हल्ली ग्लोबल वॉर्मिंगमुळे युरोपमध्येही हीट व्हेव वाढायला लागलीय. त्यामुळे ज्यांना युरोपची मस्त थंडी अनुभवायचीय त्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर किंवा मार्च एप्रिलमध्ये प्रवासाला निघावं. ज्यांना ट्युलिप गार्डन्स बघायचेत त्यांनी पुढील वर्षी 21 मार्च ते 10 मे दरम्यानची अॅमस्टरडॅमला भेट देणारी सहल घ्यावी. एकट्या येणार्या पर्यटकांनी वुमन्स स्पेशल किंवा सीनियर्स स्पेशलची सहल निवडावी
युरोप आता आयुष्यभराचं स्वप्न उरलेलं नाही. माझ्या पर्यटन आयुष्यात जेव्हा मी पहिल्यावहिल्या युरोप सहली जाहीर केल्या तेव्हाच्या जाहीरातीतलं वाक्य होतं, आयुष्यभर उराशी बाळगलेलं एक स्वप्न म्हणजे युरोप. ह्या स्वप्नपूर्तीसाठी योग्य निर्णय घ्या, खात्रीचा पर्याय निवडा. आता काळ बदलला. अनेक स्थित्यंतरं झाली. एक मात्र आहे की जे आज पन्नाशी किंवा साठीच्या वयात आहेत त्यांनी परदेश प्रवासासाठी तीन वर्षातून एकदा फक्त पाचशे डॉलर्स मिळायचे अनेक कागदपत्र दाखल केल्यानंतर, हा काळही पाहिलाय आणि आज एका वर्षात परदेशी निघालेल्या प्रवाशाला दहा हजार डॉलर्स घेण्याची सरकारमान्यता आहे हे सुद्धा ते बघताहेत. हे लक्षण आहे भारतीयांच्या हाती अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण ह्या जीवनावश्यक गोष्टींच्या गरजा भागल्यानंतर शिल्लक राहणारा पैसा वाढण्याचं. आत्ताच जाहीर झालेल्या संख्याशास्त्राच्या आकडेवाडीनुसार गतवर्षात अडीच कोटी इतक्या भारतीयांनी विदेश भ्रमण केलं आणि साधारणपणे 25 हजार कोटी युएस डॉलर्स इतके रुपये खर्च केले. म्हणजेच पावणे दोन लाख कोटी भारतीय रुपये!!! अबबऽऽऽ पर्यटनक्षेत्रासाठी हे आकडे उमेद वाढविणारे आहेत. अनेक उद्योगांविषयी मंदीच्या बातम्या वाचताना उदासी आलेल्या व्यावसायिक मनांना ह्यातून थोडासा दिलासा मिळेल. आम्ही मात्र आजपर्यंत कधीही पर्यटनक्षेत्राच्या भविष्याविषयी साशंक नव्हतो. आपला आपल्या माणसांवर जेवढा विश्वास असतो तेवढाच विश्वास आमचा ह्या पर्यटनक्षेत्रावर पुर्वी होता, अगदी शून्य झालो सहा वर्षांपुर्वी तेव्हाही दुमत नव्हतं ह्याच व्यवसायात यायचं ह्याविषयी, आणि हा विश्वास आत्ताही आहे आणि यापुढेही ह्या क्षेत्राच्या भविष्याविषयी तो तेवढाच दृढ आहे. उलट आमच्यासारख्या पर्यटनसंस्थांची गरज वाढणार आहे दिवसेंदिवस. जग बर्यापैकी अनिश्चिततेकडे झुकतंय हे आपण रोजच बघतोय, त्यावेळी हॉलिडे ह्या गोष्टीसाठी कुणीतरी खात्रीची पर्यटनसंस्था वा पर्यटन व्यावसायिक पाठीशी असावं ही मनोधारणा वाढत चाललीय. आत्ताच जेट एअरवेज सारखी भलीमोठी एअरलाईन कोसळल्यानंतर पर्यटकांनी त्याचा अनुभव घेतला आहेच. ऐन सीझनमध्ये पर्यटकांचा ठरलेला हॉलिडे व्यवस्थित घडवून आणण्यात आम्हाला प्रचंड आर्थिक मानसिक नुकसान सोसावं लागलं पण पर्यटकांना त्याची शून्य किंवा कमीत कमी झळ लागेल ह्याची काळजी घेतली. कुठेही, कधीही, काहीही घडू शकंत तेव्हा ग्रुप टूर्सद्वारे आलेले पर्यटक आणि त्यांच्या सोबतचा टूर मॅनेजर एकत्र असणं हा एकमेकांना मॉरल सपोर्ट असतो आणि त्यांच्या पाठीशी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस 24x7 वीणा वर्ल्ड टीम खंबीरपणे उभी असते. एअरलाईन्सशी असलेले सौहार्दाचे संबंध, भारतात वा परदेशात सर्वत्र मनापासून काम करणारे आमचे तेथील सप्लायर्स-पार्टनर्स अडीअडचणीला कोणतंही सहकार्य करायला तयार असतात. आत्तापर्यंत अडचणी अनंत आल्या कारण भारतभर आणि जगभर संचार आहे पण कुठेही अडकून पडायला झालं नाही. पटकन काहीना काही मार्ग निघत होताच.
सर्व काही आलबेल असतं तेव्हा गोष्टी व्यवस्थित घडतातच पण आमचा पर्यटनसंस्थांचा कस लागतो तो अडचण येते तेव्हा. किती जलदपणे कमीत कमी त्रासात आपण त्या अचानक उद्भवलेल्या कठीण परिस्थितीवर मात करतो हे महत्त्वाचं असतं. आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे पर्यटकांनी आत्ता सुरुवात केलीय पुढच्या वर्षाच्या म्हणजे समर व्हेकेशनच्या युरोप सहलींचं बुकिंग करायची. आता सर्वच पर्यटनसंस्था आपापले प्लॅन्स जाहीर करतील आणि पर्यटकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होईल. एखाद्या सहलीची नक्की किंमत किती? युरोपला जायचं तर आहे पण एवढ्या सगळ्या सहलींमधून नेमकी कोणती सहल निवडायची? कोणत्या सीझनमध्ये जायचं? कुणासोबत जायचं? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. साहजिकच आहे, त्याच प्रश्नांची उकल करणं ह्यासाठीच तर आम्ही आहोत आणि ह्या लेखाचा प्रपंचही त्यासाठीच. सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळालीच पाहिजेत. पुर्वी युरोपला जायचंय एवढाच विचार करून पर्यटक आमच्या कार्यालयात यायचे. म्हणजे वर नमूद केलेले सर्व प्रश्न त्यांच्या मनात असायचेच पण त्यात आता भर पडलीय ती आणखी एका प्रश्नाची आणि तो आहे नेमका कोणता युरोप आम्ही बघू? चला एकेका प्रश्नाची उकल करूया.
सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे युरोप हे फक्त एकदा जाण्याचं ठिकाण उरलं नाहीये. वीणा वर्ल्डच्या सहा वर्षांच्या आयुष्यात पाच पाच वेळा युरोपला जाऊन आलेले पर्यटक आहेत, आणि अजूनही त्यांचा बराचसा युरोप बघायचा राहिलाय. ह्यात वावगं काही नाही कारण जगाच्या पर्यटनाचा विचार केला तर युरोप जगभराचे पर्यटक आकर्षित करण्यात कायम नंबर वन राहिलाय, सतत अग्रस्थानी. दुसर्या नंबरवर असणार्या खंडात आणि युरोपमध्ये व्हिजिटर नंबर्सच्या बाबतीत प्रचंड फरक आहे त्यामुळे त्या दुसर्या नंबरला काही अर्थ नाही इतकं पर्यटन युरोपमध्ये फोफावलंय. आर्थिक स्तर उंचावत असलेला भारतातला मोठा मध्यमवर्ग युरोपमध्ये जाणार्या भारतीयांचे नंबर्स इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढवतोय की तिथलं प्रत्येक टूरिझम बोर्ड भारताचं स्वागत करण्यासाठी रेड कार्पेट वेलकम देण्यासाठी सज्ज आहे. आमच्याकडेही मुंबई कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दररोज किमान एकतरी युरोपियन सप्लायर त्यांच्या देशाला, पर्यटनस्थळाला किंवा हॉटेलला प्रमोट करण्यासाठी भेट द्यायला आलेला तुम्हाला दिसेल.
युरोप एकदा बघून पूर्ण होणार नसेल, आणि तिथे पुन्हा पुन्हा जायचं असेल तर आपल्याला थोडंसं प्लॅनिंग करायला हवं. हे करताना आपण प्रामुख्याने काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, स्वत:ला काही प्रश्न विचारले पाहिजेत. युरोपमध्ये भाषा, भोजन, सवयी, चालीरिती, ट्रान्सपोर्ट आदी गोष्टी एकट्या दुकट्या नवख्या पर्यटकाला तेवढ्या सोप्या नसल्याने जगभरचा पर्यटक हा ग्रुप टूरद्वारे युरोप बघणं पसंत करतो. युरोपमध्ये फिरताना तुम्ही ह्या ग्रुप टूर्सने आलेल्या पर्यटकांची गर्दी सर्वत्र पाहिली असेल. आमच्याकडेही ग्रुप टूर्सद्वारे युरोपला जाणार्या पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. अर्थात आम्ही युरोपचे कस्टमाईज्ड हॉलिडेही बनवून देतो ज्या पर्यटकांना स्वत: फक्त त्यांच्या फॅमिलीसोबत प्रायव्हेटली जायचं असतंं त्यांच्यासाठी. त्यांच्याशीही आमची कस्टमाईज्ड हॉलिडेची संपूर्ण टीम सतत संपर्कात असते जेणेकरून ते युरोपमध्ये एकटे फिरत असले तरी त्यांना तिथे काहीही अडचण येत नाही. अर्थात युरोप महाग आहे हे सर्वश्रृत आहेच त्यामुळे तुलनेने ग्रुप टूर्सद्वारे जाणं स्वस्त पडतं आणि भरपूर बघूनही होतं. आता पर्यटकांनी स्वत:ला जोखायचंय ते म्हणजे आपल्याजवळ वेळ किती आहे? आपण दरवर्षी युरोपला जाणार आहोत? एकदाच जाणार आहोत? आयुष्यात चार-पाच वेळी जाणार आहोत? ह्या प्रश्नांमुळे आपल्याला कोणता युरोप आधी बघायचा ते ठरवता येईल. दुसर्या भागातले प्रश्न आहेत ते म्हणजे मला एका वेळी बरेच देश बघायचेत आणि चार-पाच वर्षात युरोप खंडातले किमान पंचवीस तीस देश बघायचेत की एका वेळी एक देश असा दरवर्षी युरोपची एक तरी वारी करायचा प्लॅन करायचाय? युरोप खंडासाठी बजेट किती ठेवायचं हाही भाग आहेच. तसं आम्ही एका लाखात पाच दिवसांत पाच देशांची युरोपवारी घडवून हजारो पर्यटकांना युरोपची तोंडओळख करून देतोच किंवा सव्वा लाखात सात दिवसात सात देश दाखविण्याची किमयाही करतो. आणि पाच दिवस असो, सात दिवस असो की अगदी तीस दिवसांची युरोप टूर, प्रत्येक पर्यटक अगदी आनंदाने आणि समाधानाने परत आलाय पैशाचा अगदी पूर्ण मोबदला मिळवून. त्यामुळे सहल कोणतीही असो, युरोपच्या कोणत्याही देशातली असो, कितीही दिवसांची असो आणि कितीही रुपयांची ती संपूर्णपणे यशस्वी करण्यात आमचे कसलेले एकसे एक टूर मॅनेजर्स आणि त्यांच्या सदैव पाठीशी असलेली ऑफिस टीम एकदम पटाइत आहे. उगाच नाही संपूर्ण भारतातून सर्वात जास्त पर्यटक वीणा वर्ल्डच्या ग्रुप टूर्सद्वारे जातात. आपण ह्यावर्षी युरोपला गेला असाल तर अनेक ठिकाणी ते आपल्याला दिसले असतील. वीणा वर्ल्डवर विश्वास ठेवून येणार्या ह्या पर्यटकांचे मन:पूर्वक आभार.
आपण कोणत्या पठडीतले पर्यटक आहोत हे वरील प्रश्नांमधून आपल्याला उमगलं की सरळ वीणा वर्ल्डचं ट्रॅव्हल प्लॅनर उघडायचं, त्याची लिंक मागवायची किंवा वीणा वर्ल्ड डॉट कॉम वेबसाईटवर जायचं. त्यामध्ये मल्टीकंट्री युरोप, गोल्डन कॉम्बिनेशन्स ऑफ युरोप, सिंगल कंट्री युरोप, स्कॅन्डिनेव्हियन युरोप, नॉदर्न युरोप, मेडिटरेनीयन युरोप, बाल्कन युरोप, बॉल्टिक युरोप असे वेगवेगळे विभाग दिसतील. वेळ असेल, आवड असेल, बजेटचा अडसर नसेल तर एक पर्यटक किमान आठ ते नऊ वेळा युरोप करू शकतो आणि तरीही त्यांचं मन भरणार नाही आणि युरोप त्यांना आणखी खूणावत राहिल. आमचं युरोप सहलींचं वाढतं संख्याशास्त्र ह्या विधानाला बळकटी आणतंय. जी पर्यटक मंडळी युरोपला एकदाच जाणार आहेत आणि पहिल्यांदाच जाणार आहेत त्यांनी वीणा वर्ल्डची अकरा दिवसांपासून तेवीस दिवसांपर्यंतची वेस्टर्न युरोपची कोणतीही मल्टीकंट्री टूर घ्यावी, ज्यामध्ये युरोपमधल्या महत्त्वाच्या बर्याच देशांना भेट देता येते, युरोपच्या अद्वितीय सहलीची इच्छा पूर्ण होते. एकदाच युरोपला जाणार्यांसाठी ह्या परिपूर्ण सहली आहेत. आत्तापर्यंत जाऊन आलेल्या पर्यटकांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय.
हल्ली ग्लोबल वॉर्मिंगमुळे युरोपमध्येही हीट व्हेव वाढायला लागलीय. स्वित्झर्लंडमध्ये दुपारी घामाच्या धारांना सामोरं जावं लागलंय मे-जूनमध्ये. त्यामुळे ज्यांना युरोपची मस्त थंडी अनुभवायचीय त्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर किंवा मार्च एप्रिलमध्ये प्रवासाला निघावं. ज्यांना ट्युलिप गार्डन्स बघायचेत त्यांनी पुढील वर्षी 21 मार्च ते 10 मे दरम्यानची अॅमस्टरडॅमला भेट देणारी सहल घ्यावी. एकट्या येणार्या पर्यटकांनी वुमन्स स्पेशल किंवा सीनियर्स स्पेशलची सहल निवडावी, जेणेकरून त्यांना ऑटोमॅटिकली पार्टनर मिळेल आणि अदरवाईज सिंगल सप्लीमेंटद्वारे भरावे लागणारे पैसे वाचतील, त्यात एखादी दुसरी सहल करता येईल. ग्रुप टूर नो डाऊट थोडी हेक्टिक असते पण पर्यटकांना तेच आवडतं कारण त्यात आम्ही महत्त्वाचं सगळं स्थलदर्शन समाविष्ट केलेलं असतं जेणेकरून काही बघायचं राहिलं असं होऊ नये. आणि हे सर्व स्थलदर्शन कार्यक्रमाप्रमाणे पूर्ण करायला तयार असतात आमचे युरोप एक्सपर्ट टूर मॅनेजर्स आणि त्यांच्या मागे असलेली सर्व यंत्रणा. युरोप सहलीनंतर थोडा थकवा येतो पण तो असतो समाधानाचा आणि आनंदाचा, अगदी हवा हवासा. आणि त्यातही रीलॅक्स करायचंच असेल तर सहल संपल्यावर शेवटच्या किंवा जवळपासच्या शहरात दोन-तीन दिवस शांत निवांत राहण्यासाठी आम्ही बर्याच टूर्समध्ये पोस्ट टूर हॉलिडे घेता येण्याची सोयही केलीय.
घेशील किती दो करांनी... दोन डोळ्यांनी... दोन पायांनी अशी अवस्था आहे युरोपची. काळजी नसावी, आम्ही आहोत नं... वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर म्हणतो तसं, मैं हूँ ना!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.