हॅप्पी रीपब्लिक डे! आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! प्रत्येक नवीन वर्ष हा महत्त्वाचा दिवस आपल्याला देत असतं ज्यादिवशी आपण आपली गाडी पुन्हा एकदा रुळावर आणू शकतो. नवीन वर्षी पहिल्या तारखेला आपण अनेक रीझॉल्युशन्स करतो. यावर्षीही आपण सर्वांनीच ती केली असणार. आज सव्वीस दिवस होताहेत नवं वर्ष सुरू होऊन तेव्हा त्यातली किती रीझॉल्युशन्स आपण आजपर्यंत पाळतोय ते बघायला हवं. जर समजा सर्वच काही ठरविल्या बरहुकूम होत असेल तर नथिंग लाईक इट! आपणच आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारायची. पण जर समजा असं काहीसं होत असेल की, रात्री झोपताना ठरवलं सकाळी उठून जीमला, मॉर्निंग वॉकला किंवा स्विमिंगला जायचं आणि सकाळी जाग आल्यावर अजून थोडंसं लोळूया, उद्या नक्की जाऊ म्हणजेच रात्री झोपताना एक्सरसाईजची तुला नितांत गरज आहे असं तुझं हेड तुला सांगत असेल पण सकाळी उठल्यावर तुझं हार्ट प्रेमाने लोळण्याला प्राधान्य देत असेल तर आता लागलीच उठायचंय आणि आज ज्यादिवशी भारत कोणत्या नीती- नियमांच्या आधारे काम करणार हे सत्तर वर्षांपूर्वी ठरवलं गेलं त्या प्रजासत्ताक दिनी आपण स्वत: ह्यापुढे कोणत्या नितीनियमांच्या आधारे चालणार ह्याची खुणगाठ बांधायची आणि आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आपल्या स्वत:चाही प्रजासत्ताक बनवायचा. हेड एक सांगतंय हार्ट वेगळंच काही करतंय हे युद्ध थांबविण्यासाठी, हेड आणि हार्टला एका लयीत आणण्यासाठी प्रजासत्ताक दिनासारखा चांगला दिवस नाही.
स्वातंत्र्यदिन हा मला हार्टचा मामला वाटतो तर प्रजासत्ताक दिन हा हेडचा. बघानं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनासाठी झालेला भारतीय स्वातंत्र्यसंग्राम पाहिला तर तो संपूर्णपणे हार्टचा मामला होता, स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहूती देणं हे आणखी काय असू शकतं? त्यावेळी हेड मध्ये आलं असतं तर आज आपण करतो तसा स्वार्थी विचार डोकावला असता, मी माझे प्राण का देऊ? मीच राहिलो नाही तर त्या स्वातंत्र्याचा काय उपयोग? माझ्यामागे माझ्या कुटुंबाचं काय होणार?... आणि त्यामुळे ब्रिटीश अजूनही ठाण मांडून आपल्या देशात असते. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते भारतमातेसाठी चुपचाप आपल्या प्राणांची आहुती देणार्या अशा अनंत छोट्या, मोठ्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे. आजच्या शुभदिवशी आपण त्यांना मन:पूर्वक मानवंदना देऊया. भारत स्वतंत्र झाल्यावर त्या स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी पेलण्यासाठी बहुधर्मी-बहुवर्णी-बहुभाषी अशा खंडप्राय भारताला लोकशाहीवादी एकसंध देश बनवायला आणि तो व्यवस्थित चालवायला घटनेची- संविधानाची गरज होती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या ड्राफ्टिंग कमिटीने पूर्ण केली, आणि साडेतीन वर्ष अखंड मेहनत घेऊन तीनशे पंच्याण्णव आर्टिकल्स असलेलं कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया जन्माला आलं. त्या संविधानासोबत राहून आपणही प्रत्येक भारतीयाने आपल्या आयुष्याला आणखी चांगलं वळण लावण्याचा, आयुष्य सर्वार्थाने समाधानी बनविण्याचा निश्चय करून तो अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी ठेवली तर व्यक्ती-व्यक्तीने बनलेला भारतीय प्रजासत्ताक खर्या अर्थाने चिरायु होईल.
गेल्या रविवारी घरीच होते त्यामुळे माझं आवडतं काम हाती घेतलं होतं, साफसफाई. हात काम करीत असताना कानांना आणि डोक्याला थोडं खाद्य देऊया या विचाराने ज्ञानोपासक व्यक्तीमत्त्वांच्या मुलाखती यू ट्यूबवर सुरू केल्या. पहिलीच मुलाखत होती जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकारणाचे गाढे अभ्यासक ब्रेकआऊट नेशन्सचे लेखक रुचिर शर्मांची. जगाची अर्थव्यवस्था, भारताचं स्थान, वेगवेगळ्या देशांचे प्रगतीचे आलेख अशा अनेक विषयांचा परामर्श घेतला जात होता. त्यामुळे अनेक गोष्टींचं ज्ञान मिळून चित्तवृत्ती प्रफुल्लित होत होती. त्याच मुलाखतीतला एक प्रश्न होता की, गुगल अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, अडोबचे सीईओ शंतनू नारायण, मास्टरकार्डचे सीईओ अजयपाल बांगा, पेप्सीकोच्या फॉर्मर सीईओ इंद्रा नूयी... अशा अनेक भारतीयांनी जगातल्या महाकाय कंपन्यांचं नेतृत्व केलं आहे वा करीत आहेत, त्याचं नेमकं कारण काय? ते म्हणाले, इंडियन्स आर रुलिंग बिकॉज दे हॅव हेड अॅन्ड हार्ट. वॉव! व्हॉट अॅन आन्सर! खूप मोठं उत्तर त्यांनी लिटरली एका वाक्यात दिलं होतं. शिक्षण, अभ्यास, हुशारी माणसाला आयुष्यात यशस्वी बनवतात ह्यात वाद नाही पण असं काही भव्य-दिव्य करायचं असेल तर हेड आणि हार्ट ह्यांच्यात एकवाक्यता असली पाहिजे, त्याचा समन्वय साधता आला पाहिजे. आपला भारत आणि आपण त्याबाबतीत सुदैवी आहोत. आपलं मशीन झालेलं नाहीये, इमोशन्सना अजूनही आपण आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान देऊन आहोत जी आपली खरी शक्ती आहे, फक्त त्याचा योग्य प्रमाणात उपयोग करता आला पाहिजे.
एखाद्या महाकाय कंपनीचं काय, आमच्यासारख्या छोट्या कंपनीचं काय किंवा आमच्या टूर मॅनेजर्सचं काय? व्हाय एव्हरीवन मेक्स अ डीफरन्स? त्याला कारण आहे हेड आणि हार्टचा उत्कृष्ट समन्वय. जगातलं कोणतंही स्थलदर्शन हे सगळ्यांसाठी सेमच आहे. प्रत्येक सहल आणि त्यात दिल्या जाणार्या सर्व सर्व्हिसेसही सेमच आहेत. मग वीणा वर्ल्डच का? हा प्रश्न कोणालाही पडेल, आणि तिथेच येतो वीणा वर्ल्डचा एक्सपर्ट टूर मॅनेजर. टूर मॅनेजर्स मेक अ लॉट ऑफ डिफरन्स! सहलीत तुम्ही किती मजा आणता? एखादी अडचण उद्भवली तर त्याला कसे सामोरे जाता हे त्याच्यावर अवलंबून असतं आणि चोवीस तास त्याच्या पाठीशी असलेल्या वीणा वर्ल्ड ऑफिस टीमवर. टूर मॅनेजर्स रीफ्रेशर्स ट्रेनिंग हा आमचा वीणा वर्ल्डमधला एक महत्त्वाचा भाग. सतत स्वत:ला अपग्रेड करीत राहणं. जगात बर्याच ठिकाणी वीणा वर्ल्डचे पर्यटक जास्त संख्येने दिसत असले तरी डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही. आपण अजून खूप लहान आहोत जगातल्या मोठ्यामोठ्या पर्यटनसंस्थांचा विचार केला तर, आणि कितीही मोठे झालो तरी पाय जमिनीवर आणि डोकं धडावर असलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं काम मनापासून करायचं. हेड आणि हार्टचा समन्वय साधत एक एक करीत छोटी-छोटी यशाची शिखरं काबीज करत मोठा विजय मिळवायचा. मला कामगार- कारागीर-कलाकार थिअरी आवडते. जो हाताने काम करतो तो कामगार (लेबर), जो हातासोबत डोक्याचा वापर करून काम करतो तो कारागीर (क्राफ्ट्समन) आणि जो हँड, हेड आणि हार्ट ह्या तिन्हींचा वापर करून काम करतो तो कलाकार (आर्टिस्ट). आपल्याला प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रातलं कलाकार बनायचंय. ही जाणीव सतत असली नं तर आपल्याकडून कधीही चुकीचं काम होणार नाही. हाच आमच्या प्रत्येक ट्रेनिंगचा महत्त्वाचा भाग असतो.
आपल्या सभोवती अनेक उदाहरणं दिसतात यशाची आणि अपयशाची, जी आपली उत्तम मार्गदर्शक ठरतात. जरा खोलात जाऊन विचार केला तर अशा अनेक उदाहरणांमध्ये हेड आणि हार्टचं सिन्क्रोनायझेशन गडबडलेलं दिसतं. अॅक्चुअली हेड म्हणजे एक शिस्तप्रिय वास्तवदर्शी बाप आहे आणि हार्ट म्हणजे सर्वांवर प्रेम करणारी आई. कुटुंबात असताना आपण स्वत:साठी- स्वत:ला शिस्तित ठेवण्यासाठी डोक्याचा वापर केला पाहिजे, थोडक्यात आपण आपलं बाप बनलं पाहिजे पण कुटुंबासाठी मात्र आपण हार्टचा वापर केला पाहिजे, आपल्याला सर्वांची आई बनता आलं पाहिजे. कुटुंब-मित्रमैत्रीणी हा हार्टचा मामला असतो, तेच व्यवसायात-कार्यालयात हेडचा वरचष्मा असतो, तिथे नफा-तोटा-स्वार्थ ह्या गोष्टी असतात. राजकारणातली मैत्री जर आपण बघितली तर तिथे मात्र शंभर टक्के हेड राज्य करीत असतं. हार्टला बहुतेकदा तिथे नो एन्ट्री, अगदी मज्जावच असतो. थोडक्यात आपण जी निखळ मैत्री किंवा नातेसंबंध म्हणतो तो प्युअरली हार्टचा मामला असतो.
कलयुगात राहताना फक्त हार्टचा अंमल आपल्यावर असेल तर आपण लोकप्रिय होऊ पण व्यावहारिक जगात कदाचित अपयशी ठरू. जर आपण फक्त हेड ह्या गोष्टीला आपल्यावर राज्य करायला दिलं तर आपण आपल्या व्यवसायात किंवा करियरमध्ये यशाची शिखरं गाठू पण त्यावेळी कदाचित आपण आपली माणसं आणि समाजापासून दूर गेलेलो असू, म्हणजे सभोवताली माणसं असतील पण ती मनापासून आपल्यासोबत नसतील. म्हणूनच मानसिक, कौटुंबिक, व्यावसायिक उत्कर्ष खर्याअर्थाने साधायचा असेल तर आपलं डोकं कायम ठिकाणावर असलं पाहिजे आणि हृदयात सगळ्यांप्रती कृतज्ञता, प्रेम, आदर ह्या गोष्टींचा वास असला पाहिजे. कधी-कधी डोकं गरम होईल पण शीतल शांत लव्हिंग हार्टने त्याला थंड करता आलं पाहिजे. आणि हो, आपल्याला आपलं स्वत:चं व्यक्तीमत्त्व जोखता आलं पाहिजे. आपल्यात हेड स्ट्राँग आहे की हार्ट ते कळलं पाहिजे, म्हणजे निर्णय घेताना आपल्या वीकनेसेसवर आपण काम करू शकतो. अनेक यशस्वी बिझनेसमनच्या बाबतीत आपण बघतो की ते गट फीलिंगने म्हणजे हार्ट काय सांगतयं ते ऐकून बिझनेस डीसिजन्स घेतात आणि मग हेडचा-डोक्याचा वापर करून तो निर्णय कार्यन्वित करतात, यश मिळवतात. आपल्यालाही अनेकदा जाणवतं की आपलं हार्ट एक सांगत असतं आणि हेड दुसरं काहीतरी, बहुतेकदा तर ते चेतावणी देत असतं. अनेकदा ही दोघं आपल्याला पूर्ण गोंधळवूनही टाकतात. त्या दोघांचं एकमत व्हायला आपल्याला हार्ट-टू-हेड हा जगातला सर्वात मोठा लांबचा प्रवास करावा लागतो. तो ज्याला जास्तीत-जास्त जलदगतीने करता येईल म्हणजे ह्या दोघांचा समन्वय फास्ट साधता येईल, तेवढी आयुष्याची लढाई चांगल्या तर्हेने जिंकता येईल. आजच्या प्रजासत्ताक दिनी आणखी सजग होऊन, डोकं शांत ठेवून, लेट्स लिसन टू अवर हार्ट!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.