मागच्या रविवारी अंदमानच्या चोवीस डिसेंबरच्या सहलीचं विमान रद्द झाल्यावरचा प्रसंग, त्यातून निर्माण झालेली छोटीशी आणीबाणीसदृश परिस्थिती आणि तो प्रॉब्लेम सोडविल्यानंतरच समाधान ह्याचं संक्षिप्त वर्णन मी ह्या लेखमालेत केलं होतं. दर आठवड्याला बर्याच वृत्तपत्रात लिहिल्या जाणार्या ह्या लेखांमुळे माझा आणि वाचकांचा संवाद सुरू असतो. त्या लेखातली आवडलेली वा खटकलेली गोष्ट ते ईमेलद्वारे कळवीत असतात. एखाद्या गोष्टीवरचं त्यांचं विचारमंथनही पाठवतात. गेली वीस वर्ष हा संवाद सुरू आहे. या आठवड्यातसुद्धा अशी ईमेल्स आली. त्यातील श्री. मंदार कुलकर्णी ह्यांनी पाठविलेल्या ईमेलने माझं लक्ष वेधलं. त्यांचं म्हणणं, जरी संपूर्ण वस्तूस्थिती तुम्ही ह्या छोट्या लेखात लिहिली नसेल तरी त्या दिवशी तुम्ही ऑफिसमध्ये होतात, तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न एअरलाईनबरोबर बसून करीत होतात आणि जेव्हा प्रॉब्लेम सुटला तेव्हा तुम्ही पर्यटकांना भेटायला गेलात. ह्याऐवजी आधीच तुम्ही पर्यटकांना भेटायला हवं होत. परफेक्ट! श्री. मंदार ह्यांचं मत अतिशय रास्त होतं. तो लेख वाचल्यानंतर असा विचार काहींच्या मनात आला असेल ह्याची मला कल्पना आहे. मी आधी का आले नाही? ह्याचं कारण थोडक्यात त्या लेखात मी दिलं असलं तरी ह्या ईमेलमुळे ती घटना नव्हे तर हा विषयच आणखी विस्तारित करता येईल ह्या उद्देशाने आजचा लेख लिहायला घेतला.
आपण आपल्या सुजलाम-सुफलाम भारत देशाला पर्यटनाच्या आघाडीवर जगाच्या तुलनेत पिछाडीला ठेवलं ही वस्तुस्थिती आहे. अनेक दशकं टूरिझम हे खातं साईडिंगला पडलेलं आपण पाहिलंय, अर्थात गेल्या काही वर्षात केंद्राकडून टूरिझम हे महत्त्वाचं खातं गणलं जाताना दिसतंय ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारनेही नव्या राजकारभारात श्री आदित्य ठाकरेंना टूरिझम मिनिस्टर बनवून तरुण विचारांना प्राधान्य दिलंय हे बघून बरं वाटतंय. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या पर्यटनाला गती मिळेल ही अपेक्षा ठेवीत एक पर्यटन व्यावसायिक म्हणून त्यांना शुभेच्छा देते. भारतात येणारा एक विदेशी पर्यटक किंवा महाराष्ट्रात दुसर्या राज्यातून येणारा एक पर्यटक आठ लोकांच्या हाताला काम देऊ शकेल ही शक्ती आहे टूरिझमची. जगातील अनेक देशातल्या पर्यटनाने हे सिद्ध केलंय आणि त्या देशांना समृद्ध बनवलंय. मुंबईपेक्षा लहान असलेलं सिंगापूर किंवा दुबई पर्यटनाच्याद्वारे त्या देशांच्या अर्थव्यवस्थेत किती मोलाचा वाटा उचलतेय हे आपण बघतोच आहोत. आज काही ठरवलं तर किमान पंचवीस वर्षांनी आपल्याला भारतातली काही राज्य तरी दुबई सिंगापूर सारखी पर्यटनात आघाडीवर दिसतील. येणारी पिढी आपल्याला दुवा देईल. असो. हा झाला भारत आणि पर्यटनाचा अतिसंक्षिप्त लेखाजोखा.
पर्यटन संस्था, विमान कंपन्या, हॉटेल इंडस्ट्री हे सगळे संलग्न असे व्यवसाय. एअरलाईन इंडस्ट्रीचा विचार केला तर, इफ यू वाँट टू बी अ मिलिओेनेर फ्रॉम अ बिलिओनेर, देन स्टार्ट द एअरलाईन हे मजेशीर सुभाषित किती खरं आहे हे धडाधड कोसळणार्या विमान कंपन्यांनी एक धडधडीत सत्य म्हणून आपल्यासमोर ठेवलंय. मोदी लूफ्ट, ईस्ट वेस्ट, राज, सहारा, डेक्कन, किंगफिशर, जेट एअरवेज... आठवताहेत का ही नावं? हॉटेल इंडस्ट्री तशी बर्यापैकी तग धरून आहे पण तिला टॅक्स स्ट्रक्चरने मारलंय. आपल्या भारतातल्या बर्याच हॉलिडेची किंमत जगातल्या अनेक ठिकाणच्या हॉलिडेपेक्षा जास्त असते. कारण टॅक्सेस. त्यामुळे भारतात येणारा विदेशी पर्यटक श्रीलंका, दुबई, थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूरसारख्या देशांची निवड करतो. विदेशी पर्यटकांचं सोडा, आपल्या भारतातला पर्यटकही कधी कधी भारतात पर्यटन करण्याऐवजी परदेशी जातो. हे चित्र भुषणावह नाही तर ते भयावह आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया ला ते परवडण्यासारखं नाही. विदेशी पर्यटक तर आलेच पाहिजेत पण आपले भारतीय पण आपल्या देशात फिरलेच पाहिजेत. सो, हॉटेल व ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री टॅक्स रीफॉर्मस् होणं गरजेच आहे. ह्या नंतर येतात पर्यटनसंस्था, म्हणजे आमच्यासारखे व्यावसायिक. त्यांचा गेल्या साठ वर्षांचा रेकॉर्ड पाहिला तर कुणीही खूप प्रेरणादायी चित्र उभं केलेलं नाही. संस्था उभ्या राहतात, संस्थाचालकासोबत बर्यापैकी मोठ्या होतात आणि त्याच्यासोबतच बंद होतात. हे चित्र आम्हाला बदलायचंय. संस्था मोठी झाली पाहिजे हा एक भाग असतो आणि संस्था टिकली पाहिजे हा दुसरा महत्त्वाचा भाग असतो. पर्यटनसंस्थांचा इतिहास संस्था मोठी करता येते पण संस्था टिकवता येत नाही हे दर्शवितो. हे चित्र बदलण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं आम्ही समजतो.
म्हणतात नं की कोणतीही सवय जर लावून घ्यायची असेल, टिकवायची असेल तर सलग एकवीस दिवस सातत्याने ती गोष्ट करावी लागते. आणि ते खरं आहे हे मी स्वत: आजमावून पाहिलंय. ह्याचाच आधार घेऊन आम्ही ठरवलं की आपली संस्था म्हणजे वीणा वर्ल्ड किमान शंभर वर्ष टिकलीच पाहिजे. एकदा का तिने शंभरी पार केली की मग ती इतकी स्ट्राँग असेल की ती आपोआप त्या शंभर वर्षांच्या तत्वप्रणालीवर चालू राहिल, मोठी होत राहिल. हे मनाशी ठरविताना आम्ही जगातल्या अनेक अशा छोट्या-मोठ्या संस्थांचा अभ्यास केला (म्हणजे तो चालूच आहे) ह्या अभ्यासात मला आवडलं ते उदाहरण म्हणजे जपानच्या होशी रीओकान या हॉटेलचं. असं म्हणतात, की सर्वसाधारणपणे पासष्ट टक्के फॅमिली बिझनेसेस एका जनरेशनपर्यंतच चालतात. तीस टक्के फॅमिली बिझनेसेस् हे दुसर्या जनरेशनपर्यंत टिकतात. फक्त तीन ते पाच टक्के बिझनेसेस हे चार जनरेशनच्या पुढेपर्यंत चालतात. ही टक्केवारी जर लक्षात घेतली तर आपल्याला होशी रीओकानचं महत्त्व पटेल. जपानचं हे हॉटेल सातशे अठरा साली सुरू झालं आणि आजपर्यंत म्हणजे तेराशे वर्ष त्याची मालकी एकाच फॅमिलीकडे आहे. आत्ता त्यांची सेेहेचाळीसावी पिढी हे हॉटेल चालवतेय. वॉव्व! इंटरेस्टिंग अॅन्ड इन्स्पायरिंग... फॅमिली बिझनेस चालवणं आणि टिकवणं हे जापनीज रक्तात, त्यांच्या कौटुंबिक मुल्यांमध्ये, एकमेकांवरील विश्वासात, पारदर्शकतेत आणि त्यांच्या विचारपद्धतीत असावं कारण जगातल्या दोनशे वर्षांहून जास्त टिकलेल्या पाच हजार कंपन्यांमधील साठ टक्के म्हणजे तीन हजार कंपन्या जपानमध्ये आहेत. सुडो होन्के ही जापनीज वाईन मेकर कंपनी फाऊंडरची पंचावन्नावी पिढी आज चालवतेय. अशी हजारो उदाहरणं आहेत आपला आत्मविश्वास वाढविणारी.
प्रत्येक संस्थापकाने माझ्यावर शंभर वर्षांची जबाबदारी आहे त्यामुळे मी जे काही करतोय ते फक्त माझ्यासाठी नाही तर मला फाऊंडेशन बळकट करून ते पुढच्या पिढीकडे सोपवायचंय हे लक्षात घेतलं तर आपणही लाँग लास्टिंग असं काहीतरी निर्माण करू शकू, पण हे सगळं करताना आपल्याला आपल्या कामाच्या पद्धती बदलाव्या लागतात. आपल्या भारतात पर्यटन संस्था का टिकू शकल्या नाहीत? मल्टीनॅशनलसारखं त्यांना का मोठं होता आलं नाही? चाळीस ते पन्नास वर्ष एवढीच त्यांची आयुःमर्यादा का राहिली? हे अभ्यासलं तेव्हा असं लक्षात आलं की ह्या पडझडीचं मुख्य कारण आहे, मैं हूँ ना. (वीणा वर्ल्ड टूर मॅनेजरला आम्ही आणि पर्यटक मैं हूँ ना म्हणतो. त्याचा अर्थ वेगळा आहे बरं का!). बर्याचशा संस्था चालकांनी बिझनेस सुरू केला, वाढवला, नावारूपाला आणला पण दुसर्या पिढीकडे तो तेवढ्याच कुशलतेने सोपविण्यात ते कमी पडले. पैशाचे व्यवहार असोत, एखादा प्रॉब्लेम हाताळण्याचं कौशल्य असो वा कुठच्याही गोष्टीवर निर्णय घ्यायची प्रक्रिया, बर्याच मंडळींनी ह्या नाड्या आपल्या हातात ठेवल्या आणि अॅक्चुअली तिथेच प्रॉब्लेम झाला. मैं हूँ नामुळे पुढची पिढी तयार झाली नाही किंवा त्यांना फुलफ्लेज्ड निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिलं गेलं नाही. आपला तजुरबा आणि पुढच्या पिढीतली आधुनिकता, नाविन्य, तंत्रज्ञान ह्याचा छानसा मेळ आपल्याला घालता आला नाही. वर्षानुवर्षे चालणार्या, काळानुरूप त्यात बदल करता येईल अशी मांडणी असणार्या सिस्टीम्स आणि प्रोसेसेस् आपण निर्माण करू शकलो नाही. थोडक्यात आपल्या छोट्या-मोठ्या व्यवसायाचं आपण इन्स्टिट्युशनलायझेशन करू शकलो नाही.
आता वीणा वर्ल्ड जर पुढची शंभर वर्ष टिकवायची असेल तर आपल्याला एवढं तर कळलंय की, काय करायचं नाही. मग ध्येयपूर्तीकडे जाणारा आपला मार्ग आणखी सुकर झाला म्हणायचा. तसं बघायला गेलं तर आमची सुरुवातचमैं हूँ ना ने नव्हे तर हम हैं ना ने झाली. तीस वर्षांत जे केलं ते आम्ही तीन वर्षात करू शकलो ऑर्गनायझेशनमधल्या छोट्या-मोठ्या लीडर्समुळे. रुढार्थाने आम्ही त्यांना मॅनेजर म्हणत असू पण मॅनेजर्सपेक्षा ते लीडर्स जास्त आहेत. आता बघा नं, एकतीस डिसेंबरला न्यू ईयर सेलिब्रेशन भारतात व जगात वेगवेगळ्या ठिकाणी होणार होतं. दुबईला डेझर्टमध्ये, बँकॉकला रीव्हर क्रुझवर, दिल्लीला किंग्डम ऑफ ड्रीम्समध्ये& एकच गाइडलाईन दिली होती, All our guests are looking forward to this New Years Eve. Lets deliver them moments to be cherished forever. सगळ्या ऑफिस टीम्स आणि टूर मॅनेजर्सनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे सेलिब्रेट झालेली ही संध्याकाळ पर्यटकांच्या निश्चित स्मरणात राहिल. ह्यात मी किंवा सुधीर, सुनिला, नील आमच्यापैकी कुणीही, लेट मी डू इट म्हणत ह्या लीडर्सच्या कामात ढवळाढवळ केली नाही. अशीच सगळी कामं ही लीडर्स मंडळी करीत असतात, अडचणींवर मार्ग काढत असतात, निर्णय घेत असतात. टू मेनी लीडर्स कॅन स्पॉईल द गेम ह्याचंही भान असल्याने फ्रिक्शनलेस प्रोसेसेस् निर्माण करण्यात मात्र आम्ही हिरिरीने भाग घेतो. पर्यटकांकडे आणि वाचकांकडेही माझा ईमेल आयडी असतो. एखादी अडचण आल्यास आम्ही अप्रोचेबल असतो हे त्यांना माहीत असतं. आम्ही स्वत: कदाचित त्या ईमेलला उत्तर पाठविणार नाही पण त्यावर टीम काम करतेय ह्याची खात्री करतो. हे काम आता आणखी मोठ्या प्रमाणावर हाती घेतलंय आणि त्याचाच भाग आहे काहीही झालं की पटकन आपण समोर यायचं नाही. लेट देम डू इट! बी देअर फॉर सपोर्ट! आता टीम आम्हाला म्हणत असते, डोंट वरी, हम हैं ना।.
चांगले लीडर्स तयार झाले आहेत, त्यांची स्ट्रेंग्थ आमच्या तजुरब्याने आणखी वाढवायचीय. आता मी आहे आणि मी नाही ह्या दोन्ही गोष्टी मी अनुभवतेय. माझ्या आयुष्यात वीसेक वर्ष मी टूर मॅनेजर होते त्यामुळे लीडिंग फ्रॉम फ्रंट हे काय असतं ते क्षणोक्षणी अनुभवलंय. आता मला शिकायचंय ते लीडिंग फ्रॉम बीहाइंड, लीडिंग फ्रॉम डिस्टन्स. मैं हूँ ना हे आयुष्य मी जगलेय. सध्या हम हैं ना सुरू आहे आणि नंतर वो हैं ना सारे।
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.