Published in the Saturday Lokasatta on 15 March, 2025
...सॅलरी ऑर्गनायझेशनच्या हातात असली तरी मन:स्थिती मात्र माझ्या हातात आहे नं. कोणता दृष्टीकोन बाळगायचा हे तीच ठरवते...
‘गोएअरवेजने बॅन्क्रप्टसी म्हणजेच दिवाळखोरी जाहीर केली आणि आमचे अठ्ठावीस कोटी रुपये नाहीसे झाले, ते सुद्धा ऐन समर सीझनच्या वेळी, बरोबर दोन वर्षांपूर्वी. त्यावेळी NCLT नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल ने आम्हाला जी काही कागदपत्रं सबमिट करायला सांगितली ती आम्ही केली, ह्या आशेने की हे पैसे मिळतील. सर्व नाही मिळाले तरी काही तरी मिळतील. पण आता अगदी अलिकडेच या दिवाळखोरीवर शिक्कामोर्तब झालं आणि आमचे पैसे पूर्ण बुडाल्याची खात्री झाली. मला भाजी मंडईमध्ये जाऊन पंधरा वीस रूपयांसाठी कधीतरी केलेल्या घासाघिसीची आठवण झाली. पै पै वाचवायचा संस्कार झालेल्या मनाला ही रिॲलिटी पचवणं अवघड होतं, पण काय करू शकत होतो आम्ही? ह्या गोष्टीला आज इन्शुरन्स कंपन्याही सपोर्ट करीत नाहीत. त्यामुळे पैसे पूर्ण गेले. म्हणतात नं, ‘वुई वेस्ट अवर्स अँड देन वरी फॉर मिनिट्स’ तसंच काहीसं आहे हे, ‘वूई लूज क्रोर्स अँड देन वरी फॉर थाऊजंड्स’ एक बरं झालं ‘पैसे मिळणार की नाही मिळणार?’ हया दोलायमान अवस्थेची अखेर झाली होती. जे झालं त्याचा विचार करून आणखी वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. ‘स्वीकार लो, आगे बढो’ हा विचार करून कामाला लागलो. पण गो एअरवेज आमची पाठ सोडेना. एअरलाइनच्या किंवा आमच्या एअर रिझर्वेशन्सच्या मिटिंगमध्ये गो एअरवेजचा विषय यायचाच. पैशाचं कारण नव्हतं, तर कारण होतं गो एअरवेज नसल्यामुळे अनेक ठिकाणचे रूट्स बंद झाले, काही ठिकाणी दुसऱ्या एअरलाइन्स आल्या पण त्या डबल एअर फेअर घेऊन. म्हणजे पूर्वी आम्ही ज्या टूर्स अगदी रॉकबॉटम प्राईसमध्ये आमच्या पर्यटकांना दिल्या त्यांची किंमत वाढली. आधीच कोविडनंतर सगळं महागलंय त्यात एअरफेअर्सचा दणका. आम्ही तरीही प्रयत्न करतो पर्यटकांना ऑफ सीझन-मिड सीझनमध्ये कमीत कमी पैशात ‘पैसा वसूल टूर्स’ देण्याचा, पण गो एअरवेजनंतर फरक पडलाय. आम्ही पाच-सहा वर्षांपूर्वी थायलंड तीस हजारात दिलं होतं तो इतिहास झाला. ते दिवस पुन्हा येणे नाही. दोनेक महिन्यांपूर्वी एका एअरलाईन्सच्या मिटिंगमधून बाहेर आले आणि एखादा चमत्कार घडावा तसा माझ्या विचारांमध्ये बदल झाला. हा बॅन्क्रप्टसीचा मुद्दा सोडला तर वीणा वर्ल्ड झाल्यापासून गो एअरवेजने आम्हाला प्रचंड सहकार्य केलंय आणि आमच्या पर्यटकांनाही. त्यामुळेच आम्ही एअरफेअरसह वीस हजारात शिमला मनाली देऊ शकलो होतो आणि तीस हजारात काश्मीर. तसंच आम्हाला सीट्सही मोठ्या प्रमाणावर मिळायच्या. सीझनमध्ये दोनशे अडीचशे प्रवासी दररोज काश्मीरला उतरताना बघून श्रीनगर एअरपोर्टच्या ड्युटी ऑफिसरने एकदा विचारलंही की, ‘वहाँ मुंबई में किसको रखा है के नही की सारे श्रीनगर आये है?’ आताही आम्ही तेवढ्याच पर्यटकांना काश्मीरला नेतो पण वेगवेगळ्या विमान कंपन्यांद्वारे. एकूण फ्लाइट्सची संख्याही कमी झालीय नं. तीच अवस्था शिमला मनालीसाठीच्या चंदिगड फ्लाइटची किंवा बँकॉक आणि दुबईचीही. म्हणजे हया एअरलाइनमुळे फ्युचर बिझनेसवरही परिणाम झाला. पण एक मात्र सत्य की ह्या एअरलाइनने आम्हाला भरपूर साथ दिली. वीणा वर्ल्डला उभं करण्यात मोलाची मदत केलीय तेव्हा आता यापुढे त्यांना दूषणं द्यायची नाहीत. लेट्स बी ग्रेटफूल टूवर्डस् द एअरलाईन. झालं गेलं विसरून जाऊया आणि गो एअरवेज बरोबरचे चांगले दिवस आठवणीत ठेऊया. वाव! त्या विचारांनीच किती हलकं वाटलं मला. एक-दोन मिटींग्समध्ये मी हा किस्सा सांगितलाही. पण आमच्या छोट्याशा वीणा वर्ल्डच्या जगात ‘लेट एव्हरीवन बी अवेअर’ किंवा ‘ऑल ऑन द सेम पेज’ ही फिलॉसॉफी आम्ही अगदी आग्रहपूर्वक राबवत असल्याने गेल्या आठवड्यात महिन्यातून एकदा होणाऱ्या लक्ष्य मीटिंगमध्ये भारतभरच्या सर्वांनाच ‘गो एअर प्रति आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि यापुढे पैसे गेल्याबद्दल दूषणं देत बसण्याची नकळत लागलेली सवय मोडीत काढूया’ याचा पुनरुच्चार केला. माझी अवस्था ‘झालं मोकळं आभाळ’ सारखी झाली.
फेब्रुवारी महिन्यात सॅलरी रिव्हीजन होती. एच आर चा मेल आणि नवीन सॅलरी वाचताना त्यांनी दिलेल्या अनेक सूचनांसोबतच्या एका वाक्याने माझं लक्ष वेधलं. तुमची सॅलरी तुमच्या प्रोफाइलशी निगडीत आहे. दुसऱ्यांबरोबर तुलना करू नका. सॅलरी परफॉर्मन्सवर अवलंबून असते. तुमच्या सिनियर वा ज्युनियर असण्यावर नाही. वगैरे वगैरे... या सगळ्यांमधून जे वाक्य मला आवडलं ते म्हणजे ‘युवर सॅलरी इज फीडबॅक यू रिसिव्हड फ्रॉम द ऑर्गनायझेशन’. खरंच की! आता हा फीडबॅक सकारात्मक घ्यायचा की नकारात्मक हे पूर्णपणे आपल्या हातात. जर या सॅलरी स्वरूपात मिळालेल्या फीडबॅकवर मी खूष असेन तर मला कॉम्प्लेसंट नाही बनायचंय. एकदा का ते समाधान अंगात शिरलं की प्रगती खुंटलीच. इथे विचार केला पाहिजे की ऑर्गनायझेशन आपल्या कामाची व्यवस्थित पावती देतेय म्हणजेच मी आणखी चांगलं काम केलं तर मला माझ्या करियरमध्ये फास्ट पुढे जाता येईल. जर सॅलरी फीडबॅकवर आपण खूश नसलो तर मग मात्र मन नकारात्मक विचारांनी भरून जातं. ‘माझ्या कामाचं मोलंच नाही इथे’, ‘इतकं मर मर मरायचं पण हीच का माझी किंमत केली त्यांनी?’... अशावेळी दोन गोष्टी होऊ शकतात. मॅनेजर, सिनियर मॅनेजर वा मॅनेजमेंटला भेटायचं, त्यांना चक्क जाब विचारायचा. खुल्या मनाने त्यांचाही फीडबॅक घ्यायचा. ते पटलं तर त्याबरहुकूम स्वत:मध्ये सुधारणा करायची आणि ‘पुढच्या वर्षी मला वाटत असलेली सॅलरी ऑर्गनायझेशन मला देईलच’ अशा तऱ्हेने काम करायचं आणि आपली जागा निर्माण करायची ऑर्गनायझेशनमध्ये. जर ते पटलं नाही तर मात्र खितपत पडायचं नाही. नकारात्मक विचारांची गर्दी सतत आपल्या मनात असली तर आपण जास्त नुकसान करतो स्वत:चं, तेव्हा नथिंग डुईंग. चक्क ऑर्गनाझेशन बदलायची. त्यात आपलं स्वत:चं हित आहेच आणि ऑर्गनायझेशनचंही. सॅलरी ऑर्गनायझेशनच्या हातात असली तरी माझी मन:स्थिती मात्र माझ्या हातात आहे नं. कोणता दृष्टीकोन बाळगायचा हे तीच ठरवते. सो लेट्स कीप अवर माइंड अंडर कंट्रोल!
कोविडमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ हे नवीन कल्चर आपल्याला मिळालं. ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे हेच, हे आपण सर्वांनी अधोरेखित केलं. कोविड संपला, हळूहळू ऑफिसेस सुरू झाली. मोठमोठ्या कंपन्यानी आता ह्यापुढे आमची सत्तर ते ऐशी टक्के मॅनपॉवर घरून काम करणार हे जाहीर केलेलं असतानाही ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ ची नोटीस जाहीर केली आणि भारतात लोकांनी पुन्हा ऑफिसेसना यायला सुरवात केली. आमच्याकडेही आधी काहींना आम्ही वर्क फ्रॉम होम दिलंं होतं, पण त्यांनाही सांगावं लागलं की ‘अर्धी टीम इथे, अर्धी टीम घरून’ असं काम होऊ शकत नाही तेव्हा आता आपण सर्वांनी ऑफिसमधून काम करायचं. आमच्या मार्केटिंग टीममधल्या विभूती चुरी, गायत्री नायक आणि त्यांची टीम वीणा वर्ल्डच्या जाहिराती आणि प्रमोशनल स्ट्रॅटेजी बनवितात, ज्या विरारला राहतात. त्यांना वर्क फ्रॉम होम होतं कारण घरून तसंही चांगलं काम होत होतं. पण आता टीम वाढली होती. त्यांनी टीमसोबत असणं महत्वाचं होतं. पण त्यांना सांगायचं कसं हा प्रश्न होता म्हणजे ॲज ॲन ऑर्गनायझेशन सांगू शकत होतो पण आमची प्रोफेशनल तरीही इमोशनल ऑर्गनायझेशन नं. ‘हायर ॲंड फायर’ संस्कृतीपासून आम्ही कोसो दूर. त्यांना सांगितल्यावर थोडी रडारड झालीच पण त्यांना म्हटलं असं बघा की कोविड नंतर तुम्हाला तीन वर्षं घरून काम करायला मिळालीच नं. तुम्हालाही घराबाहेर पडायला मिळेल. थोडं चलनवलन जरूरीचं आहे. ट्रेनप्रवासात पॉडकास्ट, ऑडियोबुक्स ऐकायला मिळतील. जुन्या मित्रमैत्रिणींशी गाठीभेठी होतील, महत्वाचं म्हणजे टीमसोबत एकत्र असल्याने अनेक निर्णय पटापट घेतले जातील. बदलत्या जगाबसोबत दृष्टीकोन बदलायला हवा. दोन दिवस ऑफिस तीन दिवस घर असं करूया आणि त्या ऑफिसला रूजू झाल्या. क्रिएटिव्हिटीसाठी घरी एकांत आणि टीम वर्क साठी ऑफिस ह्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या.
आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे शूजमेकर कंपन्यांच्या दोन एक्झिक्युटिव्हिज्ची गोष्ट. दोघांना आफ्रिकेतल्या गावांमध्ये पाठवलं शूज मार्केटचं पोटॅन्शियल बघायला. एक म्हणाला, इथे कुणीही शूज वापरत नाहीत, इथे मार्केट नाही’. दुसरा म्हणाला, ‘इथे कुणीही शूज वापरत नाही, पण त्यांना जर शूजचं महत्व पटवून दिलं तर इथे प्रचंड मोठ्ठं मार्केट निर्माण करता येईल’. डेल कार्निगीच्या पुस्तकात कैद्यांच्या बाबतीतलं एक उदाहरण वाचलं होतं, दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांसंबंधीचं. ह्या कैद्यांनी जेलच्या खिडकीतून बाहेर पाहिलं, एकाला दिसला बाहेरचा चिखल तर दुसऱ्याला स्वच्छ आकाशातल्या चांदण्या. थॉमस अल्वा एडिसनने दहा हजार असफल प्रयोग केले तेव्हा कुठे इलेक्ट्रिक बल्बचा जन्म झाला. पण त्याचं म्हणणं, हे प्रयत्न असफल झाले नाहीत तर इलेक्ट्रिक बल्ब पहिल्यांदा बनवणं ही दहा हजार पायऱ्यांची कार्यप्रणाली आहे. झाडावरून खाली पडणारं सफरचंद आपल्यासाठी एक नॅचरल प्रोसेस, तीच आयझॅक न्यूटनसाठी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारी घटना ठरली कारण त्याने वेगळ्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहिलं. हत्ती आणि दृष्टीहीन माणसांची गोष्टही आपल्याला ज्ञात आहेच. ह्या सहा दृष्टीहिनांनी हत्तीचा एक एक भाग स्पर्शिला. ज्याने पायाला स्पर्श केला तो म्हणाला हे झाड आहे, ज्याने सोफ्लडेला स्पर्श केला तो म्हणाला हा भलामोठा साप आहे, ज्याने कानाला स्पर्श केला तो म्हणाला हा फॅन आहे, थोडक्यात जो ज्या चष्म्यातून बघतो त्याला ती गोष्ट त्याप्रमाणे वाटते. पूर्ण पिक्चर कळतच नाही. बऱ्याचदा आपण असं पूर्ण पिक्चर बघतच नाही. व्यापक दृष्टीकोन ठेवणं ही काळाची गरज आहे. आणखी एक गोष्ट, एका राजवाड्याचं काम सुरु होतं. बाजूने जाणाऱ्या एका विद्वान वाटसरूने तिथल्या कामगारांना विचारलं, काय करताय? एक म्हणाला ‘विटा रचतोय’, दुसरा म्हणाला ‘मी भिंत बांधतोय’, तिसरा म्हणाला ‘मी राजवाडा बांधण्यासाठी सहकार्य करतोय. इथे राजवाडा झाला की हा परिसर उजळेल, सर्वांना काम मिळेल, माणसांचं राहणीमान उंचावेल, सर्वत्र आनंदीआनंद पसरेल’. एकच गोष्ट पण किती वेगवेगळे दृष्टीकोन. मला अब्राहम लिंकन यांचं उदाहरण खूपच आवडतं. एका अमेरिकन सिव्हिल वॉर मध्ये अब्राहम लिंकनांवर खूप टीका झाली, ‘शत्रूंना संपवून टाकण्याऐवजी ते शत्रूंना जास्त जवळ करताहेत’, लिंकन म्हणाले, ‘तेच तर मी केलं, शत्रूंना संपवलंच की, त्यांना मित्र बनवून टाकलं’.
दृष्टिकोनासंबंधातील अशी उदाहरणं शाळांमध्ये शिक्षणाचा आमूलाग्र भाग बनवायला पाहिजेत. जग बदललंय. नवीन दृष्टीकोनातून जगाकडे बघायला शिकलं पाहिजे. आमच्या एका जाहिरातीची टॅगलाईन होती, ‘परिस्थिती बदलणार नाही, मनःस्थिती बदलूया’. आयुष्य खरंतर खूप साधं आहे. आपण बऱ्याचदा चुकीचा दृष्टिकोन बाळगून कॉम्प्लिकेशन्स वाढवतो. क्षणभर थांबून स्वतःलाच प्रश्न केला पाहिजे, कोणता पर्स्पेक्टिव्ह मी परिधान केलाय? राईट पर्स्पेक्टिव्ह विल गिव्ह अस राईट आन्सर्स. कविवर्य मंगेश पाडगांवकर सांगून गेले आहेत, ‘सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत?... शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं?... काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं?... काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं?... पेला अर्धा सरला आहे म्हणायचं की पेला अर्धा भरला आहे म्हणायचं?... आपणच हे ठरवायचं’.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.