‘तुमचे किती देश बघून झाले?’ जरा का पर्यटनाचा धागा मिळाला की हा प्रश्न हल्ली प्रत्येकजण दुसर्याला विचारतोय. आमच्या टूर मॅनेजर्समध्ये जवळजवळ पंचवीस टूर मॅनजेर्स असे आहेत की ज्यांचे पन्नास देश बघून झालेयत. टूर मॅनेजर्सच्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट आहे कारण जेवढा त्यांचा अनुभव दांडगा तेवढा पर्यटकांना त्याचा जास्त फायदा...
‘वर्षातून किती वेळा हॉलिडे घ्यावा?’हा प्रश्न आत्ताच थायलंडच्या वुमन्स स्पेशल टूरवर एका मुलीने विचारला. तसं बघितलं तर साधा प्रश्न. हिचा पहिलाच प्रवास असल्याने, बाकीच्यांच्या तुलनेत थोडं मागे पडल्यासारखं वाटल्याने स्वत:च्याही प्रवासाचं आता थोडं प्लॅनिंग करावं वाटून तिने मी समोर आल्यावर पटकन हा प्रश्न केला. पण ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर माझ्याजवळ तरी कुठे आहे? ‘हॉलिडे’ ही मानसिकता आहे. हॉलिडे म्हणजे फक्त ‘चलो, बॅग भरो, निकल पडो’ नव्हे तर दररोजच्या आपल्या कामांमधून, विचारांमधून, कटकटींमधून थोडंसं बाजूला येऊन काही वेळासाठी वेगळं काही करणं आणि स्वत:च स्वत:ला रीज्युविनेट करणं म्हणजे हॉलिडे. चहुबाजूने स्पर्धेने ग्रासलेल्या युगात प्रत्येकाने हे टॉनिक घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल, ‘आम्ही जर रोज असा हॉलिडे घेत बसलो, स्वत:ला रीफ्रेश करीत बसलो तर मग वीणा वर्ल्डचं काय होणार? हे स्वत:च्याच पायावर कुर्हाड मारण्यासारखं नाही का?’ प्रथमदर्शनी तुम्हाला तसं वाटेल पण पर्यटन व्यावसायिक असण्यासोबतच मी एक मार्केटिंग पर्सन आहे हे विसरू नका. तुम्हाला दररोज असा छोटा ‘सेल्फ रीज्युविनेटींग हॉलिडे’ घ्यायला सांगण्यात माझी मोठ्ठी स्ट्रॅटेजी आहे.
प्रत्येकाने वर्षातून किमान दोन वा तीन वेळा प्रवास केला तर आमचा व्यवसाय वाढू शकतो, हे मला पक्कं माहीतीय, आणि असं जर असेल तर तुम्ही पर्यटनाला कधी निघू शकणार ही बेसिक गोष्ट विचारात घ्यायला नको का? पर्यटनासाठी शरीर, मन आणि खिसा ह्या तीन गोष्टी तंदुरूस्त असणं महत्वाचं आहे. प्रफुल्लित मन आरोग्यवर्धक असल्याने शरीर तंदुरूस्त बनतं आणि तंदुरूस्त पीडाहीन शरीर ह्या भूतलावरच्या प्रत्येकाचं उत्पन्न वाढवू शकतं हे सूर्यप्रकाशाइतकं लख्ख आहे. मनाने कमकुवत आणि शरीराने आजारी ह्या दोन्ही गोष्टींपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला कंट्रोलमध्ये ठेवणं महत्वाचं आहे. स्वत:च स्वत:ला रीज्युविनेट करणं, दिवसभराच्या दबडग्यातून मधून मधून छोटा हॉलिडे घेणं, प्रसन्न विचार करून मनाला प्रफुल्लित करणं आणि त्याद्वारे शरीराला ताजंतवानं करणं, स्वत:मध्ये चैतन्य निर्माण करणं आणि त्याद्वारे कामं संपवण्याचा, कामं चांगली करण्याचा झपाटा वाढवणं हे करियरलाही आणखी उंचावर नेऊन ठेवणारं नाही का? असं जर करीत राहिलो तर काय बिशाद आहे मिळकत न वाढण्याची? वुई ऑल हॅव टू जस्ट कंट्रोल अॅन्ड चॅनलाइज अवरसेल्व्हज. आता लक्षात आलं तुमच्या की दिवसभरातला असा छोटा हॉलिडे वीणा वर्ल्डसाठी किती महत्वाचा आहे ते?
एकदा का दिवसभरातल्या अशा छोट्या हॉलिडेची सवय लागली की मग त्यामध्ये चेंज हा लागणारच, त्यासाठी वीणा वर्ल्ड आहेच की तुमच्यासाठी अगदी छोट्यातल्या छोट्या एक दिवसाच्या किंवा मोठ्यातल्या मोठ्या महिनाभराच्या हॉलिडेसाठी. एक दिवसाच्या पिकनिक पासून अगदी एक महिन्याच्या सहलीपर्यंत देशविदेशात पर्यटनाचं पेव फुटलंय हे निश्चित. सहल म्हटली की किमान ती आठवडाभराची असावी, परदेशी जायचं तर किमान पंधरा दिवसांसाठी जावं हे काही अलिखित नियम हल्ली धाब्यावर बसताना दिसताहेत. आजकाल पर्यटकमंडळी पंधरा दिवसांची भारतातली सहल करताना जेवढे उत्साही असतात तेवढाच उत्साह चार दिवसांच्या परदेश सहलीत जाण्यातही असतो. अर्थातच ह्याला कारण मल्टिनॅशनल्सच्या जागतिक स्पर्धेत आकसून गेलेल्या सुट्ट्या. नेव्हर माईंड, काळाची गरज ओळखून आम्ही अगदी चार दिवसांच्या परदेश सहलींचंही आयोजन सुरू केलंय.
‘ट्रेन्डस्’ हा आमच्या अभ्यासातला नेहमीचा भाग. आत्तापर्यंत आपल्या देशात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्ताने येणारे दोन वीकेंड्स फार प्रसिद्ध होते. गणपती विसर्जनानंतर किंवा भाऊबीजेनंतर सहलींना निघायचं हा बाय अॅन्ड लार्ज फंडा पण काही वर्षांपासून ‘आम्हाला गणपतीमध्ये बाहेर जायचंय’, ‘ऐन दिवाळीत चार दिवसांचीच सुट्टी आहे तेव्हा कुठेतरी जायचं म्हणतोय’ हा बदल घडायला लागलाय. अॅक्च्युअली गणपतीमध्ये आम्हीसुद्धा हक्काची सुट्टी घ्यायचो. लाँग वीकेंड असला तर तीन दिवस ‘दुकान बंद’ अशी मस्त चैन करायचो. पण आता नाही. आता ऐन गणपती आणि दिवाळी ह्यामध्ये छोट्या सहलींची, वीकेंड स्पेशलची डिमांड वाढायला लागलीय. डिमांड असेल तर सप्लाय करायलाच हवा नाही का?
प्रवाशांनी ओसंडून वाहणारे एअरपोर्टस्, इमिग्रेशनच्या भल्या मोठ्या रांगा, हॉटेल्सचे ‘सोल्डआऊट’ बोर्डस्, पर्यटनस्थळांची गर्दी हे सगळं कसलं द्योतक आहे तर पर्यटकांच्या पर्यटनाच्या वाढणार्या आवडीचं. हे वाढतं पर्यटन तर आमच्या व्यवसायाचा स्त्रोत आहे. आणि जसे ट्रेन्डस् बदलताहेत तसं आम्ही आमच्यात बदल करतोय. त्यामुळेच येत्या प्रत्येक लाँग वीकेंडला आम्ही भरपूर सहलींचा खजिना पर्यटकांसमोर खुला केलाय ज्यामध्ये लेह लडाख, अमृतसर वाघा बॉर्डरपासून केरळ, हैदराबाद, पाँडिचेरी, अंदमानपर्यंतच्या नॉर्थ टू साउथ तर नॉर्थ ईस्ट भूतानपासून उदयपूर, कुंभलगढ राजस्थानपर्यंतच्या ईस्ट टू वेस्ट अशा एकसेएक सहलींचा समावेश आहे. ज्यांना परदेशवारी करायचीय त्यांच्यासाठी सिंगापूर, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, श्रीलंका, मॉरिशस, फुकेत क्राबी, चायना, दुबई ह्या कंबाइन्ड किंवा सिंगल सिंगल सहली आहेत. ह्या ठिकाणी व्हिसा व्हायला जास्त वेळ लागत नाही किंवा काही देशांना ऑन अरायव्हल व्हिसा असल्याने पासपोर्ट असेल तर ‘चलो, बॅग भरो, निकल पडो!’
सहलींवर पर्यटकांना भेटायची जेव्हा संधी मिळते तेव्हा तेथील संवादात कुणाचे किती देश बघून झालेत? हा विषय निघतोच. मग ज्याचे जास्त देश बघून झालेयत त्याची कॉलर टाइट असते. वीकेंड स्पेशलमध्ये आम्ही छोटे छोटे देश घेतलेयत जे अशा छोट्या सुट्ट्यांमध्ये कव्हर करता येतील आणि आपल्या पाहिलेल्या देशांची संख्या वाढवता येईल. वीणा वर्ल्डने एक जगाचा नकाशा तयार केलाय जो आपण आपल्या घरी लावून ठेवू शकता आणि जशी तुमच्या देशांची भ्रमंती पुढे जाईल तशी तुम्ही एकेका देशावर टिकमार्किंग करू शकता.
‘समथिंग टू लूक फॉरवर्ड टू’ अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात असतात किंवा आपण त्या निर्माण करीत असतो, त्यातलीच एक गोष्ट म्हणजे पर्यटन. पर्यटनाला निघण्यापूर्वीची उत्सुकता आणि तयारी तसंच परत आल्यानंतरच्या छान आठवणी ही आता गरजेची गोष्ट झालीय. अर्थात वर्षातून किती सहली कराव्या हे प्रत्येकाने ठरवायचं आहे, त्याला अमूक एक नेमकं उत्तर नाही. पण त्याचं प्लॅनिंग करणं खूप जरूरीचं झालंय एवढं मात्र खरं!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.