जसं महाविद्यालयीन शिक्षण संपायला येतं, करियरची दिशा ठरते तसं आईवडिलांचं अभ्यास कर म्हणून आपल्यामागे लागणं थांबतं. पुढची मार्गक्रमणा यशस्वीपणे करण्याची जबाबदारी संपूर्णपणे आपली असते. तेव्हा स्वत:च स्वत:ची प्रेरणा बनणं, सतत स्वत:ला स्फूर्ती देत रहाणं महत्त्वाचं ठरतं. जागतिकीकरण आणि स्पर्धेच्या जगात आपणच आपल्याला आव्हानं देत राहिलं पाहिजे. आम्हीही आमच्यासाठी असंच एक चॅलेंज निर्माण केलं...
जागतिकीकरणामुळे करियरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. नोकरीसाठी विविध पर्याय आहेत. व्यवसायांमध्ये आणि व्यवसाय करण्यामध्ये नाविन्य आलंय. म्हटलं तर एका छानशा युगात वावरण्याची सुसंधी आपल्याला मिळाली आहे. अर्थात संधी आव्हानं आणि जोखीम घेऊनच येत असते त्यामुळे कोणताही व्यवसाय किंवा नोकरी सोपी राहिली नाहीये. परवा एका डीझाईन फर्मशी संवाद सुरू होता. म्हटलं तुम्ही तुमच्यात नाविन्य कसं राखता? त्यांनी एक वेगळीच पद्धत अमलात आणलीय. संपूर्ण संस्था मुली चालवतात, प्रत्येकीचं ह्या संस्थेतलं करियर पाच वर्षांचं. पाच वर्षांनंतर तुम्ही बाहेर पडायचं. इथे असेपर्यंत मात्र जी-जानसे काम करायचं. क्रीएटिविटी-कन्सेप्च्युअलायझेशन- आयडियाज-डीझाईन्स ह्यात सतत नाविन्य असलं पाहिजे. पाच वर्ष एकाच ठिकाणी राहिल्यानंतर आचार विचारात तोच तोच पणा येतो, अशावेळी संस्थेसाठी जुनी माणसं जाऊन नवीन माणसं घेणं आणि माणसांसाठी हा जॉब सोडून नवीन जॉब करणं हे चांगलं, दॅट कीप्स् एव्हरीवन गोइंग! हा त्यांचा फंडा. संस्थेशी जोडण्याआधीच ही संकल्पना स्पष्टपणे येणार्या नवीन मुलीला सांगितली जाते त्यामुळे प्रत्येकजणीकडे भविष्याचं चित्र सुस्पष्ट असतं. आता ह्या डीझाईन फर्मने ही स्ट्रॅटेजी ठरवलीय पण माहीती- तंत्रज्ञान-आयटी सेक्टरमध्ये तर हा अलिखित नियमच आहे. परफॉर्म ऑर पेरीश, अॅडॉप्ट ऑर पेरीश, चेंज ऑर पेरीश, ह्या क्षेत्राने लॉयल्टी हा शब्दच जणू शब्दकोशातून बाहेर फेकलाय. आज इधर तो कल उधर ह्याला आपणही सरावलोय. क्षेत्रच तसं आहे. त्याच्या वेगाशी जुळवून नाही घेता आलं तर हे क्षेत्रच बदलणं चांगलं.
एकदा कुलाबा ताजच्या गोल्डन ड्रॅगनला जेवायला गेलो होतो. तिथला व्हिन्सेंट इतक्या अदबीने आणि मनापासून सगळं काही करीत होता की त्याच्याशी संवाद साधावासा वाटला. तो अभिमानाने आणि हसर्या चेहर्याने म्हणाला, मी इथे अठ्ठावीस वर्ष आहे. टाटा ग्रुप आणि ताज ची संस्कृती जणू ह्या माणसाने आमच्यापुढे उलगडली होती. खराखुरा ब्रँड अॅम्बॅसीडर. आजही अशा अनेक संस्था आहेत जिथे माणसं आनंदाने- अभिमानाने त्यांचं आयुष्य झोकून देताहेत. त्यांचं फायनल डेस्टिनेशन ती एकच संस्था असते. रेझ्यूमे हा प्रकार त्यांनी तयारच केलेला नसतो. स्वत:चं कुटुंब आणि स्वत:चं करियर ह्या दिशा त्यांनी पक्क्या ठरवलेल्या असतात.
आमच्या वीणा वर्ल्डचंही तसंच आहे की. लोग जुडते गये और वीणा वर्ल्ड बनता गया त्यामुळे इथे जवळजवळ सत्तर ते पंचाहत्तर टक्के आम्हा टीम मेंबर्ससाठी वीणा वर्ल्ड हेच फायनल डेस्टिनेशन आहे. आता जर आपलं सर्वांचं प्रोफेशनल लाईफ इथेच व्यथीत करायचं असेल तर मग अनेक गोष्टींची दखल घ्यावी लागते. पहिलं म्हणजे मी स्वत: माझ्या आवडीने, माझ्या पसंतीने कुणाच्याही आग्रहाशिवाय इथे आलोय नं हे स्वत:च चेक करावं लागतं. त्यानंतर मी जे काम करतोय ते माझ्या ज्ञानाशी-शिक्षणाशी निगडीत आहे नं हे बघावं लागतं, तिसरं म्हणजे सकाळी उठल्यावर मला ऑफिसमध्ये जावसं वाटतं की नाही? म्हणजे कोणता विचार मनात येतो? आय हॅव टू गो! असं बळजबरीचं फीलिंग येतं की ऑय वाँट टू गो! असा उत्साह असतो ह्याची स्वपरिक्षा करायची. एकदा का योग्य मन:स्थितीने पुढे जाणारी टीम बनली की संस्थेला मागे वळून पहावं लागत नाही. मग जबाबदारी संस्थेची असते किंवा वीणा वर्ल्डची आहे प्रत्येक टीम मेंबरला त्याच्या त्याच्या आवडीच्या भागात पुढे न्यायची. त्यांच्यासाठी सतत नवनवीन क्षितीजं निर्माण करण्याची. वीणा वर्ल्डच्या सुरुवातीपासून गेली सहा वर्ष ह्यामध्ये आम्ही बर्यापैकी यशस्वी झालोय असं म्हणायला हरकत नाही. आणखी काहीतरी करूया ह्याचं स्पिरिट प्रत्येक वीणा वर्ल्ड टीम मेंबरमध्ये आहे ही भाग्याची गोष्ट आहे कारण येणारं भविष्य हे अशांसाठीचं आहे.
जरी हे युग प्रचंड स्पर्धेचं असलं, जग जवळ आल्याने अनेक आव्हानं आपल्यासमोर उभी ठाकलेली असली तरी हे युग, हा कालखंड मला आवडतो. रोज काहीतरी नवीन करायला मिळण्याची किंवा ते देण्याची क्षमता ह्यात आहे. एकच गोष्ट अनेक वेगवेगळ्या प्रकारे करता येते हे ह्याच युगाने आपल्याला शिकवलं. काल केलेली अगदी बरोबर असणारी गोष्ट आज रद्दबातल होऊ शकते हे स्विकारण्याची मानसिकता समृद्ध केली ती ह्याच युगाने. सभोवताल बदलतंय तुलाही स्वत:ला बदलावं लागेल, बदल अपरिहार्य आहे ही जाणीव प्रकर्षाने झाली तीही आत्ताच. नथिंग इज पर्मनंट, एव्हरीथिंग इज पॉसिबल हेही ह्या युगाने दाखवून दिलं. वुई आर इन अ वंडरफुल वर्ल्ड! मनुष्यजन्म मिळालाय आणि आपल्याला त्याचं सोन. करायचंय हे ही तितकचं खरं.
रोज तेच ऑफिस, रोज तीच कामं, कामांच्या बाबतीत वेगवेगळे प्रोजेक्ट्स हे झालं रूटीन, प्रत्येकाचं योगदान त्याप्रती असतंच. घर-कुटुंब-शिक्षण ह्या वैयक्तिक जबाबदार्याही असतात प्रत्येकाच्या. ह्या सगळ्यांमधून एक काहीतरी हॉबी किंवा वेगळं लक्ष्य असावं किंवा ते असलं तर कौटुंबिक वा कार्यालयीन आयुष्य उत्साही बनून जातं. आणि म्हणूनच सहा वर्षांपूर्वी आम्ही आमच्यासाठी एक चॅलेंज आणलं. ते चॅलेंज होतं, आपल्या आयुष्यात पन्नास देश बघण्याचं. आम्ही अशा क्षेत्रात आहोत की आमच्या परफॉर्मन्सच्या जोरावर आम्ही किमान पन्नास देश आपल्या आयुष्यात बघू शकतो. पर्यटकांना त्यांच्या आयुष्यात असे पन्नास देश पूर्ण करायला बर्यापैकी पैसे मोजावे लागतात. पर्यटनामुळे माणूस आचार-विचार- आहार-आरोग्य-मानसिकता ह्या सर्वच बाबतीत प्रगल्भ बनतो हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतलाय. मग हे जर आपण वीणा वर्ल्डमध्ये आपल्या स्वकर्तृत्वाने, पैसे खर्च न करता करू शकत असू तर का करू नये? अर्थात परफॉर्मन्स इज द की! पैसे नाही, पण खडा परफॉर्मन्स देणं जरूरीचं आहे. सो आम्ही सर्वांनी हे आव्हान स्विकारलंय. आमच्या रुटीनमध्ये आम्ही स्वत:ला सतत चार्ज ठेवीत असतो ह्या फिफ्टी कंट्री चॅलेंजच्याद्वारे. आणि खरंच ही गोष्ट आम्हा सर्वांच्या एनर्जी लेव्हल्स हाय ठेवीत असते कारण वुई ऑलवेज लूक फॉरवर्ड टू समथिंग विच इज रीअली इंटरेस्टिंग. दरवर्षी किमान एका देशाला भेट द्यायचा विचारच किती उत्साहवर्धक आहे बघा नं!
आम्ही ऑफिसमध्ये काम करणारी मंडळी पण आमच्याकडे असे काही टीम मेंबर्स आहेत जे अमेरिकेला पन्नास वेळा जाऊन आलेत किंवा युरोपला शंभर वेळा. हे आहेत आमचेच नव्हे तर पर्यटकांचे आवडते वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्स. वीणा वर्ल्डच्या चारशेपेक्षाही अधिक टूर मॅनेजर्समध्ये तीस टूर मॅनेजर्सनी पन्नास देशांहून अधिक देशांना भेट दिलीय. आणखी वीस जणं ह्या वर्षी पन्नास देश पूर्ण करतील. आणि हे सगळं घडण्यात आमचा कोणताही हात नाही. त्यांनी संपूर्णपणे स्वत:च्या परफॉर्मन्सवर, पर्यटकांची सहल उत्कृष्ट तर्हेने आनंदात पार पाडीत हे पन्नासहून अधिक देशांचं चॅलेंज पूर्ण केलंय. आपल्याला पटकन असं वाटतं की किती लकी आहेत ही टूर मॅनेजर मंडळी! पण सहल जर शंभर टक्के यशस्वी करायची असेल तर आमच्या टूर मॅनेजर्सना कंबर कसून, ऊन-वारा- पाऊस-दिवस-रात्र कशाचीही पर्वा न करता काम करावं लागतं. ज्यांनी ज्यांनी सहल केलीय त्या पर्यटकांना त्याची कल्पना असेल. फार कठीण काम आहे ते पण आमची ही टूर मॅनेजर मंडळी लिलया पार पाडीत असतात. जे काम त्यांनी हाती घेतलंय ते त्यांना आवडतंय, त्यांनी त्यात स्वत:ला झोकून दिलंय म्हणूनच कितीही कष्ट पडले तरी ते त्यांच्या चेहर्यावर दिसत नाहीत.
परवा डॉक्टर विठ्ठल लहाने आणि पद्मश्री तात्याराव लहानेंची यु ट्यूबवरील भाषणं ऐकत होते त्यात ते म्हणाले, आपल्या आईवडीलांनी आपल्याला आता अभ्यास नको करू रे बाबा असं म्हटलं पाहिजे एवढा अभ्यास आपण केला पाहिजे, तुम्हाला त्याची गोडी लागली तरच ते घडू शकतं. झपाटून उठलं पाहिजे त्यासाठी. आमच्या टूर मॅनेजर्सच्या बाबतीतही तसंच आहे. घरी गेल्यावर त्यांच्या घरची मंडळी नक्कीच त्यांना सांगत असतील, आता काहीही काम न करता विश्रांती घे रे बाबा! हा समाधानाचा क्षण असतो, घरच्यांचा आणि आमच्या टूर मॅनेजर्सचाही. मी स्वत:ही पंधरा वर्ष टूर मॅनेजर होते त्यामुळे मला ह्या सर्वांची कल्पना आहे. भरपूर काम करायचं आणि मग घरच्यांकडून स्वत:चे भरपूर लाड करून घ्यायचे. आपल्या घरच्यांसोबत श्रमपरिहाराचा आनंद केवळ शब्दातित.
हजारो मैलांचा प्रवास करणार्या, पर्यटकांना त्यांच्या सहलीचा निखळ आनंद मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्स त्यांच्या कर्तृत्वामुळे भारतीय पर्यटनक्षेत्रातच नव्हे तर जगभरातील पर्यटन स्थळी गौरविले जातात. त्यांनी निश्चितपणे ह्या क्षेत्रात स्वत:चा ब्रँड निर्माण केला आहे. त्यांना माझा मन:पूर्वक सलाम! त्यांचं करिअर ह्या क्षेत्रात येणार्यांचं मनोबल नक्कीच वाढवेल, म्हणूनच आजपासून सुरू करीत आहे फिफ्टी कंट्री चॅलेंज पूर्ण केलेल्या आमच्या टूर मॅनेजर्सचं मनोगत, त्यांच्याच शब्दात.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.