आम्ही वीणा वर्ल्डमध्ये एका भिंतीवर एडवर्ड दी बोनोच्या सिक्स हॅट्स विराजमान केल्या आहेत, ज्या आम्ही कोणत्याही प्रोजेक्टवर निर्णय घेताना विचारात घेतो. ह्या हॅट्स निर्णयप्रक्रियेच्या वेळी सर्व बाजूने विचार कसा करावा ह्याचं मार्गदर्शन करतात. निर्णय कधी अॅझम्प्शन्सवर, गटफिलिंगवर, किंवा अपूर्या माहितीवर घेतले जातात आणि त्याचं व्हायचं तेच होतं...
गेल्या आठवड्यात माझा मोबाईल हरवला. मीटिंगमधून आले होते त्यामुळे तो सायलेंट मोडवर. वाजतोय पण कुठे आहे ते कळत नाही. सर्व जागा शोधून झाल्या पण कळेना, एक वाटत होतं की वाजतोय म्हणजे कुठेतरी आहे. कुणा चुकीच्या माणसाच्या हाती नाही लागलाय. बराच वेळ शोधाशोध करण्यात घालविल्यावर मी ठरवलं, आता मिळेल तेव्हा मिळेल. एवढं पॅनिक व्हायचं नाही. लेट्स सी, आपण किती वेळ मोबाईल शिवाय राहू शकतो ते. हो म्हणजे तिही एक अपॉर्च्युनिटी होती जबरदस्तीने आलेली जी मला सांगत होती, ‘स्वत:ला चेक कर मोबाईल नावाच्या व्यसनाच्या आधीन किती गेलीयस तू?’. ‘जो होता है वो अच्छे के लिये होता है।’ हे रोमारोमात भिनलेलं असल्याने मी माझ्या मोबाईलचा शोध थांबवला. ‘लेट्स एन्जॉय मोबाईल फ्री मोमेंट्स’ आणि तसं फारसं काही बिघडलं नाही बरं का. ऑफिस व्यवस्थित चालू होतं, घरी सर्व ठिकठाक होतं, माझ्या मोबाईलमुळे माझं आणि कुणाचंच काही अडलं नाही.
काही अडलं नाही पण ह्या हरवलेल्या आणि न गवसलेल्या मोबाईलमुळे इतकी अझम्प्शन्स समोर आली की काही विचारू नका. माझा फोन संध्याकाळी हरवला, त्यामुळे कुणाला फोन हरवलाय ह्याची कल्पना नव्हती. मीही कळवलं नाही. मोबाईलपासून सुटका झाल्याने घरी येऊन क्राऊन सीरियलचे दोन भाग राहीले होते ते बघितले. तरीही माझ्याकडे वेळ उरला. देवदत्त पटनाईकचं लीडर नावाचं पुस्तक संपायला आलं होतं त्याला मुहूर्त मिळत नव्हता ते संपवलं आणि तरीही मी साडेदहाला माझ्या नेहमीच्या वेळी झोपले. त्याक्षणी वाटलं हा मोबाईल असाच हरवलेला राहू दे. तो हातात असला की दुसरं काही सुचत नाही आणि इतर गोष्टी करायला वेळही मिळत नाही. किती वेळ जातो त्या मोबाईलवर हे आज मला नव्याने कळलं होतं. काही लोकं घरी आल्यावर मोबाईल ऑफ करुन टाकतात त्यातलं सुख मला आज जाणवलं. दुसर्या दिवशी सांगलीचे आमचे स्नेही कलेक्टर श्री.व सौ. काळम आणि त्यांचा मुलगा देवव्रत घरी येणार होते. युएस व्हिसासाठी अपॉइंटमेंट होती तेव्हा सुधीरने, ‘ब्रेकफास्ट एकत्रच करुया’ म्हणत केलेल्या आग्रहाला त्यांनी हो म्हटलं. हे ऑफिसमध्ये कुणाला माहीत नव्हतं. बरं, त्यात मुंबई बंद वातावरणात ऑफिसमध्येही तुरळक उपस्थिती तेव्हा माहोल सिरियसली कामाचा नसल्याने म्हटलं आज लेट गेलं तरी नो प्रॉब्लेम. कुणाला काही कळवलंच नाही. थोडंसं बेदरकारपणे वागूया की. रोजच परफेक्ट, ऑर्गनाइज्ड, शिस्तित वागून तसाही कंटाळा आला होता. मागच्या आठवड्यातल्या लेखाप्रमाणे, ‘रेझल्युशन नाही, रेव्हल्युशन नाही तर एका सकाळी थोडं केअरलेस वागणं हे होतं जणू न्यू इयर सेलिब्रेशन’.
काळम कुटुंबाला युएस व्हिसा मिळाला त्यामुळे ‘व्हिसा’ ह्या विषयावरच्या गप्पा इतक्या रंगल्या की काही विचारू नका. कलेक्टर साहेबांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव तर अफलातून. नेहमीच्या घाईधावपळीत ही सकाळ नं जाता जरा वेगळ्या वातावरणात गेल्याने आम्हालाही बरं वाटलं आणि ऑलमोस्ट अर्ध्या दिवसाने आम्ही ऑफिसला पोहोचलो. केबीनमध्ये स्थिरस्थावर झाले आणि एकएक करून मॅनेजर मंडळी केबीनमध्ये घुसली. प्रत्येकाच्या चेहर्यावर चिंता. शिल्पाने विचारलं, ‘काय झालं?’ मला वाटलं की, ‘तुम्हाला हॉस्पिटलला वैगेरे अॅडमिट केलं की काय? काल तुम्हाला सिव्हियर कॅच आला होता पाठीला. तुम्ही फोन उचलत नाही सुधीर सर फोन उचलत नाही’. अॅनी म्हणाली, ‘आज मुंबई बंदप्रमाणे मोबाईल बंद करून तुम्ही आम्हाला विश्रांती देता की काय असं आम्हाला वाटलं’ रजिथा म्हणाली, ‘इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचा काही इश्यू झाला असं मला वाटलं’, मार्केटिंग मॅनेजर प्रणोतीला वाटलं की, ‘मुंबई बंदचा फायदा घेऊन एकदम सेक्ल्युजनमध्ये जाऊन तुम्ही दोन आठवड्याची आर्टिकल लिहून टाकताय जेणेकरून आमचा तगादा कमी होईल’. ‘मला काय वाटलं’ त्याचा उच्चांक होता आमची प्रोजेक्ट अॅन्ड कम्प्लायन्स मॅनेजर भावना. ‘अहो तुम्ही दोघंही फोन घेत नाहीत, म्हणून मी सुरेश ड्राईव्हरला व्हॉट्सअॅप केलं विचारण्यासाठी तर त्याचा वन लाइन मॅसेज आला, ‘घरी कलेक्टर आलेयत, उशीर होईल यायला’ त्यामुळे मला वाटलं की, ‘इनकम टॅक्सची धाड पडलीय की काय? आणि त्यांनी तुमचा फोन बीन काढून घेतलाय, आता तुमची काय अवस्था असेल?’ ‘भावनाने बॉलिवूडचे जास्त सिनेमे पाहिल्याचा हा परिणाम’. हूऽऽऽ एकंदरित माझ्या हरवलेल्या फोनने, ते न कळविल्याने, थोड्याशा चलता है अॅटिट्युडने जे जे काही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या एरिया ऑफ कन्सर्नप्रमाणे वाटलं ते ऐकून आमची हसता हसता पुरेवाट झाली. अझम्प्शन्स प्रिझम्प्शन्स चाइनिज व्हिस्पर्स अशा सगळ्या गोष्टी एकत्र आल्या होत्या आणि एक खूपच हसी-मजाकचा माहोल तयार झाला त्या दिवशी. नियमांच्या अखत्यारित राहून काम करणारं, कुठेही कोणताही डिफॉल्ट न करणारं डिपार्टमेंट म्हणजे कम्प्लायन्स सांभाळणारं भावनाचं डिपार्टमेंट तरीही तिला इनकमटॅक्सची धाड पडल्याचं वाटणं म्हणजे आपल्या सुसाट सैरावैरा धावणार्या विचारांचं प्रतिबिंब होतं. त्यावर हसणं नॅचरल आहे ‘पण मला काय वाटू शकतं’ हे दाखवून विचार करायला लावणाराही एक भाग होता.
वस्तूस्थिती काय हे माहीत नसताना आपण आपल्या मनानुसार, कामानुसार, अनुभवानुसार आणि कल्पकतेनुसार ठोकताळे बांधतो ते असे हास्यास्पद असले तर ठीक आहे पण ह्या साध्या उदाहरणावरुन आपल्याला दिसतंय की ‘वस्तुस्थिती’ आणि ‘वाटणं’ हे किती वेगवेगळं असू शकतं. नातेसंबंधांमध्ये दुरावा आणायला ही अशी अझम्प्शन्स खूप मोठं कार्य करीत असतील नाही. खरंतर माझी जबाबदारी होती की सुधीरच्या फोनवरून माझा फोन हरवल्याची आणि घरी पाहुणे आल्याची बातमी मॅनेजर्स ग्रुपला कळवायची. किंवा सुरेशने ‘घरी पाहुणे आलेत’ हे सांगितलं असतं तर भावनाच्या फिल्मी मनाने घेतलेल्या उभारीला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या काळजीला आवरतं घेता आलं असतं. शिल्पाने तर मला डायरेक्ट हॉस्पिटललाच अॅडमिट करुन टाकलं कारण तिलाच माहीत होतं पाठीच्या कॅचचं प्रकरण. कुणीतरी म्हटलंय, काहीही असं ‘वाटणं’च्या आधी एक सोपी पद्धत आचरणात आणा ‘विचारण्याची’. कुटुंबा-कुटुंबामधल्या दरीला कमी करायचं असेल, एकमेकांविषयी कटुता संपवायची असेल तर ‘वाटणं’ कमी करून ‘विचारणं’ ह्याची सवय आपण प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे.
आम्ही वीणा वर्ल्डमध्ये एका भिंतीवर एडवर्ड दी बोनोच्या सिक्स हॅट्स विराजमान केल्या आहेत, ज्या आम्ही कोणत्याही प्रोजेक्टवर निर्णय घेताना विचारात घेतो. ह्या हॅट्स निर्णयप्रक्रियेच्या वेळी सर्व बाजूने विचार कसा करावा ह्याचं मार्गदर्शन करतात. निर्णय कधी अॅझम्प्शन्सवर, गटफिलिंगवर किंवा अपूर्या माहितीवर घेतले जातात आणि त्याचं व्हायचं तेच होतं. त्यामळे ह्या कलरफूल थिंकिंग हॅट्स जे सांगतात ते आम्ही पडताळून पाहतो आणि अनुभव असा आहे की ह्या पद्धतीचा वापर करून घेतलेले निर्णय बर्यापैकी बरोबर ठरतात. रेड हॅट-इन्ट्युशन, ग्रीन हॅट क्रिएटिव्हिटी, येलो हॅट-ऑप्टिमिझम, व्हाइट हॅट-फॅक्ट्स अॅन्ड फिगर्स, ब्लॅक हॅट-क्रिटिकल थिंकिंग, ब्ल्यू हॅट-प्रोसेस कंट्रोल, आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी कधी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये, गटफिलिंगने किंवा इमोशनल होऊन निर्णय घेते असं
म्हणतात. मग हा ड्रॉबॅक माझ्या लक्षात आल्यावर,
मी अजूबाजूला ह्या हॅट्स घालून टीमला बसवलं तो निर्णय तावूनसुलाखून बघण्यासाठी.
‘मला वाटलं’ ह्या गोष्टीचं मुळ वस्तुस्थितीशी जोडलेलं असलं पाहिजे. परिस्थिती संपूर्णपणे समजून आपण त्यावर भाष्य केलं पाहिजे. इथे मला डेल कर्निगीच्या पुस्तकातलं एक वाक्य आठवतं, ‘कुणावरही टिका करु नका कदाचित त्या परिस्थितीत तुम्हीही तसेच वागला असता, गोष्टी दिसतात तशा नसतात नेहमीच’.अफवा, गॉसिप्स हे सुद्धा ‘मला वाटणं’ ह्याच जातकुळीतले प्रकार, नकारात्मक दृष्टीकोनवाली माणसं ते निर्माण करतात आणि मुर्ख माणसं त्या पसरविण्यासाठी मदत करतात. सर्वसाधारण प्रतिक्रिया अभ्यासल्या तर आपल्याला जाणवेल, एखादी चांगली गोष्ट ऐकली की आपण प्रश्न विचारतो ‘खरं?’ आणि एखादी वाईट ऐकली की आपण म्हणतो ‘असेल बाबा, हल्ली कुणाचाच भरोसा नाही’.आपण आपल्या कुवतीनुसार आपल्याला हवं तसं समजतो किंवा त्यावर विश्वास ठेवतो.
या नवीन वर्षात आपण कोणतंही रेझल्युशन केलं नाही तरी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अझम्प्शन्स, परसेप्शन, बायस... ह्या गोष्टींपासून सुटका करुन घेऊया. एक फॉरवर्ड आठवला. “Why do you always insist on taking the hard road?” I replied, “Why do you assume I see two roads?”
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.