परिस्थिती आपल्या हातात नाही म्हणून तर सतत परिस्थितीनुरुप आपल्याला मन:स्थिती बदलावी लागते. अशावेळी येणारा प्रत्येक क्षण मनापासून का जगू नये? लेट्स सेलिब्रेट! आम्ही आनंदाच्या व्यवसायात आहोत. उत्सव हा आमच्या व्यवसायाचा कणा आहे. पर्यटकांच्या घरची परिस्थिती आमच्या हातात नाही पण त्यांची मन:स्थिती अंशत: आनंदी करण्याचा जो मार्ग आम्ही आमच्या जीवनाचं लक्ष बनवलंय तो सुकर व्हावा म्हणून तर प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.
आपला भारत उत्सवप्रिय आहे, अर्थात आपल्याही उत्साहाला कायम उधाण आलेलं असतं, आणि का येऊ नये? ह्या गाण्याच्या ओळी मला फार भावतात, ‘आनेवाला पल जानेवाला है। हो सके तो इसमे जिंदगी बितादो पल जो ये जानेवाला है।’ चलो जीये अपनी जिंदगी। आयुष्य कसं जगावं ह्यासाठी आज इतके मार्ग उपलब्ध झालेत किंवा इतक्या गोष्टींचा भडिमार आपल्यावर होतोय की गोंधळायलाच जास्त झालंय. आपल्या सभोवताली कधीही नव्हतं एवढं प्रचंड मायाजाल आपणच तयार करुन ठेवलंय, त्यात गुरफटण्याआधी भानावर यायला हवं आणि साधं सोप्प सरळ आनंदी आणि समाधानी आयुष्य जगण्याचं तंत्र आत्मसात करायला हवं. तंत्रज्ञानाने सोयी-सुविधांचा सागर आपल्यासमोर खुला केलाय. कष्टप्रद आयुष्य सुखावह झालंय. कामं चुटकीसरशी व्हायला लागलीयत. प्रचंड वेळ वाचतोय, पण हा वाचणारा वेळ आपण कुठे घालवतोय ते तपासून घ्यायला हवं. मागच्या आठवड्यात बॉस्टनला राहणारा माझा मामेभाऊ स्वप्नील राऊत त्याच्या कुटुंबासह मुंबईत होता काही दिवस. भेट झाल्यावर गप्पांचं आदान-प्रदान करताना टिपिकल
‘इंडिया-अमेरिका’ ‘तुमचं-आमचं’... गोष्टी चालू असताना स्वप्नीलची पत्नी उमा म्हणाली, ‘आम्ही एकमेकांशी जास्त बोलतो. गॅझेट्सपासून दूर राहतो’ प्रत्येक संवादामधनं किमान एक विचार मिळतोच मिळतो. ह्या आमच्या संवादाचं फलित ते होतं, ‘वुई टॉक टू इच अदर’. अंदमानला आमचा एक असोसिएट आहे अक्षय रावत, त्याचं हॅवलॉक आयलंडवर एक रेस्टॉरंट आहे तिथे गेले होते जेवायला. लंचची वेळ होती. मुंबईत ऑफिस सुरू होतं. प्रवासात ऑफिसशी संपर्क तुटला होता त्यामुळे जरा खबरबात घेेऊया म्हणून फोन हातात घेतला आणि वाय-फाय कोड काय म्हणून विचारण्यासाठी डोकं वर केलं आणि लक्ष समोरच्या भिंतीवर गेलं. तिथे मोठ्ठ्या अक्षरात लिहिलं होतं, ‘वुई डोन्ट हॅव वाय-फाय, टॉक टू इच अदर’ मलाच आपल्या फोनविषयीच्या अतिप्रेमाची थोडी लाज वाटली, आणि सुमडीत फोन पर्समध्ये ठेवून दिला. आणि सर्वांशी बोलका संवाद सुरू केला. अक्षयचं अभिनंदन केलं म्हटलं, तू हे भिंतीवर लिहिलेलं फटकारणं मला आवडलं. आजकाल काही रेस्टॉरंटनी जेवताना मोबाईल बाजूला ठेवला, अजिबात त्याकडे ढुंकून पाहिलं नाही आणि सोबत आलेल्या माणसांशी गप्पा मारल्या तर बीलामध्ये दहा टक्के सवलत सुरू केलीय. व्हॉट्स अॅपवर खूप पूर्वी फॉरवर्ड झालेले दोन फोटो मला इथे आठवले. एका आजीला भेटायला सगळी नातवंडं आलेली असतात. सगळी आजीच्या सभोवती प्रेमाने बसलेली पण प्रत्येकाचं डोकं मोबाईलमध्ये खूपसलेलं आणि आजी हताशपणे त्यांच्याकडे बघतेय. दुसरं चित्र होतं जपानच्या की लंडनच्या एका रेल्वे स्टेशनवरचं. गाडीसाठी प्रचंड गर्दी थांबलीय. प्रत्येक जण मोबाईलवर बिझी अगदी गर्क. त्यात एका माणसाला सर्कल करून दाखवलं होतं आणि लिहिलं होतं, ‘अॅट लास्ट वुई स्पॉटेड अ मॅड मॅन हू वॉज लुकिंग अॅट द नेचर’ अर्थात हा जोक म्हणून फॉरवर्ड असला तरी व्हर्च्युअल वर्ल्डमुळे जगात निर्माण होणार्या महाभयानक रोगाची जाणीव करून देत होते हे नक्की. वेळीच प्रत्येकाने स्वत:ला सावरणं खूप गरजेचं झालंय.
‘मॅड मॅन लुकिंग टू द नेचर’ हा जोक आम्ही मात्र प्रत्यक्षात उतरवतोय. पर्यटनामुळे आम्हाला एक खूलं दार मिळालंय जिथे माणसाचं मशीन बनण्याच्या आत आम्ही त्याला पुन्हा माणसात आणण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी थोडंसं योगदान देऊ शकतो. आणि म्हणूनच आम्ही हा पर्यटनव्यवसाय करताना कितीही अग्रेसिव्ह असलो, कमर्शियली आम्ही हा बिझनेस करीत असलो तरी भविष्यात येऊ घातलेल्या ह्या प्रॉब्लेमला टक्कर द्यायचा प्रयत्न करतोय. जस्ट इमॅजिन, आपल्या मोबाईलला चिकटून बसलेली, लॅपटॉप मांडीवर घेऊन पाठीच्या कण्याचं खोबरं करीत तानसतास गढून गेलेली, ‘पिन टू इलिफंट’ सगळं काही ऑनलाईन खरेदी करण्यात गुंग झालेली, कुठे डिस्काउंट किती जास्त मिळतं ह्यासाठी कॉम्प्यूटरसमोर डोळ्याच्या खाचा करीत खूर्चीला तासनतास खिळून बसणारी ही जनरेशन नकळतपणे काय तर्हेचे फिजिकल आणि मेंटल प्रॉब्लेम्स निर्माण करणार आहे हे देवच जाणे. त्यासाठीच पर्यटनाचा प्रचंड अवेरनेस निर्माण करणं, ह्या तरुण जनरेशनची खूर्चीवरून उचलबांगडी करीत निसर्गाच्या जवळ नेणं, छोट्या मोठ्या पर्यटनाच्या माध्यमातून इतिहास, भुगोल, निसर्ग, शिल्पकला, हस्तकला, माणसामाणसातलं वैविध्य, भाषा, भोजन इत्यादी सगळ्याचा अनुभव देणं ह्या गोष्टी आम्ही करतोय. आज हा लेख लिहिताना मी थायलंडला आहे. बँकॉकमध्ये काल पावणे तीनशे महिलांचा इव्हेंट आम्ही केला. त्यात बर्याच तरुण मुली होत्या. एकूणच सगळा माहोल इतका खूश होता की काही विचारू नका. ह्या तरुण जनरेशनमधल्या मुलीच्या चेहर्यावरचा आनंद मला समाधान देत होता. नुस्त्या चिवचीव करीत होत्या. ‘काय बरं वाटलं’, ‘ऑफिसपासून टोटली दूर, अक्षरश: रीज्युविनेट झालो’ ‘वुई सिंपली फ्रिक्ड आऊट’ ‘कॅन यू टेक इन्स्टॉलमेंट्स फ्रॉम अस् आणि आम्हाला वर्षाला एक टूर मस्ट करून टाका’. किती सजेशन्स देत होत्या काही विचारू नका. पण मला सगळ्यांच्यात त्या व्हर्च्युअल वर्ल्डपासून दूर आल्याचा आनंद जाणवत होता. आणि त्या जाणीवेतून माझा पर्पज किंवा आमच्या पर्यटनात असण्याचा हेतू जास्तीत जास्त क्लीअर होत होता. कोणताही व्यवसाय हा फक्त पैसे कमवण्यासाठी नसावा. त्यातून समाजाचा कोणतातरी प्रॉब्लेम सोडवला गेला पाहिजे. आणि जेव्हा मनापासून तसे प्रयत्न होतात तेव्हा समाधान मिळतं आणि पैसाही येत राहतो. हेतू चांगला असेल, प्रयत्न प्रामाणिक असतील तर पैशाच्या पाठी लागावं लागत नाही. तो आपोआप येतो.
सिंगल्स स्पेशल ही कल्पनासुद्धा वीणा वर्ल्ड झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात आणली ती ह्याच हेतूने की, वीस ते पस्तीस वयातल्या तरुण तरुणींना त्यांच्या रोजच्या टेंशन-स्ट्रेस-टार्गेट्स ह्या सगळ्यांतून बाहेर काढायचं आणि निसर्गाच्या जवळ न्यायचं, हायकिंग ट्रेकिंग राफ्टिंग अशा अॅडव्हेंचर गेम्सचा त्यांना अनुभव घ्यायला लावायचा, कॉम्प्यूटर आणि मोबाईलच्या बाहेरचं जग जास्त सुंदर आहे ह्याची त्यांना जाणीव करून द्यायची. आपण जीवंत असणं हे भाग्य आहे पण त्या जीवंत असण्यात जीवंतपणा आणण्यात पर्यटनाच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करण्याचा आम्ही विडा उचललाय. ‘बीइंग सिंगल’ हे जर अनेकांनी निवडलेलं एक सेलिबे्रशन असेल तर त्या सेलिब्रेशनचा बॅश उडवायला रीझन देणं वीणा वर्ल्डचं कर्तव्य आहे. आम्ही महिलांना असं सेलिब्रेशन करायला लावलं वुमन्स स्पेशलच्या माध्यमातून अकरा वर्षांपूर्वी, त्याचवेळी सीनियर्सनाही आयुष्याचा उत्तरार्ध किती छान असू शकतो हेही सप्रमाण दाखवून दिलं सीनियर्स स्पेशलद्वारे. आजही मी अनुभवणार आहे थायलंडला सीनियर्स स्पेशलमधून आलेल्या, खर्या अर्थाने तरूण झालेल्या मुलामुलींचा ओसंडता उत्साह. किती लकी आहे बघानं, दर आठवड्याला मला असं ह्या महिलांच्या आणि सीनियर्सच्या उत्साहात न्हाऊन निघायला मिळतं. व्हॅलेंटाइन डे पासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कोणताही सीझन असू दे तुमच्या सेलिब्रेशनचं, वीणा वर्ल्ड आहे तुमच्या दिमतीला. आत्ता डॉरिस डे यांनी लिहिलेलं गाणं आठवतंय, ‘के सेरा सेरा, व्हॉटएव्हर विल बी, विल बी... फ्यूचर इज नॉट अवर्स टू सी के सेरा सेरा’... सेलिब्रेट एव्हरी मोमेंट, लेट्स सेलिब्रेट लाईफ!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.