पहिलावहिला नवाकोरा पासपोर्ट जेव्हा हातात येतो तेव्हा आनंदानं मन मोहरून उठलं नसेल असं क्वचितच कुणाच्या बाबतीत झालं असेल. माझा नवा पासपोर्ट पहिल्यांदा जेव्हा हातात आला तो दिवस मला अजूनही आठवतोय. प्रथम त्याकडे डोळे भरून पाहिलं. त्यावर हलकासा हात फिरवला, तो उघडून त्याचा सुगंध घेतला जसा नव्या पाठ्यपुस्तकाचा घ्यायचे तसा. त्यावरचं माझं नाव चेक केलं तेव्हा तर आपण कुणीतरी खास असल्याचा भास झाला. माझ्या देशप्रेमी मनाला आपल्याला भारताने एक मजबूत नागरिकत्त्व बहाल केल्याचा आनंद झाला.
तुमच्यापैकी किती जणांकडे पासपोर्ट आहे? वीणा वर्ल्ड सेल्स मीटच्या वेळी सुधीरनी प्रश्न विचारला. बरेचसे हात वर आले-ज्यांचे हात वर आले नाहीत त्यांना उद्देशून सुधीर म्हणाले, ज्या मेंबर्सकडे पासपोर्ट नाही ती मंडळी एकतर स्वत:वर विश्वास ठेवीत नाहीयेत किंवा टूरिझमवर. जर मी आज टूरिझममध्ये प्रवेश करतोय तर माझ्या मनात एक गोष्ट पक्की पाहिजे की माझ्या मेहनतीवर, माझ्या स्वकर्तृत्वावर जगाची प्रदक्षिणा पूर्ण करीन. माझ्यासमोर वीणा वर्ल्डचे रोज इतके टीम मेंबर्स दिसताहेत, कुणी पाच खंडांवर पाय रोवलाय तर कुणी सातही खंड काबीज केलेयेत. आपल्या विवेक कोचरेकरने यावर्षी म्हणजे त्याच्या वयाच्या सदतीसाव्या वर्षी सप्तखंडांवर स्वत:चा आणि वीणा वर्ल्डचा झेंडा फडकवलायंच पण तो शंभर देशही पूर्ण करतोय. तिशीतच पन्नास देश पूर्ण केलेले अनेक टूर मॅनेजर्स आपल्याकडे आहेत. ते जर त्यांच्या कर्तृत्वावर ह्या गोष्टी सहज साध्य करू शकतात, शंभर देश पूर्ण करण्याकडे आगेकूच करतात तर मी का नाही? हा प्रश्न तुम्हाला पडला नाही? बर्याचदा आपण इच्छा ठेवायलाही बिचकतो. स्वप्न बघा तर ते सत्यात येईल. टूरिझममधल्या प्रत्येकाने अखंड पर्यटनाचं-जग बघण्याचं स्वप्न उराशी बाळगलं पाहिजे. आपण बर्याचदा विचार करतो की, मी अजून राज्याच्या बाहेर पाय ठेवला नाही, जग बघण्याचा विचारही करणं पाप आहे. हा विचारच आपल्याला मागे खेचतो. आजपासून हा विचार आपण आपल्या मनातून हद्दपार करायचाय. आयुष्याकडे मागायला शिकूया आणि ते हासिल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. दुसरी गोष्ट अशी आहे किंवा असू शकते की, तुम्ही तुमच्या करियरबाबत क्लीअर नाही आहात. कुठेतरी जॉब करायचाच म्हणून जर तुम्ही ह्या क्षेत्रात आला असाल तर तुमच्यासाठी टूरिझम हे क्षेत्र नाही. कारण इथे ह्या इंडस्ट्रीमध्ये मनापासून सेवा द्यावी लागते. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि यात मन ओतलं नसेल तर तुम्ही फार काळ ह्या इंडस्ट्रीत सर्व्हाइव्ह होणार नाही. स्वत:ला ओळखा, जर हे क्षेत्र तुमच्यासाठी नसेल तर वेळ घालवू नका. आजच बाहेर पडा, आवडीच्या क्षेत्रात जा. आणि जर इथे रहायचा निर्णय पक्का असेल तर मात्र कंबर कसून कामाला लागा. भारतात टूरिझम रीव्हॉल्युशन येऊ घातलीय. अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. स्वत:ला तयार करा त्यासाठी. कंबर कसून कामाला लागा. आणि येत्या तीन महिन्यात ज्यांच्याजवळ पासपोर्ट नाही त्यांनी स्वत:चा पासपोर्ट तयार करण्याने ह्याचा श्री गणेशा करा. लाईफ इज शॉर्ट, डोन्ट वेस्ट टाईम, मेक अ डिसिजन टूडे अॅन्ड अॅक्ट टूवडर्स इट विथ क्लीअर माईंड! काही टीम मेंबर्सनी तिथल्या तिथे सुधीरना पासपोर्ट तयार करण्याचं प्रॉमिस केलं आणि त्यासाठीच्या कागदपत्रांंची जुळवाजुळवही केली. सुधीरच्या कळकळीच्या बोलण्याने एकूणच पर्यटनरुपी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
पासपोर्ट आहे का? हा प्रश्न मी आता तुम्हाला विचारते. आणि मला खात्री आहे, अनेक जणांकडे तो नसणार आहे. ह्या पासपोर्ट नसल्याला अनेक कारणं असू शकतात. एक, पासपोर्ट आजही अनेक जणांच्या दृष्टीतून श्रीमंती थेरं ह्या प्रकारातला वाटतो. दुसरं आपण कुठे जाणार आहोत परदेशात तर आपल्याला पासपोर्टची गरज आहे? हा प्रश्न डोक्यात पक्का बसलेला असतो. तिसरं, डॉक्युमेंटेशनच नको वाटतं, हा दाखला आणा-ते सर्टिफिकेट जोडा ही कटकट वाटते. चौथं कारण पैशाचं असू शकतं की आत्ता तर फॉरिनला जायचं नाहीये नं मग पासपोर्ट तयार करण्याचा खर्च आजच कशाला अंगावर घ्यायचा? मलातरी वरकरणी ही कारणं दिसली, ह्याहून वेगळीही असू शकतात. ज्यांच्या ज्यांच्याकडे पासपोर्ट नाही त्यांनी आजच कारण शोधायचं, पासपोर्ट का अजून केला नाही त्याचं आणि पासपोर्ट काढण्याच्या तयारीला लागायचंय. रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती आहे पासपोर्ट. आपण भारताचे एक सन्माननीय नागरीक आहोत ह्याचा एक सुस्पष्ट दाखला. परदेशात बहुतेक देशात बाळ जन्माला आल्यानंतर लागलीच त्याला नाव दिलं जातं आणि लगेचच त्याचा पासपोर्ट काढला जातो. आपल्याकडेही तो दिवस फार दूर नाही. कदाचित सरकारच ती गोष्ट हाती घेईल. सरकारला संपूर्ण भारतासाठी ही गोष्ट जेव्हा करायची तेव्हा करू दे पण विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर ही गोष्ट त्यांनी सक्तीची करावी. ज्यांना आर्थिकदृष्ट्या हे शक्य नाही त्यांना सवलत देऊन करून घ्यावी. जग जवळ आलंय, खेळात-विज्ञानात-संशोधनात आपले भारतीय विद्यार्थी अतुलनीय कामगिरी बजावताहेत. त्यांना परदेशी आपलं कौशल्य दाखविण्याची सुसंधी कधीही येऊ शकते, पासपोर्ट नाही म्हणून संधी गेली असं व्हायला नको, किंवा ऐनवेळी तो करण्यात येणारा मानसिक व आर्थिक मनस्तापही नको. प्रत्येक विद्यार्थ्याकडे पासपोर्ट असणं ही गोष्ट मला आणखी एका दृष्टीने महत्त्वाची वाटते ती म्हणजे, पासपोर्ट हे एक स्वप्न आहे. तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी त्या पासपोर्टकडे- स्वत:च्या भविष्याकडे समथिंग टू लूक फॉरवर्ड टू अशा नजरेने जेेव्हा बघते, भविष्यात मला हे-हे करायचंय असं मनाशी ठरवून जेव्हा अभ्यासाला लागते तेव्हा आज माझं वास्तव कसंही असलं तरी मला फरक पडत नाही, कारण मला तो पासपोर्ट काहीतरी छानसं खुणावत असतो, मला कुठे पोहोचायचंय ते दाखवत असतो. कुणाला त्यात ऑलिम्पिक्स दिसेल तर कुणाला एमआयटी हारवर्ड ऑक्सफर्डसारख्या युनिर्व्हसिटीज, तर कुणाला नासा किंवा अंटार्क्टिकाचा तळ संशोधनासाठी साद घालील. पासपोर्ट हे मला एक इन्स्पिरेशन वाटतं.
आठवून बघा बरं, तुमचा पहिला पासपोर्ट तुम्ही कधी काढला होतात? बर्याच जणांकडे पहिल्या पासपोर्टपासून सगळे पासपोोर्ट जतन केलेले असतील. एकदा एअरपोर्टवर इमिग्रेशन लाईनमध्ये एक व्यक्ती किमान वीस पासपोर्ट घेऊन उभी होती. इमिग्रेशन ऑफिसरपासून आम्ही सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने बघत हसत होतो. आता डिजिटलायझेशननंतर हा देखावा बघायला मिळत नाही पण पूर्वी बर्याचदा अशा व्यक्ती नजरेला पडायच्या. अर्थात आजही तीन ते पाच पासपोर्ट बर्याच प्रवाशांकडे असतात. मी पण नेहमी तीन पासपोर्ट्स घेऊन प्रवास करते. एक करंट पासपोर्ट, दुसरा युनायटेड किंगडमचा व्हॅलिड व्हिसा ज्यावर आहे तो आणि तिसरा ज्यावर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा व्हिसा आहे तो. न जाणो तिथल्या तिथून एका देशातून दुसर्या देशात जावं लागलं तर, पासपोर्ट सोबत आणला नाही म्हणून अडचण व्हायला नको. पहिलावहिला नवाकोरा पासपोर्ट जेव्हा हातात येतो तेव्हा आनंदानं मन मोहरून उठलं नसेल असं क्वचितच कुणाच्या बाबतीत झालं असेल. माझा नवा पासपोर्ट पहिल्यांदा जेव्हा हातात आला तो दिवस मला अजूनही आठवतोय. प्रथम त्याकडे डोळे भरून पाहिलं. त्यावर हलकासा हात फिरवला, तो उघडून त्याचा सुगंध घेतला जसा नव्या पाठ्यपुस्तकाचा घ्यायचे तसा. त्यावरचं माझं नाव चेक केलं तेव्हा तर आपण कुणीतरी खास असल्याचा भास झाला. माझ्या देशप्रेमी मनाला आपल्याला भारताने एक मजबूत नागरिकत्त्व बहाल केल्याचा आनंद झाला. माझ्या असण्याचा तो ठोस पुरावा मी माझ्या कपाटात जीवापेक्षा जास्त जपला. जेव्हा-जेव्हा तो पासपोर्ट माझ्या नजरेसमोर यायचा तेव्हा-तेव्हा मी मनाने जगातल्या अनेक देशात पोहचलेले असायचे. माझा पहिला पासपोर्ट ज्याची व्हॅलिडीटी दहा वर्ष होती तो कोराच राहीला. परदेशातील देशांचा एकही इमिग्रेशन स्टॅम्प माझ्या पासपोर्टवर आला नाही. पण मी त्या पासपोर्टकडे कधी रागाने पाहिलं नाही. हा पासपोर्ट कोराकरकरीत राहून संपल्यावर जेव्हा मी दुसरा पासपोर्ट काढायला गेले, तेव्हा सुद्धा मी तेवढ्याच अगदी जणू पहिला पासपोर्ट काढतेय ह्या उत्साहात गेले आणि दुसरा पासपोर्ट काढला. दहा वर्ष तशीच गेली तरीही ह्या दुसर्या पासपोर्टवर नक्कीच कोणत्यातरी देशाचा व्हिसा येईल ही ईच्छा आणखी प्रबळ झाली होती. गली बॉय सिनेमाच्या भाषेत सांगायचं तर अपना टाईम आयेगा। असं वाटत रहायचं. दुसर्या पासपोर्टवर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मी थायलंड सिंगापूरच्या पहिल्यावहिल्या परदेश प्रवासाला निघाले. मग मागे वळून पाहिलं नाही. जग बघण्याचं, सप्तखंडांवर पाय ठेवण्याचं माझं कधी काळी बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं होतं. गेली काही वर्ष पायाला भिंगरी लागल्यासारखी फिरले. कधी-कधी तर असं व्हायचं की मी एअरपोर्टवर एक क्षण थांबायचे, मी कोणत्या एअरपोर्टवर आहे आणि कुठे निघालेय हे आठवायचे आणि पुढे जायचे. गझनी सिनेमातलं आमिरच्या संजय सिंघानिया या कॅरॅक्टरसारखं झालं होतं माझं. आमच्या टूर मॅनेजर्सची परिस्थिती ह्यापेक्षा वेगळी नसणार ह्याची मला खात्री आहे. ह्या अखंड पर्यटनाने आम्हा सर्वांच्याच व्यक्तिमत्त्व विकासात भर पडली असं म्हणायला हरकत नाही, शहाणपण कदाचित यायचं असेल अजून पण आयुष्य सुसह्य व्हायला, त्यातली आव्हानं पेलायला प्रवासातल्या अनंत अनुभवांची शिदोरी कामी आली असं निश्चितपणे म्हणू शकते.
प्रत्येकाकडे पासपोर्ट असणं हे आणखी एका दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे कोणत्याही अपॉर्च्युनिटीसाठी आपण रेडी असणं. संधी एकदाच दार ठोठावते असं म्हणतात, आणि आजच्या जगात एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत की संधी येईल तेव्हा बघू म्हणणारे मागे पडणार आहेत, कारण दुसरा कुणीतरी जो रेडी आहे किंवा ज्याने स्वत:ला रेडी ठेवलंय तो ती सुसंधी पटकावणार आहे, आपल्याकडून हिसकावणार आहे. सो, आपली मानसिकता तशी बनवूया. लेट्स ऑलवेज बी रेडी, स्टेडी, गो!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.