गेली तीन वर्ष सातत्याने वीणा वर्ल्ड नॉर्थ ईस्टच्या सहली यशस्वीरित्या आयोजित करतंय. मी स्वत: दरवर्षी वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशलच्या निमित्ताने नॉर्थ ईस्टच्या वार्या करतेय. आसाम अरुणाचल मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपूरा ह्या पूर्वांचलातील सेव्हन सिस्टर्स्टचं सौंदर्य, त्यातील विविधता पर्यटकांना मोहवून टाकते. ते बघताना एक गोष्ट टोचत राहते ती म्हणजे, नॉर्थ ईस्टला सहली न्यायला, पर्यटकांना ही भूमी दाखवायला आम्ही एवढा उशीर का केला?
नॉर्थ ईस्ट म्हटलं की आपल्यासमोर सेव्हन सिस्टर्स किंवा पूर्वांचल किंवा आसाम, अरुणाचल, मेघालय, नागालँड, त्रिपूरा मणिपूर, मिझोराम ही सात राज्य येतात. पण खरंतर नॉर्थ ईस्ट ऑफ इंडियामध्ये एकुण आठ राज्य आहेत आणि ते आठवं राज्य आहे सिक्किम. सिक्किमच्या सहली सोलो म्हणजे स्वतंत्रपणे किंवा दार्जिलिंगसोबत आम्ही करीत होतोच खूप पूर्वीपासून पण पूर्वांचलकडे किंवा सेव्हन सिस्टर्सकडे तसं दुर्लक्षच झालं म्हणायला हरकत नाही. आणि ते आमचंच नाही तर आपल्या संपूर्ण भारतीय पर्यटनक्षेत्राचं. अर्थात त्यावर काथ्याकुट करण्यात अर्थ नाही. आता आपण काय करू शकतो हे महत्वाचं आणि ह्या एका विचारानेच आम्ही वीणा वर्ल्ड सुरू झाल्या झाल्या लागलीच नॉर्थ ईस्टच्या सहली सुरू केल्या. ज्यावेळी पहिली पायलट टूर केली तेव्हा ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी अवस्था झाली. निसर्गसौंदर्य, लोककला, परंपरा, विविधता, आश्चर्य अशा अनेक बाबींनी परिपूर्ण अशा डेस्टिनेशन्सचा जगभर शोध घेत जिप्सीसारखं फिरणार्या आम्हाला आपल्या उत्तर-पूर्वेकडे असलेल्या, आपल्या भारतातल्या, हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या एक से एक सुंदर राज्यांचा पूर्णपणे विसर कसा काय पडला? एखादी गोष्ट सारखी आपल्यालाच टोचत राहते न तसंच काहिसं ह्या नॉर्थ ईस्टच्या बाबतीत झालं. तुज आहे तुजपाशी....
नॉर्थ ईस्ट, काश्मीर आणि हिमाचलच्या तोडीचं आहे, जराही कमी नाही उलट मी म्हणेन की नॉर्थ ईस्टमध्ये विविधता जास्त आहे. अर्थात हिमाचल आणि काश्मीरमध्ये पर्यटनाचा विस्तार, पर्यटकांचा वावर, त्यांचं प्रमोशन, पर्यटकांद्वारे होणारी त्याची जाहिरात ह्या सगळ्या गोष्टी खूप आधीपासून झाल्याने ही राज्य देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली. पर्यटकांकडून पैशाचा ओघ सुरू राहिल्याने इन्फ्रास्ट्रक्चर आणि हॉटेल इंडस्ट्री वाढली आणि पर्यटन सुकर बनलं. नॉर्थ ईस्टच्या बाबतीत हे सर्वच थोडं उशीरा घडलं किंवा घडवलं. अर्थात आता आपल्या माननीय पंतप्रधानांनी नॉर्थ ईस्टच्या विकासाचे अनेक आराखडे आखल्यामुळे तसंच केंद्राचं लक्ष नॉर्थ ईस्टकडे वळल्यामुळे संपूर्ण पूर्वांचलमध्ये चैतन्य आलंय असं म्हणायला हरकत नाही. आम्हीही नॉर्थ ईस्टकडे मोठ्या आशेने बघतोय कारण पर्यटकांना सतत नवीन काय देत रहायचं, नव्या डेस्टिनेशन्सच्या त्यांच्या डिमांड कशा पूर्ण करायच्या ह्यासाठी विचार करावा लागतो. ज्यावेळी नॉर्थ ईस्ट डोळ्यासमोर आलं त्यावेळी एखादी अलिबाबाची गुहा सापडावी तसं झालं. नॉर्थ ईस्ट युरोपसारखं वाटलं. जसं युरोपमध्ये असलेल्या अनेक देशांच्या सोलो टूर्स किंवा दोन देशांच्या, तीन देशांच्या किंवा मल्टीकंट्रीज् असलेल्या कॉम्बिनेशन्सच्या टूर्स करतो तसंच पोटेंशियल मला नॉर्थ ईस्टमध्ये दिसलं. इथे प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र सहल होऊ शकतेे किंवा दोन राज्य, तीन राज्य किंवा सातही राज्यांची एकत्रित सहल होऊ शकते. आणि गेली तीन वर्ष सातत्याने आम्ही ह्या सहली करतोय. भरपूर पर्यटकांनी वीणा वर्ल्डसोबत नॉर्थ ईस्टच्या सहली केल्या. नॉर्थ ईस्टच्या सहलींमध्ये संपूर्ण सात राज्यांना कव्हर करणारी वीस दिवसांची नॉर्थ ईस्ट एक्सप्लोरर ही सहल आहे तर आसाम अरुणाचल मेघालय ह्या तीन राज्यांनी मिळून बारा दिवसांची नॉर्थ ईस्ट ज्वेल्स ही सहल आहे किंवा सात दिवसांची आसाम आणि मेघालय कव्हर करणारी एक छोटी नॉर्थ ईस्ट हायलाइट्स सहल आहे. ह्या सर्व सहली मुंबईहून विमानाने असतात, मुंबई ते मुंबई. काही सीट्स बाहेरगावच्या पर्यटकांसाठी डायरेक्ट जॉइनिंग अशाही असतात. पुण्याहून नॉर्थ ईस्ट साठी चांगले कनेक्शन यायचे चान्सेस आहेत त्यामुळे पुणे ते पुणे असा पर्यायही पर्यटकांसाठी उपलब्ध होईल. ह्या मे महिन्यामध्ये जेव्हा पर्यटकांची स्नो स्पेशल सहलींची डिमांड वाढायला लागली तेव्हा आम्ही तवांग हे पर्यटनस्थळ नव्याने आणलं आणि पर्यटकांनीही ह्या तवांग बोमडिला काझिरंगा सहलीचं खूप चांगलं स्वागत केलं. सिक्किम हा नॉर्थ ईस्टचा भाग. त्या सिक्किमची सोलो टूर सध्या डिमांडमध्ये आहे. सिक्किमसुद्धा हिमालयाच्या पायथ्याशी असल्याने आणि ब्रिटिशांनी वसविलेल्या हिलस्टेशनचा शिक्का असल्याने पर्यटकांना कायम मोहात पाडतं, मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा तिथल्या निसर्गसौंदर्याने आणि गंगटोक शहराच्या एकुणच नगर रचनेने आश्चर्यचकित झाले होते. ह्या सर्व डेस्टिनेशन्ससाठी इंडिपेंडन्ट म्हणजे तुम्हाला हवी तशी हॉलिडे पॅकेजेसही आमच्या सिग्नेचर हॉलिडेज्कडे आहेत.
नॉर्थ ईस्टच्या आठ राज्यांची महती सांगायला ही जागा अतिशय अपूरी आहे. पण थोडक्यात आपण जाणून घेऊया की स्थलदर्शनाचा किती मोठा खजिना ह्या राज्यांनी आपल्यासमोर खुला केलाय. अरुणाचलमध्ये तवांग मॉनेस्ट्री जी दहा हजार फुटांवर निसर्गाच्या कोंदणात बसलीय ती ल्हासा तिबेटनंतर जगातली दुसर्या नंबरची मोठी मॉनेस्ट्री आहे. तवांगचा वर्षभर बर्फाच्छादित राहणारा सेला पास म्हणजे अनोखं अॅडव्हेंचर, आणि सेला लेक किंवा माधुरी लेक (शुंगात्सर) म्हणजे निर्मळ निसर्गाचा साक्षात्कार. बोमडिला हे तवांगचं प्रवेशद्वार म्हणायला हरकत नाही आणि तेही तितकंच निसर्गसुंदर. तिथून दिसणारे गोरीचेन पहाड केवळ अविस्मरणीय. आसामचं मुख्य आकर्षण म्हणजे एकशिंगी गेंड्याचं काझिरंगामध्ये वसलेलं राज्य हा सहलीतला महत्वाचा भाग. एक्कावन्न शक्तीपिठातलं गोहत्तीचं कामाख्या मंदीर, भारतातील सर्वात मोठी नदी ब्रम्हपुत्रा, माजुली हे नदीतलं अनोखं बेट, मैलोन् मैल पसरलेले हिरवेगार चहाचे मळे, आदि गोष्टी आसामला सेंट पर्सेंट मार्क्स देऊन टाकतात. गोड्या पाण्याचा सर्वात मोठा तरंगता लेक म्हणजे लोकटक लेक ही मणिपूरची मोठी ओळख आहे. १९९४च्या इंफाळ आणि कोहीमाच्या जपानी लोकांवर मिळवलेल्या विजयाचं स्मारकही सिमेट्रीच्या स्वरूपात मणिपूरमध्ये आहे. अतिशय सुंदर अशा मेघालयाचं मुख्य आकर्षण म्हणजे लिव्हिंग रूट ब्रीज आणि दावकी लेक आणि मास्माई केव्हज्, बांगला देशाची बॉर्डर दाखविणारं तमादिल गाव, उमनॉट रिव्हर या वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपल्या स्मरणात राहतं. हॉर्नबिल फेस्टिवलसाठी प्रसिद्ध असलेलं नागालँड तौ फेमा ह्या ऐतिहासिक गावामुळे आणि जिथे कुणीही झाड तोडत नाही अशा खोनोमा ह्या ग्रीन व्हिलेजमुळे जगाची ओळख बनलंय. त्रिपूराचा नीर महाल आपल्याला जलमहलची आठवण करून देतो तर उनाकोटी हिल्स आश्चर्यचकित करतात. आणि हो मेघालयातलं मौल्लिन्नाँग गाव तर स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे, अगदी जगाचं लक्ष त्या छोट्याशा गावाने वेधून घेतलंय. अजून कितीतरी गोष्टी आहेत पण पुन्हा कधीतरी त्या विषयी.
सो पर्यटकहो, नॉर्थ ईस्ट पर्यटनासाठी सज्ज आहे, आम्ही तुमच्या दिमतीला हजर आहोत फॅमिली टूर्स, वुमन्स स्पेशल, सीनियर्स स्पेशल आणि इंडिपेंडन्ट हॉलिडेज घेऊन, मग आता वाट कसली बघायची? चलो, बॅग भरो, निकल पडो! ह्यावेळी मिशन नॉर्थ ईस्ट!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.