एकदा मी आणि माझी मैत्रिण चेक रीपब्लिकमधल्या प्राग शहरात हॉलिडेवर गेलो होतो, तेव्हा तिथल्या मेट्रो लाईन्स पाहून मी पटकन म्हटलं की,अरे हे बघ इथे केवळ तीनच मेट्रोच्या लाईन्स आहेत, यावरून तिनं तडक मला प्रश्न केला,मग मुंबईत किती मेट्रोच्या लाईन्स आहेत गं? वीस वर्षांपूर्वी माझ्याकडे या प्रश्नाचे ठोस उत्तर नव्हते, पण आज जर कुणी हा प्रश्नकेला तर मुंबई-पुण्यात वेगानं सुरू असलेल्या मेट्रोचे काम बघता माझ्याकडे कुणालाहीकौतुक वाटेल असं उत्तर तयार असेल.
१९९९-२००० साली मी लंडनमध्ये राहत असताना रोजच तिथल्या मेट्रोचा म्हणजेच ट्युब ट्रेनचा वापर करीत असे. लंंडनची ही अंडरग्राऊंड ट्रेन सिस्टीम १८६३ पासून कार्यरत असून जगातली सर्वात जुनी अंडरग्राऊंड ट्रेन सिस्टीम आहे. आज अकरा लाईन्सवर जवळ-जवळ ३० लाख लोकं या ट्रेनचा वापर करतात. त्यावेळी एकदा मी आणि माझी मैत्रिण चेक रीपब्लिकमधल्या प्राग शहरात हॉलिडेवर गेलो होतो, तेव्हा तिथल्या मेट्रो लाईन्स पाहून मी आश्चर्यानं पटकन म्हटलं की, अरे हे बघ इथे केवळ तीनच मेट्रोच्या लाईन्स आहेत, यावरून माझ्या मैत्रिणीला फार गम्मत वाटली. त्यानंतरचा तिचा प्रश्न मला अपेक्षितच होता आणि माझ्याकडे वळत तिन तो विचारलाच. मग मुंबईत किती मेट्रोच्या लाईन्स आहेत गं? मी पण गमतीत तिला उत्तर दिलं की भारत सो़डतानाच तुम्ही ब्रिटिशांनी थोड्या मेट्रो लाईन्स टाकल्या असत्या तर आज आमचे आयुष्य सोईस्कर झाले असते. वीस वर्षांपूर्वी माझ्याकडे या प्रश्नाचे ठोस उत्तर नव्हते, गम्मत करून वेळ मारून नेली, पण आज जर कुणी हा प्रश्न केला तर मुंबई-पुण्यात वेगानं सुरू असलेल्या मेट्रोचे काम बघता माझ्याकडे कुणालाही कौतुक वाटेल असं उत्तर एकदम रेडी असेल. त्यावेळेस गमती- गमतीत एकमेकींची अशी थट्टा मस्करी करत लंडनच्या पिकॅडिली सर्कस स्टेशनवर आमची ट्युब ट्रेन येऊन थांबली होती, या गोष्टीकडे आमचे लक्षच नव्हते. माईंड द गॅप ही ट्युब स्टेशनवरची ओळखीची अनाऊंसमेंट कानावर पडली आणि आम्ही ट्रेनमध्ये शिरलो. लंडनच्या ट्युब ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधल्या अंतराची जाणीव असावी म्हणून सतत माईंड द गॅप ही अनाऊंसमेंट स्टेशनवर ऐकू येत असते. हे वाक्य इतके प्रसिद्ध झाले की हॉलिडेवरून परत येताना लंडनचे सुवेनिअर म्हणून ट्युब ट्रेनच्या अनेक लाईन्सच्या मॅप चे फ्रिज मॅगनेट व इतर गोष्टी सोबत आणण्या बरोबरच माईंड द गॅप लिहिलेल्या टी-शर्टस्नादेखील अधिक पसंती दिली जाते. कुठल्याही मेट्रो शहराची ट्रेन सिस्टिम ही त्याची लाईफलाईन ठरते. मग ते शहर लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, टोकियो, न्यू दिल्ली असो किंवा मुंबई. आपल्या व्यवसायासाठी दैनंदिन प्रवास करणार्या हजारो-लाखो लोकांसाठी ट्रेन्स ह्या खरंच वरदान आहेत असंच म्हणावं लागेल. हाच प्रवास अधिक रूचकर करण्याच्या दृष्टीने लंडनच्या या अंडरग्राउंड ट्रेन्सवर इतर अॅडर्व्हटायझिंगबरोबर क्लासिक व कंटेंपररी अशा दोन्ही प्रकारच्या कविता प्रदर्शित होऊ लागल्या. ट्रेनचा प्रवास करताना तिथल्या गोंधळाच्या वातावरणात मध्येच अचानक एखादी कविता वाचायला मिळाली की आपला घाई-गडबडीचा दिवसही छान आनंद देऊन जातो. हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला की या कवितांचा संग्रह पोएम्स् ऑन द अंडरग्राऊंड म्हणून एका पुस्तकात प्रकाशित झाला. मुंबईतल्या ट्रेन्ससारखं चौथी सीट कोणाची किंवा पुढच्या स्टेशनला कोण उतरतंय? ही चौकशी करत ती सीट रीझर्व्ह करण्याइतपत या मेट्रोवर संभाषण होत नसले तरी न बोलता कम्युनिकेशन केले जाते. केवळ तिथल्या लोकल्ससाठीच नव्हे तर पर्यटकांसाठीसुद्धा या मेट्रो ट्रेन्स फारच सोईस्कर ठरतात. सर्व मुख्य स्थलदर्शनांजवळ हे मेट्रो स्टेशन्स बांधलेले असतात, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये न अडकता अगदी आरामात आपण आपल्या दिवसाचा साईटसिईंग प्रोग्राम्स पार पाडू शकतो. त्यात एका दिवसाचे वीकेन्ड किंवा आठवड्याभराचे पासेस काढले की ते खूप किफायतीसुद्धा ठरते. सर्वात जास्त ट्रेन लाईन असल्या तरी वापरण्यासाठी सर्वात सोपी ट्रेन सिस्टीम म्हणजे लंडनची अंडरग्राऊंड सिस्टीम. इथल्या अनेक पासेसपैकी आपल्याला सोईस्कर असलेला पास निवडला की लंडनमधल्या ट्रेन, बस आणि काही फेरी बोटवर सुद्धा हा एकच पास वापरता येतो.
लंडनच्या मेट्रो स्टेशनचा सिम्बॉल म्हणजे एक लाल सर्कल ज्यावर निळ्या अक्षरात अंडरग्राऊंड असे लिहिलेले असते. रस्त्यांवर फिरत असताना ही खूण दिसली की स्टेशन तिथे जवळच असणार हे लक्षात येते. मला आवडलेले मेट्रो स्टेशनचे सर्वात जास्त सुंदर साईन कोणतं असेल तर ते आहे, पॅरिस मेट्रोचे साईन. पॅरिसच्या सबवे स्टेशनच्या प्रवेशाजवळ मेट्रोपोलिटन हे सुंदर आर्ट नेवू शैलीत लिहिलेले दिसते. मेट्रोपोलिटन या कंपनीने पॅरिसमधल्या मेट्रो ट्रेन्स चालवायला घेतल्या तेव्हा प्रवेशद्वाराच्या डीझाईनरसाठी कॉम्पीटिशन ठेवली होती. यात पॅरिसचे आर्किटेक्ट आणि डीझाईनर हेक्टर गुईमर्ड विजयी झाले. आर्ट नेवू शैलीत तयार झालेेले मेट्रो गेटचे डीझाईन त्यांचच आहे. एका फुलाच्या वेलीची आठवण करून देेणारे हे डीझाईन १९व्या शतकाच्या उत्तरार्धात पॅरिसमध्ये निसर्गाचा संदर्भ देणार्या आर्ट नेवू शैलीबरोबरच, नवीनच आणलेल्या मेट्रो ट्रेन्समुळे हळूहळू प्रसिद्ध झाले. फ्रान्समध्ये फिरताना अनेकदा फ्रेंच भाषा बोलता येत नसेल तर एकटे फिरायला त्रास होतो व त्यातून होणार्या बर्याच गमतीजमती ह्या सर्व तर आपल्याला माहितीच असतील. यासंदर्भातलाच एक किस्सा सांगायचा, तर एकदा पॅरिसवरून युरोस्टार घेऊन लंडनला जाण्यासाठी मी एकटी निघाले होते, माझ्या हातात माझी एक सुटकेस होती. तेव्हा कसंबसं तोडके-मोडके फ्रेंच वापरत मी मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचले. तेवढ्यात आपली ट्रेन नक्की कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल याचा विचार करत असतानाच एक फ्रेंच युवक माझी सुटकेस घेऊन पायर्यांवरून पळू लागला. त्याचा पाठलाग करीत मी खाली उतरले, तेव्हा तो चोरी नव्हे तर माझी मदत करीत होता हे लक्षात आले. आणि त्याच्यावर संशय घेतल्याबद्दल मला लाजिरवाणं वाटलं. त्या मेट्रो स्टेशनवर एस्केलेटर नव्हते आणि माझी ट्रेन चुकू नये म्हणून त्याने माझी बॅगच फक्त खाली उतरवून दिली नाही तर मला ट्रेनमध्ये चढण्याससुद्धा मदत केली.
वैयक्तिकरित्या फिरताना एखाद्या शहराची ओळख करून घेण्यासाठी त्या शहरातील लोकल ट्रान्सपोर्टचा वापर करीत आपण सर्व स्थलदर्शन अगदी आरामात करू शकतो. अशावेळी आपली हॉटेल्ससुद्धा ट्रेन स्टेशनजवळ असली की ते फारच साईस्कर ठरते. स्टेशनजवळ बहुधा दुकाने व रेस्टॉरंट्स भरपूर असतात त्यामुळे आपल्याला चांगला चॉईस असतो. या अंडरग्राउंड ट्रेन्सना न्यूयॉर्कमध्ये सबवे म्हणतात. सब म्हणजे खाली आणि वे म्हणजे रस्ता. रस्त्याच्या खाली चालणार्या ट्रेन्स म्हणून त्या सबवे ट्रेन्स. तसेच, लंडनमध्ये जेव्हा अंडरग्राऊंड ट्रेनसाठी ट्युबचा मार्ग बनवला गेला, तेव्हा रस्ते खणून ट्रेन ट्रॅक बांधल्यावर त्यावरून तो रस्ता झाकण्यात यायचा. पुढे त्यामध्ये थोडा बदल करत आणखी खोल खणून संपूर्ण टनेल बांधून त्यात ट्रेन ट्रॅक बांधण्यात आला आणि म्हणूनच या ट्रेनच्या मार्गाला द ट्युब हे टोपणनाव देण्यात आले. एखाद्या शहरातल्या या रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीमला मेट्रो म्हणण्यात येते, कारण त्या मेट्रो शहरातल्या लोकांसाठी वाहतुकीचे सर्वात महत्त्वाचे साधन ठरतात. एखाद्या देशाच्या सर्वात मोठ्या शहरांना मेट्रो सिटीज म्हणून ओळखले जाते. इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमुळे आकर्षित झालेल्या प्रचंड लोकसंख्येने मेट्रो सिटी तयार होते. या संदर्भात वापरलेले मेट्रोे नाव प्राचीन ग्रीक भाषेवरून घेतलेले आहे. मेट्रोपोलिस म्हणजे ग्रीक भाषेत मदर सिटी, ज्या शहरातून लोकं इतर ठिकाणी जाऊन स्थायिक होतात आणि त्या शहराचे बांधकाम आपल्या मदरसिटीप्रमाणे किंवा मेट्रोपोलिसवर आधारित पद्धतीनं करतात. अशा या मेट्रो सिटीज् पर्यटनासाठी एखाद्या देशाच्या गेटवे पॉइंट्स ठरतात कारण बहुतेक फ्लाइट्स व ट्रेन्सची या मेट्रो सिटीज् मधून उत्तम कनेक्शन्स मिळतात. बर्याचवेळा आपण या शहरात एक- दोन दिवसांचे वास्तव्य करून पुढच्या रीसॉर्ट टाऊन्सकडे प्रवास करीत निघून जातो. पण खरंतर आपण या मेट्रोजमध्ये अगदी आरामात एखाद्या आठवड्याचा हॉलिडेसुद्धा घेऊ शकतो. त्या शहरातील मुख्य स्थलदर्शन करताना संध्याकाळ होताच या शहरांंमध्ये उपलब्ध असणार्या थिएटर शोज्, कॉन्सर्ट्स, रेस्टॉरंट्स, बार, फूड स्ट्रीटस्, मार्केट्स, नाइट लाईफ, शॉपिंग अशा अनेक एंटरटेन्मेंट करणार्या गोष्टींचा लाभही आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर अनेक निसर्गरम्य ठिकाणे ह्या शहरांपासून एक-दोन तासांवर असल्याने आपण अनेक डे ट्रिप्स करत सभोवतीच्या आकर्षणांनासुद्धा भेट देऊ शकतो. आपल्या पुढच्या हॉलिडेवर केवळ दोन-तीन दिवसांचा सिटी ब्रेक न घेता एखादा आठवडा एकाच मेट्रो मध्ये राहून त्या शहराची व देशाची जवळून ओळख करून घ्या. बरं ही ओळखही तिथल्या मेट्रोज् मधून प्रवास करीत करून घेतलीत तर अधिक सोईस्कर. बघूया तरी लाईफ इन ए मेट्रो कसे असते. हा अनुभव देण्यासाठीच तर लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, सिडनी... आपली वाट बघत आहेत. मग, कधी निघताय?
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.