स्पेस, कम्युनिकेशन, हेल्थ केअर, अॅग्रिकल्चर, इंटरनेट ह्याद्वारे आपल्याला जे काही लाभ झाले आहेत ते बघता, ‘ह्यापेक्षा सुख आणि सुविधा काय असू शकतात.’ असा प्रश्न विचारावासा वाटतो. आपण नशीबवान आहोत, रीयली ब्लेस्ड.
नवीन वर्ष आणि सोमवार हे समीकरण एकदा जुळून आलं की मग आपला आनंद गगनात मावेनासा होतो. आणि का असू नये. अहो अनेक सोमवार आणि असंख्य एक तारखेची तर आम्ही आयुष्यभर वाट बघत असायचो. कोणतंही नवीन चांगलं काम करायला आम्हाला सोमवार किंवा एक तारखेची आवश्यकता असायची. डायरी लिहिणं हा प्रकार आमच्या लहानपणी खूपच ‘इन स्टाईल’ होता. डायरीमध्ये आपल्या मनातल्या गोष्टी लिहायच्या, ती डायरी कुणाच्याही हाताला लागू द्यायची नाही, जे काय आपल्या मनात अगदी प्रायव्हेट आहे ते त्या आपल्या डायरी नावाच्या मैत्रिणीला सांगायचं रोज रात्री आणि मन शांत करून झोपी जायचं ही पध्दत. बॉलिवूडच्या सिनेमांनीही डायरी ह्या गोष्टीला खूप फूटेज दिलं. कधी ती डायरी हरवायची, कधी चुकीच्या माणसाच्या हाती लागायची, त्या डायरीमुळे कधी गैरसमज व्हायचे तर कधी झालेले गैरसमज दूर व्हायचे. अशी ही डायरी लिहायला आपण सुध्दा सुरुवात करावी म्हणून मी माझ्या आयुष्यातले अनेक तीस आणि एकतीस डिसेंबर आयडियल बूक डेपो, दादर किंवा एशियाटिक, चर्चगेट किंवा क्रॉसवर्ड अशा अनेक ठिकाणी घालवले आहेत. कारण एक तारखेपासून डायरी लिहायची म्हणजे ती डायरी एकदम नवी-कोरी असायला हवी, नाही का. अगदी त्या नव्या-कोर्या डायरीच्या पानांचा सुगंध घेण्यापासूनचा आनंद जो मिळवायचा असायचा. सगळ्या माझ्या लेखनिक, भावनिक, मानसिक गरजा पूर्ण करणारी जी डिझायनर डायरी असेल तिची साग्रसंगीत खरेदी व्हायची आणि ही डायरी माझ्या टेबलावर किंवा अभ्यासाच्या पुस्तकांवर एखाद्या राणीप्रमाणे विराजमान व्हायची. मनावर मोरपीस फिरल्यासारखं व्हायचं कारण उद्या एक तारखेपासून डायरी लिहायला सुरुवात जी होणार होती. माझं मन तर पुढच्या अनेक वर्षापर्यंत धावायचं, ‘वीस वर्षांनी ह्या डायरीज वाचायला किती मजा येईल, एवढ्या डायरीज जमतील की एखांद मोठं कपाट करावं लागेल आपल्याला. त्यात प्रत्येक वर्षीचे कप्पे करावे लागतील. कारण कोणत्याही वर्षीची, कोणत्याही महिन्याची डायरी पटकन मिळायला हवी, नाही का?’. ह्या डायरीमध्ये किती आणि काय लिहायचं? काय लिहायचं नाही? बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे ती कुणाच्या हाती लागली तर. अशी अनेक द्वंद्व मनात सुरू व्हायची आणि त्यातून बाहेर पडून एक तारखेला रात्री आमची स्वारी डायरी लिहायला बसायची. पहिलं पान-पहिला शब्द-पहिली ओळ ह्याची सुंदर हस्ताक्षरात सुरुवात व्हायची. मनात कितीतरी साठलेलं असायचं त्यामुळे पहिलं पान पटकन संपून जायचं आणि मग वाटायचं की ह्या एवढ्याशा छोट्या पानात कसे राहाणार माझे विचार? पान अजून थोडं मोठं असायला हवं होतं. नेव्हर माईंड, आपण आपल्या विचारांना थोडं आटोपशीर करूया असं म्हणत तीन-चार दिवसांत डायरीचं एक एक-पान आटोपशीर व्हायला लागायचं. पहिल्या आठवड्याची साती-सात पानं छान लिहिली गेल्यावर मला माझा अभिमान वाटायला लागायचा, दुसर्या आठवड्यात अति कामामुळे दोन दिवसाचा खाडा, आणि झोप इतकी यायची की पहिल्या दिवशी छोटं वाटणारं डायरीचं पान खूप मोठं वाटायला लागायचं. तिसर्या आठवड्यात काही कारणास्तव घरी यायला उशीर व्हायचा आणि जेमतेम दोन पानांवर मदार जायची. वीस वर्षांच्या डायरीजसाठी कप्प्यांचं कपाट करणारी मी, वीस दिवसांत नांगी टाकायची. नूतन वर्षाच्या नूतनदिनी सर्व पुस्तकांच्या माथ्यावर राणीसारखी विराजमान झालेली ही नूतन डायरी कधी त्या पुस्तकांच्या ढिगार्यात तळाशी जाऊन पोहोचायची ते कळायचंही नाही. एवढं होऊनही दरवर्षी नवीन डायरी घ्यायचा उत्साह तेवढाच असायचा आणि वीस वर्ष डायरी लिहिली नाही पण वीस वर्ष मी वर्षाअखेरीस नव्या-कोर्या डायरीची खरेदी सातत्याने केली आणि त्यात मात्र सातत्य राखलं ह्याचा आजही मला अभिमान आहे. अहो, कशाततरी सातत्य असणं ही सोप्पी गोष्ट नाही, साध्या-सुध्या माणसाचं ते कामंच नाही. कारण फक्त डायरी लिहिण्याच्या प्रकारातच नाही तर असं सातत्य मी अनेक गोष्टींमध्ये अबाधित राखलंय. रोज सकाळी चालायला जाणं, त्यासाठी नवीन शूज आणि जॉगिंग सूट्सची खरेदी करणं, रोज सकाळी जिमला जाणं, त्यासाठी ट्रेनिंग-रनिंग शूज आणि कपडे खरेदी करणं, पोहणं हा तर सर्वांगाला व्यायाम म्हणून स्विमिंग कॉश्च्युम, कॅप, गॉगल, सराँग आदी गोेष्टींना वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करणं, एक तारखेपासून गोड खाणं सोडायची प्रतिज्ञा करणं ह्या गोष्टी दरवर्षी मी दिमाखात सुरू केल्या अगदी नित्यनेमाने आणि तेवढ्याच नित्यनेमाने मी त्या सोडल्या. तरी बरं, स्मोकिंग आणि ड्रिंकिंग ह्या सवयी नव्हत्या नाहीतर त्याही गोष्टी ह्या सोडण्याच्या यादीत विराजमान झाल्या असत्या. अॅक्चुअली ह्यात माझा दोष नाहीये. हे सगळं करीत असताना कुठेतरी वाचलं जायचं, ‘इट्स ओके, नॉट टू बी परफेक्ट!’ किंवा ‘व्हेन यू डू सच थिंग्ज, इट शोज, यू आर अ परफेक्ट ह्युमन बीइंग’. आता ह्युमन बीइंग नसल्याचा ठप्पा कोण कपाळी मारून घेणार? त्यामुळे दरवर्षी हा धरसोडीचा प्रकार चालूच राहिला.
आता आज मला पुन्हा एकदा नव्या दमाने काहीतरी सुरुवात करायचीय. कारण उद्या आहे सोमवार आणि एक जानेवारी, हे कॉम्बिनेशन दरवर्षी थोडं येतं? ह्या सोमवारी एक जानेवारी दोन हजार अठराचं स्वागत करताना एवढं नवं-कोरं वर्ष त्या जगनिय्यत्याने आपल्या झोळीत टाकल्याबद्दल काहीतरी करायला हवं, नाही का? पण मी आता इतक्या वर्षांनी थोडी शहाणी झालेय. उद्या काहीतरी नव्याने आणि सातत्याने सुरू करायचंय म्हणून कोणतीही खरेदी मी केली नाहीये. कोणतंही रेझंल्युशन मी करणार नाहीये. माणसाला कधीतरी शहाणपण सुचतं ते असं. नो रेझंल्युशन हाच विचार खूप रेव्हल्युशनरी आहे असं माझं मलाच वाटायला लागलंय. मनातल्या मनात आपलीच खुशामत करायचा हा प्रकार. असो, आदतसे मजबूर. ‘रेव्हल्युशन’ हा शब्द लिहिला आणि एकदम असंख्य विचार जमा व्हायला लागले मनात. युगान-युगे झालेल्या अनेक रेव्हल्युशन्स आपण, ऐकल्या आहेत. अमेरिकन रेव्हल्युशन, चायनीज रेव्हल्युशन, क्युबन रेव्हल्युशन, रशियन रेव्हल्युशन आणि आपल्या जास्त माहितीची फ्रेंच रेव्हल्युशन तसंच इंडस्ट्रीयल रेव्हल्युशन, सोशल रेव्हल्युशन, टेक्नॉलॉजिकल रेव्हल्युशन इ. कोणतीही क्रांती म्हटली मग ती राज्यक्रांती असो, औद्योगिक क्रांती असो किंवा तंत्रज्ञानाची क्रांती असो, ती कधीही सोप्पी नव्हतीच. कधी त्यासाठी रक्तरंजित सडे पडले तर कधी एकेका पिढीचे प्रयत्न खर्ची पडले. पण ह्या अनेक जनरेशन्सनी किंमत मोजून एक सुंदर असं जग आपल्या स्वाधीन केलं. स्पेस, कम्युनिकेशन, हेल्थ केअर, अॅग्रिकल्चर, इंटरनेट ह्याद्वारे आपल्याला जे काही लाभ झाले आहेत ते बघता, ‘ह्यापेक्षा सुख आणि सुविधा काय असू शकतात’. असा प्रश्न विचारावासा वाटतो. आपण नशीबवान आहोत, रीयली ब्लेस्ड. आज आपण कुठे आहोत? मग तो समाजाचा अगदी निम्न स्तर असला तरी आपल्याला कुठे जायचंय हे आपण आज ठरवू शकतो, आपल्याला त्यासाठी अनेक अपॉर्च्युुनिटीज आणि ऑप्शन्स उपलब्ध आहेत. कठोर मेहनतीच्या जोरावर पुढे आलेल्या अनेकांची उदाहरणं आपल्या आजुबाजूला दिसताहेत. एखादी गोष्ट ठरवली, त्याचा पाठपुरावा केला, त्यासाठी कठोर परिश्रम केले तर इच्छित यशापासून आणि आर्थिक सुबत्तेपासून कुणीही वंचित राहू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्या स्वाधिन केलीय, जी आपल्याला जतन करायचीय, वाढवायचीय आणि त्यासाठी आज ह्या वर्षाच्या शेवटी एकतीस डिसेंबरला मला एकंच गोष्ट सारखी नजरेसमोर येतेय ती म्हणजे रेव्हल्युशन. मी माझ्याच विरूध्द उभी ठाकलेली मानसिक क्रांती, मेंटल रेव्हल्युशन. वारसाहक्काने आपल्याला मिळालेलं हे सुंदर जग जतन करीत पुढच्या पिढीसाठी ते आणखी सुंदर करण्याची आपली अलिखित जबाबदारीच आहे. त्यासाठी मला माझं मन खंबीर करीत चांगल्या विचारांना चालना देत, आचरणाला योग्य दिशा देऊन कोणतंही आव्हान पेलायला स्वतःला तयार करायचंय. ह्याची परिणिती निश्चितपणे माझं आरोग्य सशक्त होण्यात होईल. एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी ‘सर सलामत तो पगडी पचास’ हे कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. आज माझ्या मनात दडुन बसलेल्या सगळ्या नकारात्मक, प्रेरणाहीन, भीतिदायक अशा सैतानाला नामोहरम करून अक्षरशः क्रांती घडवायचीय. एकदाका ही रेव्हल्युशन यशस्वी करण्यात मी यशस्वी झाले की मग मागच्या पिढीने सोपवलेली माझी जबाबदारी चांगल्या तर्हेने पार पाडायला मी तयार होईन. मिलेनियममध्ये बदल घडताना, त्याचा गोड-गोड अठराव्या वर्षात प्रवेश होताना मी माझ्यात क्रांती घडवतेय आणि तयार होतेय येणारं आयुष्य झेलायला, अधिक मजबूत अधिक ताकदवान होऊन. आणि तुम्हालाही सर्वांना शुभेच्छा देतेय. ‘हॅप्पी न्यू इयर! लेट्स लिव्ह हॅप्पी, हेल्दी अॅन्ड स्ट्रेसलेस लाईफ!’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.