वुमन्स स्पेशल ही आमची अनेक सहलींसारखी एक सहल, थोडक्यात कमर्शियल व्हेंचर, पण ती सहल तशी कधी वाटलीच नाही. मनाचा अणि हृदयाचा कोणतातरी कोपरा तिने व्यापलेला आहे. सहा वर्षांपूर्वी वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा पहिली सहल आम्ही आयोजित केली ती वुमन्स स्पेशलची, त्या सहलीने आम्हाला सांगितलं की, ‘आम्ही आहोत पाठीशी, आगे बढो।’
एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्स अॅप आला, ‘मी घाटकोपरची रेखा. सध्या स्कॅन्डिनेव्हिया रशियाच्या च्या वुमन्स स्पेशल सहलीवर आहे. ही माझी वीणा वर्ल्डसोबतची आठवी वुमन्स स्पेशल. याआधी युरोप, दुबई, श्रीलंका, भूतान, जपान, गुजरात रण ऑफ कच्छ, पाँडिचेरी इतक्या ठिकाणी मी बिनधास्त भटकलेय वीणा वर्ल्डसोबत. प्रत्येक सहल मस्त झालीय. तुमचे टूर मॅनेजर्स ऑसम. वुई आर एन्जॉयिंग टू द फुल्लेस्ट’. आता अशातर्हेचे फीडबॅक प्रत्येक टूरचे येतात किंवा ते यायलाच हवेत कारण त्यासाठीच तर पर्यटकांनी वीणा वर्ल्डवर विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला जपण्यासाठी टीम अहोरात्र मेहनत घेतेय. त्यामुळे या फीडबॅकने हवेत जाण्याचं कारण नाही तर ते आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्याबरहुकूम घडलं पाहिजे, त्यासाठीच तर पर्यटक त्यांचे कष्टाने कमावलेले पैसे वीणा वर्ल्डकडे सहलीसाठी भरतात. इथे वुमन्स स्पेशलला तर विश्वास आणि सुरक्षितता हा महत्त्वाचा भाग. ती जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून व्यवस्थित बजावतोय ह्याचा सार्थ अभिमान आहे. पण या छोट्याशा व्हॉट्स अॅपमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एक- स्कॅन्डिनेव्हिया रशिया, दोन-आठवी टूर, आणि तीन-‘एन्जॉयिंग टू द फुल्लेस्ट’. पहिली वुमन्स स्पेशल केली होती तेव्हाचे दिवस आठवले आणि म्हटलं, ‘याचसाठी केला होता अट्टाहास’.
पहिल्यांदा वुमन्स स्पेशलचा विचार मनात आला तेव्हा वाटलं की, ‘खरंच अशातर्हेने महिला घरातून बाहेर पडतील का? कशातर्हेने ही गोष्ट पुढे जाईल? वाढवता येईल? जर ती चांगली झाली तर ती वर्षानुवर्ष कशी चालत राहील? तेवढं सातत्य आपल्याला ह्या प्रयोगात राखता येईल का?’ दोन हजार सहामध्ये पहिली सहल जाहीर केल्यानंतर त्याला आलेल्या तीनशे महिलांच्या संख्येने दाखवून दिलं की घरासाठी आणि समाजासाठीही ह्याची गरज आहे. मुलगी शिकणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मुलगी आनंदी होणंसुद्धा, आणि मुलीच्या आनंदाचं एक छोटसं कारण मला गवसलं होतं. पहिल्यांदा प्रत्येक सहलीला संपूर्ण सहलभर आमच्या टूर मॅनेजर्ससोबत मी ही जायचे. सर्वकाही ठीक आहे नं हे बघणं होतच पण माझा जास्त वेळ निरीक्षणातच जायचा. कोण महिला ह्या सहलींना येतात? कुठून कुठून येतात? साडी नेसणार्या, पंजाबी ड्रेस घालणार्या, जीन्स, स्कर्टवाल्या किती आहेत? सतत साडी नेसणारीला जीन्स किंवा स्कर्ट घालावासा वाटतो का? ह्यातून अॅक्च्युअली बनली एक संकल्पना. साडीतून-सलवार कमिज, सलवार कमिजमधून स्कर्ट, स्कर्टवरून जीन्स, जीन्सवरून मिनी स्कर्ट आणि एखादं पट्टाया गोवासारखं डेस्टिनेशन असेल तर अगदी स्विमिंग कॉश्युमसुद्धा. हे कपड्यांमधलं परिवर्तन होतं, ह्यात कुठेही थिल्लरपणा नव्हता. पेहेरावात बदल करणं हे त्यातल्या त्यात सोप्प काम होतं. त्या आधीचा एक पहिला पाडाव पार केला होता, तो म्हणजे महिलांनी एकटीने घराबाहेर पडण्याचा विचार तिने स्वत: मान्य केला होता आणि घरच्यांनीही त्याला स्विकारलं होतं. म्हणजे अगदी लिहिलंय एवढं सहजासहजी हे निश्चितच झालं नाही. ‘काय म्हणतेस एकटी जाणार तू? नवर्याला सोडून? आणि मुलाबाळांचं काय? आई भटकतेय आणि नवरा मुलं सांभाळतोय? काय अडलंय एवढं एकटीने जाण्यासारखं? आम्ही नाही बाबा असे नवरा मुलांना सोडून भटकभवानीसारखं बाहेर भटकत! जायलाच पाहिजे का? पैसे काय वर आलेत असे उधळायला? लोक काय म्हणतील ह्याची तरी लाज?...’ असे अनेक तिरकस शेरे कधी घरातून तर कधी शेजारातून तर कधी ऑफिसमधून ऐकायला मिळायचे. कुणी समोर तोंडावर बोलायचे तर कुणी मागून कुजबूज करायचे, कुणी तर न बोलता नुसत्या नजरेनेच घायाळ करायचे. ह्या सगळ्यांनी मनातला एक कोपरा भितीने व्यापायचा तर दुसरा गिल्टने. आपण काहीतरी चुकीचं तर करत नाही? ही भावना कधी कधी इतकी तीव्र व्हायची की काहीजणी सहलीवर ढसाढसा रडायच्या, ‘मी इथे मजा करतेय आणि त्यांचं तिथे ठीक चाललं असेल ना!’ ह्या विचाराने व्याकूळ व्हायच्या. मग कौन्सिलिंगही करावं लागायचं. ‘यू डीझर्व्ह इट! नथिंग राँग इन धिस! सर्वांसाठी एवढे प्रचंड कष्ट उपसल्यावर तुला वर्षातून किमान एकदा अशा ह्या फक्त स्वत:साठीच्या वेळाची गरज आहे आणि तुझ्या कुटुंबाला पण हे माहीत आहे म्हणून त्यांनीही तुला आनंदाने पाठवलंय तेव्हा ह्या वेळेचं सोनं कर, जगून घे तुझे हे स्वच्छंद दिवस. खळखळून हस, जोरजोरात गाणी गा, दमेस्तोवर डान्स फ्लोअवर नाचून घे, जे कधीच घातले नाहीत पण घालावेसे वाटतात असे कपडे घाल, कुठे पॅरासेलिंग करीत हवेत उड तर कधी स्कुबा डाईव्ह करीत समुद्राचा तळ गाठ. स्विमिंग कॉश्युम घालायला लाजू नकोस, फिल्म स्टारसारखा मोठ्ठा गॉगल घालून स्विमिंग पूल सन डेकवर बाजूला ज्यूसचा ग्लास आणि हातात आवडते पुस्तक घेऊन पहुडायलाही विसरू नकोस. कुणी काय म्हणेल ह्याचा तर अजिबात विचार करू नकोस. तुझ्या मनातल्या सुप्त इच्छा इथल्या खुल्या आकाशात पूर्ण करून घे. कम ऑन! फ्लाय, रन, डान्स, सिंग, डू व्हॉट यु वाँट टू डू। बी अ कॉलेज गर्ल द वे यु वेअर।’ आणि परिस्थिती बदलत गेली. सगळ्या सख्या आणखी मनमोकळ्या झाल्या. बर्यापैकी गिल्ट फ्री मन:स्थितीने सहली एन्जॉय करायला लागल्या. कपड्यांमध्ये परिवर्तन आलं. सहलींवर येताना साडी किंवा सलवार कमिज ओढणीपेक्षा जीन्स आणि टी शर्टस् अधिक सोईस्कर आहेत हे तिने अनुभवलं आणि घरानेही तिला त्या कपड्यांमध्ये स्विकारलं. हा बदल महत्त्वाचा होता आणि तो घडला. गेली अनेक वर्ष मी ही सहल करतेय, पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘दे धम्माल’ असं ह्या सहलीचं स्वरूप असलं तरी ह्याची पातळी कधी खाली गेली नाही. कधी ह्यात थिल्लरपणा आला नाही. डीसेंट स्वरूपात ही सहल नेहमी पुढची पायरी गाठत गेली.
खरंतर वुमन्स स्पेशल ही आमची अनेक सहलींसारखी एक सहल, थोडक्यात कमर्शियल व्हेंचर, पण ती सहल तशी कधी वाटलीच नाही. मनाचा अणि हृदयाचा कोणतातरी कोपरा तिने व्यापलेला आहे. आणि का नाही? सहा वर्षांपूर्वी वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा पहिली सहल आम्ही आयोजित केली ती वुमन्स स्पेशलची, हाच महिना होता, बावीस ऑगस्ट दोन हजार तेराला. आणि महिलांनी डोक्यावर घेतली ती सहल, बुकिंग बंद करावं लागलं इतकी. तिथून वाढला आमचा वीणा वर्ल्ड टीममधल्या सर्वांचा आत्मविश्वास. त्या सहलीने आम्हाला सांगितलं की, ‘आम्ही आहोत पाठीशी, आगे बढो।’ हा महिलांनी एकत्र येऊन एका महिलेला दिलेला जबरदस्त पाठिंबा होता. त्या महिलांचे आम्ही सर्वजण शतश: ऋणी आहोत, कारण तिथून सुरू झाला वीणा वर्ल्डचा प्रवास. थोडक्यात महिलांनी महिलांना सपोर्ट केला तर असं वीणा वर्ल्डसारखं काही उभं राहू शकतं. वुमन्स स्पेशलच्या काही सहलींना मी आजही उपस्थित राहते. एका गाला इव्हिनिंगला आमच्या सख्यांना भेटते तेव्हा या गोष्टीचा पुनरुच्चार करते की, तुम्ही पाठिंबा दिलात म्हणून वीणा वर्ल्डची मुहूर्तमेढ रोवली गेली, भक्कम झाली. त्याचप्रमाणे आपल्या घरातली, नात्यातली, शेजारातली कोणतीही मुलगी जर काही स्वत:च सुरू करणार असेल, थोड्या वेगळ्या वाटेने जायचा विचार करीत असेल तर तिला मनापासून पाठिंबा देऊया, शुभाशिर्वाद देऊया. कुठे अपयश आलं तर तिच्या पाठीशी आणखी भक्कमपणे उभे राहूया, आत्मविश्वास वाढवूया. ‘तरी मी तुला सांगितलं होतं, आता भोग...’ असा विचार आपल्या मनातही येणार नाही ह्याची काळजी घेऊया.
ज्या वुमन्स स्पेशल सहलीने वीणा वर्ल्डची सुरुवात झाली त्या सहलींची संख्या हल्ली दिवसेंदिवस वाढतच चाललीय. आत्ता ह्या इतक्यात, युरोपमधलं स्कॅन्डिनेव्हिया म्हणजे नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, टॅलिनला वुमन्स स्पेशल आहे. लेह लडाखमध्ये आमच्या महिला धम्माल करताहेत. स्पेनलाही वुमन्स स्पेशल निघालीय. सप्टेंबरमध्ये युरोप अमेरिका नेपाळ भूतान आणि सर्वांची लाडकी सिंगापूर थायलंड मलेशिया ह्या सहली आहेतच. वर्षाला जिथे मी तीन-चार सहली करायचे तिथे आता महिन्याला पाच-पाच सहली जाताहेत वुमन्स स्पेशलच्या. आता तिरकस शेरा मारणार्या आमच्या शेजारणीही एकत्र मिळून मैत्रिणी-मैत्रिणी असा ग्रुप करून सहलीला येताहेत. आजी मुलगी नात अशी तीन जनरेशन कधी एकत्रित आलेली दिसतात तर कधी सासू-सून, कधी विहिणबाई-विहिणबाई. म्हणूनच म्हणते ही नुसती एक सहल नाहीये तर ती आहे एक रीलेशन बिल्िंडग- स्ट्रेंथनिंग अॅक्टिव्हिटी. नात्यानात्यांची वीण घट्ट करणारं एक साधन. हे सारं एक परिवर्तन आहे. विचारातलं, आचारातलं, पेहेरावातलं, आत्मविश्वासातलं आणि ते हवंहवसं आहे. पहिल्या सहलीला मला वाटलं होतं की महिला परदेशात यायला तयार होतील का? ही एक प्रकारची भीती होती माझ्या मनातली ती आमच्या ह्या सख्यांनी घालवली. मला ते जाहिरातीतलं वाक्य आठवलं, ‘डर के आगे जीत है।’
मी एकटी परदेशात जाऊ शकते. मी एकटी धम्माल करू शकते, मी माझ्या स्वत:साठी वेळ काढू शकते... हे सगळं खूप आनंददायी आहे आणि म्हणूनच रेखा भांबुंरेंचा व्हॉट्स अॅप मेसेज मला भूतकाळात घेऊन गेला. ‘येस् आय कॅन!’ चा विश्वास अधिक मजबूत करून गेला.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.