ह्या वर्षासाठी आता उशीर झालाय, पण इट्स नेव्हर टू लेट! गेट ऑर्गनाईज्ड राइट नाऊ! आयुष्य गतिमान झालंय, दिलेल्या वेळेत तुम्हाला जास्त वेळ मिळवायचाय, असलेल्या जागेत तुम्हाला जास्त जागा करायचीय, आनंद वाढवायचाय आणि उत्पादनही, हे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं म्हणून होणार नाही. सो, उठा, हसा, धावा, आता मात्र थांबू नका.
डिसेंबर सुरू झाला की आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे तरंग उठायला लागतात. जे झालं ते झालं पण येणार्या नवीन वर्षात आपण हे करायचं, आपण ते करायचं, आपल्याकडून पुन्हा अशी चूूक होऊ द्यायची नाही, शरीराकडे लक्ष द्यायचं, औषधांची छुट्टी करायची, आयुष्याला थोडी शिस्त लावायची वगैरे वगैरे. कुणाला हा पार्टी मंथ वाटतो तर कुणाला टॅ्रव्हल मंथ, कुणी थर्ड क्वार्टरचं टार्गेट पूर्ण करण्याच्या प्रेशरमध्ये असतं तर कुणी लास्ट क्वार्टरची स्ट्रॅटेजी आखण्यात. एका बाबतीत मात्र सगळ्यांचं एकमत असतं की, अरे आत्तातर कुठे वर्ष सुरू झालं होतं, एवढ्या लवकर कसं संपलं वर्ष? बर्याच गोष्टी करायच्या राहिल्यात अजून, अरे सरत्या वर्षा, थोडा थांब ना रे, मला हे पूर्ण करू दे, मला ते पूर्ण करू दे. आणि ते वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीस मिष्किल हसत आपल्याला सांगत असतं, मी आलो तेव्हाच सांगितलं होतं, मी किती दिवस राहणार आहे, कधी जाणार आहे, आय अॅम व्हेरी ऑर्गनाईज्ड! तुम्हाला 12 महिने, 52 आठवडे, 365 दिवस, 8760 तास, 525600 मिनिट आणि 31536000 सेकंद दिले होते, यात एक सेकंदही वाढवून मिळणार नाही हे आधीच सांगितलं होतं, दर सेकंदाला तुम्हाला मी आठवण करून देत होतो मी जातोय म्हणून पण तुम्हाला वाटलं, इतनी जल्दी क्या है? आणि आता रीक्वेस्ट करताय? एवढ्या उशीरा जाणीव झाली तुम्हाला? ह्या वर्षासाठी आता उशीर झालाय, पण इट्स नेव्हर टू लेट! गेट ऑर्गनाईज्ड राइट नाऊ! आयुष्य गतिमान झालंय, मी दिलेल्या वेळेत तुम्हाला जास्त वेळ मिळवायचाय, असलेल्या जागेत तुम्हाला जास्त जागा करायचीय, आनंद वाढवायचाय आणि उत्पादनही, हे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं म्हणून होणार नाही. मी भेदभाव केलेला कधी पाहिलाय तुम्ही? प्रत्येकासाठी मी तेवढाच आहे, तो श्रीमंत म्हणून त्याला जास्त, तो गरीब म्हणून त्याला कमी असं माझ्याकडून कधी झालं नाही, होणार नाही. सूर्यदेवाने आणि मी एकमेकांना वचन दिलं होतं, आपल्याकडून कधीही कुणासाठीही पक्षपात होणार नाही. आणि आम्ही ते आजन्म पाळतोय. तुम्हीही स्वत:ला असं वचन द्या, ते पाळा आणि बघा तर कसा छान चमत्कार घडतो ते. सो, उठा, हसा, धावा, आता मात्र थांबू नका.
सरतं वर्ष सध्या असं बोलत समोर ठाण मांडून बसलंय. आपण असं करायला हवं होतं, असं केलं असतं तर असं झालं असतं, ही एक गोष्ट आपल्याकडून खूप चांगली झालीय पण इथे थोडंसं दुर्लक्ष झालं, असंख्य विचारांनी डोक्यात गर्दी केलीय. आता ह्या सगळ्या विचारांच्या गर्दीतून बाहेर यायचंय. सरत्या वर्षाने वर म्हटलंय नं, मी दिलेल्या वेळेत तुम्हाला जास्त वेळ मिळवायचाय. ह्या एकाच विचारावर मी विचार करायला लागले. असलेल्या वेळेत जास्त वेळ कसा मिळवायचा? एका पुस्तकात वाचलेला विचार समोर आला. रोज सकाळी आपण जर एक तास लवकर उठलो तर आपल्या आयुष्यात आपण किमान दोन वर्षाचा जागेपणीचा वेळ वाढवू शकतो. अरे वा! दोन वर्ष म्हणजे आपण किती प्रोजेक्ट्स पूर्ण करू शकू. बिझनेस वुमन असल्याने दिल मांगे मोअर म्हणत मी विचार केला, एक तासाने दोन वर्ष वाढत असतील तर जर मी दोन तास आधी उठले तर माझ्या आयुष्यात चार वर्ष मी वाढवू शकेन. क्या बात है! चार वर्ष एक्स्ट्रा मिळणार असतील तर आपलं दहा वर्षांचं टार्गेट आपण बर्यापैकी आधी पूर्ण करू. फारच फायदेशीर सौदा आहे नाही का? करायचं काय आहे तर फक्त रोज सकाळी दोन तास आधी उठायचंय. सो इझी! सोप्प तर आहे पण माझ्या व्यक्तीमत्त्वाचा पन्नास वर्षाचा स्टॅटिस्टिकल डेटा मला सांगत होता की, मॅडम सोप्प आहे पण सातत्याने ते करण्यात तुम्ही कमी पडलाय तेव्हा हावरटपणा थोडा कमी करा, सध्या फक्त एक तास आधी उठण्याचाच विचार करा, वाढीव मिळणार्या दोन वर्षांवर समाधानी रहा. जर ह्यात सातत्य राखलंत तर मग रोज दोन तास लवकर उठण्याची आणि जागेपणाची चार वर्ष अधिक मिळविण्याचा खुशाल विचार करा. परफेक्ट. कारण तसंही एक तास आधी उठायचं म्हणजे एक तास आधी झोपायला हवं, हो जागतिक स्पर्धेच्या युगात कामं वाढतच चाललीयत, ती पूर्ण करण्याचा झपाटा किंवा वेग ही वाढवावा लागतोय, अशावेळी शारीरिक आणि मानसिक संतुलन व्यवस्थित राखणं फार म्हणजे फारच महत्त्वाचं झालंय आणि त्यासाठी किमान सहा आणि कमाल आठ तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. झोपेशी समझौता नाही. पुरेशी शांत सकस झोप मिळालीच पाहिजे. हो म्हणजे सहा-सात तास गादीवर आडवे होतो पण झोप काही लागलीच नाही, असं व्हायला नको. याचा अर्थ झोप चांगली येण्यासाठी मला माझं मन शांत आणि स्थिर करायला हवं. सरत्या वर्षाने जसं म्हटलं तसं मला ऑर्गनाईज्ड व्हायला हवं. ऑफिसमधल्या गोष्टी ऑफिसमध्ये, घरातल्या गोष्टी घरात, मित्रमैत्रिणींचं विश्व वेगळं, एकाची तंगडी दुसर्यात-दुसर्याची तिसर्यात करू लागले की स्ट्रेस ह्या सध्याच्या फॅशनेबल शब्दाला आपल्या जीवनात शिरकाव करायला आपणच परवानगी दिल्यासारखं. सो, पुन्हा एकदा अधिक सातत्याने आमच्या वीणा वर्ल्डमधल्या टाईम व्हील ची मदत घेणं गरजेचं होतं.बर्याचदा तिथेही पहिला सोमवार, पहिली तारीख, पहिला महिना, पहिला आठवडा, नवीन वर्ष ह्यावेळचा उत्साह बर्यापैकी अल्पजीवी ठरलाय, तो पुन्हा पुन्हा मिळवणं हे माझं मलाच करावं लागणार होतं. आमचं टाईम व्हील सांगतं, वेळेत या, वेळेत डेस्कवर बसा, वेळेत कामाला सुरुवात करा, वेळ वाया घालवू नका, वेळेत कामं पार पाडा, समाधानाने वेळेत घरी निघा, वेळेआधी घरी पोहोचा, घरच्यांना वेळ द्या, वेळात वेळ काढून वाचन करा, दिवसभराचा आढावा घेऊन देवाचे आभार मानून वेळेत झोपा, वेळेआधी उठा, वेळ काढून व्यायाम करा आणि देवाला मनोमन नमस्कार करून वेळेत आणि उत्साहात नवीन दिवसाला सामोरं जा.
टाईम व्हील ने ऑर्गनाईज केल्यावर माझं मानसिक संतुलन अतिशय चांगलं होणार होतं, माझ्या अर्ध्या झोपेची निश्चिती झाली होती, आता पुढचा भाग होता शारिरीक संतुलनाचा, जो आणखी महत्त्वाचा होता. औषधावीना आरोग्य ही एक गोष्ट जरी आपण आपल्या अंगी बाणवली तर आयुष्य सुखी झाल्याच्या असंख्य कथा आपण रोज ऐकतो. इथे बारीक होण्याची किंवा झिरो फिगरची बात नाहीये, देवाने जी अंगकाठी दिलीय ती निरोगी ठेवायचीय, त्यामुळे पोट साफ असणं हे नैसर्गिकरित्या कोणतीही चूर्ण, गोळ्या न घेता करण्याकडे कल असला पाहिजे. बहुत सारे दर्दों की एक जड म्हणजेच पोट साफ नसणं. म्हणजे त्यासाठी मला जगण्यासाठी खाणं हे आत्मसात करावं लागणार होतं. इंटरमिटंट डाएट, कीटो डाएट, जनरल मोटर्स डाएट, प्लांट बेस्ड डाएट, डॉ. सरीता डावरे डाएट, डॉ. जगन्नाथ दिक्षित डाएट, डॉ. ऋजुता दिवेकर& डाएट कोणाचंही असो अति न खाण्याची सवय मला स्वत:ला लावून घ्यायची होती. पायांचं काम चालणं, डोळ्यांचं बघणं, कानाने ऐकणं, तोंडाने बोलणं, हाताने काम करणं हे सगळं सतत चालत्या स्थितीत ठेवण्यासाठी त्यांचा व्यवस्थित सकारात्मकरित्या वापर करणं, त्यांची देखभाल करणं थोडक्यात रोज कोणता ना कोणता व्यायाम करणं क्रमप्राप्त होतं. कमी खाणं, अरबट चरबट न खाणं आणि व्यायाम करणं ह्याने माझी शारिरीक स्थिती उत्तम होणार होती. म्हणजे मानसिक-शारिरीक संतुलनाचा पंचाहत्तर टक्के भाग मला चांगली झोप देणार होता.
आता उरलेला प्रश्न होता पंचवीस टक्क्यांचा तो माझ्या चांगल्या झोपेला शांत निवांत आणि उठल्यावर चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा होता तो होता आध्यात्मिकतेचा. जगन्नियंत्याचे आभार आणि त्याच्या नामाचा जप माझी शक्ती वाढविणार आहे. त्याशिवाय व्यर्थ आहे सर्वकाही. जो होगा सो होगा! कीप काल्म! होनी कौन टाल सकता है? आपल्या हातात काही नाही. आणि होणार्या गोष्टीला काहीतरी कारण असतंच ते आपल्याला त्यावेळी कळत नाही एवढंच, पण मागे वळून पाहिलं की समजतं, अच्छा तर हे होण्यासाठी त्यावेळी ते घडलं होतं तर, मग त्यावेळी आपण कशाला एवढे घाबरलो? एवढा आकांडतांडव कशाला केला? शांत राहून आणखी चांगल्यातर्हेने परिस्थिती हाताळता आली असती नाही का? आता यापुढे नंतर त्या गोष्टीचा पश्चाताप नाही करायचा. आयुष्य जसं येईल तसं मी स्विकारणार, हसतमुखाने सामोरं जाणार, दुसर्याचा दु:स्वास नाही, कुणाचा मत्सर नाही, कुणावर राग नाही. व्हॉटएव्हर विल बी, विल बी! ते माझ्या हातात नाही पण त्यावर अतिशय चांगला मार्ग काढणं हे माझं मलाच करायचंय. त्यामुळे जरी मला एका दिवसात अनेक कामं करायची असली तरी ज्यावेळी जे काम हातात आहे त्यावर चित्तवृत्ती एकवटवण्याचं काम मला माझ्यातली आध्यात्मिक बैठकच करवून देणार आहे. हरिवंशराय बच्चन ह्यांची कविता आठवली, मन का हो तो अच्छा, ना हो तो ज्यादा अच्छा! कारण पुढे आणखी चांगलं काही असणार आहे आपल्यासाठी. ह्या सर्व विचारांनी माझी झोप निरोगी-शांत-अविचलित होणार आहे. आणि मग मी जग जिंकायला मोकळी नाही का? सो मी माझ्यासाठी असलेल्या वेळेत एक तास वाढवलाय. आणि सरत्या वर्षाने जे कान टोचलेत ते मनापासून मनावर घेतलंय. त्याने सांगितलंय तसं जे झालं ते झालं आता मात्र बी सीरियस अॅन्ड स्टिल बी मोअर हॅप्पी!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.