गेल्या महिन्यात सर्वच ऑफिसेसमधली उपस्थिती रोडावली होती, हा कुठे आहे? ती कुठे आहे? असा प्रश्न केला की उत्तर यायचं धम्माल टूरवर फूकेतला गेलाय किंवा धम्माल टूरवर राजस्थानला गेलीय. सगळा आनंदाचा आणि कृतकृत्यतेचा मामला. सहलींमधून नात्यांची गुंफण होते, आणि म्हणूनच मी म्हणते की सहली कौटुंबिक नात्यांची वीण आणखी घट्ट करतात, त्यात आनंद फुलवतात आणि आयुष्याकडे बघण्याचा एक आगळा दृष्टीकोन देतात.
आमच्या पुणे सेल्स ऑफिसमधल्या व्हिनस उंबरकरचा ब्लॉग वाचला आणि संदीप खरे-सलील कुलकर्णींची दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता आठवली. व्हिनसच्या वडिलांची श्री अनिल उंबरकरांची इच्छा होती अंदमानला जायची. नॅट जीओ, डिस्कव्हरी हे त्यांचे आवडते विषय, पाण्याखालची, रंगबिरंगी दुनिया त्यांना सतत खुणावत असायची, आणि व्हिनसकडे त्यांची सारखी विचारणा असायची कधी जायचं आपण म्हणून, हळूहळू व्हिनस तो प्रश्न कसा टाळता येईल ते बघायची, तिच्या भाषेत कलटी मारायची. अर्थात तिच्या मनात वडिलांची अंदमानची इच्छा पूर्ण करायची आस होती, त्यामुळे एक दिवस अंदमानची सहल जेव्हा सवलतीच्या दरात वीणा वर्ल्ड टीम मेंबर्स व त्यांच्या फॅमिलीसाठी जाहीर झाली तेव्हा तिने वडिलांना न विचारताच त्यांचं बुकिंग करून टाकलं आणि दहा दिवसांत वडिलांना घेऊन अंदमानला रवाना झाली. ती स्वत: सहलीची मजा घेत होती पण वडिलांच्या चेहर्यावरचा इच्छापूर्तीचा आनंद बघून आणखी खूश होत होती. काही पर्यटकांनी अंदमानमध्ये डायव्हिंग करायची टूम काढली आणि व्हिनसही त्यात सामिल झाली. ती डायव्हिंगला जातेय म्हणून तिच्या वडिलांना आनंद झाला होता, तो त्यांंच्या चेहर्यावर दिसत होता पण व्हिनसला जाणवलं ते त्यामागचं दु:ख कारण पाय दुखत असल्याने त्यांना डायव्हिंगला जाता येणार नव्हतं आणि नॅटजिओवर बघितलेली ती पाण्याखालची अद्भूत दुनिया त्यांना बघता येणार नव्हती. व्हिनसनं धाडस केलं आणि वडिलांच्या नकळत त्यांचाही फॉर्म भरला, दुसर्या दिवशी त्यांना डायव्हिंगला घेऊन गेली. मनातून थोडी धास्तावलेली होती जर काही झालंतर म्हणून, पण वडील जेव्हा डायव्हिंग करून सुखरुप परत आले तेव्हा तिला हायसं वाटलं, आणि तिच्यासाठी तो परमोच्च आनंदाचा क्षण होता. वडिलांची फार दिवसांची इच्छा तिने पूर्ण केली होती. आयुष्यात हेच आनंदाचे क्षण तर वेचायचे असतात. व्हिनसने एक चांगलं उदाहरणं सगळ्या टीमसमोर ठेवलं होतं, त्यासाठी तिचं अभिनंदन केलं.
वीणा वर्ल्डच्या सेल्स ऑफिसेसमध्ये बुकिंग करायला आलेले पर्यटक कधी कधी आमच्या टीम मेंबरला प्रश्न करतात, एवढं भरभरून तू बोलतेयस तर तू जाऊन आलीयेस का ह्या ठिकाणी? प्रश्न साहजिक येतो आणि उचितही असतो. एखादी गोष्ट आपण एक व्यावसायिक म्हणून विकत असू तर आधी आपण स्वत: ती तपासून घेतलेली असली पाहिजे. आमच्या व्यवसायात आम्ही सहल विकतो, त्यामुळे ती विकताना त्या टीम मेंबरने ती सहल केलीय का ? हा समोर बसलेल्या पर्यटकाचा प्रश्न रास्त असतो, कदाचित त्यामुळे बोलणार्यावर अधिक विश्वास बसतो समोरच्या गेस्टचा. आम्ही जगाला जग दाखवतो, अनेक प्रकारच्या सहली देशविदेशात आयोजित करीत असतो. तसं बघायला गेलं तर जग बघायला एक जन्म अपूरा आहे. त्यामुळे आमचा टीम मेंबर तिथे जाऊन आलाच असेल असं नाही, पण पर्यटकांसोबत जाणारे आमचे अनेक टूर मॅनेजर्स पन्नास देशांची वारी पूर्ण केलेले आहेत, अशा सारख्यांच्याच भरवशावर आमचे ऑफिस टीम मेंबर्स भरभरून बोलत असतात, पर्यटकांना खात्री देत असतात. आमचे टूर मॅनेजर्स एकापाठोपाठ एक असे देशविदेश पालथे घालत असतात, ऑफिसमध्ये असणार्या टीम मेंबर्सना तो चान्स नसतो पण त्यांनाही ह्या अनेक प्रकारच्या सहलींचा आनंद लुटता यावा म्हणून दरवर्षी आम्ही वर्षातल्या अमूक एका वेळी एअरलाईन्स- हॉटेलियर्सच्या सहकार्याने वीणा वर्ल्ड टीम मेंबर्ससाठी देशविदेशातल्या चार-पाच दिवसांच्या अनेक सहलींचं आयोजन करतो. साधारणपणे तीनशे चारशे टीम मेंबर्स देशविदेशात पर्यटन करतात. जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ह्या सहलींचं आयोजन केलं जातं जेव्हा सुपरपीक सीझनचं काम थोडं कमी झालेलं असतं. गेला महिनाभर आमच्या नेहमीच्या पर्यटकांच्या ईमेलसोबत टीम मेंबर्सच्या फॅमिलीच्या पत्रांनी माझा ईमेल बॉक्स फुल्ल झाला. प्रत्येक पत्र वाचताना किंवा त्यातला आशय जाणून घेताना आनंद होत होता. आताच्या अनिश्चिततेच्या काळात आमच्या टीममेंबर्सच्या फॅमिलीच्या मनातली ही निश्चिंतता मला सुखावून गेली. कुणी अगदी पहिल्यांदाच घराबाहेर पाऊल टाकलं होतं, कुणाचा पहिला विमानप्रवास होता, कुणी पहिल्यांदा विमानतळ पाहिला तर कुणाचा पहिलावहिला परदेश प्रवास. कुणाला बहिणीने सहलीला नेलं होतं तर कुणी पहिल्यांदाच आईवडिलांना घेऊन अशा सहलीला यायचा आनंद मिळवला होता. कुणाच्या बहिणीने गेल्यावर्षी स्वतः धम्माल सहलीचा आनंद लुटल्यानंतर यावर्षी आपल्या अहोंना ही एकदा येऊन बघाच काय धम्माल असते ह्या धम्माल सहलीत म्हणून सोबत आणलं होतं. तेव्हा त्यांच्या अहोंनी आता पुढे कधीही पर्यटनाला जाऊ तर वीणा वर्ल्डसोबतच असा पण केल्याचं पत्रही समाधान देऊन गेलं. आमच्या पीएसपी टीममधील मैथिली सोनपत्की हीचं आता काही दिवसांत लग्न आहे त्यामुळे आई-वडिलांसोबत एकत्र प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी ती केरळ धम्माल सहलीला गेली होती तर काहीजण आमच्या टीम मेंबर्सपैकी असेही होते की ज्यांना आपल्या कामाचा भाग म्हणून एखाद्या डेस्टिनेशनची माहिती गेस्टना देण्याच्याव्यतिरिक्त एक स्टेप पुढे जाऊन प्रत्यक्ष त्या डेस्टिनेशनचा आनंद लुटायचा होता, म्हणून त्यांनी धम्माल सहलीची वाट पकडली होती. तर प्रॉडक्ट डीपार्टमेंट्समधले आमचे हरहुन्नरी टीम मेंबर्स कामाचं योग्य नियोजन आधीच करून सर्वांच्याच फॅमिलीसोबत एकत्र सहलीची मजा लुटता यावी म्हणून ठरवून आपापल्या फॅमिलीला घेऊन धम्माल राजस्थान टूरवर गेलं होते. एकूणच सगळा आनंदाचा आणि कृतकृत्यतेचा मामला. सहलींमधून नात्यांची गुंफण होते ती अशी, आणि म्हणूनच मी म्हणते की सहली कौटुंबिक नात्यांची वीण आणखी घट्ट करतात, त्यात आनंद फुलवतात आणि आयुष्याकडे बघण्याचा एक आगळा दृष्टीकोन देतात. आणि म्हणूनच ह्या वीणा वर्ल्ड टीम मेंबर्ससाठी आयोजित केल्या जाणार्या सहलींना आम्ही धम्माल टूर्स असं म्हणतो. गेल्या महिन्यात सर्वच ऑफिसेसमधली उपस्थिती रोडावली होती, हा कुठे आहे? ती कुठे आहे? असा प्रश्न केला की उत्तर यायचं धम्माल टूरवर फूकेतला गेलाय किंवा धम्माल टूरवर राजस्थानला गेलीय. आमची जनरल मॅनेजर शिल्पा मोरे नेहमी ह्या सहलींचा घाट घालते कारण कौंटुबिक आनंद ही एक बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे टीमचं नॉलेज आपसूक वाढतं. टूर म्हणजे काय असतं, तिथे काय महत्त्वाचं असतं, कुठे सावधानता बाळगायला पाहिजे असं प्रॅक्टिकल ट्रेनिंगही होऊन जातं. व्यक्तिमत्त्व विकास होतो तो वेगळाच. आतातर आमची अनेक कुटुंब दरवर्षी धम्माल टूरची वाट बघतात आणि ते दरवर्षी निघतात वेगवेगळ्या पर्यटनस्थळी.
परवा एका मीटिंगमध्ये बसलेले असताना धम्माल टूरचा विषय निघाला. जी-जी मंडळी जाऊन आली होती त्यांच्या चेहर्यावर ती धम्माल स्पष्टपणे प्रतित होत होती. आता पुढच्या वर्षी आपण इथे सहल करूया, तिथे जाऊया... अशी चर्चा एकदम रंगात आली. मला भातंब्रेकरांचा 60-30-10 चा टुरिझम फॉर्म्युला आठवला आणि मी म्हटलं, आपण सर्वांनी ठरवूया की आपला कामानिमित्त होणारा प्रवास वगळून आपण वर्षातून किमान एकदा आपल्या कुटुंबाबरोबर किंवा मित्रमैत्रिणींसोबत पर्यटन करायचं. त्यासाठी आपणही आपल बचतीचं सूत्र ठरवूया आणि पैसे साठवूया. आपल्या माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलं आहेच. येत्या तीन वर्षांत भारतातल्या किमान पंधरा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचं, त्यातही सहभागी होऊया. आपल्या देशातलंं पर्यटन वाढविण्यासाठी आपणच प्रयत्न करूया. जगात पर्यटन उद्योगवाढ दुसर्या नंबरवर आहे. मॅन्युफॅक्चरिंग पाठोपाठ पर्यटनाचा नंबर लागतोय. त्यानंतर आरोग्य, तंत्रज्ञान-IT ह्या इंडस्ट्रीज येतात. तेव्हा सुजलाम्-सुफलाम् विविधतेने नटलेल्या आपल्या भारतातही पर्यटनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आपण हातभार लावूया, भले तो अंशत: असेल पण त्याने आपल्याला समाधान निश्चित मिळेल. बचत करणे, दरवर्षी किमान एक सहल करणे ह्यावर आम्ही मनोमन शिक्कामोर्तब केलं आणि कामाला सुरुवात केली.
ओम पर्यटनाय नम: हा आम्ही जपत असलेला मंत्र, कारण पर्यटन हाच आमचा उद्योग आहे, तीच आमची रोजी रोटी आहे. एक मात्र निश्चित, पर्यटन वाढतयं. वीणा वर्ल्डच्या सहा वर्षाच्या काळात चौदा ते पंधरा सहली वीणा वर्ल्डसोबत केलेले अनेक पर्यटक आहेत. वीणा वर्ल्डला त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आम्ही त्यांचे शतश: ऋणी आहोत, पण हीच मंडळी पर्यटन किती वेगाने वाढतंय ह्याची जाणीव करून देताहेत. अन्न वस्त्र निवारा शिक्षणानंतर पर्यटन त्या यादीत समाविष्ट झालंय, त्यासाठी बजेट ठेवलं जातंय. पुढची पायरी असते पर्यटन कुठे कधी कसं करायचं त्याची. त्यासंबंधी पुन्हा कधीतरी.... तोपर्यंत धम्माल करीत आयुष्य झेलू.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.