Published in the Saturday Lokasatta on 23 March 2025
...एका मिनिटात विजयी होऊन पहिल्या नंबरचं चषक जणू हातात घेऊनच आपण मैदानातून बाहेर यायचं ह्या मानसिकतेत मोठ्या आत्मविश्वासाने मी उभी राहिले...
‘हे पोस्टर कशासाठी चिकटवलंय दाराला?’ माझा प्रश्न. ‘अरे मॉम तो एक गेम आहे, लेट्स प्ले.’ हेताने मला उत्तर देत आय मास्क आणला. साराला समोर उभं केलं, तिच्या हातात स्टिकर दिला. डोळ्यावर आय मास्क बांधला. तिला गोल गोल फिरवलं आणि सांगितलं, ‘जा आता समोरच्या पोस्टरवर बरोबर ठिकाणी स्टिकर चिकटव.’ गोल गोल फिरवल्यामुळे सारा भरकटली, नेमकं कोणत्या दिशेला जायचं ह्याचा गोंधळ उडाला. पण आमच्या आवाजांच्या दिशेने ती अंदाज बांधत गेली आणि हळूहळू मजल दरमजल करीत पोहोचली त्या पोस्टरपर्यंत आणि बऱ्यापैकी जवळ तिने स्टिकर चिकटवला. त्यानंतर घरात असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांवर ही पट्टी बांधली गेली आणि त्यातनं जी काही दे धम्माल उडाली आणि हास्याची कारंजी निर्माण झाली की विचारूच नका. जेव्हा माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली तेव्हा तर हद्द झाली. म्हणजे माझ्याआधी एक-दोन प्लेअर्स खेळले होते. मला अंदाज आला होता. जिथे डोळ्यांवर पट्टी बांधली जात होती तिथपासून पोस्टरचं अंतर, पोस्टरच्या कडेपासून जिथे नाकावर स्टिकर चिकटवायचाय तिथपर्यंतचं अंतर, ह्याचं माझ्या उंचीशी मनातल्या मनात कॅल्क्युलेशन मी करून ठेवलं होतं. सोप्पं होतं ते, आधीचे दोन प्लेअर्स एवढे का गोंधळले असा विचार करीत मी खेळात उतरले. एका मिनिटात स्टिकरची आणि नाकाची भेट घडवून विजयी होऊन पहिल्या नंबरचं चषक जणू हातात घेऊनच आपण मैदानातून बाहेर यायचं ह्या मानसिकतेत मोठ्या आत्मविश्वासाने मी उभी राहिले. माझ्या डोळ्यांवर पट्टीरूपी मास्क लावण्यात आला. आधीच्या प्लेअर्सप्रमाणे मलाही गरगर फिरवण्यात आलं. त्यातही मी कॅल्क्युलेशन करून ठेवलं होतं. एकंदरीत तीन राऊंड्स मला फिरवलं गेलं त्यामुळे आता जी दिशा आलीय ती पोस्टरचीच असणार हे माझ्या कॅल्क्युलेशनने मला सांगितलं. मी सावधपणे चालायला सुरुवात केली आणि फिदीफिदी हसण्याचा आवाज आला. ‘ओह्, म्हणजे माझी दिशा चुकलीय तर. असं कसं बरं झालं?’ मन हार मानायला तयार नव्हतं. मी प्रयत्न जारी ठेवले. आता बाकीच्यांचं हसणं गडगडाटी स्वरूप धारण करायला लागलं. ‘नील, चला गाद्या घालूया, सकाळपर्यंत ही पोहोचेल पोस्टरपाशी’ एक आवाज. ‘अरे वीणा, तुला काही आमच्या आवाजाची दिशा वगैरे कळतेय की नाही?’, ‘अरेरे, तू एवढी सेन्सलेस असशील असं वाटलं नव्हतं’,‘अरे ही तर टोटल मंद आहे’, ‘वीणा आज तुझी इमेज धूळीला मिळवलीस तू’, ‘अरे यार इसके बारे में क्या सोचा था और ये क्या निकली’, एकंदरीत माझ्या कॅल्क्युलेशनचे बारा वाजले होते आणि आत्मविश्वासाच्या तर चिंधड्या उडाल्या होत्या. अभिमानाची जागा असहाय्यतेने घेतली आणि मी म्हटलं, ‘मान्य आहे मी मंद आहे, बट नाऊ गिव्ह मी अ क्लू’. मी पराभव पत्करल्यावर आणि मदत मागितल्यावर मात्र कुत्सितपणे हसणारी तोंडं आणि शाब्दिक चपराकी बंद झाल्या. ‘वीणा डाव्या हाताला वळ, दोन पावलं पुढे जा, लेफ्ट लेफ्ट, थोडसं राइट, आता समोर, यू आर ऑलमोस्ट देअर, आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’... म्हणत मला एकदाचं त्यांनी पोस्टरपर्यंत पोहोचवलं, आत्तापर्यंत माझ्या हुशारीची एैशी तैशी झाल्याने तिथेही मी दिवे लावले. कानाच्या जागी नाक लावून निधड्या छातीने मैदानात उतरलेली मी नामोहरम होऊन माझ्या जागी येऊन बसले. डोळे उघडे असतानाचं जग आणि डोळ्यांवर पट्टी बांधल्यानंतरचं जग ह्यातलं अंतरएखाद्या सत्यासारखं समोर उभं राहिलं या छोट्याशा खेळामुळे.
या खेळात आणखी मजेची गोष्ट अशी होती की थोड्याफार फरकाने प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखीच होती. ‘काय मूर्खपणा चाललाय हा, आता मी बघा कसा मस्त स्टीकर लावतो ते’ असं म्हणत एकेक जण मैदानात उतरत होता आणि,‘वाटलं होतं तेवढं पटकन नाही जमलं, इट्स नॉट दॅट ईझी’ असं मनातल्या मनात म्हणत होता किंवा जेव्हा डोळ्यांवरची पट्टी काढली जात होती तेव्हा चेहऱ्यावर तरी तसं दिसत होतं. ‘मला ते पटकन जमणार होतं पण तुम्हाला हसविण्यासाठी मी वेळ काढला’ अशा प्रकारची स्वत:च्या अपयशावर लावलेली एक मिष्किल झालरही बघायला मिळाली. पण एकंदरीतच ते तेवढं सोप्पं नव्हतं हे प्रत्येकाला उमजलं होतं. हा गेम आम्ही ‘पिन द नोज’ म्हणून खेळलो. सगळेच इंग्रजाळलोय, पण त्याला आता काही इलाज नाही. घरात वा शक्य होईल तिथे आपली मातृभाषा बोलायची आणि पुढे न्यायची. असो, तर ह्या खेळाला आपण शाळेत, ‘गाढवाला शेपूट लावणे’ असं म्हणायचो. आत्ताही डोळ्यासमोर गावच्या शाळेतला तो वर्ग आठवला. समोर मोठा काळा फळा, त्यावर खडूने सरांनी वा बाईंनी वा वर्गातल्याच एका उभरत्या चित्रकाराने काढलेलं गाढवाचं भलमोठ्ठं चित्र. आणि एकेक करून आपण डोळ्यांवर पट्टी बांधून त्या गाढवाला शेपूट लावायला सरसावायचो. वर्गातला तो एक तास लाफ्टर क्लब बनायचा, ओढून ताणून आणलेल्या गडगडाटी हास्याचा नव्हे तर बेंबीच्या देठापासून डोळ्यांत पाणी आणणाऱ्या खऱ्याखुऱ्या हास्याचा. आपण असाच आणखी एक खेळ खेळायचो, आंधळी कोशिंबीर. त्यातही अशीच मजा यायची, ज्याच्यावर राज्य असायचं त्याला आणि खेळताहेत त्यांनाही.
‘उघडा डोळे बघा नीट’ ही एका टीव्ही चॅनलची टॅगलाईन. सर्वप्रथम ती आली तेव्हा ‘अरे अशी काय ही लाईन’ असं वाटलं पण हळूहळू त्यातला अर्थ कळायला लागला आणि मग ती लाईन बोल्ड आणि ब्युटिफूल बनून गेली. हीच लाइन मला ह्या ‘पिन द नोज’ गेमनंतर ‘डोळे बंद करा आणि जाणीव जागी करा’ अशी करावीशी वाटली. म्हणजे माझ्यासाठी ती मी बदलून पण टाकली. तसंही आपण हे नकळत करीतच असतो. अचानक उदभवलेल्या एखाद्या अडचणीला सामोरं जाताना बऱ्याचदा आपण घरात किंवा कार्यालयात एखाद्या निवांत जागी एकटे बसतो, डोळे बंद करून घेतो, शांत होतो, विचार करतो. अडचण वा संकट आपल्यामुळे आलेलं असेल किंवा आपल्यावर ओढवलेलं असेल तर ते बदलता तर येत नाही त्यामुळे ‘व्हॉटस नेक्स्ट?’ ह्या प्रश्नावर मनातल्या मनात ‘हे की ते?’ ‘किंतु परंतु’ चा उहापोह करतो आणि निश्चितपणे कुठेतरी निर्णयाप्रती पोहोचतो. डोळे बंद केल्यावरच खरंतर महत्त्वाच्या गोष्टी दिसायला लागतात. दिवसातला थोडासा चिंटूसा वेळ आपण ह्या डोळे बंद करण्याला दिला पाहिजे. बऱ्याचशा प्रश्नांची उकल होऊ शकेल. उघडे डोळे, बंद डोळे, डोळ्यांवर झापडं, ढापणं बांधलेले डोळे, सतत समोर बघणारे डोळे, समोर तसंच सभोवताली बघणारे डोळे, मागे वळून पाहणारे डोळे, भूतकाळाच्या चलत्चित्रपटात रमणारे डोळे, भविष्याचे काल्पनिक चित्र कुतूहूलाने बघत त्यात देहभान विसरायला लावणारे डोळे... बापरे बाप! केवढ्या प्रकारचे हे डोळे? आपले डोळे कोणत्या प्रकारचे आहेत ते आपणच तपासायला हवं. ह्या डोळ्यांमध्ये आता भर पडलीय ती म्हणजे कॅमेऱ्याचे डोळे. टूर्सवर आम्हाला ह्याचा प्रत्यय येतो. कधी कधी कुणी कुणी पर्यटक आपल्या स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी एखाद्या पर्यटनस्थळाच्या सौदर्यांचा मनसोक्त आस्वाद घेतच नाहीत. सतत आपल्या डोळ्याला कॅमेरा. फोटो महत्त्वाचे आहेतच, त्या आनंदी आठवणी आहेत नो डाऊट. पण फोटोत आणि कॅमेऱ्यातच जर ते पर्यटनस्थळ बघायचं असेल तर मग इतके पैसे खर्च करून यायचंच कशाला एवढ्या दूर. पर्यटनस्थळांच्या छान छान फोटोज् आणि व्हिडियोज् नी तर सोशल मिडिया आणि चित्रपट भरलेले आहेत. मला इथे चित्रकार शाम जोशींची आठवण झाली. ते एकदा टूरवर होते. त्यानां मी विचारलं, ‘शामकाका तुमच्याजवळ कॅमेरा नाही?’ ते म्हणाले, ‘वीणा, मी ही ठिकाणं उघड्या डोळ्यांनी बघतो. त्यांचा आनंद घेतो, मनात त्यांची चित्रं रेखाटतो आणि घरी गेल्यावर कॅनव्हासवर ते चितारतो.’ त्यांचे शब्द आजही जसेच्या तसे आठवताहेत. मी सुद्धा टूरवर कधी कधी फोनच्या आहारी जाते, दे दणादण फोटोज काढायला सुरुवात करते, पण मग एकदम शामकाकांचे शब्द आठवतात आणि भानावर येत, मी कॅमेरा बंद करून चिडीचूप उघड्या डोळ्यांनी त्या पर्यटनस्थळाचा आनंद घ्यायचा प्रयत्न करते. हो, प्रयत्नच म्हणायला हवा कारण हात नकळत त्या मोबाइलकडे खेचला जातच असतो.
गाढवाला शेपूट लावणं काय किंवा आंधळी कोशिंबीर काय मला हे आपल्यातली जाणीव जागी करणारे खेळ वाटतात. ‘इट्स नॉट ईझी ॲालवेज’ या वास्तवाची जाणीव करून देतात. उघडे डोळे आणि डोळ्यांवर पट्टी या दोन गोष्टींमध्ये असलेल्या जमीन अस्मानाच्या फरकाची ते आपल्याला जाणीव करून देतात. डोळ्यांचं महत्त्व काय आहे हे पटवून देतात आणि ही एकच गोष्ट आपल्याला त्या जगन्नियंत्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडते. गाढवाला शेपूट लावणं किंवा मग तो ‘पिन द नोज’ वा ‘पिन द टेल’ असा कोणत्याही भाषेतला खेळ असो, तो कधीतरी अधूनमधून खेळला पाहिजे. आपल्याला इझीली मिळालेल्या डोळ्यांची महती आपल्याला कळली पाहिजे. त्याप्रती आपल्या मनात कृतज्ञता असली पाहिजे. जेव्हा जेव्हा हे होईल तेव्हा मग आपल्यानंतर आपले डोळे कुणाचे तरी डोळे बनू शकतील. मग आय डोनेशनसाठी वा ॲार्गन डोनेशनसाठी सरकारला कॅम्पेन करण्याची गरज भासणार नाही.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.