी संस्कृतीचा भोक्ता होता. त्यातूनही कदाचित त्याला सिम्पल ईझी डिझाईन्स, ओपन वर्क स्टेशन्स, क्लटर फ्री, स्टोअरेज फ्री शोरूम्सची आयडिया सुचायला मदत झाली असावी. आपल्याला जाणवते ही दिव्यदृष्टी जेव्हा आपण ‘ॲपल’ च्या शोरूमला भेट देतो तेव्हा.
आपण बजेट एअरलाइन्सला दोष देतो फक्त पंधरा किलोच बॅगेज अलाऊड करतात म्हणून. पण त्याचा दुसरा भाग असा आहे की आपल्याला त्या एअरलाईन्स शिकवतात ‘थोडक्यात भागवा. खूप काही सोबत घेऊ नका. सगळीकडे सगळं काही मिळतंय.’ आर्मी नेव्ही एअरफोर्सचा तर नाराच आहे, ‘ट्रॅव्हल लाईट, मूव्ह फास्ट’ थोडक्यात ही फिलॉसॉफी आपल्याला सांगते की, आयुष्यात जिंकायचं असेल तर बी लाइट! घरातलं आणि मनातलं ओझं दूर ढकलून द्या. हलकं व्हा. आणि उत्साहाने आयुष्याला सामोरं जा.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.