‘दे आर ऑलवेज इन अ हरी बट नेव्हर ऑन टाइम!’ हे लेबल आपल्याला चिकटलंय ‘इंडियन टाइम’ सारखं. सच्चा भारतीयाचं रक्त तापतं हे ऐकल्यावर पण जसं नाव कमवायला खूप वर्ष लागतात तसं अशा तर्हेची नको ती प्रतिमा निर्माण व्हायला खूप वर्ष लागली, कलेक्टीव्हली आपण हे आपल्यावर ओढून घेतलंय. आता हा शिक्का जर पुसून काढायचा असेल तर अगदी बिगरीतल्या वयापासून सुरूवात करायला पाहिजे...
गेल्या वर्षी वुमन्स स्पेशल थायलंडच्या मुलींना भेटायला गेले होते. प्रत्येक वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशल सहलीवर एका संध्याकाळी गाला इव्हिनिंगला माझी उपस्थिती ठरलेली असते, मग ती सहल देशाच्या वा जगाच्या कानाकोपर्यात कुठेही असो. प्रवास भरपूर होतो, ऑफिसमध्ये काम करायला वेळ खूपच कमी मिळतो हे तोटे आहेत म्हणायला गेलं तर, पण प्रवास आणि त्याद्वारे होणारं स्थळांचं, माणसांचं, एअरपोर्ट्सचं ऑब्झर्वेशन हा माझ्या व्यवसायाचा भाग असल्याने कनेक्टेड वाटतं, त्याचा उपयोगही होतो, तसंच विमानात-एअरपोर्ट्सवर-हॉटेलमध्ये एकांतात एकचित्त होऊन काम करायला वेळ भरपूर मिळतो. फिरणं अपरिहार्य आहे आणि ती परिस्थिती या दोन वर्षात बदलेल असं वाटत नाही त्यामुळे मी मनःस्थिती बदलली आणि आनंदाने दर आठवड्याच्या प्रवासाचं स्वागत केलं. असो, तर अशा माझ्या प्रवासात थायलंडची गाला इव्हिनिंग संपवून आम्ही गप्पा मारत होतो, फोटोग्राफी सुरू होती. एक मुलगी, वय वर्ष पंचावन्न, हो! वुमन्स स्पेशलचा उत्साहच इतका असतो की तिथे प्रत्येक महिला सात ते सत्तर वयाची ही मुलगीच असते. तर ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, ‘आम्ही खूप धम्माल केली मस्त होती तुमची व्यवस्था पण फक्त एकच करा, एअर इंडियाचं विमान बदला. फारच कंजस्टेड हो, खूपच त्रास झाला’. माझं उत्तर, ‘अहो पण एअर इंडियाचं ड्रीम लायनर आहे ह्या मुंबई-बँकॉक रूटवर, चांगलं एअरक्राफ्ट, उलट मला त्याचा अभिमान आहे’ एअरक्राफ्ट बदललं होतं की काय असा विचार करीत मी आमच्या टूर मॅनेजर दिपिका दांडेकरला विचारलं, तर तिने कन्फर्म केलं की ड्रीम लायनरच होतं. मग म्हटलं कसा त्रास झाला. उलट एअर इंडियात जेवण चांगलं मिळतं ही अजून एक जमेची बाजू. मी त्या मुलीला विचारलं, ‘आत्तापर्यंत तुम्ही कोण-कोणत्या एअरलाइनने देश-विदेशात प्रवास केलाय? आणि तुमच्या आवडीची एअरलाइन कोणती?’ तर म्हणाली, ‘नाही, हा माझा पहिलाच विमानप्रवास आणि देशाबाहेरची ही पहिलीच सहल, पण सगळे म्हणतात एअर इंडिया बद्दल असंच काही बाही’. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. तिला म्हटलं, ‘अगं असं नाही करायचं, सगळे म्हणतात म्हणून अशी नावं नाही ठेवायची. प्रत्येक एअरलाइनमध्ये प्लस-मायनस असतं, मी जगातल्या बर्याच एअरलाइन्सनी प्रवास केलाय म्हणून सांगते. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्याच नॅशनल एअरलाइनला नावं नाही ठेवायची आणि कुणीतरी बोलतंय म्हणून आपण त्याची ‘री’ ओढायची नाही. तुमचा प्रवास उत्कृष्ट अशा ड्रीम लायनरने झालाय, भारतीय पध्दतीचं भोजन मिळालंय, त्या चार तासाच्या प्रवासात आणखी काय अपेक्षा करायची? आता इकॉनॉमी क्लासमध्ये थोडी अडचण होते. टॉयलेट्स कमी असतात. तिथे थोडं अॅडजस्ट व्हावं लागतं पण त्याला इलाज नाही. माझी रीक्वेस्ट आहे ‘एअर इंडिया म्हणजे खराब’ असं कुणी म्हणत असेल तर त्यात आपला सूर न मिसळता त्याला थांबवा तिथे, मुलीचा दोष नव्हता तर जे कुणी तिच्या मनावर त्या तर्हेचं इंम्प्रेशन बिंबवत होते त्यांचा होता. बघानं खरंतर पहिला विमानप्रवास, पहिला परदेश प्रवास किती आनंदात तिने तो केला असता पण कुणीतरी एअरलाइनविषयी काहीतरी तिच्या डोक्यात भरवलं आणि ह्या पहिल्या प्रवासाचा आनंद घेण्याऐवजी ती थोड्याशा खट्टू मनाने त्या पहिल्या-वहिल्या प्रवासाला सुरूवात करती झाली. माझ्या तेहेतीस वर्षांच्या पर्यटन आयुष्यात मी अनुभवलंय... अगदी नऊ सप्टेंबरच्या अमेरिकेच्या अटॅकच्या वेळीसुध्दा, तिथे अमेरिकेत अडकलेल्या पर्यटकांना सुरू झालेल्या पहिल्या फ्लाइटने मुंबईला आणलंय. असाच सपोर्ट ते सतत देत आलेयत अगदी वीणा वर्ल्ड झाल्यावर सुध्दा. आणि हे सर्वच पर्यटनसंस्थांच इम्प्रेशन आहे. दे नेव्हर लेट अस डाऊन! काही ठोकताळे असतात तसा माझा ठोकताळा वेगवेगळ्या एअरलाइन्सच्या बाबतीत तो म्हणजे ज्या एअरलाइनच्या इकॉनॉमी क्लासमध्ये लेगस्पेस कमी ती एअरलाइन पर्यटकांच्या कम्फर्टपेक्षा पैशाचा जास्त विचार करते. कारण दोन रो जास्त वाढतात. एअर इंडियाची लेगस्पेस क्वाइट कम्फर्टेबल. तुम्ही म्हणाल, “आज काय एअर इंडियावर, तसं नाही पण जेव्हा अशा तर्हेने आपण आपल्या देशाला, राष्ट्रीय संपत्तीला नावं ठेवतो तेव्हा कासाविस व्हायला होतं. आपल्या देशाचं जे काही चांगलं वाईट चित्र आहे त्याला आपणही काही प्रमाणात जबाबदार आहोतच नाही का”.
चार महिन्यांपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये असताना तिथे स्थाईक झालेल्या एका भारतीय मुलीशी रेस्टॉरंटमध्ये ओळख झाली. कसं वाटतंय इथे, आवडतंय का? सेटल होणार का? ह्यावर अगदी सेटल होणार की नाही सांगता येत नाही, आपल्या माणसांना मिस करतेय पण कंपनी जोपर्यंत ठेवणार तेवढे दिवस आनंदाने राहाणार...चर्चा सुरू राहिली. ती म्हणाली, ‘इथे पहिल्यांदा आले तेव्हा हॉटेलला राहिलो आम्ही, झोप येत नव्हती, मध्यरात्र झाली होती. उठून खिडकीतून बाहेर बघत बसले. रस्त्यावरून वाहनं जात होती, गाड्या कमी होत्या, माणूस नव्हताच पण गाड्या सिग्नलला थांबत होत्या. कोणी बघत नव्हतं, पोलिस नव्हता तरी सगळे आज्ञाधारकपणे शिस्त पाळत होते. आश्चर्य वाटलं आणि वाईटही. कारण आपण अशी शिस्त पाळलीच नाही. पण मुलांना आता इथे चांगली सवय होतेय. लहानपणापासूनच आपसूक ह्या गोष्टी आणि शिस्त कोणत्याही दबाव वा दबडग्याशिवाय त्यांच्या अगवळणी पडताहेत. आम्हाला त्या इथे आल्यावर शिकाव्या लागल्या’. तिचं अगदी बरोबर होतं आपण शिस्त शिकवायला जातो, ती पाळायला सांगतो आणि त्यामुळेच त्याचा बोजबारा उडतो. शिस्त रिस्पेक्ट डिसिप्लीन ह्या गोष्टी आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटक का नाही बनत? आपण मोठ्यांनी सिग्नलला थांबलं, चुपचापपणे कोणत्याही लाइनमध्ये उभं राहीलं, झेब्रा क्रॉसिंगवरूनच ग्रीन सिग्नल झाल्यावरच रस्ता क्रॉस केला तर आपलं अनुकरण मुलं करतीलच आपसूक. काहीही वेगळं शिकवायची गरज नाही. पण जेव्हा आई मुलाला शाळेत नेताना बाईकवर पाठीशी बसवून सिग्नल तोडते, राँग लेनमधून जाते तेव्हा नॅचरली मुलं काय शिकणार ते ठरलेलं आहे. आता पर्यटनाच्या बाबतीत म्हटलं तर रांगेत उभं राहणं, दाटीवाटी धक्काबुक्की न करता उभं राहणं, पुढच्याचं काम झाल्यावर आपण काउंटरला जाणं ह्या गोष्टी पहिल्या परदेश प्रवासातच कराव्या लागतात. जगात सर्वत्र माणसं शांतपणे सर्व ठिकाणी ‘क्यू’ मध्ये उभी राहिलेली दिसतात. आणि पर्यटनाला सुरूवात करण्यापूर्वी हा रांगेत उभं राहण्याचा पेशन्स आपल्याला अंगी बाणवावा लागेल. जग कुठे पळून जात नाही. थोडं सबूरीने घेऊया. आणिक एक साधी गोष्ट इथे द्यावीशी वाटते, विमान लँड झालं, दारं उघडली की आपण इतक्या घाईघाईत ढकला-ढकली करीत पुढे जायचा प्रयत्न करतो की ते शांतपणे बघणार्याला खूप विचित्र वाटतं. खरी पध्दत आहे, आपल्या आधीच्या सर्व सीट्सवरच्या पर्यटकांना बाहेर निघू द्यायचं आणि त्यांच्यापाठी आपण. फक्त पाच-दहा मिनिटांचा मामला असतो. स्थलदर्शनाच्या बाबतीत ग्रुप टूरमध्ये सर्वजण वेळेवर येतात आणि एकच कुणीतरी स्वतःच्या वेळेप्रमाणे येतो आणि मग कोच कॅप्टन शेरा मारतो. ‘ओ आय नो, इंडियन टाइम!’ सो वुई आर ऑलवेज इन अ हरी बट नेव्हर ऑन टाइम! हे दुषण पुसून काढायला आपल्याला सर्वांनाच कष्ट घ्यायला हवेत. प्रत्येक कुटुंबाने ठरवलं तर अवघड काहीच नाही. लेट्स लिव अ पर्पजफुल लाइफ!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.