Published in the Saturday Lokasatta on 05 April 2025
…आमच्या वीणा वर्ल्डच्या जाहिराती आणि माझं लिखाण ह्या दोन्हीमध्ये इंग्रजी शब्दांचा मनसोक्त वापर होण्याचं मूळ कॉलेजच्या दिवसांमध्ये आहे...
गेल्या वर्षी, कॅलिफोर्नियात सांताक्लाराला आमच्या धाकट्या मुलाला, राजला भेटायला गेलो होते. अर्धावेळ ऑफिसचं काम आणि अर्धावेळ त्याच्यासोबत टाईमपास एवढाच अजेंडा होता. इतरवेळी मुलं दूरदेशी त्यांच्या कामात, आपण भारतात आपल्या व्यापात. बॅक ऑफ द माईंड मात्र आमच्यासारख्या सगळ्याच आईवडिलांची सतत प्रार्थना सुरू असते ह्या भारताबाहेर राहणाऱ्या मुलांसाठी. आठवण आली की आवंढा गिळणे एवढंच आपल्या हातात. त्यामुळे हे असे आठ दिवस म्हणजे येणाऱ्या वर्षभराची शिदोरी असते. असो, सो आम्ही राजसोबत चिल आऊट होत होतो. एक दिवस मी, सुनिला, सुधीर आणि राज हॉटेलमध्ये लिफ्टने रूमकडे चाललो होतो. दोन चायनीज तरूण मुलंही लिफ्टमध्ये होती, आम्ही शांतपणे त्यांचं संभाषण ऐकत होतो. म्हणजे फक्त ऐकत होतो कळत काहीच नव्हतं, कारण ते चायनीजमध्ये बोलत होते. टोन ऑफ व्हॉइसवरून ती आयटीमध्ये काम करणारी सॅलरी पॅकेजवर खूश असणारी मुलं दिसत होती. आम्ही लिफ्टमधून बाहेर आल्यावर सुनिला म्हणाली, ‘ही मुलं बघ कशी त्यांच्या भाषेत दिलखुलास बोलत असतात. त्यांना किती अभिमान असतो त्यांच्या भाषेचा.’ सुनिलाने एका वाक्यात मोठ्या विषयाला हात घातला होता. जगात प्रवास करताना एक गोष्ट बऱ्यापैकी लक्षात आलीय ती म्हणजे दोन चायनीज भेटले, दोन कोरियन भेटले, दोन इटालियन भेटले, दोन फ्रेंच वा जर्मन भेटले तर ते डायरेक्ट त्यांच्या भाषेत बोलायला सुरुवात करतात. जगात सर्वात जास्त बोलली जाणारी किंवा जगाची वा बिझनेस ट्रान्झॅक्शनची भाषा म्हणून प्राधान्य मिळालेली इंग्लिश भाषा ते बाजूला ठेवतात आणि आपल्या मायबोलीत प्रेमाने, गर्वाने आणि अभिमानाने बोलायला सुरुवात करतात. आपल्याकडे हाच अभिमान तमिळ लोकांमध्ये आढळतो. आपल्या स्वत:च्या भाषेवर त्यांचं अतोनात प्रेम. आपल्या रुढी परंपरा जपण्यात त्यांना खूप स्वारस्य. आपल्या देशात वा परदेशात उच्चविद्याविभूषित आणि उच्चपदस्थांमध्ये तमिळ लोकं पुढे आहेत हे स्टॅटिस्टिक्स सांगतं. आमच्या बिल्डिंगमध्येही बरीच तमिळ मंडळी आहेत आणि चारजण एकत्र आले की सगळ्या गप्पा तमिळमध्येच. स्वत:च्या मुलांबरोबरही तमिळमध्येच बोलणार. एवढं मस्त वाटतं त्यांचं ते तमिळ ऐकून. आणि मग मी स्वत:कडे बघते. मलाच का एवढी इंग्रजी भाषेची ओढ? आम्ही मराठी मिडीयम ओल्ड स्कूलवाले, शाळेत जी मुलं मराठीमध्ये बोलताना जास्तीत जास्त इंग्लिश शब्दांचा वापर करायची त्यांना स्टायलिश समजलं जायचं आणि मग आपल्या संभाषणातही इंग्लिश शब्द कसे येतील वा आपल्याला समोरच्यावर ते कसे फेकता येतील ह्याची प्रॅक्टीस व्हायची मनातल्या मनात. कॉलेजमध्ये मोठमोठ्या इंग्लिश शाळांमधून मुलं आली आणि आमच्यासारखी फाडफाड इंग्लिश न बोलता येणारी मुलं आणखी बावचळली. इंग्रजी भाषा न येणं म्हणजे मोठा अपराध ही भावना मनात घर करून बसली त्यावेळी, इतकी की मराठी बोलायला लाज वाटायची किंवा दबक्या आवाजात आम्ही बोलायचो. आता `हू केअर्स’च्या जमान्यात आपापल्या भाषा कदाचित जास्त चांगल्या बोलल्या जात असतील इतर देशांसारख्या, पण त्यावेळी परिणाम असा झाला की ना धड मराठी ना धड इंग्लिश अशी माझी मराठी इंग्रजाळली. आमच्या वीणा वर्ल्डच्या जाहिराती आणि माझं लिखाण ह्या दोन्हीमध्ये इंग्रजी शब्दांचा मनसोक्त वापर होण्याचं मूळ कॉलेजच्या दिवसांमध्ये आहे. आपल्या अस्खलित मराठी बोलण्याच्या आणि लिहिण्याच्या अयशस्वितेचं खापर कॉलेजवर फोडून मी नामानिराळी झाले, पण वस्तुस्थिती हीच आहे. जाहिराती लिहिताना कधी त्या मराठीत सुचतात तर कधी इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुचलेल्या जाहिराती मराठी करताना गुगलचा आधार घ्यावा लागतो. किती ही अधोगती! पण लिहिणारे वाचणारे बोलणारे ऐकणारे अशा सर्वांचंच थोड्याफार फरकाने असंच झाल्यामुळे आम्ही आणखी नाक उंच करून सांगतो, ‘भाषा कोणतीही असो, संवाद साधला गेला पाहिजे’.‘जगात किती भाषा आहेत रे गुगलभाऊ?’ असा प्रश्न विचारायची खोटी, त्या बाबतीतलं सर्व ज्ञान एका क्षणात देऊन तो मोकळा. त्याच्या आणि इतर अनेक अभ्यासकांच्या मते, जगात 195 देश आहेत, म्हणजे हा आकडा वादातीत आहे, कारण कधी एखादा नवीन देश स्वातंत्र्य घोषित करतो तर कुणी छोटा देश एखाद्या बलाढ्य देशाचा अंकित होतो. ह्या सगळ्या देशांमध्ये सुमारे 7139 भाषा बोलल्या जातात. त्यातल्या साधारण आशियामध्ये 2215, आफ्रिकेत 2144, अमेरिकेत 1061, पॅसिफिक रीजन मध्ये 1313 तर युरोपमधल्या 44 देशांमध्ये 287 बोलीभाषा आहेत अशी सर्वसाधारण वर्गवारी. सर्वात जास्त मूळ बोलीभाषा कोणत्या देशात आहेत हे पहायला गेलं तर पापुआ न्यु गिनीचा पहिला नंबर लागतो, त्या देशात 840 बोलीभाषा आहेत. तर इंडोनेशियात 707, भारतात 447 आणि चायनामध्ये 302 बोलीभाषा आहेत. सर्वात कमी म्हणजे एकच बोलीभाषा असणारा देश आहे नॉर्थ कोरिया, बघा भाषेच्या बाबतीतही डिक्टेटरशीप. आईसलँडमध्ये दोन बोलीभाषा तर न्यूझीलंडमध्ये चार. आहे की नाही हे सर्व इंटरेस्टिंग! जगात सर्वात जास्त वापरात असलेली भाषा अर्थातच इंग्लिश आहे आणि अलीकडच्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त बोलली जाणारी भाषाही इंग्रजीच आहे. जगातील 1 अब्ज 46 कोटी लोक ही भाषा बोलतात. त्यानंतर मॅन्डरिन म्हणजे चायनीज या भाषेचा नंबर लागतो. जगातले 1 अब्ज 17 कोटी नेटिव्ह चायनीज लोकं ही भाषा बोलतात. त्यानंतर येते ती हिंदी. जगभरात 62 कोटी लोक हिंदी भाषा बोलतात. यानंतर नंबर लागतो तो स्पॅनिश भाषेचा. 57 कोटी लोक या भाषेत बोलतात. मग पाचव्या क्रमांकावर फ्रेंच भाषा येते. आज जगभरात 38 कोटी लोक फ्रेंच भाषा बोलतात. फ्रेंच नंतर पोर्तुगीज, बंगाली आणि अरेबिक या तिन्हींमध्ये भाषांमध्ये स्पर्धा आहे आणि या भाषा सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. साधारणपणे प्रत्येकी 27 कोटींपेक्षा जास्त लोकं या तीनही भाषा बोलतात. आपल्या पश्चिम बंगाल आणि त्यांना लागून असलेल्या राज्यांमधले आणि बांगलादेशातले लोक त्यांच्या बंगाली भाषेवर प्रेम करतात, ती भाषा बोलतात आणि पुढच्या पिढीकडे सोपवतात. हिंदी बोलणाऱ्यांची संख्या अलीकडेच 60 कोटींच्या वर पोहोचली आहे आणि याचं कारण म्हणजे आपली लोकसंख्या. इथे जसं बॉलिवूड चालतं तसंच हिंदीही. जगाची व्यावहारिक भाषा इंग्लिश तर भारताची हिंदी, त्यामुळे आपण पहिल्या वा दुसऱ्या स्थानावर येऊ शकतो, जर भारतातले जास्तीत जास्त लोक हिंदी बोलू लागले तर. लोकसंख्या ही आपली शक्ती आहे ती अशी. पण जसा काळ जातोय तशा भाषा नामशेष होण्याची संख्या वाढू लागलीय. युरोपियन कोलोनायझेशन, लोकांचं स्थलांतरण, नंतरचं जागतिकीकरण ही सगळी कारणं असली तरी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे होणारं भाषेचं हस्तांतरण पूर्वीसारखं दमदारपणे होत नाही हे तितकंच खरं आहे. त्याची कारणं अनेक असतील, ती पूर्णपणे रास्तही असतील पण काहीतरी नक्कीच करायला पाहिजे आणि ते इतरांनी किंवा दुसऱ्यांनी नाही तर आपण स्वत: केलं पाहिजे, आपल्या घरापासूनच सुरुवात झाली पाहिजे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ प्रमाणे आमचे सर्व टूर मॅनेजर्स टूर्सवर हिंदी भाषेत बोलतात, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आणि जगातून आलेल्या एनआरआय ह्या सर्वच पर्यटकांना समजण्यासाठी सोप्पं जावं म्हणून. आम्ही कधीकधी टूरवर एक ‘मायबोली’ नावाचा खेळ घेतो. पूर्वी तो फक्त वुमन्स स्पेशल आणि सिनियर्स स्पेशल टूरवरच घेतला जायचा. पण आता तो सर्वच टूर्सवर घेतला जातो. या खेळात आधी वेगवेगळ्या इंटरेस्टिंग पण सर्वांना त्यावर बोलता येऊ शकेल अशा सोप्प्या विषयांवर चिठ्ठया तयार केल्या जातात. बसमध्ये एकदा पुढचा आणि एकदा मागचा असा सीट नंबर घेऊन त्यावरील व्यक्तीला एक चिठ्ठी उचलायला लावली जाते. चिठ्ठीत जो विषय असेल त्यावर त्या व्यक्तीने एक मिनिट आपल्या मातृभाषेत एकही इंग्लिश शब्द न वापरता, न थांबता बोलायचं. बाकीचे सगळे पर्यटक यावेळी जज असतात, परीक्षकाचं काम करतात. इंग्लिश शब्द आला की आऊट करायचं. त्यामुळे कान एकवटून ते त्या एक मिनिटाच्या भाषणातले बोलणाऱ्याचे इंग्लिश शब्द शोधत असतात. ज्यावर राज्य आलंय ते पर्यटक त्यांच्या कोणत्याही अगदी तेलुगू, तमिळ, उर्दू, पंजाबी, कन्नड भाषेतून एक मिनिट त्या विषयावर बोलत असताना इंग्लिश शब्द आला की सगळ्या पर्यटक जजेसकडून हल्लाबोल होतो आणि वक्त्याला सन्मानाने आऊट केलं जातं. काहीवेळा वक्ता भांडायला लागतो कारण त्याच्या वा तिच्या दृष्टीने तो शब्द इंग्लिश नसतोच. तो त्यांच्या भाषेतलाच शब्द असतो. इंग्लिश शब्द इतके नसानसात भिनलेत आपल्या देशातल्या सगळ्याच भाषांमध्ये की कळतही नाही तो त्या भाषेतला मूळ शब्द नाही ते. खूप धम्माल येते हा खेळ खेळताना. एकदा एका सिनियर्स स्पेशल टूरवर हा गेम मी घेत होते. शेवटी सर्वांनी माझ्यावरच राज्य दिलं आणि विषयही दिला. आता आली का पंचाईत. माझी भाषा पूर्ण इंग्रजाळलेली, देवाचं नाव घेतलं आणि सुरू झाले. देवानेच लाज राखली. एकही इंग्लिश शब्द न वापरता मी एक मिनिट बोलू शकले. किती हा पराक्रम. तुम्हीही घरात वा मित्रमंडळीत हा खेळ खेळून बघा.भाषा वाचवणं म्हणजे आपली भाषा बोलणं, आपल्या भाषेत लिहिणं, आपल्या भाषेत वाचणं, आपल्या भाषेत ऐकणं, आपल्या भाषेतली गाणी गुणगुणणं, आपल्या भाषेवर गेम्स तयार करून ते खेळणं. आमच्या नीलची सौ ही गुजराती आहे, हेता. ती जेवढं प्रेम गुजराती भाषेवर करते तेवढंच मराठी शिकायचा प्रयत्नही करतेय. माझे आणि इतर मराठी पॉडकास्ट ऐकते, आजीशी बोलताना मराठीतच बोलायचा प्रयत्न करते. हे सगळं बघून बरं वाटतं. थोडक्यात आमच्या घरात मराठी बोलणारं एक माणूस वाढतंय. हे भाषा वाचविण्यासाठीचं छोटंसं योगदानच म्हणता येईल. त्यावरून सुचलं की आपण प्रत्येकाने एक आपली मातृभाषा, भारतातली कोणतीही एक दुसरी भाषा आणि एक जगातली भाषा अशा तीन भाषा शिकण्याचा मनापासून प्रयत्न केला तर एक माणूस तीन भाषा वाचविण्यासाठी अंशत: योगदान देईल. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला इंग्लिशसह चार भाषा अवगत असतील. इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट. माझ्यासाठी माझ्या तीन भाषा मी ठरवल्यात. माझी माय मराठी, दुसरी गुजराती आणि तिसरी जापनीज्. लेट्स स्टार्ट फ्रॉम टुडे! ठरवलं की होतं... करूयाच सुरुवात!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.