जसं एखाद्या व्यक्तीला दोन-तीन वेळा भेटल्यानंतरच त्याच्या स्वभावाची ओऴख आपल्याला होते, तसंच एखाद्या डेस्टिनेशनचं खरं रुप हे परत भेट दिल्यानंतरच अधिक प्रखरपणे उलगडते. म्हणजेच ,जर आपण एखाद्या डेस्टिनेशला केवळ एक-दोन दिवस राहिलो तर तिथल्या मुख्य स्थलदर्शनांना भेट तर देऊन येऊ, पण त्या देशाची खरीखुरी ओळख कदाचित होणार नाही. त्यात एखाद्या देशातील एकाच शहराला भेट देऊन संपूर्ण देशाबद्दल तेच मत बनवणं योग्यही ठरणार नाही.
ऑस्ट्रेलियात चार वर्ष राहिलो होतो त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला भेट नको द्यायला आमच्या एका मित्राचे हे शब्द ऐकून मला खूप गम्मत वाटली. मग मात्र त्याच्यावर माझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. तिथली गुलाबी पाण्याची पिंक लेक आणि समुद्रात उठणार्या लाटांच्या आकाराचा वेव्ह रॉक हा डोंंगर पाहिलायस का? टासमेनियाच्या होबार्ट शहरातल्या सालामानका फूड मार्केटमध्ये फूड टेस्टिंग केलंयस? माऊंट बुलरच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांवर स्किईंगचा अनुभव घेत तिथल्या ह्स्की डॉग्स्बरोबर डॉग स्लेडिंगचा अनुभव घेतलायस की नाही? माझ्या ह्या प्रश्नांना कंटाळून, मी हरलो, तू जिंकलीस. नक्कीच ऑस्ट्रेलियाला एकदा काय परत-परत भेट देऊ शकतो मी हे म्हणत माझ्या मित्राने हार स्विकारली आणि मी मात्र माझ्या झालेल्या विजयाने आनंदून गेले. मी म्हटलं, अरे अजून तर मी उलुरु किंवा एयर्स रॉक आणि त्या जवळचे फील्ड ऑफ लाइट,जवळ-जवळ ३०००कि.मी पार करणार्या द घाना या ऑस्ट्रेलियन ट्रेनची जर्नी, क्वीन्सलॅँड मधील हृदयच्या आकाराचे रोमँटिक हार्ट रीफ, किंवा साऊथ ऑस्ट्रेलियाच्या कांगारू आयलंडबद्दल तर विषयच काढला नाही. तू एवढ्यातच हार मानलीस. आपल्या जीवाभावाच्या मित्र-मैत्रिणींंना चिडवण्यात एक वेगळीच मजा येते कारण आपल्याला खात्री असते की कुणीच वाईट वाटून घेणार नाही. पण आमच्या या खेळकर बाचाबाचीतनं एक विचार सुचला की, खरंच बरेचदा आपण एखाद्या ठिकाणी भेट दिल्यावर तिथे परत जाण्याचा विचार करीत नाही किंवा कंटाळा करतो आणि टाळतो. पण जर विचार केला तर, आपण भारतवासी असलो तरी आपल्यालाही संपूर्ण भारत देश ह्या एका आयुष्यात पूर्णपणे पाहणं शक्य आहे का? त्यामुळेच मला असे वाटते की एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यावर आपल्या बकेट लिस्टमध्ये त्याच्यावर टिक- मार्क करून तिथेच त्या ठिकाणाला पूर्णविराम देऊ नये.
एखाद्या डेस्टिनेशनला पहिली भेट देणे हे पहिल्या रोमँटिक डेटवर जाण्यासारखेच असते नाही का? पहिल्या भेटीत आपल्याला त्या ठिकाणाचे नाव-गाव व रंगरूप ह्याची ओळख होते. जसे एखाद्या व्यक्तीला दोन-तीन वेळा भेटल्यानंतरच त्याच्या स्वभावाची ओळख आपल्याला होते, तसेच एखाद्या डेस्टिनेशनचं खरं रुप हे परत भेट दिल्यानंतरच अधिक प्रखरपणे उलगडते. आपल्याला एखादे ठिकाण आवडले की नाही हे आपण तिथल्या स्थलदर्शनावरून, जेवणाच्या स्वादावरून, आपण तिथे प्रवास करीत असताना तिथल्या हवामानावरून आणि आपल्या संपर्कात आलेल्या लोकांवरून ठरवतो. माझ्या मते खरंतर तिथल्या लोकांकडून मिळालेल्या वागणुकीवरून त्या देशाची छबी ठरते. उदाः-न्यूझीलंड व अमेरिकेमध्ये सगळेच फार फ्रेन्डली वागतात. बाली व थायलंडमध्ये अगत्यशीलपणा दिसतो. केनिया, टांझानिया व आफ्रिकेतील सर्व्हिस इतर कुठेही दिसत नाही आणि भारतासारखे आपले लाड तर जगात कुठेच होत नाहीत. मग आपण त्या ठिकाणी केवळ एक-दोन दिवस राहिलो तर तिथल्या मुख्य स्थलदर्शनांना भेट तर देऊन येऊ, पण त्या देशाची खरीखुरी ओळख कदाचित होणार नाही. त्यात एखाद्या देशातील एकाच शहराला भेट देऊन संपूर्ण देशाबद्दल तेच मत बनवणं योग्यही ठरणार नाही. म्हणूनच मला वाटते की परत-परत भेट दिल्याने आपला हॉलिडे अधिक चांगला घडतो. मुख्य आकर्षणे पहिल्या भेटीत पाहिल्यानंतर स्थलदर्शन पूर्ण करण्याची घाई नसते आणि त्या ठिकाणच्या खर्या लोकल एक्सपीरियन्सेसचा आपण अनुभव घेऊ शकतो. त्यात बर्याच वेळा कुटुंबातल्या आई-वडिलांनी कामाच्या निमित्ताने त्या ठिकाणाला भेट दिलेली असते. अशावेळी तर हमखास मुलांना तिथेच घेऊन जा. एक तर त्या जागेची थोडीशी ओळख झाल्यामुळे आपण मुलांच्या आवडीच्या गोष्टींवर लक्ष केंंद्रीत करू शकतो आणि मुलांना खूश केले की आपला हॉलिडे यशस्वी झालाच म्हणून समजा.
दुसर्यांदा हॉलिडेसाठी निवड होणार्या डेस्टिनेशन्समध्ये स्वित्झर्लंडचे नाव वारंवार येते. तिथले इन्फ्रास्ट्रक्चर, स्थलदर्शन, निसर्गसौंदर्य व लोकल लोकांचे आदरातिथ्य हे सर्व पर्यटनासाठी एक उत्तम गोल्डन कॉम्बिनेशन ठरते. जणू काही देवाने स्वित्झर्लंड देशाला पर्यटनासाठीच बनविले आणि तिथले निसर्गसौंदर्य जपत आधुनिकता स्विकारणार्या लोकांच्या ताब्यात दिले असे वाटते. स्वित्झर्लंडला पहिल्या भेटीत ल्युसर्न व इंटरलाकेन ह्या शहरांना भेट देणे तर ओघाने ठरलेलेच असते. तिथून एंजलबर्गचे माऊंट टिटलिस व इंटरलाकेनजवळ युंगफ्राउ या दोन माऊंटन रीसॉर्टवर मनसोक्त बर्फात खेळून झाले की मग आपण स्वित्झर्लंड मधल्या इतर आकर्षणांकडे आपला मोर्चा वळवू शकतो. स्वित्झलर्ंंडच्या मागच्या ट्रिपवर मला लॉयकरबादला भेट देण्याची संधी मिळाली. स्वित्झर्लंडच्या वॅले या कॅनटनमधल्या लॉइक या भागात लॉयकरबाद हे थर्मल वेलनेससाठी प्रसिद्ध रीसॉर्ट. संपूर्ण वॅले हा भागच नैसगिर्र्क जिओथर्मल गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रसिद्ध आहे. आणि इथे अनेक थर्मल वेलनेस रीसॉर्ट बांधलेले आहेत. त्यातलेच एक पिक्चर पोस्टकार्ड परफेक्ट गाव म्हणजे लॉयकरबाद. सभोवती बर्फाचे डोंगर, हिरव्यागार टेकड्या, आणि गवतात नाचणारी वाइल्ड फ्लावर्स इथे कुठेही फिरताना नजरेस सुखावतात. इथे छोट्या-मोठ्या हाईक्सवर जाऊन प्रदूषणविरहीत ताज्या हवेचे लांब श्वास घेऊन आनंदी झालेल्या, पण फिरून थोडंसं दमलेल्या शरीराला इथल्या हॉट वॉटर बाथ्स्मध्ये विश्रांती मात्र मस्त मिळाली. अतिशय चांगल्या चेंंजिंग फॅसिलिटीस्नी सुसज्ज मोठा स्विमिंग पूल होता. त्यातले पाणी नैसर्गिकरित्याच गरम होते. पण योग्य तापमान ठेवण्यासाठी टेम्प्रेचर कंट्रोल केले होते. थंडगार वार्याची झुळूक अनुभवत त्या गरम पाण्यात डुंबून सभोवती बर्फाचे डोंगर पाहताना जणू मला स्वर्गच मिळाल्यासारखं वाटत होतं. स्वित्झर्लंडची खासियत म्हणजे चीज, चॉकलेट्स आणि ट्रेन. मग जर दुसर्यांदा स्वित्झर्लंडला निघाला असाल तर या अस्सल स्विस गोष्टींचा आस्वाद घ्या. केयर, मायस्ट्रानी सारख्या चॉकलेट फॅक्टरीजमध्ये चॉकलेट तयार होताना आपण बघू शकतो आणि स्वित्झर्लंडमध्ये स्वतः चॉकलेट बनवायलासुद्दा शिकू शकतो. पश्चिम स्वित्झर्लंडला भेट देत असाल तर ग्रुयर चीज फॅक्टरीला नक्कीच भेट द्या. तसेच स्वित्झर्लंडमध्ये अनेक सीनिक ट्रेन्स आहेत, त्यातून एकदातरी प्रवास केलाच पाहिजे, तरंच स्वित्झर्लंडची खरी ओळख झाली असे म्हणता येईल.
पॅरिसच्या पहिल्या भेटीत आपण आयफेल टॉवर आणि कॅब्रे शो पाहिला असेलच, पण जर का पुन्हा पॅरिसला जायचा योग आला तर तिथल्या 2CV म्हणजेच चिट्रोएन या छोट्याशा गाडीत बसून, गाडीचं छप्पर उघडून पॅरिसची अनोखी सिटी टूर करा. किंवा पॅरिसच्या अनेक म्युझियम्सपैकी काही म्युझियम्सना भेट देऊन पहा. क्लोद मोने, रेन्वा, सीझान, गोग्यँं सारख्या प्रसिद्ध आर्टिस्टचे इम्प्रेशनिस्ट व पोस्ट इम्प्रेशनिस्ट पेंंटिंग्स् पाहण्यासाठी म्युसी दी-ऑरसेसारख्या म्युझियम्सना भेट द्या किंवा मोने या इम्प्रेशननिझमच्या सर्वात लाडक्या आर्टिस्टचे घर बघायला जिवर्नीला डे ट्रिप करून या. पॅरिस शहराचे एक गुपित जमिनीखाली दडलेले आहे, ते इथल्या कॅटाकॉम्ब्समध्ये. पॅरिसचे कॅटाकॉम्ब्स हे पॅरिसमधील प्राचीन दगडी खाणी आहेत, ज्यात सहा दशलक्षाहून अधिक लोकांचे अवशेष ठेवलेले दिसतात. पॅरिसच्या वाढत्या दफनभूमींंचा भार उचलण्यासाठी हे कॅटाकॉम्ब्स बनविले गेले व नंतर काळाच्या ओघात लोकं यांना विसरून गेले. १९व्या शतकाच्या सुरुवातीला याचा शोध लागला आणि काही प्रायव्हेट कॉन्सर्टस्साठी हे एक आगळे-वेगळे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आणि मग टूरिझमसाठी खुले केले गेले. जमिनीखालच्या आकर्षणांबरोबरच पॅरिसच्या अनेक प्रसिद्ध गल्लीबोळांमध्ये दिवस दिवस फिरलो तरी वेळ कसा जातो हे कळतच नाही. अनेक बुकशॉप्स, कॅफेस्, रेस्टॉरंट्स, आर्ट गॅलरीज्नी सजलेल्या छोट्या रस्त्यांवर घड्याळाकडे लक्ष न देता मनसोक्त फिरून बघा. यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे पॅरिसचे लॅटिन क्वार्टर. पॅरिसजवळच्या शँँपेन भागाला भेट देऊन शँपेन ही नक्की कशी आणि कुठे बनवली जाते हे जाणून घ्या.
निसर्गप्रेमी आणि अॅडव्हेंचरची आवड असलेल्या मंडळींंसाठी सर्वात उत्तम ठिकाण म्हणजे न्यूझीलंड. न्यूझीलंडचे नॉर्थ व साऊथ आयलंड दोन्ही फार सुंदर आहेत. उत्तरेकडे जीओथर्मल अॅक्टिव्हिटीचे अॅट्रॅक्शन व इथल्या माओरी लोकांचे कल्चर बघायला मिळते तर दक्षिणेकडे बर्फाचे ग्लेशियर्स,लेक्स आणि रीसॉर्ट टाऊन्स बघायला मिळतात. आपल्या पहिल्याच भेटीत न्यूझीलंडच्या प्रेमात पडलेल्या आमच्या पर्यटकांनी जेव्हा दुसर्यांदा न्यूझीलंडला भेट देण्याचा प्रोग्राम केला तेव्हा दोन आठवडे केवळ साऊथ आयलंडला भेट द्यायचे ठरविले. मग काय, क्वीन्सटाऊनबरोबर इथल्या एबल टास्मन नॅशनल पार्कमध्ये कयाकिंग, मार्लबरो भागातील उत्तम वायनरिस् व तिथल्या अतिशय निसर्गरम्य अशा क्वीन शार्लोट ट्रॅकवर तीन दिवसांचा ट्रेकिंग प्रोग्राम, फ्रान्झ जोसेफ ग्लेशियरवर हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर बर्फात ग्लेशियरवर चालण्याचा अनोखा अनुभव आणि मिलफोर्ड साऊंडच्या पाण्यात बोटीवर रात्रीचे वास्तव्य करण्याचा सुंदर प्रोग्राम आम्ही त्यांच्यासाठी बनविला. कुठल्याही शहराला किंवा देशाला परत भेट देण्याची अनेक कारणे असू शकतील. कधी नवीन हॉटेल- रीसॉर्टचे उद्घाटन किंवा काही नवीन थीम पार्क बांधल्यावर पाहण्याचं निमित्तं किंवा कधी-कधी तर नवीन एअरलाईनचे फ्लाइट लाँच झाल्यावरचा दौरा& कारण कुठलेही असो, दुसरी तिसरी ट्रिप ही पहिल्या ट्रिपपेक्षा नेहमीच अनुभवांनी श्रीमंत ठरते. पुढच्या महिन्यात सिंगापूर एअरलाईन्सचे नवेकोरे A-380 हे विमान मुंबई ते सिंगापूरच्या रूटवर लाँच करण्यात येत आहे. मग काय चांगलेच कारण आहे सिंगापूरला भेट द्यायला. यावेळी मात्र मी कुठल्याही स्थलदर्शनाला भेट न देता सिंगापूरच्या गार्डन्स आणि स्ट्रीट फूड मार्केट्सना भेट देण्याचं ठरवूनही टाकलंय. चलो, एक बार फिर से देखते है, ये देश कैसे दिखता है इस बार!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.