Published in the Saturday Lokasatta on 16 February, 2025
...मी मनातल्या मनात आईल सीटवर कुणीतरी पुरुष प्रवासी येऊ दे अशी प्रार्थना करीत होते. म्हणजे मग सुधीरला मध्ये बसावं लागणार आणि मला विंडो मिळणार. जेमतेम दोन तासांचा प्रवास...
गेल्या वर्षी जयपूरला गेलो होतो. शादी का मौसम. राजस्थानने स्वत:ला डेस्टिनेशन वेडिंगचा बालेकिल्ला बनविलाय. त्यामुळे आपल्या प्रत्येकालाच कधीतरी राजस्थानी शादीचा अनुभव घेता येतो. मी आणि सुधीर निघालो होतो राजस्थानच्या एका रिसॉर्टमध्ये पंजाबी शादीची मजा लुटायला. आमचे असोसिएट नरेश अरोरा ह्यांच्या मुलीचं लग्न होतं. या एकाच फंक्शनसाठी आम्ही गेलो होतो, कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवासाला निघायचं होतं. मुंबई-जयपूरचा प्रवास आम्ही इंडिगो एअर ने केला. विंडो सीटचं आकर्षण आपण कितीही प्रवास करीत असू किंवा कितीही वय झालेलं असलं तरी आपल्या प्रत्येकाला असतंच. सर्वसाधारणपणे आपल्या भारतातील विमानप्रवासात एका साईडला तीन आणि दुसऱ्या साईडला तीन सीट्स असं थ्री बाय थ्री कॉन्फिगरेशन असतं सीट्सचं. आम्हाला एक विंडो आणि एक मधली सीट होती. आता तिसरं कोण असणार त्या आइल सीटवर यावर मला विंडो मिळणार की सुधीरला हे ठरणार होतं. मी मनातल्या मनात आईल सीटवर कुणीतरी पुरुष प्रवासी येऊ दे अशी प्रार्थना करीत होते. म्हणजे मग सुधीरला मध्ये बसावं लागणार आणि मला विंडो मिळणार. जेमतेम दोन तासांचा प्रवास, पण माझ्या अंतर्मनातले बालहट्ट काही केल्या संपायला तयार नव्हते. पण तसेही ते नकोच संपायला कधी. मनाच्या एका कोपऱ्यात ही बालसुलभ जिज्ञासा कुतूहल उत्सुकता जिवंत ठेवता आली पाहिजे. त्या दिवशी सुधीरचं नशीब बलवत्तर होतं. आईल सीटवर मुलगी आली, मला चुपचाप मधल्या सीटवर बसावं लागलं आणि सुधीरची स्वारी, ‘बघ मी अपेक्षा करीत नाही कधी त्यामुळे मला नेहमी चांगलं ते मिळतं’, असे विजयी भाव चेहऱ्यावर घेऊन विंडो सीटवर विराजमान झाली. ‘आलिया भोगासी’ म्हणत मी माझ्या सॅन्डविच सीटवर ‘लेट्स एन्जॉय रिडिंग’ असं मनाशी म्हणत इंडिगोचं फ्लाइट मॅगेझिन घेऊन बसले. पुढच्या दोन तासात अथपासून इतिपर्यंत मॅगेझिन वाचून झालं. पायलटने ‘थोड्याच वेळात आपण जयपूरला उतरू’ अशी अनाऊन्समेंट केली. विमान खाली उतरता उतरला सुधीर म्हणाला, ‘जयपूर आता पूर्वीसारखं गुलाबी राहिलं नाही’. हे वाक्य एखाद्या वेदनेसारखं मला बोचलं. कुणा गायकाला, ‘तुझा सूर आता पूर्वीसारखा लागत नाही’ म्हटल्यावर कसं वाटेल तसंच काहीसं मला झालं. जगातल्या वेगवेगळ्या देशांतून येणाऱ्या पर्यटकांना ‘पिंक सिटी जयपूर’ बघायची असते आणि विमानातून ती जर पिंक दिसली नाही तर मग ते लेबल मिरविण्यात काय अर्थ आहे? जयपूरने, राजस्थानने आणि भारतानेही सिरियसली यावर विचार केला पाहिजे. कलरफूल कंट्री म्हणून आपल्या भारताकडे बघितलं जातं आणि त्याचं बरचसं श्रेय हे राजस्थानला आहे. महाराजा सवाई रामसिंग ह्यांनी 1876 मध्ये क्वीन व्हिक्टोरियाचा मोठा मुलगा भविष्यातला राजा प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड ज्यावेळी भारत भेटीत जयपूरला भेट देणार होता त्यावेळी त्याच्या स्वागतार्थ राजस्थानची अगत्यशीलता आणि आतिथ्य याचा रंग म्हणून संपूर्ण जयपूर शहर गुलाबी करून टाकलं. ते इतकं सुंदर दिसायला लागलं की जयपूरच्या राणीने प्रश्न केला की येणारी प्रत्येक वास्तू ह्याच रंगात का रंगवू नये? एकेक करीत गुलाबी घरांची संख्या वाढू लागली कारण राणीच्या आग्रहाखातर राजाने कायदाच पास करून टाकला. तसं जयपूरला जाणं बऱ्याचदा झालंय आणि त्यामुळेच असेल कदाचित जयपूरच्या गुलाबी रंगाचा प्रॉमिनन्स तेवढा दिसत नाही किंवा विमानातून तरी तो दिसत नाही हे सुधीरच्या वाक्याने जाणवलं. पिंक सिटी ही जयपूरची ओळख आहे. येणाऱ्या पिढ्यान्पिढ्यांसाठी ती तशी राहिलीच पाहिजे म्हणून सरकारने तो कायदा आणि त्याची अंमलबजावणी यावर सक्त नजर ठेवली पाहिजे. दीडशे वर्षांपूर्वी, फारशा सोयीसुविधा नसताना महाराजा सवाई रामसिंग द्वितीय यांनी संपूर्ण शहर गुलाबी करून दाखवण्याची किमया केली असेल तर आजच्या सरकारने त्याच्या पुढची पायरी गाठायला पाहिजे, नाही का? पूर्वी राजे महाराजे अंबारीतून, घोड्यावरून फिरायचे थोडक्यात रस्त्यांवरून जायचे. त्यांच्या आणि जनतेच्या डोळ्यांना ते गुलाबी शहर मस्त दिसायचं. आता आपण किंवा देशविदेशातले पर्यटक जास्तकरून विमानाने जयपूरला उतरतात. त्यांना जयपूर हे पिंक शहर वरून आकाशातूनही गुलाबी दिसलं पाहिजे.
राजस्थानमध्ये जयपूर जसं पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं, तसं जोधपूर ब्ल्यू सिटी म्हणून ओळखलं जातं. जोधपूरच्या मेहरांगड फोर्टवरून या ब्ल्यू सिटीचा नजारा तुम्हाला बघायला मिळतो. शहरातली ही निळी घरं आधी फक्त उच्च वर्णीयांसाठी बांधली जायची, पण काळानुरूप हे बदललं, सर्वच घरं निळी झाली आणि जोधपूरला ‘ब्ल्यू सिटी’चं लेबल लागलं. उदयपूर आणि आजूबाजूचा एरिया म्हणजे राजस्थानातल्या मार्बल साम्राज्याचं माहेरघर. इथल्या जास्तीत जास्त इमारती व्हाईट मार्बलने सजल्या आणि उदयपूरला ‘व्हाईट सिटी’ हे नाव चिकटलं. सोनार फोर्ट या सोनेरी किल्ल्यामुळे आणि जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या घरांमुळे जैसलमेर बनली ‘गोल्डन सिटी’ किंवा ‘येलो सिटी’. अजमेर फोर्टच्या लाल रंगावरून अजमेरला ‘रेड सिटी’चा मान मिळाला. म्हटलं नं, भारताला कलरफुल कंट्री म्हटलं जातं, त्यात राजस्थानचा सिंहाचा वाटा आहे.
सरकारचे अनेक प्रोजेक्ट्स सुरू असतात, मग का नाही हा एक कलरफुल सिटीजचा प्रोजेक्ट हातात घ्यायचा? शहरातला एखादा रस्ता, पहाडावरचं एखादं गाव, एखादी कोस्टलाईन का नाही कलरफूल बनवायची? आपल्या देशातल्या किमान पंचवीस टक्के राज्यांमध्ये किंवा शहरांमध्ये आपण ही रंगाची उधळण केली तर भारत देश भविष्यात आणखी परदेशी पर्यटकांना आकर्षित करेल आणि ही एक गोष्ट भारताच्या खजिन्यात फॉरेन एक्सचेंजची सुद्धा भर टाकील. जगात अनेक ठिकाणी या रंगांनी आपली एक ओळख त्या त्या ठिकाणांना दिलीय आणि जगातले असंख्य पर्यटक अशी ठिकाणं आपल्या बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करताहेत. आम्ही पर्यटकांना अशा अनेक ठिकाणी घेऊन जात असतो. त्यातली काही उदाहरणं द्यायची म्हटली तर अशी..
मोरोक्को मध्ये असलेलं, पंधराव्या शतकात ज्यू लोकांनी वसवलेलं शेफशावन हे निळं शहर मारोक्कोची ओळख बनलंय आणि लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. शीपयार्डमधल्या स्क्रॅप मटेरियलमधून उभं राहिलं आहे अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्समधलं कलरफूल ‘ला बोका’. लाल पिवळा निळा नारंगी अशा एकदम ब्राइट कलर्समधलं हे ठिकाण अर्जेंटिनाच्या सहलीतलं मस्ट व्हिजिट डेस्टिनेशन आहे. मेक्सिकोमधलं ‘लास पाल्मितास’ हे शहर किंवा दोनशे नव्वद घरांचं एका टेकडीवरचं गाव. लोअर इन्कमवाल्या लोकांची घरं असल्यामुळे, त्याचा एकंदरीत नजारा हा यथातथाच म्हणजे झोपडपट्टीचा. ग्राफिटीसाठी फेमस असलेल्या तिथल्या एका युथ ऑर्गनायझेशनने एकत्र येऊन मेक्सिको सरकारच्या मदतीने ही साधी घरं रंगवली वेगवेगळ्या भडक रंगांमध्ये आणि ती टेकडी त्या रंगवलेल्या घरांमुळे एका म्युरलमध्ये कर्न्व्हट झाली. तरुणाईला कामं मिळाली, क्राइम रेट कमी झाला आणि एक आदर्श उदाहरण जगासमोर आलं. स्पेनमधल्या हुस्कार शहराची तर गोष्टच वेगळी. सोनी पिक्चर्सने त्यांच्या हॉलिवूड मूव्ही ‘द स्मर्फ्स’ साठी हे शहर रंगवलं संपूर्णपणे निळ्या रंगात. घरांच्या मालकांना त्यांनी सांगितलं की शूटिंग आणि प्रमोशन संपल्यावर आम्ही पुन्हा तुमचं गाव आणि सगळी घरं होती त्या स्वरूपात करून देऊ. पण प्रमोशन संपलं तेव्हा गावातल्या सगळ्या घरमालकांनीच एकत्र येऊन सोनीला सांगितलं, ‘आम्हाला नको आमच्या घरांचा ओरिजिनल कलर, राहू दे असंच निळं टाऊन. आणि आता हे निळं शहर हुस्कार ‘कस्टमाईज्ड हॉलिडे’ घेऊन जाणाऱ्या पर्यटकांच्या यादीत समाविष्ट झालंय. कोलंबियामधल्या गुआतापे या कलरफूल शहराची कहाणीही तशी छान आहे. तिथे श्रीमंतांची घरं मस्त रंगामध्ये रंगवलेली असायची, त्यावर अतिशय सुंदर नक्षीकाम असायचं. तिथल्या मेयरला गरीब आणि श्रीमंतांमधली ही दर्शनीय दूरी मिटवायची होती, म्हणून त्याने सर्वांना साधनसामग्री पुरवली आणि मग सर्वांचीच घरं सुंदर दिसायला लागली. आता हे शहर जगभरातल्या टूरिस्टचं आकर्षण बनलंय. मला आणखी एक गोष्ट आवडते ती पेस्टल शेडमध्ये रंगवलेल्या ‘रेनबो रो’ या चार्ल्सटन साऊथ कॅरोलिना मधल्या रस्त्याची. एका जजने इथे घर घेतलं आणि ते पेस्टल शेडमध्ये रंगवलं. ते शेजाऱ्याला इतकं आवडलं की त्यानेही दुसऱ्या रंगाच्या पेस्टल शेडमध्ये स्वत:चं घर रंगवलं. ती घरं इतकी छान दिसायला लागली की आजूबाजूच्यांनीही आपल्या घरांचे रंग पेस्टल शेड्समध्ये बदलले आणि रस्त्याला जान आली. ग्रीनलँड म्हणजे बर्फाचं आगार. तिथली घरं अर्थातच डेन्मार्क कोपनहेगनच्या धर्तीवर बांधलेली. तिथल्या नूक गावातली अल्ट्रामॉडर्न झोपडीसारखी दिसणारी ड्रिफ्टवूडची घरं त्यांनी ब्राईट कलरने रंगवली आणि फक्त एकच बदल केला तो म्हणजे त्या बिल्डिंगच्या उपयोगाप्रमाणे रंग दिले म्हणजे हॉस्पिटल्स क्लिनिक्स, डॉक्टर्सच्या घरांना पिवळा रंग, कमर्शियल बिल्डिंग्ज, शाळा चर्चेस, टीचर्स आणि मिनिस्टर्सच्या घरांना लाल रंग, टेलिकम्युनिकेशन बिल्डिंग्जना हिरवा तर फिश फॅक्टरीजना निळा. किती मस्त विचार नाही का? ग्रीसमध्ये उन्हाळ्यात सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आणि उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी बनवली गेली व्हाईट वॉश्ड हाऊसेस. समुद्राचा निळा रंग, पांढरी घरं, मधूनच डोकावणारे ब्ल्यू डोम्स आणि गुलाबी रंगाच्या अनेक छटा दाखवणारी बोगनवेलीची फुलं. उगाचच नाही भारतीय आजकाल मोठ्या संख्येने ग्रीसकडे निघालेयत. पिवळ्या पांढऱ्या रंगातलं स्पॅनिश-पोर्तुगीज आर्किटेक्चर मग ते कॅलिफोर्नियातलं सांता बारबारा असो किंवा आपल्या भारतातलं गोवा वा पाँडिचेरी, त्याचा बाजच वेगळा. जगातलं कोणतंही स्पॅनिश-पोर्तुगीज राजवटींचा अंमल असलेलं टाऊन घ्या. तिथे पर्यटकांची गर्दी नाही असं होणारच नाही. पोर्तुगीजांनी आपला ठसा उमटवून त्या शहरांना कायमची वेगळी ओळख दिली ती अशी. ब्राइटन बीच मेलबर्न ऑस्ट्रेलियामध्ये समुद्रकिनाऱ्यावर लोकांनी कलरफुल बॉक्सेस निर्माण केले आहेत, ते सुध्दा इतके मस्त दिसतात की पर्यटकांचं लक्ष तिथे न गेलं तरच नवल. आपल्या पूर्वजांनी ही रंगाची मस्त अशी उधळण करून आपलं वेगळेपण जगासमोर ठेवलंय. आता वेळ आहे त्या रंगांना आणखी उठाव देण्याची, सुंदर बनवण्याची, आणखी काही चांगलं निर्माण करण्याची.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.