यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये या दोन्ही देशांच्या तोडीस तोड सामना घडताना आपण पाहिला अगदी त्याप्रमाणेच टूरिझममध्येसुद्धा या दोन्ही देशांचे निसर्गसौंदर्य, स्थलदर्शन व वास्तव्यासाठी हॉटेल्स इ. सर्वकाही तोडीस तोड आहे. दोन्ही देशांमध्ये एक साम्य म्हणजे त्यांचा अतिशय सुंदर समुद्रकिनारा. या समुद्रकिनार्याला लागलेली छोटी-मोठी शहरे आणि निळ्याशार समुद्रात चमकणारी बेटं.
हल्लीच घडलेल्या फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात नक्की कुणाला सपोर्ट करावा असा गहन प्रश्न मला पडला होता. एका बाजूला होते अनेक वर्षांपासून टूरिझमसाठी जगभरात सर्वात लोकप्रिय असलेले फ्रान्स तर दुसर्या बाजूला होते फुटबॉल वर्ल्ड कपमध्येच नव्हे तर टूरिझममधलासुद्धा उभरता सितारा क्रोएशिया. फ्रान्सला अनेकवेळा वेगवेगळ्या कारणांसाठी भेट द्यायची संधी मला मिळाली होती. आणि क्रोएशियामध्ये मागच्याच वर्षी एका सेल्फ ड्राईव्ह हॉलिडेवर गेले असताना मी क्रोएशियाच्या प्रेमात पडले होते. वर्ल्डकप फायनल सुरू होती तेव्हा आम्ही ऋषिकेशमधल्या ‘आनंदा स्पा’ या डेस्टिनेशन स्पामध्ये तीन रात्रींचे वास्तव्य करत होतो आणि तिथे अनेक फ्रान्सचे पर्यटक भारत पाहण्यासाठी आले होते. या फ्रेंच मंडळींबरोबर कुंजापुरीच्या ट्रेकपासून गंगा आरतीसुद्धा एकत्र केल्याने साहजिकच फायनल पाहताना ‘विव्ह ला फाँस’ची घोषणा करत फ्रान्सच्या आनंदात सहभागी झालो.
जसे फुटबॉलमध्ये या दोन्ही देशांच्या तोडीस तोड सामना घडत होता तसेच टूरिझममध्येसुद्धा या दोन्ही देशांचे निसर्गसौंदर्य, स्थलदर्शन व वास्तव्यासाठी हॉटेल्स इ. सर्वकाही तोडीस तोड आहे. दोन्ही देशांमध्ये एक साम्य म्हणजे त्यांचा अतिशय सुंदर समुद्रकिनारा. या समुद्रकिनार्याला लागलेली छोटी-मोठी शहरे आणि निळ्याशार समुद्रात चमकणारी बेटं. वर्षभर सुंदर सूर्यप्रकाश लाभलेल्या या समुद्र किनार्याला ‘रीव्हिएरा’ म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम जगात प्रसिद्ध झाले ते ‘फ्रेंच रीव्हिएरा’ आणि ‘इटालियन रीव्हिएरा’. तीनशे पासष्ट दिवसांपैकी नव्वद टक्के सनी डेज्, प्रसन्न हवामान आणि समुद्रकिनारपट्टीच्या निसर्गसौंदर्यामुळे ही रिविएरा शहरे टूरिझमसाठी लोकप्रिय झाली व थंडीला कंटाळून युरोपियन टूरिस्ट हे रीव्हिएरा हॉलिडेज् घेऊ लागले. इथल्या बीचेसवर सन बाथिंग करत उत्तम भोजन व लक्झरी हॉटेल्समध्ये वास्तव्य हे सर्व काही प्रसिद्ध झाले. हॉलीवूड स्टार्समध्येसुद्धा रीव्हिएरा व्हेकेशन्स लोकप्रिय ठरल्याने आज युरोपियन रीव्हिएराला लागून अनेक हॉलीवूड स्टार्सची घरे आपल्याला दिसतात.
पण आज कुठल्याही रीव्हिएरावर अगदी स्टार्सप्रमाणे राहणं आपल्याला अगदी सहज शक्य आहे. फ्रान्सच्या दक्षिणेकडच्या समुद्रकिनारपट्टया त्याच्या गडद निळ्या रंगामुळे ‘कोत द झ्युर’ म्हणजेच ‘निळे कोस्ट’ म्हणून ओळखल्या जातात. ‘कोत द झ्युर’वरची काही प्रसिद्ध शहरे म्हणजे सेंट त्रोपे, आँतिब, नीस, कान्स आणि फ्रान्स व इटलीमधला छोटासा देश प्रिन्सिपॅलिटी ऑफ मोनॅको. फ्रेंच रीव्हिएराचा आविष्कार आपण मार्से या शहरापासून करू शकतो. मार्से हे पोर्ट शहर जवळपासच्या ‘प्रोवान्स’ भागाची सैर करण्यासाठी उत्तम ठरते. प्राचीन काळात भारतातून आणलेल्या इंडिगो या निळ्या रंगाच्या डायमुळे मार्से शहराचे भारताशी संबंध होते व आजसुद्धा इंडिगो आणि प्रोव्हेन्सा यलो रंगामध्ये बनलेल्या अनेक गोष्टी इथे बघायला मिळतात. फ्रान्सच्या दक्षिण-पूर्व भागातले प्रोव्हान्स हे दक्षिण आल्प्सच्या पर्वतरांगांबरोबर वीनयर्डज्, ऑलिव्ह ग्रोव्हस आणि लॅव्हेंडर फील्ड्स अशा विविध परिसरांसाठी प्रसिद्ध आहे. या निसर्गसौंदर्याने प्रभावित होऊनच प्रसिद्ध आर्टिस्ट वॅन गॉफने प्रोव्हान्समध्ये राहून ३५०च्यावर मास्टर पीसेस चित्रित केले. प्रोव्हान्समध्ये रहायचे असेल तर अनेक कंट्री हाऊस हॉटेल्समध्ये राहून फ्रेंच क्वीझीनचा उपभोग आपण घेऊ शकतो. मग वाइनची लागवड केलेल्या वीनयर्डज्मधून किंवा लॅव्हेंडर फील्ड्समधून पायी चालत, सायकल चालवत किंवा आपली गाडी घेऊन फिरण्याची मजा आपण घेऊ शकतो. पॅरिसच्या गजबजलेल्या स्थलदर्शनाबरोबर प्रोवान्समधले आरामदायी हॉलिडे हे उत्तम कॉम्बिनेशन ठरते. ‘कोत द झ्युर’ बरोबर या संपूर्ण भागाला ‘प्रोव्हन्स आल्प्स कोत द झ्युर पाका’ असे ओळखले जाते व मार्से नंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले इथले महत्त्वाचे शहर म्हणजे नीस. या शहराला प्रेमाने ‘नीस ला बेल’ म्हणजेच ‘नीस द ब्युटिफूल’ असे सुद्धा म्हणण्यात येते. फ्रान्सचा भाग होण्याआधी नीस हे ग्रीक व इटालियन राज्याचा भाग होता. त्याचे काही अवशेष आणि शहरावर पडलेला प्रभाव आजसुद्धा इथे दिसतो. नीस शहराची शान म्हणजेच इथल्या समुद्राला लागलेला सुंदर रस्ता म्हणजे ‘प्रोमेनाद दे झांगले’. अठराव्या शतकातल्या इंग्लिश राजघराण्यातल्या एरिस्टोक्रॅट्सच्या नीस मधल्या वाढत्या हॉलिडेज्मुळे या रस्त्याला हे नाव लाभले. या प्रोमेनाडवरून आपल्या लक्झरी लिमोझीनमधून शॅम्पेनचा टोस्ट करत आपण हॉलिवूड स्टार्ससारखाच हॉलिडे आज घेऊ शकता. नीस व जवळपासचे मोनॅको हे सेलिंगसाठी प्रसिद्ध आहे व कॅटामरान, यॉट्स, स्पीड बोट अशा वेगवेगळ्या बोटीतून आपण इथे समुद्रामध्ये सेलिंग ट्रिप्स करत जवळच्या बेटांनासुद्धा भेट देऊ शकता. नीस आणि मोनॅकोच्या मधोमध एक छोटेसे मीडीवल शहर आहे, ते म्हणजे ‘एझ व्हिलेज’. कॉबल्डस्टोन रस्ते, अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणारे पॅनोरॅमिक व्ह्यू व काही लक्झरी हॉटेल्सच्या रूम्समधून दिसणारा अथांग सागर फारच मोहक वाटतो. एझ व्हिलेजमध्ये काही परफ्यूम फॅक्टरीज् आहेत ज्याला आपण भेट देऊ शकता आणि स्वतः परफ्युम बनवण्याचा अनुभवसुद्धा घेऊ शकता. मोनॅको हा देश आपल्या पोर्टवर लागलेल्या लक्झरी यॉट्स, कसिनो व मोनॅको ग्राँ प्री या मोटरकार रेसिंगसाठी प्रसिद्ध आहे. वेळ असल्यास नक्कीच मोनॅकोमध्ये वास्तव्य करा किंवा वेळ कमी असल्यास नीसवरून मोनॅकोची डे ट्रीप तर नक्कीच करा.
जसे नीस व फ्रेंच रीव्हिएराच्या इतिहासात इटालियन्सचा सहभाग होता तसेच क्रोएशियाच्या स्थापनेतसुद्धा इटालियन इतिहास महत्त्वाचा आहे. इटलीच्या पश्चिमेकडच्या फ्रान्सवर रोमचा प्रभाव होता तर इटलीच्या पूर्वेकडच्या क्रोएशियावर पूर्णपणे व्हेनिस शहरातल्या लोकांचा प्रभाव आहे. क्रोएशिया, स्लोव्हेनिया आणि क्रोएशियाच्या दक्षिणेकडच्या मॉन्टेनेग्रोमध्ये अनेक छोटी शहरे बघून व्हेनिस शहराची आठवण येते. क्रोएशियाच्या डालमेशिया या भागावर तर व्हेनिसच्या सांस्कृतिक व कलात्मक क्षेत्राचा प्रचंड मोठा प्रभाव दिसतो. जेव्हा डालमेशियावर व्हेनिसचे वर्चस्व होते तेव्हा व्हेनिस हे इटालियन रेनेसाँचे केंद्रबिंदू होते आणि त्यामुळे याचा प्रभाव हा क्रोएशियाच्या अनेक गोष्टवर वारंवार आढळतो. क्रोएशिया, सर्बिया व स्लोव्हेनिया हे युगोस्लाव्हिया या कम्युनिस्ट देशाचे भाग होते. युगोस्लाव्हियाचे भाग झाल्यानंतर आर्थिक स्वांतत्र्य मिळाल्यापासून हे सर्व देश अनेक क्षेत्रांमध्ये उन्नती करतच आहेत. त्यामधे टूरिझम हा फार मोठा वाटा घेऊन जातो. प्राचीन मॉन्युमेन्ट्स, कल्चर व इतिहासाचा वारसा लाभलेल्या या देशांनी आज मॉडर्न पद्धती इतक्या सुंदररित्या स्विकारल्या आहेत की प्राचीनतेचे व आधुनिकतेचे कॉम्बिनेशन फारच मोहक वाटते. जरी गाडीचे स्टीयरिंग व्हील डावीकडे असले आणि भारतापेक्षा उलट दिशेने गाडी चालवत असलो तरी क्रोएशियाच्या कोस्ट लाईनवर गाडी चालवण्यासारखे सुख नाही आणि ते अगदी सोपे आहे. त्यात हवे तिथे गाडी थांबवून एड्रियाटिक समुद्राच्या सुंदर पाण्यात पोहण्याची मजा काही औरच आाहे. क्रोएशियाच्या लोकल लोकांचे सर्वात आवडीचे वेळ घालवायचे साधन म्हणजे, हवे तेव्हा हवे तिथे पोहू लागणे. क्रोएशियाला भेट देणार असाल तर आपला स्विमसूट विसरू नका. ‘गेम ऑफ थ्रोन्स’सारख्या टी. व्ही मालिकेमधल्या राजाची राजधानी दाखवण्यासाठीसुद्धा क्रोएशियाची राजधानी डुबरोव्हनिकची निवड का झाली हे डुबरोव्हनिकला जाताच कळते. इथल्या ओल्ड टाऊनमध्ये बसून दिवसाची रात्र, रात्रीची पहाट कशी होते हे कळतरसुद्धा नाही. आणि दर पहाटे या ओल्ड टाऊनचे रस्ते धुतले जातात, येणार्या दिवसाचे स्वागत करण्यासाठी डुबरोव्हनिक परत एकदा तयार होते.
समुद्रकिनार्याच्या सौदंर्याबरोबरच उत्तरेकडे ‘प्लिटविस लेक्स नॅशनल पार्क’ च्या २९५ स्क्वे.मी. च्या एरियामध्ये १६ लेक्स, वॉटरफॉल्स, व हिरव्यागार सौंदर्याची खाण आहे. त्याचबरोबर अगदी फ्रेन्डली इंग्लिश बोलणारे लोक आणि उत्तम वाईन्स व स्वादिष्ट जेवणामुळे क्रोएशिया हे जगातले एक सर्वात लोकप्रिय टूरिस्ट स्पॉट बनत आहे. वर्ल्डकप फायनलचे हे दोन्ही देश फ्रान्स व क्रोएशिया तितकेच सुंदर व आकर्षक आहेत. आपल्या हॉलिडेसाठी कुणाचीही निवड करा, तुम्हीच विनर ठराल हे नक्की!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.