IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10AM - 7PM

एक असं नातं...

18 mins. read

सात आठ वर्षांपूर्वी आम्हा मित्रमंडळींचा ग्रुप ग्रीसमध्ये संतोरिनी आयलंडवर सनसेट बघण्यासाठी गेला होता. एका छानशा व्ह्यू पॉइंट असलेल्या रेस्टॉरंटच्या टेरेसवर डिनर टेबलवर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. अशावेळी गप्पा कुठूनही कुठेही जातात. बॉलिवूड, हॉलिवूड, क्रिकेट फुटबॉलपासून अगदी सरकारला दोष देण्यापर्यंत. काय बोलायचं हा प्रश्नच नसतो, पायलीला पन्नास विषय असतात. गिरीश-सुप्रिया करंदीकर, अरुण-लीना पालकर आणि आम्ही दोघे असे सहाजण गप्पांमध्ये रंगलेले असताना विषयाची गाडी युरोप अमेरिकेत वाढणारी आपली पुढची पिढी, ते बहुतेक आता त्या देशांचेच रहिवासी होतील यातला आनंद आणि वेदना, आपल्या देशातून होत असलेला ब्रेन ड्रेन... अशा थोड्याशा नाजूक विषयाकडे वळली. कारण आम्ही तिघंही 'सेलिंग इन द सेम बोट’ होतो. आमची, पूर्ण वा अर्धी पुढची पिढी परदेशातील सुवर्णसंधी आणि तेथील सुखसुविधांकडे आकर्षित होऊन तिथे स्थायिक झाली होती. दोष देण्यासारखं काहीच नव्हतं, कारण आता खऱ्या अर्थाने ‘हे विश्वचि माझे घर' अशा अतिशय छानशा युगात आपण राहतोय. कुणी घराची वेस ओलांडून दुसऱ्या घरात जातात, कुणी गावाची वेस ओलांडून शहरात येतात, कुणी राज्याची वेस ओलांडून दुसऱ्या राज्यात जातात तर कुणी देशाची वेस ओलांडून परदेशात जातात. 'टार्इम टार्इम की बात है'. त्यामुळे या स्थलांतराचं स्वागतच व्हायला पाहिजे. शेवटी माणूस हा एका जागी स्थिर राहणारा प्राणी नाही हे पूर्वापार सिद्ध झालंच आहे. अर्थात आपण माणसं आहोत आणि असं म्हणतात की कोणत्याही प्राण्याला न मिळालेली एक गोष्ट आपल्याकडे आहे ती म्हणजे भावना इमोशन्स, आणि त्यामुळेच आपण कधीकधी चुपचाप आवंढा गिळण्याचं काम करीत असतो. आमच्या गप्पांमध्ये चुटकुले आणि जोक्सची बरसात करणारा अरुण पालकर जो की आता आमच्यात राहिला नाही तो म्हणाला, 'आपल्या अमेरिकेतल्या पुढच्या जनरेशन्स असंच म्हणतील नं की आमचे पूर्वज भारतात राहत होते. आमचे आजोबा अमुक एका वर्षी भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. ‘आय हॅव बीन वन्स टू इंडिया...’ हो यार खरंय, असं  म्हणत आम्ही सर्वजण त्या कारुण्याची झालर असलेल्या मिश्‍किलीमध्ये हसत हसत सामील झालो. म्हटलं तर समस्या, म्हटलं तर प्रगती, म्हटलं तर आनंद, म्हटलं तर वेदना अशा संमिश्र भावनांनी भरलेला हा घराघरातला विषय. आमच्या सोसायटीमध्ये बहुतेक सगळ्या घरांमध्ये साधारणपणे आमच्याच वयाची दोन किंवा चार माणसं, नवराबायको आईवडील किंवा सासूसासरे. सर्वांची मुलं परदेशात. ‘एम्टी नेस्टर्स’. ‘जी लेते है अपनी जिंदगी’ म्हणत सगळेजण निश्चितपणे आपापलं आयुष्य मजेत घालवताहेत. तसंही सगळ्यांचंच आत्तापर्यंतचं जीवन कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी पूर्णपणे घेरलेलंच होतं नं. स्वतःकडे बघायला तरी कुठे वेळ मिळाला होता? लेट्स एन्जॉय!

आम्ही बिझनेसवाले, मार्केटिंग मार्इंडवाले, किंवा इनोव्हेशनवाले स्वस्थ बसत नाही. समाजातल्या समस्यांकडे, कुटुंबातल्या दबलेल्या वेदनांकडे आम्ही डोळसपणे तसंच तटस्थपणे बघत असतो. ‘व्हॉट्स फॉर मी’ हा प्रश्न सतत डोळ्यासमोर असतो. व्यवसाय करीत असताना टॉपलार्इन बॉटमलार्इन जमा खर्च ह्या गोष्टींना प्राधान्य असतंच आणि ते असायलाच हवं कारण व्यवसाय सतत चांगल्या तऱ्हेने वाढत राहिला पाहिजे. पण त्याचवेळी आपल्या व्यवसायाद्वारे आपण सकारात्मक तऱ्हेने समाजासाठी काय योगदान देतो हे ही तितकंच महत्त्वाचं. आपण करीत असलेली प्रत्येक गोष्ट ही सर्वांना आनंद देणारी असावी, त्याद्वारे समाजाला, वातावरणाला, निसर्गाला, माणसांना आणि विचारांना कोणतीही हानी पोहोचणार नाही ह्याची खबरदारी आपण घ्यायला हवी या विचारातून व्यवसाय करीत असल्याने कोणतीही खंत नाही आणि त्याचा पुरावा म्हणजे रात्री झोप शांत लागते. ‘कुठेही पश्चात्ताप करावा लागणार नाही असंच काम आमच्याकडून होऊ दे‘ ही देवाला प्रार्थना. सो, अशा या करियर आणि व्यवसायामुळे दुभागलेल्या, वेगवेगळ्या देशांमध्ये राहणाऱ्या आमच्यासारख्या कुटुंबांकडे बघताना आमच्या कल्पक मनाला सुचलं की इथे राहणारे आजी आजोबा आणि तिथे दूरदेशी राहणारी त्यांची नातवंडं ह्यांना एकत्र आणायचं. कुठेतरी मध्यावर भेटवायचं, कॅलिफोर्नियात असतील तर सिंगापूर जपान किंवा व्हिएतनामला आणि लंडन न्यूयॉकमध्ये असतील तर दुबईला किंवा स्वित्झर्लंडला. आजी आजोबांनी भारतातून त्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आणि नातवंडानी ती जिथे कुठे जगात असतील तिथून येऊन आजीआजोबांना जॉइन व्हायचं. आठ-दहा दिवस मजेत घालवायचे आणि आजी आजोबा नातवंडांचं नातं किंवा बॉन्ड दृढ करायचा. परदेशी राहणाऱ्या नातवंडांना आपल्या भारताची ओळख तर व्हायलाच पाहिजे नं. मग डिसेंबरच्या चांगल्या मोसमात त्यांच्या सुट्टीत ते घडवून आणायला पाहिजे. काय, कशी वाटते आयडिया? आणि हो! ही फक्त आयडिया नाही बरं का. जेव्हा वीणा वर्ल्ड झालं तेव्हा मी स्वतः या टूर्ससोबत जात असे. ‘ट्राइड टेस्टेड अँड सॅटिस्फाइड' असं व्हायचं ह्या टूर्सवर असताना. आजी आजोबा त्यावेळी अगदी 'सातवें आसमान पर' अशा अत्यानंदी मनस्थितीत असायचे. ‘याजसाठी केला होता अट्टाहास’ असं  जणू जीवन सार्थकतेचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं. त्याचवेळी नातवंडाना आजी आजोबा आणि त्यांचं निखळ प्रेम नव्याने जाणवायचं. मुख्य म्हणजे या टूरवर नातवंडं आईबाबांच्या धाकातून बाहेर आलेली असतात आणि आजी आजोबांच्या निर्व्याज प्रेमात ओथंबून गेलेली असतात. आईवडिलांच्या दृष्टीने हा 'स्पायलर्स वीक' असतो. म्हणजे ह्या टूर सुरू होताना एअरपोर्टवर मुलांना आजी-आजोबांच्या आणि वीणा वर्ल्डच्या भरवशावर सोडताना चिंतेने आईवडिलांच्या चेहऱ्यावर हजारो प्रश्नचिन्हं असतील याची मला खात्री आहे. आणि त्यामुळेच आम्ही आईवडिलांना या टूरला ‘प्रवेशबंदी’चा बोर्ड दाखवलाय. ‘नो एन्ी टू पेरेंट्‌‍स!’ ये मामला सिर्फ प्यार और प्यार का है। दुलार का है। इथे आठ-दहा दिवस व्यवहारी जीवनाला पूर्णविराम! शाळा कॉलेज अभ्यास नियम या सगळ्यांना सुट्टी. वर्षा-दोन वर्षांतून एकदा असा आनंद या आजी-आजोबा- नातवंडांच्या स्पेशल बॉन्डला द्यायला काय हरकत आहे? याला आपण रिज्युविनेशन थेरपी' म्हणूया जी आजी आजोबा नातवंडांना आजीवन आनंद देत राहील, कायम स्मरणात राहील. आईबाबांना यात प्रवेशबंदी असली तरी त्यांचं एक कर्तव्य त्यांनी पार पाडायचंय. ते म्हणजे या टूरवर येणाऱ्या दोन्ही पार्टीज्‌‍ना टूरपूर्वी सिलेक्शनसाठी आणि आर्थिक बोजा उचलण्यासाठी मदत करायचीय.

एक एक नाती इतकी नाजूक असतात नं, त्याला खतपाणी घालूनच ती रुजवावी लागतात, वाढवावी लागतात. प्रत्येक कुटुंबात हे काम चालूच असतं आणि आमच्यासारख्या संस्था त्यामध्ये कमर्शियली आणि इमोशनली फूल ना फुलाची पाकळी प्रमाणे योगदान देत असतात. माझा एक्केचाळीस वर्षांचा टुरिझममधला वावर आणि गेल्या बारा वर्षांचा वीणा वर्ल्डचा प्रवास बघितला तर पर्यटन व्यवसाय करताना आम्ही नेहमीच 'कुटुंब' अग्रस्थानी ठेवलं, त्या कुटुंबाच्या गरजांचा अभ्यास केला आणि त्यातूनच निर्माण झाली 'वुमन्स स्पेशल टूर’ची यशस्वी संकल्पना जी आज सर्वत्र लोकप्रियतेचा उच्चांक गाठत आहे. सिनियर्स स्पेशल टूर म्हणजे जेष्ठांची श्रेष्ठ सहल ज्याद्वारे जेष्ठ मंडळी अगदी निर्धास्तपणे जगभरात पर्यटन करताहेत. कुटुंबातल्या नवविवाहितांसाठी हनिमून स्पेशल, तरुणींसाठी योलो ॲडव्हेंचर टूर्स, मध्यमवयीन कपल्ससाठी कपल टूर्स, आजोबा नातवंडांसाठी ग्रँडपॅरेंट-ग्रँड चिल्ड्रेन स्पेशल टूर्स, फॅमिलीज्‌‍साठी रेग्युलर  तसेच लक्झरी ग्रुप टूर्स, मनासारखा हॉलिडे हवा असणाऱ्यांसाठी कस्टमाईज्ड हॉलिडे, दूरदेशी राहणाऱ्या नातेवाईकांसाठी इंडिया टूर्स अशा गोष्टी निर्माण केल्या आणि प्रत्येक कुटुंब त्याचा आनंद लुटतंय. आणि या सगळ्यामुळेच तर वीणा वर्ल्डची टॅगलाइन बनली, 'वीणा वर्ल्ड प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी.’

वुमन्स स्पेशल आता इतकी प्रत्येक घरात पोहोचलीय की त्याच्या वेगवेगळ्या डिमांड्स यायला लागल्यायत. या टूरमध्ये आम्ही फक्त मुलींनाच प्रवेश देतो. मुलगा लहान असला तरी प्रवेश नाही. त्यामुळे आता डिमांड आली आहे ती ‘नॉट विदाऊट माय किड्स’ वाल्या मॉम्सकडून, ‘वुमन्स स्पेशल विथ किड्स’ ची. जिथे फक्त आई आणि मुलं असतील. मुलांची वयोमार्यादा आम्ही वय वर्षे पंधरापर्यंत ठेवली आहे. म्हणजे दहावीपर्यंतची मुलं मुली. जेव्हा ही सूचना वारंवार यायला लागली तेव्हा आम्हाला कळलं की आता आपण याचा विचार करायलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत परीक्षांनंतर ह्या टूर्स लावल्या आहेत. मुलांना आणि त्यांच्या आईलाही आवडतील अशा डेस्टिनेशन्सना ‘वुमन्स स्पेशल विथ किड्स.’ आई मुलांचं नातंही तसंच आहे नं, ते वृद्धिंगत झालं पाहिजे आणि म्हणूनच या टूर्स जिथे आई तिच्या किचन वा करियरपासून मुक्त असेल आणि संपूर्ण वेळ, खऱ्या अर्थाने क्वालिटी टाइम तिच्या मुलांना देऊ शकेल.

कमर्शिअली व्यवसाय होत राहतो, पण वुमन्स स्पेशल किंवा ग्रँडपॅरेंट्स ग्रँड चिल्ड्रेन सारख्या संकल्पना यशस्वी होताना दिसतात तेव्हा खूप मोठं समाधान मिळतं. असं समाधान सतत निर्माण करीत राहणे म्हणजे व्यवसायाची आणि आयुष्याची लढाई जिंकली म्हणायची.


देखो अपना देश दिल से! प्यार से! सम्मान से!

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतातल्या काही राज्यांना निसर्ग सौंदर्याची देणगी लाभली आहे. नॉर्थ ईस्टमधलं मेघालय असंच एक राज्य. मेघालयचा संस्कृत भाषेतील अर्थ मेघाच्छादित प्रदेश असा होतो. हे राज्य इथल्या लँडस्केप्ससाठी आणि व्हायब्रंट आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. मेघालयात मातृसत्ताक कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे. इथे मालमत्तेचा वारसा आईकडून मुलीकडे जातो. मेघालयची राजधानी शिलाँग हे इथलं प्रसिद्ध शहर आहे. शिलाँगला पूर्वेकडचे स्कॉटलंड म्हटले जाते. हे शहर इथल्या आल्हाददायक हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी खासकरून प्रसिद्ध आहे. यामुळे देशातीलच नाही तर विदेशातील पर्यटकही इथे आकर्षित होतात. एलिफंट फॉल्स हा शिलाँगपासून जवळच असलेला थ्री टियर वॉटरफॉल प्रसिद्ध आहे. इथलं मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध असलेलं चेरापुंजी हे ठिकाण गेली अनेक वर्षं जगातलं सर्वाधिक पावसाची नोंद असलेलं ठिकाण होतं. हे ठिकाण माहीत नसलेला माणूस शोधून सापडणार नाही. हे ठिकाण पावसासोबतच इथले वॉटरफॉल्स, केव्ह्ज आणि लिव्हिंग रूट ब्रिजेससाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी शिलाँगपासून 60 किलोमीटर अंतरावरच्या मौसिनराम या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मावलीनॉन्ग हे ईस्ट खासी हिल्स या जिल्ह्यातील गाव स्वच्छतेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथे धूम्रपानावर आणि पॉलीथिनच्या वापरावर बंदी आहे. 2003 साली ट्रॅव्हल मॅगझिन डिस्कव्हर इंडियाने ‘आशियातील सर्वात स्वच्छ गाव’ म्हणून या गावाची निवड केली. हे गाव इथल्या कम्युनिटी बेस्ड इको टुरिझम ऍक्टिव्हिटीजसाठी प्रसिद्ध आहे. इथले रबराच्या झाडांच्या मुळांपासून बनविलेले लिव्हिंग रूट ब्रिज प्रसिद्ध आहेत. मेघालयातल्या डावकी या ठिकाणी उमंगोट नदी आहे. ही नदी तिच्या स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्यासाठी ओळखली जाते. इथलं पाणी इतकं स्वच्छ आहे की इथे बोटी जणू हवेत तरंगताहेत असा भास होतो. याशिवाय मेघालयातील जोवई ठिकाण वॉटरफॉल्स आणि मोनोलिथ्ससाठी प्रसिद्ध आहे. इथले काही खास स्थानिक पदार्थ म्हणजे मोमोज, जदोह, क्यात, मी कातुंग. अशा या मेघालयाला ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स मध्ये मोठी पसंती दिली जाते. मग तुम्ही कधी जाताय ढगांच्या कुशीत विसावलेलं हे राज्य पहायला?


अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

टर्की या देशातल्या इस्तंबूल शहरात ब्लू मॉस्क हे एक प्रसिध्द ठिकाण आहे. याच्या सुप्रसिद्ध इतिहासाच्या पलीकडे फेमस आहे तो या ठिकाणचा मिनार वाद. या मॉस्कमध्ये सहा मिनार आहेत. हे मिनार इसवीसन 1600 च्या सुरुवातीस बांधले गेले. तेव्हा यांच्या संख्येमुळे याबद्दल वाद उपस्थित झाला होता. तोपर्यंत मक्कामधील ग्रँड मॉस्क ही सहा मिनार असलेली एकमेव मशीद होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुलतान अहमद प्रथम याने मक्केमध्ये आध्यात्मिक श्रेष्ठता टिकवून ठेवण्यासाठी तिथे सातवा मिनार बांधण्याचा आदेश दिला. इथल्या घुमटाची रचना हे एक ऑप्टिकल इल्युजन आहे. म्हणजेच इथे मशिदीच्या आत उभे राहिले असता हा मध्यवर्ती घुमट प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा मोठा दिसतो. हे आश्चर्य घडते ते या मॉस्कच्या इनोव्हेटिव्ह आर्किटेक्चरल लेयरिंगमुळे. यामध्ये सेमी डोमच्या रचनेमुळे कॅस्केडींग इफेक्ट मिळतो आणि त्यामुळे ही रचना अधिक भव्य वाटते.

या मॉस्कला ब्लू मॉस्क म्हणण्यामागे एक खास कारण आहे. या मॉस्कच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या 20000 पेक्षा जास्त इझनिक टाइल्समुळे या वास्तूला ब्लू मॉस्क म्हटलं जात असलं तरीही तिचे हे नाव फक्त तिच्या रंगावरून देण्यात आलेले नाही. खरंतर हे नाव हिच्या निर्मितीनंतर अनेक वर्षांनी पडलं आणि हे नाव दिलं गेलं ते युरोपियन प्रवाशांकडून. इथे आलेले हे प्रवासी रात्रीच्या वेळी स्टेन्ड काचेच्या खिडक्यांमधून मॉस्कच्या आतील भागावर पडणाऱ्या निळ्या प्रकाशाने मंत्रमुग्ध झाले होते. आणि म्हणूनच त्यांनी याला ब्ल्यू मॉस्क म्हणून संबोधलं.

कॉन्स्टँटिनोपलच्या बायझेंटाईन ग्रेट पॅलेसच्या जागेवर हा मॉस्क उभारण्यात आला. त्यामुळे या मशिदीच्या खाली आजही पुरातन काळातले भूमिगत बोगदे आणि राजवाड्याचे अवशेष आहेत. या मॉस्कच्या बांधणीची कथाही रोचक आहे. सुलतान अहमद प्रथम हा राजा अशुभ मानला जायचा. त्याला युद्धात हार पत्करावी लागली आणि म्हणून साम्राज्य कमकुवत झालं असं त्याच्याबद्दल बोललं जाई. त्याने आधीच्या राजांसारखा मिळालेल्या लुटीतून मशिदीसाठी वित्त पुरवठा केला नाही, तर थेट तिजोरीतून वित्त पुरवठा करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. मशिदीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वयाच्या फक्त 27 व्या वर्षी त्याचं निधन झालं आणि त्याला त्याच्या स्वतःच्या मशिदीत दफन करण्यात आलं. या मशिदीची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मॉस्क मधल्या काही टाईल्स सदोष किंवा असिमेट्रिकल दिसतात. हे असे जाणीवपूर्वक करण्यात आले, कारण ऑट्टोमन कारागिरांचा असा विश्वास होता की केवळ देवच परिपूर्ण असू शकतो आणि म्हणून मानवी कलाकृतींमध्ये हेतूपुरस्सर अपूर्णता असायला हवी. आज अनेक ऐतिहासिक स्थळे काळाच्या पडद्याआड जात असताना ब्ल्यू मॉस्क आजही चालू आहे. इथे प्रवेश करण्याआधी तुम्हाला तुमचे शूज किंवा चप्पल बाहेर काढून मगच आत प्रवेश करता येतो. इथे जाताना सभ्य पोषाखात जावं लागतं. हे मॉस्क दररोज पाच वेळा प्रार्थनांसाठी बंद होतं. असं हे ऐतिहासिक आणि अद्भुत ठिकाण पहायचं असेल तर वीणा वर्ल्डसोबत टर्कीला चला.


रिटायरमेंटनंतरची भ्रमंती

मला लहानपणापासून फिरण्याची प्रचंड आवड होती. बालपणीच ठरवलं होतं की मोठं झाल्यावर संधी मिळाली की खूप फिरायचं, पण पुढे नोकरीमुळे आणि मग प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे मला मनासारखं फिरता आलं नाही. याचं सगळं उट्टं मी नोकरीमधून रिटायर झाल्यानंतर काढलं आणि बराच फिरलो. रिटायर झाल्यानंतर माझा जवळपास सगळा भारत फिरून झाला. काही देशांमध्ये सुद्धा फिरायला गेलो. त्यात नेपाळ, भूतान, अंदमान, दुबई, श्रीलंका हे देश आहेत तसंच भारतातली आसाम-अरुणाचल-मेघालय सारखी नॉर्थ ईस्ट मधली राज्यं सुद्धा आहेत.

मी 'रमेश वसंत आबादे' राहायला पुणे. मी, माझी बायको आणि आमचा मुलगा असा माझा परिवार आहे. मी वीणा वर्ल्डसोबत केलेली एक टूर म्हणजे 'युरोप'! माझ्या घराजवळच्या वीणा वर्ल्डच्या ऑफिसमधूनच मी ही टूर बुक केली. युरोपमधल्या तेरा देशांमध्ये फिरणं सगळ्यात जास्त एन्जॉय केलं मी! युरोपमधला निसर्ग अतिशय सुंदर आहे. त्यामुळे माझी युरोप टूर अतिशय अविस्मरणीय अशी ठरली. युरोपचं हवामान आल्हाददायक असल्यामुळे आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. त्यावेळी आमच्या आयटेनरीमध्ये 'ऍम्स्टरडॅम(नेदर्लंड्स)' बरोबर मिनी युरोप अशी ओळख असणारं 'मदुरोडॅम' होतं. पण काही कारणास्तव तिथे जाणं आम्हाला कॅन्सल करावं लागलं, त्यावेळी 'राकेश पवार' आणि 'प्रणय थळकर' या टूर मॅनेजरनी आम्हाला विश्वासात घेऊन शांतपणे परिस्थिती समजावून सांगितली. आमच्या टूरमधल्या सगळ्यांनीही अजिबात का कू न करता झालेला बदल स्वीकारला हे विशेष! याची दखल हेड ऑफिसने घेतली आणि आम्हाला आम्ही टूरवरून परत आल्यावर नुकसान भरपाई सुद्धा दिली. अर्थातच हे मुद्दाम सांगायला हवं. त्यानंतर आम्ही सगळे स्वित्झर्लंडमध्ये माऊंट टिटलिसला गेलो. तिथे आईसफॉलचा सुखद अनुभव घेतला. दोन्हीही टूर लीडर्सनी आम्हाला जागोजागी अभ्यासपूर्ण, डिटेल माहिती दिली. आम्हा सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली. त्यामुळे आता यापुढे सुद्धा मी वीणा वर्ल्ड बरोबरच टूर करणार आहे, आता माझा नेक्स्ट प्लॅन आहे जपानला चेरी ब्लॉसमचा सीझन एन्जॉय करणं. वीणा वर्ल्डच्या मॅनेजमेंटला नाव ठेवायलाच जागा नाही. ऑफिस स्टाफपासून टूर मॅनेजरपर्यंत सगळेच लोक एक माणूस म्हणून दृष्ट लागण्याइतके उत्तम आहेत. आपण आपल्या घरातल्या लोकांची कशी काळजी घेऊ तशी ते पर्यटकांची बडदास्त ठेवतात, यातच त्यांच्या यशाचं गमक आहे. युरोप टूरला मी एकटाच गेलो होतो, पण टूरवर गेल्यावर मला अजिबात एकटं वाटलं नाही. मला उत्तम ग्रुप मिळाला आणि रूम पार्टनर सुद्धा. टूरवर आम्ही फोटोज सुद्धा खूप काढले. अजूनही आमचा व्हॉट्सॲपवर एकमेकांशी संपर्क आहे. मी फिरायला जातो कारण मला जग बघायचं आहे आणि म्हणूनच शरीरात ताकद असेपर्यंत जमेल तितकं फिरण्याचं आणि जगातले सगळे देश बघण्याचं माझं ध्येय आहे.


प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍

सर्व प्रकारच्या पर्यटकांसाठी न्यूझीलंड

मुख्यतः नॉर्थ आयलंड आणि साऊथ आयलंडने बनलेला न्यूझीलंड हा देश आपल्या नितांत सुंदर निसर्गसौंदर्य, समृद्ध माओरी संस्कृती, रोमांचक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज्‌‍ आणि आपल्या अनेक अफलातून एक्सपीरियन्ससमुळे प्रत्येक प्रकारच्या पर्यटकांसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरतं. ह्यातला नॉर्थ आयलंड आपल्या व्हायब्रन्ट सिटीज्‌‍, माओरी कल्चर आणि जिओथर्मल ॲक्टिव्हिटीज्‌‍ साठी प्रसिद्ध आहे तर साऊथ आयलंड आपल्या मॅटिक लॅण्डस्केप्स आणि ॲडव्हेंचर टूरिझमसाठी प्रसिद्ध आहे. विरळ लोकसंख्या असलेल्या साऊथ आयलंडला खरंच निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. चला तर मग आज न्यूझीलंडच्या या दोन्ही आयलंड्स वर आपण कोणकोणते एका पेक्षा एक अनुभव घेऊ शकतो ते पाहू.

नॉर्थ आयलंड:

वाइटोमो केव्ज्‌‍: बोटीतून या जादुई भूमिगत गुहा पहा, जिथे हजारो ग्लोवर्म्स अंधाऱ्या गुहेच्या छताला ताऱ्यांसारखे प्रकाशित करतात.

रोटोरुआ: पारंपरिक हाका नृत्यप्रदर्शनाचा आनंद घ्या आणि हांगी (मातीच्या ओव्हनमध्ये शिजवलेले पारंपरिक जेवण) चा आस्वाद घ्या. पॉलिनेशियन स्पामध्ये नैसर्गिक खनिजयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये स्नान करून, लेक रोटोरुआचे विहंगम दृश्‍य अनुभवून ताजेतवाने व्हा.

हॉबिटन: ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स’ आणि ‘द हॉबिट’ या चित्रपटांचे चाहते प्रत्यक्षात हॉबिटन चित्रपटाच्या सेटला भेट देऊ शकतात.

बे ऑफ आयलंड्स: ऑकलंडच्या उत्तरेस असलेल्या या प्रदेशात डॉल्फिन पाहण्याच्या सफरी लोकप्रिय आहेत. इथे तुम्ही नैसर्गिक अधिवासात खेळकर डॉल्फिन्ससोबत पोहण्याचा रोमांचक अनुभव घेऊ शकता.

साऊथ आयलंड:

फ्रान्झ जोसफ ग्लेशियर: हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या अप्रतिम ग्लेशियरला पोहोचा आणि बर्फाच्छादित प्रदेशात ट्रेकिंगचा अनुभव घ्या. तसेच, बर्फावर लँडिंग करण्याचा अनोखा थरारही अनुभवा.

क्वीन्सटाउन: 'ॲडव्हेंचर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड' म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्वीन्सटाउनमध्ये बंजी जंपिंग, स्कायडायव्हिंग, जेट बोटिंग आणि स्कीर्इंग सारख्या थ्रिल्लिंग ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घ्या.

मार्लबोरो: न्यूझीलंडमधील सर्वात प्रसिद्ध वाइन प्रदेशांपैकी एक म्हणजे मार्लबोरो. येथे तुम्ही जागतिक दर्जाच्या सोव्हिनियॉन ब्लाँक वाइनचा आस्वाद घेऊ शकता, तसेच वाईन टेस्टिंगच्या आणि विनयार्ड टूरचा आनंद घेऊ शकता.

कायकोरो : जगातील सर्वात चांगल्या व्हेल पाहण्याच्या ठिकाणांपैकी एक म्हणजे कायकोरो. येथे वर्षभर स्पर्म व्हेल्स पाहता येतात, तसेच डॉल्फिन्स, सील्स आणि अल्बाट्रॉस पक्षीही पाहण्याचा आनंद आपण घेऊ शकतो.

ट्रान्झअल्पाईन ट्रेन प्रवास: हा जगातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासांपैकी एक मानला जातो. प्रायव्हेट कम्पार्टमेंट्स, गुरमे मिल्स, आणि पर्सनलाइज्ड सर्व्हिससोबत आलिशान पॅकेजचा आनंद घेत तुम्ही ख्राईस्ट चर्च ते ग्रेमाउथ दरम्यानच्या सौंदर्यपूर्ण सदर्न आल्प्सचा प्रवास करू शकता.

सेल्फ-ड्राईव्ह टूर्ससाठी सर्वोत्तम ठिकाण: न्यूझीलंडमध्ये उत्तम रस्ते आणि वळणावळणाचे निसर्गरम्य मार्ग आहेत, जे सेल्फ-ड्राईव्ह करण्यासाठी अगदी परफेक्ट ठरतात. विशेषतः, भारताप्रमाणेच इथेही लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह आहे, त्यामुळे भारतीय पर्यटकांना इथे ड्राईव्ह करणं अत्यंत सुलभ होतं.

अशा एकापेक्षा एक अफलातून एक्सपीरियन्सेस सोबत तुमचा प्रायव्हेट न्यूझीलंड हॉलिडे परफेक्टली प्लॅन करण्यासाठी वीणा वर्ल्ड टीम सज्ज आहे.


स्पॅनिश आर्ट

जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटामुळे स्पेन हे हॉट ट्रेंडिंग डेस्टिनेशन झालं. अद्वितीय कलाकारांच्या ऑफबीट कलाकृतींचा समृद्ध वारसा लाभलेला देश म्हणजे स्पेन. यात इतिहासपूर्व काळात गुहांमध्ये काढलेल्या चित्रांपासून अनेक गोष्टींचा समावेश आहे. स्पेनमध्ये जगातली सर्वात प्रतिष्ठित स्मारके आणि संग्रहालये आहेत. कॅन्टाब्रियामधली अल्तामिरा केव्ह पेंटिंग्स तर लाजवाब. या पेंटिंग्समध्ये बायसन, घोडे आणि हातांच्या ठशांचं चित्रण पहायला मिळतं. 16व्या 17व्या शतकात, स्पॅनिश गोल्डन एजमध्ये काही उत्कृष्ट धार्मिक तसंच राजेशाही चित्रांची निर्मिती झाली. या काळातील एल ग्रेको, दिएगो व्हेलाजकेस, फ्रान्सिस्को दे झुरबारान चित्रकार प्रसिद्ध आहेत. 18व्या 19व्या शतकात रोमँटिसिझम आणि वास्तववादाशी निगडित चित्रे काढण्यात आली. मानवी भावभावनांचं राजकीय उलथापालथीचं, खोलवर चित्रण करण्यात आलं. मॉडर्निझम, क्युबिझम आणि सरिअलिझम हे 20व्या शतकातील स्पेनच्या चित्रकलेचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू. यात बोल्ड कलर्स आणि ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म्सचा जास्तकरून वापर करण्यात आला. पाब्लो पिकासो, हुआन मिरो आणि साल्वादोर डाली हे या काळातील प्रसिद्ध चित्रकार होते. अशा या नामवंत कलाकारांच्या देशाला भेट द्यायची असेल तर वीणा वर्ल्डसोबत स्पेनला चला.

March 28, 2025

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top