हल्ली आपल्या प्रत्येकाच्या घरातला संवाद हा तसा बर्यापैकी कमी झालाय. मुलं आमच्याशी काही बोलतच नाहीत ही आपल्या अनेक घरांची तक्रार आहे. आमच्या घराला तर आम्ही सायलेन्स झोन नाव ठेवलंय. सर्वत्र शांतता. पण घरात अशी शांतता नांदणारच असेल तर ती वादळापूर्वीची शांतता नको, अशांत शांतता नको, गैरसमजूतीची शांतता नको, अन्यायी शांतता नको, ह्यासाठी...
हॅप्पी न्यू इयर! हे वर्ष सर्वांना आरोग्यदायी जावो! सर सलामत तो पगडी पचास! बाकी सुख-शांती- समाधान-ऐश्वर्य-संपत्ती हे सर्व आपल्याला ज्याचं त्याला निर्माण करायचंय, टिकवायचंय, वाढवायचंय त्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. नवीन वर्षाचा सूर्योदय आपण पाहू शकलो त्यासाठी मात्र जगन्नियंत्याचे आभार मानूया, आणि कामाला लागूया. नव्या कोर्या वर्षाने आपल्याला नवे कोरे तीनशे पासष्ट दिवस दिले आहेत, नव्हे लीप इयर आहे तेव्हा आणखी एक दिवस त्याने दानात आपल्या झोळीत टाकला आहे, म्हणजे तीनशे सहासष्ट दिवस आपल्याला मिळालेयत त्याचं सोनं करूया. त्यातल्या पहिल्या आठवड्याचे पाच दिवस संपले सुद्धा. अनेकांची नवीन वर्षाची अनेक रीझॉल्युशन्स आत्तापर्यंत बासनात गुंडाळली गेली असतील. नेव्हर माईंड! आपण माणूस असल्याचा तो दाखला आहे, नाहीतर आपलं मशीनच व्हायचं आणि तसंही जगभर हे पहिले पाच सहा दिवस अनवाईंड-रीवाईंडसाठीच असतात.
अनेक वर्षांच्या अनेक रीझॉल्युशन्सची अनेकदा अगदी पहिल्या आठवड्यातच वाट लागल्यावर रीझॉल्युशन्स करायचीच नाहीत हा रीव्हॉल्युशनरी निर्णय मी एका वर्षी घेतला होता पण तरीही ह्या तीस डिसेंबरला उद्या काय करायचं बरं ह्या विचाराने डोकं वर काढलं आणि मी ठरवलं, उद्या एकतीस डिसेंबर, रात्री लवकर म्हणजे दहाच्या आत झोपायचं, एक जानेवारीला सकाळी साडेचार वा लेटेस्ट म्हणजे पाच वाजता उठायचं, खुल्या हवेत जॉगर्स पार्कला तासभर चालून यायचं, स्विमिंगला सुट्टी. आफिस बंद असल्याने रविवारच्या वर्तमानपत्रातली दोन तरी ऑर्टिकल्स आजच म्हणजे नव्या वर्षाच्या नवीन दिवशी लिहायची, त्यात चालढकल करायची नाही. हे ठरवून 31 डिसेंबरला ऑफिसमधून लवकर घरी आलो. नील आणि राज त्यांच्या मित्राकडे गेले न्यू इयर सेलिब्रेशनसाठी. सुधीर कोणत्यातरी चॅनलवर वर्षभराचा आढावा बघत बसला आणि मी अधूनमधून बघत असलेली मार्व्हलस मिसेस मेझल सिरीयल बघायला बसले. ज्यावेळी रीमोट हातात घेतला त्याचवेळी ह्या एक दिवसीय रीझॉल्युशनची वाट लागणार आहे हे माझ्या लक्षात यायला हवं होतं. रात्री आठ ते साडेबारा त्या नेट सिरीजने माझ्यावर अंमल चढवला आणि त्या नशेत माझं टाईमटेबल कोलमडलं. झोपायला एक वाजला त्यामुळे उठायला सकाळी आठ. गेल्या वर्षी महत्प्रयासाने किमान सहा तास आणि कमाल सात तास झोपेची सवय लावून घेतलीय. म्हणजे गेल्या वर्षात झोपेचं टाईमटेबल सुरळीत झालंय पण जागेपणी काय करतेय त्याचा ताळमेळ अजून जमायचाच आहे. उठले उशिरा त्यामुळे जॉगर्स पार्क-मॉर्निंग वॉकचे बारा वाजले. 2020 ह्या नवीन दशकाच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि त्या शुभ दिवशी आपण स्वत:च स्वत:ला दिलेलं वचन पाळू शकत नाही? मला स्वत:चाच राग आला, पण राग येऊन त्या मन:स्थितीत आणखी वेळ आणि शक्ती वाया घालविण्यात अर्थ नव्हता. माझ्यातला शहाणपणा जागा झाला आणि त्याने बजावलं, जे झालं ते झालं, जे गेलं ते गेलं, आज वर्तमानपत्राची दोन आर्टिकल्स लिहून टाक. मॉर्निंग वॉक झाला नाही, नो प्रॉब्लेम, स्विमिंग कर नाहीतर जीममध्ये जा. एक्सरसाईज मस्ट. आणि चक्क मी त्या रागावलेल्या मनस्थितीतून बाहेर आले. एक्सरसाईज झाला, दोन्ही आर्टिकल्सही लिहून झाली. म्हणजे आपण मनाने ठरवलं तर चमत्कार वाटावा अशातर्हेने आपण काम पूर्ण करू शकतोे. एवढं सगळं करूनही वेळ उरला तेव्हा त्याच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दुपारी आमच्या नेक्स्ट जेन-यंग जनरेशन कझिन्स सोबत पुढील वर्षात प्रत्येकाने काय करायचं ठरवलंय ह्याची चर्चा केली. वर्षाच्या सुरुवातीला आपण नेमकं काय काय करणार आहोत हे प्रत्येकाने स्वत:शीच ठरवलं, ते सर्वांसमोर मांडलं तर आपण स्वत:विषयी आणि दुसर्यांनी आपल्याविषयी काय अपेक्षा ठेवायच्या हे क्लीअर होईल आणि बरेचसे गोंधळ टळू शकतील. मला वाटलं-तुला वाटलं- आम्हाला वाटलं चे वेळखाऊ आणि तापदायक प्रकार कमी होतील हा उद्देश. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता आणि सुस्पष्टता आणायची, गैरसमजांची मालिका सुरूच व्हायला द्यायची नाही. अर्थात पुढच्या पिढीच्या माथी ह्या गोष्टी मारणं म्हणजे थोडं चॅलेंजच म्हणायचं. आम्ही ओल्ड स्कूल वाले नाही का. आणि त्यांनाही दोष का द्यायचा? आम्ही त्यांच्याएवढे होतो तेव्हा आमच्या आईवडिलांनाही आम्ही तुम्हाला काही समजत नाही ह्याच कॅटॅगरीत टाकलं होतं की. कल, आज और कल चा सिलसिला सुरूच राहणार, पण तरीही काही चांगल्या जुन्या गोष्टी-सवयी पुढच्या पिढीत ढकलता आल्या तर फायदाच आहे अशा विचाराने प्रयत्न सोडायचा नाही. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण सर्वांसमोर स्वत:चे ठरविलेले प्लॅन्स सांगतो तेव्हा ते पूर्णत्वाला नेण्याचं बंधन आपोआप आपण आपल्यावर घालतो. एकंदरीत ही छोटीशी मीटिंग चांगली झाली. नेक्स्ट जनरेशन कझिन्सनी भेटायची संकल्पना सुधीरची. अर्थात त्याला साथ होती आम्ही गेली सहा वर्ष सातत्याने करीत असलेल्या एका उपक्रमाची. हे त्याचंच एक्सटेंशन.
वीणा वर्ल्ड झाल्यापासून गेली सहा वर्ष आम्ही म्हणजे मी, सुधीर, नील, राज, सुनिला, सारा असे सहाजण एकतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता भेटतो. तीन तास संवाद साधतो. गेल्या वर्षी आपण काय ठरवलं होतं, त्यातलं किती आणि काय साध्य झालं ह्याचा आढावा घेतो. काय बरोबर, काय चूक, काय करायला हवं होतं, काय नको ह्यावर खुलेआम चर्चा करतो. कुठे काही कुणाच्या मनात जर खदखदत असेल तर त्यावरही डिस्कशन करतो. एज्युकेशनल, पर्सनल, प्रोफेशनल गोल्सवर विचार विनिमय करतो. समाजातलं, राजकारणातलं देशविदेशातलं एखादं उदाहरण आपल्याला मार्गदर्शक ठरत असेल किंवा काय नाही करायला पाहिजे ह्याचा धडा देत असेल तर तेही संवादाचा भाग बनवतो. थोडी रागवारागवी, थोडं इमोशनल होणं, कधी डोळ्यात आसवं येणं तर कधी ढसाढसा रडण्याचेही प्रकार ह्या सहा वर्षांत घडलेत पण जेव्हा ही शॉर्ट अॅन्ड स्वीट मीटिंग संपते तेव्हा सर्व मळभ दूर झालेलं असतं. येत्या वर्षात परिस्थितीने साथ दिली तर आपण काय काय करणार आहोत ह्याची कल्पना एकमेंकाना स्पष्टपणे आलेली असते. त्यानंतर एखाद्या छानशा रेस्टॉरंटमध्ये जाऊन भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेऊन न्यू इयर इव्ह सुरू व्हायच्या आधीच आमचं न्यू इयर सेलिब्रेशन करतो आणि सुदृढ निकोप मनाने नव्या वर्षाची वाट बघतो. आणखी एक गोष्ट आम्ही त्यात करतो ती म्हणजे त्याचवेळी आम्ही आमचे येत्या नवीन वर्षातले दोन हॉलिडेज ठरवतो, एक मोठा आणि एक छोटा. समथिंग टू लूक फॉरवर्ड टू पाहिजेच नाही का! त्यामुळे ह्या मीटिंगकडे आणि पुढच्या वर्षाकडेही आनंदाने बघता येतं.
हल्ली आपल्या प्रत्येकाच्या घरातला संवाद हा तसा बर्यापैकी कमी झालाय. मुलं आमच्याशी काही बोलतच नाहीत ही आपल्या अनेक घरांची तक्रार आहे. आमच्या घराला तर आम्ही सायलेन्स झोन नाव ठेवलंय. सर्वत्र शांतता. जो तो आपापल्या विश्वात. पण तरीही मुलं आपल्यासोबत आपल्या देशात आहेत, घरात एकत्र राहताहेत, दिवसभरात एकदातरी दृष्टीला पडताहेत हे ही भाग्यच नाही का! अर्थात आरडाओरड, आदळआपट ह्यापेक्षा शांतता बरी. पण घरात अशी शांतता नांदणारच असेल तर ती वादळापूर्वीची शांतता नको, अशांत शांतता नको, गैरसमजूतीची शांतता नको, अन्यायी शांतता नको, ह्यासाठी मला ही वर्षाच्या अखेरीस पुढील वर्षासाठी होणारी, सर्व गोष्टी स्पष्ट करणारी, गोधळाचं- गैरसमजूतीचं उच्चाटन करणारी मीटिंग महत्त्वाची वाटते. ह्या मीटिंगनंतर वर्षभराच्या धकाधकीत जो तो आपापल्या विश्वात दंग असला, एकमेंकामध्ये फारसा संवाद नसला तरी त्यात काही वावगं वाटत नाही. एकमेकांना एकमेकांविषयी माहीत असतं. देअर आर नो सरप्राईजेस.
येणार्या जगाची आव्हानं मोठी आहेत. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइस्टाइनने म्हटलंय, I fear the day that technology will surpass our human interaction. The world will have a generation of idiots. मोबाईलवरच्या विशेस, इमोजीस, RIP, Take Care ह्या गोष्टींनी सुरुवात झालेली दिसतेच आहे, त्यातून प्रत्येकाने किमान स्वत:च्या कुटुंबातला संवाद जिवंत ठेवला, शब्दावाचून कळले सारे ह्याप्रमाणे प्रत्येक नात्यात पारदर्शकता ठेवली तर आपल्या घरात आपण स्वर्ग निर्माण करू शकतो, घर सर्वार्थाने सशक्त आणि सुदृढ बनवू शकतो. लेट्स चेक अवर होम अॅन्ड पूट द थिंग्ज इन ऑर्डर!
वन्स अगेन, हॅप्पी न्यू इयर! काळजी घ्या पण काळजी करू नका! हॅव अ वंडरफुल संडे!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.