आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. हॅप्पी रीपब्लिक डे! सत्तर वर्ष झाली आपल्याला प्रजासत्ताक बनवून. त्र्याहत्तर वर्षांपूर्वी स्वातंत्र्य संग्रामातील असंख्य छोट्या मोठ्या वीर आणि वीरांगणांनी प्राणाची बाजी लावून आपल्या भारताला स्वतंत्र केलं. त्यानंतर साडेतीन वर्षात हा स्वतंत्र झालेला देश कसा चालवायचा? स्वातंत्र्यासोबत आलेली ही मोठी जबाबदारी कशी पेलायची? ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिपत्याखाली असलेल्या कमिटीने भारतीय राज्यघटना-संविधान- कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया जन्माला घातली आणि त्याबरहुकूम आपला स्वतंत्र देश कारभार करू लागला. आपल्या घरासारखंच आहे हे नाही का? आपण एक घर घेतो. आपापल्या परीने त्याची सजावट करतो. घरातल्या माणसांनी साधारणपणे कसं वागायचं ह्याचे अलिखित नियम सर्वांना समजावून सांगतो आणि आपली घरं त्याबरहुकूम चालत राहतात. देश, राज्य, समाज, कुटुंब अशाच लिखित-अलिखित घटनेवर मार्गक्रमणा करीत असतात. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी ज्यापासून बनतात ती व्यक्ती म्हणजे आपल्या भारतातल्या सव्वाशे कोटी भारतीयांपैकी एक असलेली मी स्वत: माझं संविधान बनवलंय का? जगन्नियंत्याने मला ह्या सुंदर जगात, आपल्याला स्वतंत्र भारतात जन्माला घातलं, त्याच्याच कृपने आजपर्यंत मी जीवंत आहे, चालू फिरू शकते, विचार करू शकते, बोलू शकते, ऐकू शकते, बघू शकते म्हणजेच उपरवालेने उसका काम बराबर किया है, मी मात्र ह्या मिळालेल्या आयुष्याचं काय करतेय? माझं आयुष्य चालविण्यासाठी मी भारतीय राज्यघटनेशी निगडीत माझी स्वत:ची वैयक्तिक घटना बनवलीय का? ठेवीले अनंते तैसेची रहावे किंवा असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी करीत आयुष्य जगतेय की मिळालेल्या आयुष्याला सुविचारांच्या-सुसंस्कारांच्या- सुनियोजनाच्या साच्यात घालून माझं स्वत:चं आयुष्य आनंदी-समाधानी बनवतेय? हा प्रश्न जेव्हा स्वत:ला विचारला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, लोकार्थाने आपण एक यशस्वी-आनंदी आयुष्य जगत असलो तरी आपल्यात कितीतरी गोष्टी अशा आहेत, ज्या बदलण्याची नितांत गरज आहे. आपण स्वत:शी तर खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे माझ्यात असलेल्या चांगल्या गोष्टींपेक्षा अजून सुधारायला पाहिजेत अशा गोष्टींची यादी जास्त मोठी झाली.
मागच्या आठवड्यात मला लागलेल्या मोबाईल नामक यंत्राच्या व्यसनाने स्वत:ची आणि कुटुंबाची होणारी होरपळ मी लिहिली होती. महत्प्रयासाने त्या विळख्यातून कशी बाहेर आले त्याचाही परामर्श घेतला होता. हेतू एवढाच की आपल्या नकळत हे एक छोटसं यंत्र आपल्यावर कब्जा करतं आणि त्याचा दारू-ड्रग्जपेक्षाही भयंकर असा अंमल आपल्यावर चढतो आणि एखाद्या नशेबाजप्रमाणे स्थळ काळाचं भान राहत नाही अशी माझ्यासारखी कुणाची अवस्था झाली असेल तर वेळीच सावध होऊया, ह्यातून मुक्त होऊया.
माझ्या टू बी इम्प्रुव्हड अशा गोष्टींमधली दुसरी गोष्ट होती ती म्हणजे नेटसीरिज. मोबाईलसारखं दुसरं यंत्र माझ्या हाती आलं ते फायरस्टिक, ज्याने जगातली एंटरटेनमेंट इंडस्ट्री माझ्या पायाशी लोळण घेती झाली की. आजकाल मी टीव्ही बघत नाही! किती आऊटडेटेड कंटेन्ड अशा सुरात बोलणार्यांच्या यादीत माझी वर्णी लागली. गेम ऑफ थ्रोन्सने तर मती गुंग करून टाकली. झुरळाला घाबरणारी मी त्या पडद्यावरील नरसंहार उघड्या डोळ्यांनी-निधड्या छातीने बघू लागले.
गेम ऑफ थ्रोन्स न बघणार्याला, अरे कंबख्त तूने तो पी ही नही!च्या अविर्भावात सो बॅकवर्ड म्हणण्यापर्यंत माझी मजल गेली. आणि त्यानंतर तर क्राऊन, दिल्ली क्राईम्स, टागोर की कहानियाँ, स्पाय, डेसिग्नेटेड सर्वायव्हर, मेड इन हेवन, फॅमिली मॅन, मार्व्हलस मिसेस मेजल... आदि अनंत नेटसीरिजनी माझ्या अनेक रात्री गिळंकृत केल्या. बस और एक एपिसोड... हा शेवटचा... असं करीत करीत दुसर्या दिवसाचे पहाटेचे तीन-चार कधी वाजायचे कळायचंच नाही. ह्याचा असर निश्चितपणे दुसर्या दिवसाच्या आचार-विचारांवर आणि प्रॉडक्टिव्हिटीवर व्हायचा. एकदिवस नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमच्या व्यक्तीमत्त्वांची मुलाखत बघायला मिळाली. त्यांना प्रश्न केला होता तुम्ही ह्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतल्या स्पर्धेला कसं तोंड देताय? त्यांचं उत्तर होतं, आमची स्पर्धा एकमेकांत नाहीये, ती आहे दर्शकांच्या झोपेशी, ते जेवढे कमी झोपतील तेवढा आमचा बिझनेस वाढणार आहे. ओहो! असं आहे तर. मला हे पूर्ण व्यसनाधीन करताहेत म्हणजे. मी कमी झोपले तर ह्यांचा बिझनेस वाढणार. नो वे! मी पुढे जाईन की न जाईन पण दुसर्याचे पाय खाली खेचणारी आमची जन्मजात मानसिकता माझ्या झोपेचं खोबरं करून त्यांची व्यवसायवृद्धी कशी करू शकते? ए ड्रॉप इन द ओशन का असेना मी निषेध नोंदवला आणि त्या नेटसीरिजच्या विळख्यातून माझी बर्यापैकी सुटका करून घेतली. नेटसीरीज बघायचीच नाही असं नाही पण झोपेचं खोबरं होऊ न देता, वेळ असेल तेव्हा किंवा वीकेंडला एका वेळी एकच एपिसोड किंवा सलग दोन दिवस सुट्टी असेल तेव्हा एकावेळी कमाल तीन तास स्क्रीनसमोर बसायचं ठरवलं आणि ते बर्यापैकी पाळतेय. नकळत जडलेल्या- लोकांच्या निदर्शनास न येणार्या ह्या दुसर्या अंमलातून मी बाहेर आले.
माझ्या यादीतली तिसरी गोष्ट होती जिने माझा ताबा घेतला होता ती म्हणजे शॉपिंग. एअरपोर्टवर, शॉपिंग मॉलमध्ये, पर्यटनस्थळी, अगदी ग्रोसरी शॉपमध्येही गरजेच्या वस्तूंची यादी घेऊन जायचं आणि त्याच्या डबल गरज नसलेल्या वस्तू आणायच्या ह्यात मी आघाडी मिळवली होती. फ्रीजमध्ये वस्तूंची, कपाटात कपड्यांची प्रचंड गर्दी व्हायला लागली. घरात कुठेही एखादी वस्तू शोधायची असली तर उत्खनन करावं लागायचं. त्यात भर पडली ऑनलाईन शॉपिंगची. नवी क्रेझ. सगळ्यात स्वस्त वस्तू कुठे मिळतेय हे बघण्यात मी माझ्याजवळ असलेला, क्षणागणिक निसटणारा सगळ्यात महागडा वेळ अक्षरश: तासनतास उधळून द्यायला लागले. सेल ची जाहिरात म्हणजे नको असलेल्या गोष्टींवर लावलेला पैसा, जुगार याहून वेगळा काय असतो? तो खेळणारा नजरेस येतो त्याला आपण जुगारी म्हणून शिक्का लावतो पण आपणही तेच करतोय हे बर्याचदा लक्षात येत नाही. थोडक्यात अमेेरिका ज्या प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी मध्ये अडकलीय त्याच प्रॉब्लेमची शिकार मी स्वत:हून झाले होते. सुधीरने ह्याविषयी मला समजावण्याचा प्रयत्न केला पण मिश्टरांचं कोण ऐकणार? एक दिवस नील मात्र मला खडसावण्याच्या टोनमध्ये म्हणाला, मम स्टॉप युवर इंम्पल्स बायींग, कंट्रोल युवरसेल्फ, दुकानात असलेली प्रत्येक गोष्ट घ्यायलाच पाहिजे असं नाही आमचे दुसरे चिरंजीव जो माझ्यामते बॉर्न मिनिमलिस्ट आहे. त्याच्या गरजाच एकदम कमी. त्याने माझ्या तोंडावर नाही पण सुनिलाकडे तक्रार केली, व्हाय शी ब्रिंग्ज सो मेनी थिंग्ज अॅट होम? इज इट नीडेड? एकंदरीत माझ्या शॉपिंगवर आमच्या घरातला जनक्षोभ उसळायला सुरुवात झाली होती. सासूबाईही नॅचरली त्यांच्या बाजूने, त्यामुळे चार विरुद्ध एक ही लढाई जिकणं थोडं अवघड होतं. मलाही हळूहळू थोडी जाणीव व्हायला लागली होती की आणखी हवं चा हा हव्यास माझी कौटुंबिक-आर्थिक आणि पर्यायाने मानसिक घडी विस्कटवतोय. आय हॅव टू कंट्रोल मायसेल्फ. पण हे वेड तसं जाणारं नव्हतं, त्याला जालिम उपायच हवा होता, आणि मी तो केला. गेल्यावर्षी पंधरा ऑगस्टला, आपल्या स्वातंत्र्यदिनी मी ठरवलंं की आता एक वर्ष मी कपड्यांचं शॉपिंग करणार नाही. सहा महिने झाले ह्या गोष्टीला आणि मी त्यात पूर्ण यशस्वी झालेय. पहिल्यांदा मी ऑनलाईन साईट्स बंद केल्या, मॉलमध्ये जाणं थांबवलं ज्यामुळे शॉपिंगची उर्मी कमी झाली. हळूहळू मी मॉलमध्ये जायला लागले पण कपड्यांच्या दुकांनामध्ये घुसायचे नाही. नंतर मी तेही सुरू केलं. दुकानात घुसायचे पण काहीही न घेता बाहेर पडायचे. माझ्या मनावर मला तो ताबा मिळवायचा होता की समोर आकर्षक कपड्यांच्या स्वरूपात अनेक मोह उभे असले आणि कितीही ते छान असलं तरी त्या मोहात न अडकता मी त्यातून सहीसलामत बाहेर येतेय. एक वर्ष शॉपिंग न करण्याचा ठाम निर्धार निग्रहाने मी पाळतेय. पहिल्यांदा थोडं कठीण गेलं पण आता सवय झालीय.
आता ते पाळायला कष्ट पडत नाहीत. म्हणजे आपण ठरवलं तर आपण आपल्या मनावर आणि सवयींवर खूप छान ताबा मिळवू शकतो. अर्थात असं काही ठरवायला आधी ते कळलं पाहिजे, ते वाईट आहे हे उमगलं पाहिजे. मला हे समजण्याची समज वेळीच आली आणि त्यातून मी सहीसलामत बाहेर पडू शकले. ते घडण्यात महत्वाची भूमिका बजाविणार्या सर्वांचे आभार.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.