आय अॅम बीकॉज शी इज! आयुष्य घडविण्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहयोगी ठरलेल्या सर्व महिलांना कृतज्ञतापूर्ण सलाम! चला एकमेकींना मन:पूर्वक पाठिंबा देत आपल्या जगात सकारात्मक बदल घडवूया, आनंद वाढवूया. लेट्स मेक लाईफ मोर इंट्रेस्टिंग! हॅप्पी वुमन्स डे फ्रॉम थायलंड! वुमन्स स्पेशलवर आलेल्या एकशे पंधरा महिलांना भेटायला मी इथे आलेय.
‘ट्वेन्टी ट्वेन्टी चा भारत’ हे एक स्वप्न आपण सर्वांनी बघितलं होतं. त्यामुळे या वर्षाकडे सर्वच उद्योगधंदे मोठ्या अपेक्षेने बघत होते. जानेवारी महिना खूपच आशादायी चित्र उभं करून गेला. आमच्या छोट्या किंगडममध्येही आम्ही गतवर्षीपेक्षा खूपच चांगल्या प्रगतीपथावर होतो. एकोणीस-वीसचं आर्थिक वर्ष आमचे आधीचे सर्व रेकॉर्डस् मोडणार असं दिसत होतं आणि इतर काही उद्योगांप्रमाणे आम्हीही खूश होतो. समर सीझन म्हणजे पर्यटन विश्वासाठी सर्वात महत्त्वाचा सीझन. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान चेरी ब्लॉसम सर्वच सहली ऑलमोस्ट फुल्ल. त्यामुळे आणखी पर्यटकांना अॅकोमोडेट करण्यासाठी आम्ही युरोपचा ‘ईझी लेझी कॉस्ट सेव्हर’ ब्रँड लाँच केला. यावर्षी पहिल्यांदाच सप्लायपेक्षा डीमांड जास्त होती, अर्थात आम्हाला त्याचा अंदाज होता त्यामुळे आम्ही कॉस्ट सेव्हर ब्रँडची तयारी करून ठेवली होती. यावर्षी आपण पंचवीस हजार पर्यटक युरोप अमेरिका जपानला नेऊ शकू हा आमचा अंदाज होता आाणि बुकिंगच्या संख्येनीही ती ग्वाही दिली. गेल्या ऑगस्ट सप्टेंबरपासूनच एअरलाईन्स रिझर्व्हेशन्स डेस्टिनेशन्सच्या लोकल अरेंजमेंट्स, हॉटेल्सची वर्गवारी असं सगळं करून आम्ही निवांत झालो होतो. टूरिझमच्या कॉलेजेसमधून इंटर्न्सना रीक्रुट केलं होतं. असिस्टंट टूर मॅनेजर्स म्हणजे पर्यटनात नव्याने प्रवेश करण्यास उत्सुक असणार्या साठ जणांना इंटरव्ह्यू प्रोसेस पार पडून वीणा वर्ल्डमध्ये प्रवेश दिला होता, ज्यांच्या अॅक्च्युअल ऑन टूर ट्रेनिंगचंही शेड्युलिंग करण्यात एच आर आणि टूर मॅनेजर्स टीम मग्न होती.
सर्व सहली ‘ओके टू बोर्ड’ अशा स्टेट्सला असताना चायनाला एका सुक्ष्म विषाणूने हतबल केलं. चायनाने जगाकडे आणि जगाने चायनाकडे पाठ फिरवली. खरोखरची महासत्ता बनायला निघालेल्या, ‘तुझं माझं पटेना पण तुझ्याविना चालेना’ अशातर्हेने जगाला स्वत:वर अवलंबित केलेल्या चायनाविषयी असूया बाळगणार्या अनेक देशांना चायनाची ही ‘टेंपररी हतबलता’ सुखावूनही गेली. सर्वांवर हुकमत गाजविणार्या एखाद्या भाईची अचानक आलेल्या संकटाने उडालेली भंबेरी बघून ‘आता कशी जिरली!’ सारखा एक असूयायुक्त आनंद अनेकांना झाला. पण म्हणतात नं, दुसर्यांच्या संकटांवर कधी हसू नये, आपल्यावर तशी परिस्थिती आली तर आपली काय अवस्था होईल याचा विवेकी विचार नेहमी करावा आणि शांत रहावं. आणि झालंही तसंच, चायनाशिवाय उद्योगधंद्यांचं पान न हलणार्या जगाला चायनाने विषाणूची भेटही दिली. लोकसंख्येत नंबर वन असलेल्या चायनाने जगभर आपलं जाळं पसरवलंय. आपल्याकडे डेअरिंग-डॅशिंग मारवाडी लोकांच्या बाबतीत म्हटलं जातं, ‘जहाँ न जाय विमानगाडी वहाँ जाय आगगाडी। जहाँ न जाय आगगाडी वहाँ जाय बसगाडी। जहाँ न जाय बसगाडी वहाँ जाय बैलगाडी और जहाँ न जाय बैलगाडी वहाँ जाय मारवाडी।’. असं हे विधान चीनी माणसांनाही लागू होतं. जगाच्या प्रत्येक देशात त्यांचं बस्तान बसलेलं. बरं व्हायरस म्हणे नोव्हेंबरपासून आलाय. जगाला तो कळला जानेवारीत. त्यामुळे तो कुठे आणि किती पसरलाय ह्याची गणतीच नाही. प्रतिकारशक्ती जास्त असणार्या आपल्या भारतात तो खूपच उशिरा प्रवेशकर्ता झाला आणि आता आपण कडकडीत उन्हाळ्याकडे प्रस्थान करतोय त्यामुळे तो आपल्या मातीत फारसा टिकणार नाही. आता ह्याक्षणीच्या बातम्या जशा भीतीदायक आहेत तशाच आशादायीही आहेत. चायनामध्ये हालचाल सुरू झालीय. रूग्ण बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या वाढतेय ही चांगली गोष्ट आहे. आपण भीतीच्या सावटाखाली वावरायचं नाही हे महत्त्वाचं आणि त्याचसोबत स्वच्छतेची सावधानता बाळगायची.
अर्थात या विषाणूने जगाची आर्थिक घडी विस्कटवलीच. अपरिमित नुकसान किंवा ‘क्रिपल्ड इकॉनॉमी’ ज्याला म्हणता येईल अशी अवस्था करून ठेवली ज्याचे दूरवर परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रत्येक उद्योगधंद्याला आणि प्रत्येक व्यक्तीला भोगावे लागणार आहेत. हे परिणाम लागलीच ठळकपणे दृष्टीपथात येतात ते एअरलाईन, हॉटेल आणि टूरिझम इंडस्ट्रीवर. उद्योगधंद्यांसाठी आणि टूरिझमसाठी चायनामध्ये जाणारे प्रवासी तसेच टूरिझमसाठी जगभर फिरणारे चायनीज ही संख्या इतकी मोठी आहे की जगभरातल्या मोठमोठ्या बर्याच विमान कंपन्या ह्या चायनाच्या बळावर मोठ्या झाल्या. आज ही सगळी विमानं जमिनीवर आल्यामुळे तेलाच्या किमती गडगडल्या. नव्वद ते एकशेदहा डॉलर प्रति बॅरलचा रेट पन्नासपर्यंत घटला. खरंतर तेलाचे दर कमी होणं ही आनंदाची गोष्ट असते इतरवेळी, पण इथे ती संकट म्हणून उभी ठाकलीय. तेल स्वस्त झालंय पण वापरणार कुठे? एअरलाईन व हॉटेल इंडस्ट्रीने ऑलरेडी कंपल्सरी अनपेड लीव्ह किंवा सॅलरी कट किंवा जॉबकट ह्या गोष्टी सुरू केल्याच आहेत. इतर अनेक उद्योगही त्यांची ‘री’ ओढणारच आहेत कारण कदाचित पर्याय नसणार आहे.
गेल्या आठवड्यात आमच्या दोन कॉन्फरन्सेस प्लॅन्ड होत्या अंधेरी मुंबईच्या ‘हॉलिडे इन’ला, एक टूर मॅनेजर्सची ‘प्री सीझन मीट’ आणि दुसरी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असणार्यांची ‘अॅन्युअल मीट’. ‘कॉस्ट सेव्हिंग मेजर’ म्हणून आम्ही लागलीच ह्या कॉन्फरन्सेस रद्द करण्यासाठी ‘हॉलिडे इन’ला फोन केला. हॉटेलने त्यांचा पाढा वाचला की तुमच्या ह्या कॉन्फरन्सेससाठी आम्ही इतर कार्यक्रम कॅन्सल केलेत. त्यामुळे हे कॅन्सल होऊ शकत नाही. हंड्रेड पर्सेंट कॅन्सलेशन लागेल. आम्ही ठरवलं कॅन्सलेशन भरण्यापेक्षा करुया ह्या मीट्स. दोन मीट्समध्ये आपले आठशे टीम मेंबर्स एकत्र येतील त्याकडे आता अपॉर्च्युनिटी म्हणून बघूया. आणि ह्या दोन्ही मीट्स झाल्या अतिशय चांगल्या स्वरुपात. काय करायचं? काय करायचं नाही? ह्या संपूर्ण जागतिक उलथापालथीत आपली भूमिका काय? ह्यावर खूप चांगली चर्चासत्र झाली. ‘वन ऑर्गनायझेशन- वन लँग्वेज’ वर भर दिला.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे ह्या फेब्रुवारी महिन्यात युरोपसह सर्वत्र देशविदेशात आतार्यंत कधीही केल्या नव्हत्या एवढ्या टूर्स आम्ही केल्या होत्या. साडेतीनशेहून अधिक टूर मॅनेजर्स आणि आम्ही चौघंही फेब्रुवारीत टूर्सवर होतो. जपानपासून थायलंड सिंगापूर बाली तर मलेशियापासून केरळ अंदमान राजस्थान कुलूमनालीपयर्ंत. टूर मॅनेजर्सना मॅनेज करणारे विवेक आणि विनेशला एकाही टूर मॅनेजरने सहलीवर जाण्यासाठी नकार दिला नाही. आजही अठ्ठ्याहत्तर टूर मॅनेजर्स देशविदेशात सहलीवर आहेत. अशा ‘लीडिंग फ्रॉम द फ्रंट’वाल्या सगळ्यांचं अभिनंदन केलं. पर्सनल हायजिन आणि प्रीकॉशन्स ह्याची आठवण करुन दिली. ‘परिस्थिती आपल्या हातात नाही त्यामुळे मनःस्थिती बदलूया’ काहीही झालं तरी आपली उमेद ढळू द्यायची नाही. पर्यटकांची काळजी घेत त्यांना सहलीचा अपेक्षित आनंद देत येणार्या सहली आणखी यशस्वी करायच्या. मार्चमध्येही भरपूर सहली आहेत सगळीकडे. एकट्या युरोपचा विचार केला तर तिथेही एकवीस सहली आहेत ह्या महिन्यात. लेट्स डू अवर बेस्ट! तसंच एखादी परदेशी व्यक्ती जर आपल्याजवळ आली तर जगाचा एक सन्माननीय नागरिक म्हणून आपलं वर्तन असलं पाहिजे. पटकन त्यांच्यापासून दूर होणं, त्यांच्यावर जोक्स करणं हे करायचं नाही किंवा त्यात भाग घ्यायचा नाही. तसंच सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप वर ह्यासंदर्भात आलेले फेक फॉरवर्ड्स आपण फॉरवर्ड करायचे नाहीत. व्हायरस इम्पॅक्टपेक्षाही त्याच्या भीतीचा बागुलबूवा ह्या फॉरवडर्सनी केलाय आणि जगाची इकॉनॉमी ढासळवलीय. अंशत: का होईना आपण डॅमेज कंट्रोलमध्ये सहभागी झालं पाहिजे. लेट्स बी अ पार्ट ऑफ समथिंग विच इज पॉझिटिव्ह!
जपान किंवा सिंगापूरमध्ये सावधानी म्हणून शाळा बंद केल्या आहेत. एवढंच कशाला आपल्या दिल्लीमध्येही शाळा बंद आहेत. आता जगाने भारताकडे येणं बंद करायचं का? सर्वत्र सर्वांनी आता खबरदारी घ्यायचीय. आमचे पर्यटकही रोज सेल्स ऑफिसेसमध्ये येताहेत. कुणी भीतीच्या सावटाखाली तर कुणी संभ्रमावस्थेत, कुणी शांतपणे तर कुणी आवाज करीत. मलाही मेल्स येताहेत. ह्या सगळ्यांसाठीच आमची वीणा वर्ल्डची भूमिका इथे जाहीररित्या मांडत आहे. मला खात्री आहे की सर्वच छोट्या मोठ्या पर्यटन संस्था ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित अॅडव्हान्स सर्व्हिसेस बूक केल्या आहेत तेही ह्या भूमिकेशी सहमत होतील. पहिली गोष्ट म्हणजे लाईफ इज ऑन, टूर्स आर ऑन! सर्वत्र सहली शेड्युलप्रमाणे सुरू आहेत. वीणा वर्ल्डने चायनाच्या सहली बेमुदत पुढे ढकलल्या आहेत. इटलीसारख्या ठिकाणी जर जाता आलं नाही तर त्याऐवजी दुसर्या युरोपीयन सीटीज मध्ये पर्यटकांची पर्यायी व्यवस्था करून एअरलाईनच्या सहकार्याने त्यांची टूर पार पाडली जाईल. ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंतच्या नव्हे तर दिवाळी-ख्रिसमसच्याही सहलींसाठी विमानकंपन्यांकडे रीझर्व्हेशन्स ऑलरेडी झाली आहेत. विमानकंपन्यांनी आणि काही लोकल स्थलदर्शनाच्या कंपन्यांनी रीफंड देणं नाकारलं आहे. जोपर्यंत देश पर्यटकांसाठी खूला आहे तोपर्यंत ‘नो रीफंड’ ही भूमिका आहे त्यांची. आणि त्याला संलग्न भूमिकाच आम्हालाही घ्यावी लागतेय. त्यामुळे कॅन्सलेशनच्या बाबतीत ‘पूर्ण रीफंड‘ हा पर्याय नाही. ज्यांना ट्रान्सफर व्हायचंय त्यांना आम्ही एअरतिकीट-व्हिसा व इतर काही लँड अरेंजमेंट चार्जेस वगळून उरलेली अमाऊंट त्यांच्या पुढच्या सहलीला ट्रान्सफर करतोय. एकदा ट्रान्सफर केल्यावर त्यांची केस एअरलाईन/अनेक लँड सप्लायर्सकडे दिली जाईल आणि जर त्यांनी कन्सिडर करून काही रक्कम परत केली तर ती ह्या पर्यटकांच्या क्रेडिट नोटमध्ये जमा केली जाईल. ह्या संपूर्ण अपरिहार्य आणीबाणीच्या परिस्थितीत काही सहलींची पर्यटक मर्यादा जर एकदम कमी झाली तर आसपासच्या दोन-तीन सहली मर्ज केल्या जातील. त्यात कदाचित सहलीची ओरिजनल तारीख बदलूही शकेल, ज्यासाठी पर्यटकांचं सहकार्य मिळेल ह्याची खात्री आहे. ज्यांना जायचंच नाहीये त्यांना कॅन्सलेशनच्या नियमाप्रमाणे रीतसर रीफंड दिला जाईल. अर्थात इथे नुकसान आहे त्यामुळे निर्णय पर्यटकांचा असला तरी एकदम घाईघाईत निर्णय घेऊ नका हा सल्ला माझ्यातर्फे मी पर्यटकांना देईन. पर्यटकांच्या एका प्रश्नाचं उत्तर मात्र माझ्याकडे नाही ते म्हणजे ‘सेफ आहे का जाणं?‘ ब्रम्हदेवही ही गॅरंटी आता देऊ शकेल की नाही हा प्रश्न आहे. मात्र आम्ही स्वत: जगभर प्रवास करतोय त्यामुळे आपल्यासारखीच परिस्थिती त्या देशातही आहे हे सांगू शकतोय.
जी काही परिस्थिती आलीय तिचे आपण सगळेच बळी आहोत. त्यातून बाहेर पडण्यासाठी जेवढी सकारात्मकता अंगी बाळगता येईल तेवढी बाळगूया. १९२९, १९७३, १९९७ किंवा २००८ ची जागतिक मंदी कधीतरी संपलीच नं. प्लेग, सार्स, इबोला, निपा, स्वाईन फ्लू आले आणि गेलेच नं. कधी कधी आपल्याला, आपल्या सवयींना, उधळपट्टीला, आपण ग्रँटेड धरलेल्या आपल्या आयुष्याला आणि आरोग्याला राईट ट्रॅकवर आणण्यासाठी कदाचित देव असे हे सापळे आपल्यासाठी टाकत असेल. आणखी काही दिवसांनी वा महिन्यांनी कदाचित आपण ह्या आत्ताच्या परिस्थितीवर हसू आणि तसचं ते झालं पाहिजे. सध्या इकॉनॉमी ‘यू’ ह्या अक्षरासारखी झालीय. जानेवारीत सेन्सेक्सने उच्चांक गाठला होता. आता तो रोज निच्चांकांच्या नवनवीन पातळ्या दाखवतोय. सध्या त्या ‘यू’ चा बॉटम त्याने गाठलाय पण अजून तो किती खाली जाणार कळत नाहीयेे. आणि अर्थातच तो पून्हा अपवर्ड टर्न घेणारच आहे. ‘हे ही दिवस जातील’ ह्यावर भरोसा ठेवूया. लेट्स कीप काल्म! कीप गोईंग! कॉन्फिडंटली, करेजियसली!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.