Published in the Saturday Lokasatta on 12 April 2025
...एक एक नाती इतकी नाजूक असतात नं, त्याला खतपाणी घालूनच ती रुजवावी लागतात, वाढवावी लागतात. प्रत्येक कुटुंबात हे काम चालूच असतं...
सात आठ वर्षांपूर्वी आम्हा मित्रमंडळींचा ग्रुप ग्रीसमध्ये संतोरिनी आयलंडवर सनसेट बघण्यासाठी गेला होता. एका छानशा व्ह्यू पॉईंट असलेल्या रेस्टॉरंटच्या टेरेसवर डिनर टेबलवर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. अशावेळी गप्पा कुठूनही कुठेही जातात. बॉलिवूड, हॉलिवूड, क्रिकेट फुटबॉलपासून अगदी सरकारला दोष देण्यापर्यंत. काय बोलायचं हा प्रश्नच नसतो, पायलीला पन्नास विषय असतात. गिरीश-सुप्रिया करंदीकर, अरुण-लीना पालकर आणि आम्ही दोघे असे सहाजण गप्पांमध्ये रंगलेले असताना विषयाची गाडी युरोप अमेरिकेत वाढणारी आपली पुढची पिढी, ते बहुतेक आता त्या देशांचेच रहिवासी होतील यातला आनंद आणि वेदना, आपल्या देशातून होत असलेला ब्रेन ड्रेन... अशा थोड्याशा नाजूक विषयाकडे वळली. कारण आम्ही तिघंही ‘सेलिंग इन द सेम बोट’ होतो. आमची, पूर्ण वा अर्धी पुढची पिढी परदेशातील सुवर्णसंधी आणि तेथील सुखसुविधांकडे आकर्षित होऊन तिथे स्थायिक झाली होती. दोष देण्यासारखं काहीच नव्हतं, कारण आता खऱ्या अर्थाने ‘हे विश्वचि माझे घर’ अशा अतिशय छानशा युगात आपण राहतोय. कुणी घराची वेस ओलांडून दुसऱ्या घरात जातात, कुणी गावाची वेस ओलांडून शहरात येतात, कुणी राज्याची वेस ओलांडून दुसऱ्या राज्यात जातात तर कुणी देशाची वेस ओलांडून परदेशात जातात. ‘टाईम टाईम की बात है’. त्यामुळे या स्थलांतराचं स्वागतच व्हायला पाहिजे. शेवटी माणूस हा एका जागी स्थिर राहणारा प्राणी नाही हे पूर्वापार सिद्ध झालंच आहे. अर्थात आपण माणसं आहोत आणि असं म्हणतात की कोणत्याही प्राण्याला न मिळालेली एक गोष्ट आपल्याकडे आहे ती म्हणजे भावना इमोशन्स, आणि त्यामुळेच आपण कधीकधी चुपचाप आवंढा गिळण्याचं काम करीत असतो. आमच्या गप्पांमध्ये चुटकुले आणि जोक्सची बरसात करणारा अरुण पालकर जो की आता आमच्यात राहिला नाही तो म्हणाला, ‘आपल्या अमेरिकेतल्या पुढच्या जनरेशन्स असंच म्हणतील नं की आमचे पूर्वज भारतात राहत होते. आमचे आजोबा अमुक एका वर्षी भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. आय हॅव बीन वन्स टू इंडिया...’ हो यार खरंय, असं म्हणत आम्ही सर्वजण त्या कारुण्याची झालर असलेल्या मिश्किलीमध्ये हसत हसत सामील झालो. म्हटलं तर समस्या, म्हटलं तर प्रगती, म्हटलं तर आनंद, म्हटलं तर वेदना अशा संमिश्र भावनांनी भरलेला हा घराघरातला विषय. आमच्या सोसायटीमध्ये बहुतेक सगळ्या घरांमध्ये साधारणपणे आमच्याच वयाची दोन किंवा चार माणसं, नवराबायको आईवडील किंवा सासूसासरे. सर्वांची मुलं परदेशात. ‘एम्टी नेस्टर्स’. ‘जी लेते है अपनी जिंदगी’ म्हणत सगळेजण निश्चितपणे आपापलं आयुष्य मजेत घालवताहेत. तसंही सगळ्यांचंच आत्तापर्यंतचं जीवन कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी पूर्णपणे घेरलेलंच होतं नं. स्वतःकडे बघायला तरी कुठे वेळ मिळाला होता? लेट्स एन्जॉय!
आम्ही बिझनेसवाले, मार्केटिंग माईंडवाले, किंवा इनोव्हेशनवाले स्वस्थ बसत नाही. समाजातल्या समस्यांकडे, कुटुंबातल्या दबलेल्या वेदनांकडे आम्ही डोळसपणे तसंच तटस्थपणे बघत असतो. ‘व्हॉट्स फॉर मी’ हा प्रश्न सतत डोळ्यासमोर असतो. व्यवसाय करीत असताना टॉपलाईन बॉटमलाईन जमा खर्च ह्या गोष्टींना प्राधान्य असतंच आणि ते असायलाच हवं कारण व्यवसाय सतत चांगल्या तऱ्हेने वाढत राहिला पाहिजे. पण त्याचवेळी आपल्या व्यवसायाद्वारे आपण सकारात्मक तऱ्हेने समाजासाठी काय योगदान देतो हे ही तितकंच महत्त्वाचं. आपण करीत असलेली प्रत्येक गोष्ट ही सर्वांना आनंद देणारी असावी, त्याद्वारे समाजाला, वातावरणाला, निसर्गाला, माणसांना आणि विचारांना कोणतीही हानी पोहोचणार नाही ह्याची खबरदारी आपण घ्यायला हवी या विचारातून व्यवसाय करीत असल्याने कोणतीही खंत नाही आणि त्याचा पुरावा म्हणजे रात्री झोप शांत लागते. ‘कुठेही पश्चात्ताप करावा लागणार नाही असंच काम आमच्याकडून होऊ दे’ ही देवाला प्रार्थना. सो, अशा या करियर आणि व्यवसायामुळे दुभागलेल्या, वेगवेगळ्या देशांमध्ये राहणाऱ्या आमच्यासारख्या कुटुंबांकडे बघताना आमच्या कल्पक मनाला सुचलं की इथे राहणारे आजी आजोबा आणि तिथे दूरदेशी राहणारी त्यांची नातवंडं ह्यांना एकत्र आणायचं. कुठेतरी मध्यावर भेटवायचं, कॅलिफोर्नियात असतील तर सिंगापूर, जपान किंवा व्हिएतनामला आणि लंडन, न्यूयॉर्कमध्ये असतील तर दुबईला ‘किंवा स्वित्झर्लंडला. आजी आजोबांनी भारतातून त्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आणि नातवंडानी ती जिथे कुठे जगात असतील तिथून येऊन आजी आजोबांना जॉइन व्हायचं. आठ-दहा दिवस मजेत घालवायचे आणि आजी आजोबा नातवंडांचं नातं किंवा त्यांच्यातला बॉन्ड दृढ करायचा. परदेशी राहणाऱ्या नातवंडांना आपल्या भारताची ओळख तर व्हायलाच पाहिजे नं. मग डिसेंबरच्या चांगल्या मोसमात त्यांच्या सुट्टीत ते घडवून आणायला पाहिजे. काय, कशी वाटते आयडिया? आणि हो! ही फक्त आयडिया नाही बरं का. जेव्हा वीणा वर्ल्ड झालं तेव्हा मी स्वतः या टूर्ससोबत जात असे. ‘ट्राइड टेस्टेड अँड सॅटिस्फाइड’ असं व्हायचं ह्या टूर्सवर असताना. आजी आजोबा त्यावेळी अगदी ‘सातवें आसमान पर’ अशा अत्यानंदी मनस्थितीत असायचे. ‘याजसाठी केला होता अट्टाहास’ असं जणू जीवन सार्थकतेचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं. त्याचवेळी नातवंडाना आजी आजोबा आणि त्यांचं निखळ प्रेम नव्याने जाणवायचं. मुख्य म्हणजे या टूरवर नातवंडं आईबाबांच्या धाकातून बाहेर आलेली असतात आणि आजी आजोबांच्या निर्व्याज प्रेमात ओथंबून गेलेली असतात. आईवडिलांच्या दृष्टीने हा ‘स्पायलर्स वीक’ असतो. म्हणजे ह्या टूर सुरू होताना एअरपोर्टवर मुलांना आजी आजोबांच्या आणि वीणा वर्ल्डच्या भरवशावर सोडताना चिंतेने आईवडिलांच्या चेहऱ्यावर हजारो प्रश्नचिन्हं असतील याची मला खात्री आहे. आणि त्यामुळेच आम्ही आईवडिलांना या टूरला ‘प्रवेशबंदी’चा बोर्ड दाखवलाय. ‘नो एन्ट्री टू पेरेंट्स!’ ये मामला सिर्फ प्यार और प्यार का है। दुलार का है। इथे आठ-दहा दिवस व्यवहारी जीवनाला पूर्णविराम! शाळा कॉलेज अभ्यास नियम या सगळ्यांना सुट्टी. वर्षा-दोन वर्षांतून एकदा असा आनंद या आजी आजोबा नातवंडांच्या स्पेशल बॉन्डला द्यायला काय हरकत आहे? याला आपण ‘रिज्युविनेशन थेरपी’ म्हणूया, जी आजी आजोबा नातवंडांना आजीवन आनंद देत राहील आणि त्यांच्या कायम स्मरणात राहील. आईबाबांना यात प्रवेशबंदी असली तरी त्यांचं एक कर्तव्य त्यांनी पार पाडायचंय. ते म्हणजे या टूरवर येणाऱ्या दोन्ही पार्टीज्ना टूरपूर्वी सिलेक्शनसाठी आणि आर्थिक बोजा उचलण्यासाठी मदत करायचीय.
एक एक नाती इतकी नाजूक असतात नं, त्याला खतपाणी घालूनच ती रुजवावी लागतात, वाढवावी लागतात. प्रत्येक कुटुंबात हे काम चालूच असतं आणि आमच्यासारख्या संस्था त्यामध्ये कमर्शियली आणि इमोशनली फूल ना फुलाची पाकळी प्रमाणे योगदान देत असतात. माझा एक्केचाळीस वर्षांचा टुरिझममधला वावर आणि गेल्या बारा वर्षांचा वीणा वर्ल्डचा प्रवास बघितला तर पर्यटन व्यवसाय करताना आम्ही नेहमीच ‘कुटुंब’ अग्रस्थानी ठेवलं, त्या कुटुंबाच्या गरजांचा अभ्यास केला आणि त्यातूनच निर्माण झाली ‘वुमन्स स्पेशल टूर’ची यशस्वी संकल्पना जी आज सर्वत्र लोकप्रियतेचा उच्चांक गाठत आहे. सिनियर्स स्पेशल टूर म्हणजे जेष्ठांची श्रेष्ठ सहल ज्याद्वारे जेष्ठ मंडळी अगदी निर्धास्तपणे जगभरात पर्यटन करताहेत. कुटुंबातल्या नवविवाहितांसाठी हनिमून स्पेशल, तरुणींसाठी योलो ॲडव्हेंचर टूर्स, मध्यमवयीन कपल्ससाठी कपल टूर्स, आजोबा नातवंडांसाठी ग्रँडपेरेंट्स-ग्रँड चिल्ड्रन स्पेशल टूर्स, फॅमिलीज्साठी रेग्युलर तसेच लक्झरी ग्रुप टूर्स, मनासारखा हॉलिडे हवा असणाऱ्यांसाठी कस्टमाईज्ड हॉलिडे, दूरदेशी राहणाऱ्या नातेवाईकांसाठी इंडिया टूर्स अशा गोष्टी निर्माण केल्या आणि प्रत्येक कुटुंब त्याचा आनंद लुटतंय. आणि या सगळ्यामुळेच तर वीणा वर्ल्डची टॅगलाईन बनली, ‘वीणा वर्ल्ड प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी.’
वुमन्स स्पेशल आता इतकी प्रत्येक घरात पोहोचलीय की त्याच्या वेगवेगळ्या डिमांड्स यायला लागल्यायत. या टूरमध्ये आम्ही फक्त मुलींनाच प्रवेश देतो. मुलगा लहान असला तरी प्रवेश नाही. त्यामुळे आता डिमांड आली आहे ती ‘नॉट विदाऊट माय किड्स’ वाल्या मॉम्सकडून, ‘वुमन्स स्पेशल विथ किड्स’ ची. जिथे फक्त आई आणि मुलं असतील. मुलांची वयोमर्यादा आम्ही वय वर्षे पंधरापर्यंत ठेवली आहे. म्हणजे दहावीपर्यंतची मुलं मुली. जेव्हा ही सूचना वारंवार यायला लागली तेव्हा आम्हाला कळलं की आता आपण याचा विचार करायलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत परीक्षांनंतर ह्या टूर्स लावल्या आहेत. मुलांना आणि त्यांच्या आईलाही आवडतील अशा डेस्टिनेशन्सना ‘वुमन्स स्पेशल विथ किड्स.’ आई मुलांचं नातंही तसंच आहे नं, ते वृद्धिंगत झालं पाहिजे आणि म्हणूनच या टूर्स, जिथे आई तिच्या किचन वा करियरपासून मुक्त असेल आणि संपूर्ण वेळ, खऱ्या अर्थाने क्वालिटी टाईम तिच्यामुलांना देऊ शकेल.
कमर्शिअली व्यवसाय होत राहतो, पण वुमन्स स्पेशल किंवा ग्रँडपेरेंट्स ग्रँड चिल्ड्रन सारख्या संकल्पना यशस्वी होताना दिसतात तेव्हा खूप मोठं समाधान मिळतं. असं समाधान सतत निर्माण करीत राहणे म्हणजे व्यवसायाची आणि आयुष्याची लढाई जिंकली म्हणायची.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.