माझ्या मते सीनियर्स स्पेशल ही नुसती एक कमर्शियल सहल नाहीये. कौटुंबिक नाती घट्ट करणारी, आत्मविश्वास वाढविणारी, दुखण्यांपासून दूर नेणारी, स्वत:ला सिद्ध करणारी, राहून गेलेल्या-करता न आलेल्या अनेक गोष्टी पूर्णत्वाला नेणारी, स्वत:वरप्रेम करायला लावणारी, ज्ञान वाढविणारी, स्मार्ट बनविणारी जादुई सहल आहे.
सहा-सात-आठ किंवा सात-आठ-नऊ हे शब्द ओळखीचे वाटतात? ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आमची कोणतीही सहल केलीय त्यांना ह्या शब्दांचा अर्थ कळेल. हे शब्द म्हणजे टूर मॅनेजर आणि पर्यटक ह्यांच्यामधला जास्त काही न बोलता कळले सारे वाला संवाद आहे.वीणा वर्ल्ड ग्रुप, लक्षात आहे नं, उद्या? टूर मॅनेजरने असं विचारताच पलिकडून म्हणजे पर्यटकांकडून आवाज येतो, सहा-सात-आठ. कोणत्याही सहलीवर हे अगदी महत्त्वाचे शब्द आहेत आणि त्याचा अर्थ आहे, सहा वाजता उठा उठा सकळीक म्हणणारा गजर-मॉर्निंग अलार्म, सात वाजता सकाळची पेटपूजा-ब्रेकफास्ट आणि आठ वाजता स्थलदर्शनार्थ किंवा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी प्रस्थान-डीपार्चर. कधी एखादा दिवस सात-आठ-नऊ असाही येतो आणि कधी विमान किंवा बोट पकडायची असेल तर हे वेळापत्रक सहाच्या आधीही करावं लागतं. ग्रुप टूर मध्ये हे वेळापत्रक महत्त्वाचं आहे. अनेक मंडळींना सहलीवर आल्यावर असं वेळेबरहुकूम वागणं आवडत नाही त्यांच्यासाठी आम्ही वैयक्तिकरित्या त्यांना स्वत:ला हवं तसं मनासारखं कस्टमाईज्ड हॉलिडे पॅकेज बनवून देतो. अर्थात परप्रांतातली किंवा परदेशातली भाषा-भोजन- भूगोल ह्याची अनभिज्ञता आणि सुरक्षितता ह्याचा विचार करता जगभर ग्रुप टूर्सद्वारे येणार्या पर्यटकांची संख्या प्रचंड आहे आणि वाढतेय. ग्रुपमध्ये एकमेकांच्या साथीने सुरक्षित वाटतं, नवीन ओळखी-गप्पा गोष्टींमध्ये कंटाळवाणे प्रवास आनंददायी बनून जातात, जास्तीत जास्त बघायला मिळतं, आता पुढे काय करायचं? हा प्रश्न पडत नाही कारण कार्यक्रम व्यवस्थित आखलेला असतो, टूर मॅनेजर वेळेनुसार तो पार पडत असतो, डोक्याला ताप नसतो. ग्रुप टूर्समध्ये पर्यटक एवढ्या मोठ्या संख्येने फिरतात त्याची कारणं ही आहेतच, पण आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अडी- अडचणीत कुणीतरी काळजी घेणारं असतं, त्या अडचणीतून मार्ग काढणारं असतं. वीणा वर्ल्डच्या ग्रुप टूर्स जास्तीत- जास्त लोकप्रिय होताहेत त्याला ह्याच सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत.
कुटुंबांसाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी कोणती ना कोणती सहल वीणा वर्ल्डकडे आहे. वुमन्स स्पेशल, सिंगल्स स्पेशल, हनिमून स्पेशल, सीनियर्स स्पेशल हे त्यातलेच काही प्रकार. सगळ्याच सहलींना मागणी आहे पण वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशल चार्टबस्टर्स आहेत हे त्यांच्या सतत वाढणार्या संख्येवरून लक्षात येतं. या आठवड्यात मी पुन्हा स्वित्झर्लंडला चाललेय. युरोप सहलीवर वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशलद्वारे गेलेल्या आमच्या साडेचारशे पर्यटकांना भेटायला. गेल्या चार महिन्यात स्वित्झर्लंडला माझी ही चौथी फेरी आहे. प्रत्येक वेळी अशा चारशे ते पाचशे सीनियर्स पर्यटकांना किंवा सात ते सत्तर वयातील महिलांना भेटण्याचं भाग्य मला मिळतं. पूर्वी मी जगभरच्या म्हणजे जपानपासून स्कॅन्डिनेव्हियापर्यंत आणि ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत तसंच भारतात काश्मिरपासून अंदमानपर्यंत अणि नेपाळ भूतानपासून गुजरात राजस्थान इथे असणार्या सीनियर्स वा वुमन्स स्पेशल सहलींना गेलेल्या पर्यटकांना भेटायला जात असे पण आता दर महिन्याला ह्या आठ ते दहा सहली असल्याने प्रॅक्टिकली असं प्रत्येक टूरवर जाणं शक्य होत नाहीये. तरीही युरोप, थायलंड, कुलू-मनाली, केरळ, राजस्थानसारख्या सहलींवर जाऊन मी पर्यटकांशी संवाद सुरू ठेवते. अशा जाण्याने सर्व ठिकाणी सर्वकाही आलबेल आहे, ठरल्याप्रमाणे घडतंय हे पर्यटकांच्या चेहर्यावरून जाणता येतं. अगदी फर्स्ट हँड इन्फोर्मेशन. तेथील आमच्या असोसिएट सप्लायर्सशीही भेटता येतं, चर्चा होते, पुढच्या गोष्टी ठरवता येतात हाही फायदाच.
युरोपची अमेरिकेची किंवा जपानची कोणतीही सीनियर सिटीझन्सची टूर असली तरी आम्हाला स्थलदर्शनात काटछाट करता येत नाही, त्यांना सर्व बघायचं असतं, त्यामुळे प्रत्येक टूर ही सहा-सात-आठ ते रात्री आठ अशी दिवसभर स्थलदर्शनाने भरलेली असते. हल्ली सर्वच देशात कोणतीही बस ही बारा तासांपेक्षा जास्त चालवता येत नाही. ड्रायव्हरला बारा तास विश्रांती मिळालीच पाहिजे हा नियम, त्यामुळे आठ ते आठ किंवा नऊ ते नऊ असा कार्यक्रम असतो. त्यात स्थलदर्शन, दुपारचं भोजन, दोन अडीच तासानंतरचे टॉयलेट ब्रेक्स ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि आमचे टूर मॅनेजर्स ड्रायव्हरच्या-कोच कॅप्टनच्या मदतीने आणि पर्यटकांच्या सहकार्याने ती सहल व्यवस्थित पार पाडीत असतात. सीनियर्सच्या सहलींना प्रत्येक कोचला दोन टूर मॅनेजर्स असतात त्यामुळे सर्वच दृष्टीने ती चांगली गोष्ट असते. एकदा एका सीनियर्सच्या सहलीत आम्ही जास्त चालावं लागतं म्हणून व्हॅटिकनचं स्थलदर्शन ठेवलं नव्हतं. पण ह्या ज्येष्ठ पर्यटकांनी ते केलं आणि मी जेव्हा संध्याकाळी त्यांना भेटायला गेले तेव्हा मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने त्यांनी ती गोष्ट सांगितली. पूर्वी मला वाटायचं, सीनियर पर्यटकांच्या सहलीत काहीतरी स्थलदर्शन कमी करूया पण पर्यटकच आम्हाला तशी परवानगी देत नाहीत. सहल बूक करायच्या आधी कोणत्याही ठिकाणची फॅमिली टूर आणि सीनियर्स टूर्स ह्याची, त्यातील स्थलदर्शनाची तुलना केली जाते, एखादी गोष्ट त्यात नसेल तर त्याविषयी विचारणा होते. असं सतत घडायला लागल्यावर आम्ही फॅमिली टूर्स आणि सीनियर्स टूर्सचा कार्यक्रम सर्वत्र समसमानच ठेवला ज्याने पर्यटकांचा प्रतिसाद वाढला आणि आनंदही.
प्रत्येक सीनियर्स स्पेशल सहलीत जेव्हा ज्येष्ठ पर्यटकांना भेटते तेव्हा त्यांच्या उत्साहाला दाद द्यावीशी वाटते. खरंतर कोणतीही सहल ही बॉडी फिटनेस टेस्ट असते असं म्हणायला हरकत नाही. इथे मुंबई पुण्यात आपण इतके स्वत:ला जपत असतो की काही विचारू नका. घरची मंडळी तर बाबा हे करू नका, आता कशाला आई तू ह्या फंदात पडतेस, अगं मावशी, नाही आता तुला झेपणार हे सगळं काही, काकी, अगं भरपूर केलंस बस नं आता शांतपणे अशा अनेक काळजीयुक्त- चिंताग्रस्त संवादामुळे अपाहिज झालेलो असतो. हल्ली आमची मुलंही आम्हाला म्हणायला लागलीयत, हे करू नका, हे झेपणार नाही तुम्हाला, नॉट फॉर यू. कळत नकळत प्रत्येक घर ज्येष्ठांना वयाची जाणीव करून देत असतं. हेतू चांगला असतो ह्यात वाद नाही पण शरीर वय दाखवत असलं तरी मन कुठे तसं काही मानायला तयार असतं? म्हणूनच सहलीला फिटनेस टेस्ट म्हणते मी. आपण अजून बरचं काही करू शकतो हे सहलीला जाऊन आल्यावर कळतं. पंधरा दिवसांची असो किंवा आठ दिवसांची, प्रत्येक सहल एकदा का त्या सहा-सात-आठच्या चक्रात आली की वयाचा विसर पडून जातो. पायदुखी-कंबरदुखी- पाठदुखी हे लाड बंद होतात आणि रोज सकाळी आपण आज काय नव्याने बघायचं ह्या कुतूहलात दिवसाची सुरुवात करतो. आजपर्यंत मी स्वित्झर्लंडमध्ये सीनियर्स स्पेशलला आलेल्या अक्षरश: हजारो पर्यटकांना भेटलेय. सहा-सात- आठचं वेळापत्रक सांभाळत रोज युरोपच्या नवीन देशांना भेट देत, डोळे दीपविणारं आणि पाय थकवणारं स्थलदर्शन करूनही हसत खेळत गप्पा मारत ज्येष्ठ मंडळी सहलीचा मनमुराद आनंद लुटत असतात. ज्या दिवशी मी पर्यटकांना भेटते त्या दिवशी सकाळी ही सर्व मंडळी माऊंट टिटलीसची अविस्मरणीय सफर करून आलेली असतात. एवढं स्नो अॅडव्हेंचर करूनही आणखी उत्साहात जेव्हा खास पोशाख करून फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करतात, त्यानंतर बॉलीवूड म्युझिकवर डान्स करतात तेव्हा साक्षात दंडवत घालावासा वाटतो. त्यावेळी वाटतं की याचसाठी केला होताा अट्टाहास. सीनियर्सच्या सहली एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगभर करण्याचं वीणा वर्ल्ड टीमने मनावर घेतलं, ज्येष्ठ पर्यटकांनी प्रतिसाद दिला, आमच्या सर्व असोसिएट्सनी सहकार्य केलं आणि अखंडपणे ह्या सहली सर्वत्र सुरू झाल्या आहेत आणि राहतील. भारतातच काय जगात कुठेही मोठ्या प्रमाणावर अशा सीनियर्सच्या सहली नाहीत. त्यामुळे त्याचा सार्थ अभिमान आम्हा वीणा वर्ल्डवाल्यांना आहे. अर्थात त्यामुळे डोक्यात हवा जाऊ न देता नम्रपणे हे काम आम्ही आणखी वाढवत आहोत. आपण हे करू शकतो का? आपल्याला हे झेपेल का? ह्या प्रश्नांचं समूळ उच्चाटन करायचं ठरवलंय आम्ही.
माझ्या मते सीनियर्स स्पेशल ही नुसती एक कमर्शियल सहल नाहीये. कौटुंबिक नाती घट्ट करणारी, आत्मविश्वास वाढविणारी, दुखण्यांपासून दूर नेणारी, स्वत:ला सिद्ध करणारी, राहून गेलेल्या-करता न आलेल्या अनेक गोष्टी पूर्णत्वाला नेणारी, स्वत:वर प्रेम करायला लावणारी, ज्ञान वाढविणारी, स्मार्ट बनविणारी जादुई सहल आहे. पुढच्या पिढीला मागच्या पिढीसाठी वेळ नसणं ही युगानुयुगे चालत आलेली गोष्ट आहे आणि ती आपण स्विकारली पाहिजे. आमच्याकडे आमच्या आईवडीलांसाठी वेळ नाहीये आणि आमच्या मुलांना आमच्यासाठी वेळ नाही. पण एक गोष्ट चांगली झालीय ती म्हणजे आई वडीलांनी मुलांसाठी पैशांची तजवीज करणं कमी झालंय किंवा मुलांची ती अपेक्षा नाहीये. मुलं म्हणतात, आता तुम्ही तुमचं आयुष्य जगा, आमच्यासाठी खूप केलंत, आम्ही आमचं बघून घेऊ. अनेक पर्यटक येऊन सांगतात, बसमध्ये तर हा विषय असतो, माझ्या मुलीने मला सहलीला पाठवलं किंवा माझ्या मुलाने वाढदिवसाचं गिफ्ट दिलं वेळ देता येत नसल्याची गिल्ट भरून यायला थोडी मदत होते जेव्हा आई वडील स्वत: अशातर्हेचा आनंद घेतायेत हे बघतो तेव्हा. खासकरून परदेशस्थ मुलांना ती खंत जास्त असते. सहलीची तयारी हा सुद्धा एक सुसंवादाचा विषय होतो घरात सर्वांसाठी. काय कपडे घालायचे पासून फोनची नवीन फीचर्स काय आहेत ते बघणं समजणं ही एक साग्रसंगित तयारी असते. फोटोग्राफी करताना काय टेक्निक वापरायचं हे आजोबा आजीला नातवंडं शिकवतात तो नजारा बघण्यासारखा असतो. जी मंडळी एकेकटी राहतात त्यांच्यासाठी तर सहलीच्या आधीचे तयारीचे दोन महिने, सहलीवरचे दिवस आणि सहलीनंतरचे दोन महिने उत्साहाचे असतात. सहलीवर आत्मविश्वास वाढतो हे मी कितीतरी सहली केल्यायत म्हणून खात्रीने सांगू शकते. इथे स्टेशनवर जातानाही खबरदारी घेणारे आणि स्वत:ला जपणारे आपण युरोप टूर केल्यानंतर जग जिंकल्याची शक्ती घेऊन परत येतो. दुखण्यांकडे बघायला वेळ नसतो म्हणून तीही पळून जातात. कधी-कधी वाटतं की दुखणी आपल्याला चिकटतात कारण आपल्याकडे त्यांना गोंजारायला भरपूर वेळ असतो. आयुष्याच्या रहाटगाडग्यात बर्याच गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात, मग एखाद्या महिलेला पंजाबी ड्रेस घालावासा वाटत असेल तर एखाद्याना शॉटर्स, टी-शर्ट जे कधीही आधी घातलं नाही. हे सगळे स्वत:चे लाड सहलीवर करून घ्यायचे. काही करायचं राहिलं ही खंत काढून टाकायची. हे सगळं ह्या सीनियर्सच्या सहलीवर घडताना मी बघते आणि समाधान पावते. कमर्शियली बिझनेस करताना सीनियर्स स्पेशल-वुमन्स स्पेशल ह्या आमच्यासाठी हृदयस्पर्शी गोष्टी आहेत. सीनियर्स स्पेशल म्हणजे समथिंग टू लूक फॉरवर्ड टू... जे फार महत्त्वाचं आहे.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.