काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईनने प्रवास करीत होते. या एअरलाईनच्या जाहिराती, विमानात चढायच्या शिडीवर वा वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेली स्लोगन्स वाचणं हा छंदच जडलाय. त्यांचं इनफ्लाइट मॅगझीन चाळणं हा तर मोठ्ठा विरंगुळा प्रवासातला. ती नुसती करमणूक नसते तर कोणतीही किचकट गोष्ट किती इनोवेेटिव्ह आणि क्रीएटिव्ह पद्धतीने मांडता येते ह्याचा तो परिपाठ असतो. त्यामधल्या एका बातमीने माझं लक्ष वेधलं आणि ते म्हणजे त्यांनी त्यांच्या टीमच्या चित्रासोबत खाली एक तळटीप दिली होती की, इंडिगोने रीक्रुटमेंटसाठी कुणालाही एजंट म्हणून नेमलेलं नाही. कुणी इंडिगोमध्ये नोकरी देतो म्हणून पैसे मागितले तर त्याला बळी पडू नका, त्यानंतरच्या परिणामांना इंडिगो जबाबदार राहणार नाही. आखाती देशात नोकरीचं अमिष दाखवून गरजूंना हजारो रुपयांना लुटण्याची उदाहरणं आपण वर्तमानपत्रात वाचतो. इथल्या इथे आपल्या भारतात इंडिगोसारख्या एअरलाईनच्या बाबतीतही असा गंडा घातल्याची उदाहरणं त्यांच्यासमोर आली असणार तेव्हाच त्यांनी ही सावधानतेची सूचना दिली असणार.
कुणीतरी कुणालातरी फसवण्याच्या बातम्या आपण वृत्तपत्रात वाचतो, मित्रमंडळींकडून ऐकतो आणि जनरली आपला समज असतो की असं हे सगळं इतरांच्या बाबतीत घडतं, आपल्याबाबतीत घडणार नाही असं आपल्याला ठाम वाटत असतं. पण गेल्यावर्षी आमच्या, तसं बघायला गेलं तर अजूनही मल्टीनॅशनलसारख्या मोठ्या नसलेल्या ऑर्गनायझेशनमध्ये ही घटना घडली. रीसेप्शनवर एक मुलगा आला आणि म्हणाला एच.आरला भेटायचंय, कारण विचारल्यावर त्याने सांगितलं की, मला इथे जॉब मिळालाय. आणखी चौकशी केल्यावर त्याने त्याच्याजवळ असलेलं एक पत्र काढून दाखवलं ते अपॉइंटमेंट लेटर होतं वीणा वर्ल्डच्या बनावट लेटर हेडवर टाईप केलेलं. रीसेप्शनिस्टच्या लक्षात हा फसवणूकीचा प्रकार आला आणि तिने एच.आरला बोलावलं. त्याच आठवड्यात आणखी एक मुलगा तसंच लेटर घेऊन आला. दोन्ही मुलांची चौकशी केल्यावर असं लक्षात आलं की कुणीतरी त्यांच्या लांबच्या ओळखीतल्या मुलाने हे कृत्य केलं होतं, ह्या प्रत्येकाकडून त्याने दोन-दोन हजार रुपये घेतले होते. वीणा वर्ल्डकडे माझी वट आहे, तिथे हमखास नोकरी लावतो म्हणून त्याने ह्यांना सांगितले आणि विश्वास बसण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. आमच्या एच.आर ने त्यांना जनरली मिडसाईज वा मोठ्या कंपन्यांमध्ये रीक्रुटमेंटची पद्धत काय असते, वीणा वर्ल्डकडे ती कशी आहे हे समजावून सांगितलं आणि भविष्यात कधीही कितीही गरज असली तरी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका हा सल्ला दिला. आम्हाला वाईट वाटलं कुणीतरी आपल्या नावाचा वापर करून ह्या दोन साध्याभोळ्या मुलांना फसवलं होतं. आम्हीही मग आमच्या वेबसाईटवर करीयर्सच्या सेक्शनमध्ये लिहून टाकलं की, कुणीही जर वीणा वर्ल्डमध्ये नोकरी देतो असं अमिष दाखवलं तर त्याला बळी पडू नका, आपल्याकडे रीक्रुटमेंटची पद्धत स्ट्रेट फॉरवर्ड-डायरेक्ट आहे, तिथे कुणीही मध्यस्थी नाही. कृपया त्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
सुधीरच्या मित्राच्या बाबतीतला एक किस्सा कानावर आला. ते वापरत असलेल्या पेमेंट अॅपवरून मेसेज आला की तुमचं अकाऊंट सिक्युरिटीच्या कारणासाठी लॉक केलं आहे, ते रीस्टोअर करण्यासाठी ही प्रोसेस करा, त्यानंतर मेसेज आला, ओके, इट्स रीस्टोअर्ड, जस्ट चेक द ट्रान्झॅक्शन बाय टेन रुपीज् ट्रान्सफर ते झाल्यावर विषय संपला. दुसर्या दिवशी लक्षात आलं की त्यांच्या अकाऊंटमधून दीड लाख रुपये गायब झाले आहेत. वीणा वर्ल्डच्या प्रोडक्ट-कॉन्ट्रॅक्टिंग टीममधली सदा हसतमूख असलेली शिवांगी खुशवाहा गेल्या आठवड्यात थोडी चिंतेत दिसली. काय झालं? विचारल्यावर म्हणाली, माझ्या अकाऊंटमधून कुणीतरी सत्तावीस हजार रुपये लंपास केले आहेत. बँकेत जाऊन आले पण हे ट्रान्झॅक्शन कसं झालंय त्याचा त्यांनाही माग काढता येत नाहीये. आपण सर्वचजण पै-पै करून कष्टाने पैसे जमवतो आणि कुणीतरी भामटे सिस्टिम्स हॅक करून किंवा त्यातील लूपहोलचा फायदा घेऊन असा गंडा घालतात तेव्हा वाईट वाटतं, पटकन तोंडून शब्द येतात, आमचे कष्टाचे पैसे आहेत कुणाला पुरायचे नाहीत. पण जे हे अत्याधुनिक चोर आहेत त्यांना कुठे त्याचं काय पडलंय?
आम्ही आमच्या प्रत्येक जाहिरातीत एक महत्त्वाची टीप देत असतो जी अशी आहे. VEENA WORLD is a brand of VEENA PATIL HOSPITALITY PVT. LTD. You can book at Veena World Sales Offices/Sales Partners/Online(24x7). All payments (Cheque/Card/NEFT/ RTGS/DD) related to tours and services should be in the name of Veena Patil Hospitality Pvt. Ltd. only. No cash transactions at Veena World ह्याचं कारण एवढंच आहे की कुणीही कोणत्याही इतर नावावर चुकूनही पैसे पाठवू नयेत. तसंच वीणा वर्ल्डच्या सुरुवातीपासूनच आम्ही कॅश घेत नाही. एखाद्या पर्यटकाने कितीही मोठा बिझनेस द्यायचं म्हटलं तरी आम्ही नम्रपणे कॅश ट्रान्झॅक्शनला नाही म्हणतो. व्यवसायाच्या भाषेत कुणाला कदाचित हा मुर्खपणा वाटेल किंवा कुणाला आम्ही जरा अतीच करतोय असंही वाटू शकेल पण नितीनियमांचं पालन करूया आणि बघूया आपल्याला बिझनेस करता येतो का हे ठरवलं होतं. उद्योगात प्रवेश करणार्या तरुण पिढीला सांगावसं वाटतं की आपण अशातर्हेने बिझनेस करू शकतो आणि वाढवूही शकतो. आणि जर तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देत असाल तर तुमचे ग्राहकही तुम्हाला साथ देतात. आमचे पर्यटक आमच्या पाठीशी उभे राहिले त्यासाठी त्यांचेही आभार. आमच्या नशीबाने भारत आणि सर्व जग आता कॅशलेस इकॉनॉमीकडेच धाव घेतयं त्यामुळे तसेही त्याबाबतीत आम्ही फायद्यातच राहिलो. योग्य निर्णय घेतला आणि योग्य वेळ चालून आली असं म्हणायला हरकत नाही. पण पण... कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स, बँक ट्रान्सफर्स, एनइएफटी ह्या सर्व अतिशय सोयीच्या गोष्टींचा अभ्यास करून त्यातूनही कसं कुणाला उल्लू बनवता येईल असा अविचार करणारे अल्ट्रामॉडर्न चोर काय करू शकतात त्याचं एक उदाहरण वीणा वर्ल्डच्या साडे सहा वर्षांच्या आयुष्यात आणि माझ्या पर्यटनातील पस्तीस वर्षांच्या कारकिर्दित पहिल्यांदाच निदर्शनास आलं. एक कुटुंब आमच्या एका प्रीफर्ड सेल्स पार्टनरकडे सहलीच्या चौकशीला आलं. त्यांचा ग्रुप होता. त्यांनी सहलीची चौकशी केली आणि ग्रुपसोबत बुकिंग केलं. त्यानंतर दोन दिवसांनी ह्या कुटुंबातील एका व्यक्तीला फोन आला की तुम्ही वीणा वर्ल्डकडे ह्या ह्या टूरची चौकशी केलीय नं. त्यासाठी लागणारे पैसे तुम्ही ह्या ह्या अकाऊंटवर ट्रान्सफर करा. आणि त्यांनी कुठूनतरी आलेल्या ह्या फोनला रीस्पाँड केलं आणि पैसे ट्रान्सफर केले. आता आपल्या लक्षात आलं असेल की आम्ही जाहिरातीत स्पष्टपणे कोणत्या नावावर मनी ट्रान्झॅक्शन करायचं हे का लिहितो. खरंतर जाहिरातीतल्या प्रत्येक इंच इंच जागेला प्रचंड पैसे मोजावे लागतात. ती जागा एखाद्या सहलीच्या प्रमोशनसाठीही वापरता आली असती पण आम्हाला कल्पना आहे की आपल्या पर्यटकाचे पैसे हे कष्टाने कमावलेले आहेत त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. पण एवढं सगळं करूनही जेव्हा असे प्रकार होतात तेव्हा आणखी काय करायचं आपण ह्या विचाराने त्रस्त व्हायला होतं. आता ह्या कुटुंबाने वीणा वर्ल्डची तक्रार पोलिसात केलीय की वीणा वर्ल्डनंच ही इन्फर्मेशन लीक केली असणार म्हणून. त्यासाठी आमचं प्रोजेक्ट आणि कॉम्पलायन्स डीपार्टमंेंट पोलिसांना आमच्याकडे बुकिंग प्रोसेस कशी असते, कशातर्हेने पेमेंट ट्रान्झॅक्शन्स होतात ह्याची माहिती पुरवतेय. पोलिसांचंही तपासाचं काम खरोखरंच जलद गतीने चालतं हे ही आम्हाला ह्या सर्व प्रकारात पहायला मिळालं. ह्या एकूण प्रसंगात आम्हाला बरंच शिकायला मिळणार आहे हे निश्चित. पोलिसांना ह्या केसचा माग काढण्यात यश येेईल ह्यात संदेह नाही कारण आम्ही त्यांना हवी असलेली संपूर्ण माहिती त्वरित पुरवलीय आणि त्यांचीही तपासाची चक्र वेगळे फिरताहेत. आमच्या पर्यटकांचे पैसे परत मिळाले पाहिजेत आणि त्यांची टूर व्यवस्थित पार पडली पाहिजे ह्यासाठी प्रार्थना करणं एवढं सध्या आमच्या हातात आहे.
सर्व पर्यटकांना आणि वाचकांना ह्या संपूर्ण प्रकारात एकच सांगावसं वाटतं की हल्ली रीझर्व्ह बँक, स्टेट बँक, सरकारी, नीम सरकारी, खाजगी संस्था सर्वच जणं त्यांच्या माध्यमातून सावधानतेचे इशारे देतच असतात. पैसे ट्रान्सफर करताना एक्स्ट्रॉ प्रीकॉशन घ्या. बेनिफिशरी म्हणजे आपण कुणाला पैसे पाठवतोय ते खात्री करून घ्या. जनरली सर्वत्रच चेक वा ट्रान्सफर कोणत्या नावाने करायची हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं, आम्ही तर जाहिरातीतच ते लिहितो. कुणाच्याही फोनवर किंवा आलेल्या मेसेजेसवर लागलीच विश्वास ठेवू नका. छाननी करा, खात्री करा, आणि सगळं काही व्यवस्थित असेल तरचं पुढे जा. कुणीतरी आपल्या भोळेपणाचा फायदा घेतला, कुणाकडून तरी आपण फसवले गेलोय ही भावना पैशाच्या नुकसानीपेक्षाही जास्त क्लेशदायक. सो, बी अवेअर, बी केअरफुल! सावधान!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.