Published in the Saturday Lokasatta on 03 August 2024
...कडाक्याच्या उन्हाळ्यावर उतारा म्हणून तो जेव्हा येतो तेव्हा काय आगत स्वागत करतो आपण त्याचं, पण जाताना त्याला आपण नीट निरोप देतो का?...
आज हे आर्टिकल वाचत असताना पाऊस तसाच संततधार असेल की नाही कल्पना नाही कारण चतुरंगकडे हे आर्टिकल दहा दिवस आधी पाठवावं लागतं. असो. पण गेले पंधरा दिवस जो काही पाऊस पडतोय, विचारूच नका. वेट्टेस्ट अगदी ओलीचिंब जागा कोणती असेल तर ती चेरापुंजी नव्हे तर ‘आमची मुंबई‘ आहे असं वाटायला लागलंय. नॉर्थ ईस्टमधल्या मेघालय राज्यातल्या खासी हिल्स परिसरातल्या मैसिनराम गावाची आठवण झाली. जगातला सर्वात जास्त पाऊस आपल्या देशातल्या या गावात पडतो. एकदा पाऊस सुरू झाला की तीन एक आठवडे संततधार असतो. पावसाचा आवाज आपल्याला कितीही हवाहवासा वाटला तरी त्यांना तो नॉइज पोल्युशनसारखा असतो त्यामुळे घराच्या छप्परावर ते गवताच्या गाद्या लावतात जेणेकरून पावसाचा आवाज कमी ऐकायला येईल. मुंबईचं सध्या मौसिनराम झालंय म्हणायला हरकत नाही. ‘कोसळतोय नुसता‘, ‘किती दिवसात सूर्यप्रकाश पाहिला नाही‘, ‘जपून जा गं बाई पाऊस पडतोय‘, ‘नरिमन पॉईंटला भिजायला जायचं का?‘ अनेक संभाषणांना घराघरात जोर आलाय. कांदा प्रचंड महागलाय ह्या पावसात कारण घराघरात कांदाभजीचा उपसा सुरू असल्याने कांद्याचा तुटवडा निर्माण झालाय. ह्या वेळचा पाऊस जरी धुवाँधार कोसळत असला तरी तो थोडा ऑर्गनाइज्ड असल्यासारखा वाटतोय. म्हणजे आजपर्यंत तरी. आता तो पाऊस ऑर्गनाइज्ड आहे की आपली महानगरपालिका सशक्त होऊन काम करतेय की लोक घरातून बाहेरच पडत नाहीयेत माहीत नाही पण एवढ्या पावसातही ट्रेन्स सुरू आहेत, कधी कधी स्लो आहेत पण बंद पडल्या नाहीत. रस्त्यावर जीवघेणा ट्रॅफिक जॅम नाहीये. रोजचं वर्तमानपत्र, दूध, अंडी, फळं हे सगळं वेळच्यावेळी मिळतंय. आमच्या ऑफिसमध्ये एच आर चं मेल अजून तरी दिसलं नाही की, ‘पावसामुळे ऑफिस लवकर सोडतोय‘. शाळा लवकर सुटण्याचा जो आनंद असायचा तो कॉर्पोरेट जगतात ह्यावर्षी अजून मिळाला नाहीये. एकंदरीत ह्या पावसाने वरकरणी तरी, ‘ह्यावेळी मी नेहमीपेक्षा जास्त बरसेन पण तुमचे तेवढे हाल करणार नाही‘ असा पवित्रा घेतलेला दिसतो. दृष्टीकोन व्यापक आणि ‘सबका भला‘ वाली मानसिकता यु ट्युबवरील कोणत्यातरी स्पिरिच्युअल गुरूने शिकवलेली दिसते. ‘पाऊस पडणं किंवा पाडणं हे दरवर्षीचं ठरलेलं काम असलं तरी त्यात सुसूत्रता आण, लोकांना कमीत कमी त्रास होईल असं बघ, रोजचा पेपर वाचायला नाही मिळाला तर अनेकांचा दिवस वाया जातो ह्याचा विचार कर‘ असं काहीतरी ट्रेनिंग नक्की मिळालेलं दिसतंय. त्यामुळेच मुंबईच्या गतीला ब्रेक बसला नाही. आपली कामं थांबली नाहीत. पाऊस महाशयांचे आभार मानायला हरकत नाही. काही दिवस हा असाच सुरू राहिला तर मात्र ‘जारे जारे पावसा, तुला देतो पैसा‘ अशी परिस्थिती येऊ शकते. आपलं एक बरं असतं आधी ‘येरे येरे पावसा‘ म्हणत वरूण राजाची आळवणी करायची आणि तलाव भरले, पेरणी-रोपणीची कामं झाली की ‘अतिथी तुम कब जाओगे‘ म्हणत, ‘रेन रेन गो अवे‘ चा नारा लावायचा. बिच्चारा पाऊस! कडाक्याच्या उन्हाळ्यावर उतारा म्हणून तो जेव्हा येतो तेव्हा काय आगत स्वागत करतो आपण त्याचं, पण जाताना त्याला आपण नीट निरोप देतो का?
रोपणी वरून आठवण झाली. लहानपण गावी गेलेलं असल्यामुळे ह्या पावसाची मजा जास्तच मिळालीय असं वाटतं. आई-वडील शेतकरी कम् शिक्षक असं घर असल्याने पावसाळा, भातशेती, पेरणी, रोपणी (आवणी), कापणी, मळणी अशा क्रमाने जून ते ऑक्टोबरचा कालावधी जायचा. रेनकोट प्रकार गावी आमच्यापर्यंत पोहोचायच्या आधी इरलं असायचं डोक्यापासून पायापर्यंत पाठच्या साईडने, ते छत्रीसारखं पावसापासून सरंक्षण करायचं शेतात काम करताना कामगारांचं. कधीतरी शेतामध्ये जाऊन भाताची छोटी छोटी रोपं त्या शेतात सर्वांच्या समवेत लावायला मजा यायची. त्यावेळी पायांच्या बोटांची कातडी सारखी पाण्यात राहिल्यामुळे खराब व्हायची, त्याला बहुतेक ‘कुया‘ म्हणायचे. मग त्यापासून रक्षण करण्यासाठी पायाला खोबरेल तेल लावलं जायंच. हळूहळू गमबूट आणि रेनकोट आले आणि पावसात भिजणं, शेतात काम करणं, नुस्ती मौजमस्ती करणं जास्त सुसह्य झालं. त्यावेळी सर्व कामगारांना आमच्या घरून जेवण असायचं. शिदोर म्हणायचे त्याला. एका टोपलीत सर्व जेवण सामावलेलं. ते आम्हालाही मिळायचं. त्या पावसात थोडंसं काम केल्यानंतर शेतावर मिळणाऱ्या त्या जेवणाची मजा कुठेही मिळणं केवळ अशक्य. आत्ता शेतावर जाऊन तसं काम करता येईल का हा प्रश्न मी मलाच विचारला तेव्हा, ‘अरे तिथे साप तर नसतील? पायात कुठे काटा तर रुतणार नाही? चिखलात कुठे पडले बिडले तर?‘ अशा अनेक प्रश्नांनी आधी ‘रुक जाओ‘ चा बोर्ड लावला. तेव्हा लहानपणी अशी भीती कधी मनाला शिवायची पण नाही. शहरात रहायला लागल्यानंतरचे हे तोटे. गावच्या पावसाची गोष्टच न्यारी.
गेले तीन रविवार असा मस्तपैकी पाऊस कोसळतोय. सर्वांना त्याने बऱ्यापैकी घरातच बसवलंय. एक दिवस लिव्हिंग रुममध्ये सुधीर पावसाची गाणी लावून बसला होता. ‘गारवा‘ हा मिलिंद इंगळेचा अल्बम त्याचा आवडता. माझं इमेल क्लिअरिंग संपल्यावर मीही जॉइन झाले. बाहेर पाऊस पडत असताना आत आम्ही एकापाठी एक पावसावरची गाणी लावायला सुरुवात केली. पहिलंच गाणं आलं ते ‘मंझिल‘ चित्रपटातलं रिमझिम गिरे सावन... अमिताभ बच्चन आणि मौशुमी चॅटर्जीचं. हे गाणं चाळीस-बेचाळीस वर्षांपूर्वीचं. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ओव्हल मैदान नरिमन पॉईंट मरिन ड्राईव्ह भागात चित्रित केलेलं. चित्रीकरण साधंसं पण कधीही बघितलं तरी हे गाणं एकदम रीफ्रेशिंग फील देऊन जातं. एक एक गाणं आठवत आम्ही यु ट्युबला हुकूम करीत होतो. एक लड़की भीगी भागी सी, सोती रातों में जागिसी किशोर कुमार आणि मधुबालाच्या ‘चलती का नाम गाडी‘ चित्रपटाने आपल्याला अक्षरश: वेड लावलं होतं. इतक्या वर्षांनी ते गाणं बघताना जरापण कंटाळा आला नाही. तीच गोष्ट ‘श्री 420‘ मधल्या राज कपूर नर्गिसवर चित्रित केलेल्या प्यार हुआ इकरार हुआ... ह्या पावसातल्या गाण्याची. ॲबसोल्युट इंमॉर्टल. पासष्ट-सत्तर वर्ष झाली पण हे दोन्ही चित्रपट आणि त्यातली गाणी आजही तेवढीच फ्रेश आहेत. ऐकाविशी वाटतात. त्यानंतर आम्ही मंगेशकरांची आणि आपल्या अनेक गायकांची गाणी ऐकत बसलो. एकूणच आमची संगितभरी पावसाळी सायंकाळ वेगळा आनंद देऊन गेली.
अजूनही पाऊस पडत असेल तर आत्ता तुम्ही एक गाणं तुमच्यासमोर अवश्य लावा टीव्हीवर वा मोबाईलवर. बावन्न सालच्या हॉलिवूड क्लासिक 'सिंगिंग इन द रेन' मधलं टायटल साँग. आत्ता सध्या जी मंडळी सिनियर सिटिझन बनली आहेत त्यांनी हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. ‘जीन केली‘ ह्या अमेरिकन ॲक्टर, डिरेक्टर, कोरियोग्राफर, डान्सर, सिंगर ने काढलेला हा चित्रपट, ज्यात त्यानेच मुख्य भूमिका वठवलीय. चित्रपट चांगला चालला आणि आजही तो चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड मानला जातो. त्यातलं हे गाणं तुमचा मूड प्रफुल्लित न करेल असं होणारच नाही. सिंगिंग इन द रेन, आय ॲम हॅप्पी अगेन, आय एम डान्सिंग अँड सिंगिंग इन द रेन, आय एम हॅप्पी अगेन' ऐकताना मजा तर येतेच पण हे गाणं ‘देखने की चीज़ है।‘ आयुष्यात आपला दृष्टीकोन कसा असावा हे असं हसत खेळत आपल्याला सांगून जातं हे गाणं.
‘अरेरे, पाऊस' की 'अरे वाह, पाऊस' ही दोन वाक्य मला माझी पर्सनॅलिटी दर्शवून देतात. पाऊस पडणारच आहे, त्याला हवा तसा कोसळणार आहे. त्याचा कोणताही कंट्रोल आपल्याजवळ नाही मग ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्या मला स्वीकारायलाच पाहिजेत. बरं, ‘मी नाही जा स्वीकारणार' असंही म्हणता येत नाही. ‘यु लव्ह इट ऑर हेट इट, बट यु कान्ट इग्नोअर इट, यु कांट अवॉइड इट?‘ असा आहे हा पाऊस. त्यामुळे पावसाला स्वीकारणं अपरिहार्य आहे, न स्वीकारून जाणार कुठे? आता जर स्वीकारलं असेल तर ‘अरेरे पाऊस' करीत रडक्या चेहऱ्याने स्वीकारायचं की ‘अरे वाह पाऊस' म्हणत हसत हसत सामोरं जाऊन त्या पावसाला आपल्यासोबत घेऊन त्याच्या त्या बरसणाऱ्या आनंदात सामिल व्हायचं हे आपण ठरवायचं. या जगण्यावर शतदा प्रेम करायला लावणाऱ्या ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकरांनी शिकवलंय नं, ‘सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत‘. सो, लेट्स गो इन द रेन, एन्जॉय द रेन अँड बी हॅप्पी अगेन.
असा हा दहा-पंधरा दिवस येणारा आणि टिकून राहणारा पाऊस आपल्यासाठी निसर्गाचा एक संदेश घेऊन आलेला असतो. टेक अ ब्रेक, रीलॅक्स अँड रीज्युविनेट ! तो आपल्याला सूर्यप्रकाशाचं महत्व पटवून देतो. अनेक देशांचं जीवन वर्षभर पडणाऱ्या सततच्या पावसाने आणि ढगाळलेल्या वातावरणाने किती खडतर असेल ह्याची जाणीव तो करून देतो. आपल्याला तो सांगतो तुमची सूर्यप्रकाशाशिवाय पंधरा दिवसात ही अवस्था तर नॉर्थ पोल जवळच्या देशातील माणसं कशी रहात असतील ह्या वातावरणात? तुम्ही तुमच्या भारतात किती सुखी आहात, जस्ट बी ग्रेटफुल विथ व्हॉट यू हॅव.
आमचा धाकटा मुलगा राज लहान असताना डिस्नीच्या ‘वीनी द पू‘चा वेडा फॅन. त्यामुळे त्यावेळी पू, पिग्लेट, ख्रिस्तोफर रॉबिन च्या व्हिडियो कॅसेट्स तासन्तास बघत रहाणं हा आमचा छंद. ‘विनी द पू‘ मधूनच एखादा जीवनमंत्र देऊन जायचा, त्यातला एक विचार इथे चपखल बसतोय, ‘व्हेन लाइफ थ्रोज् यु अ रेनी डे, प्ले इन द पड्डल!‘
सो, लेट्स सिंग इन द रेन, डान्स इन द रेन अँड बी हॅप्पी अगेन!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.