वीणा वर्ल्डच्या कोलकाता येथील ब्रांच ऑफिसची सुरुवात या आठवड्यात होतेय. महाराष्ट्रात अजूनही बरंच काही काम करायचं बाकी असलं तरी आता आम्हाला दुसर्या राज्यांमध्येही वीणा वर्ल्डचं किमान एक मुख्य ऑफिस असण्याची गरज भासू लागली आहे. गुवाहाटीपासून चेन्नईपर्यंत आणि छत्तीसगडपासून अगदी दिल्ली हरयाणाचे पर्यटक वीणा वर्ल्डसोबत यायला लागलेत. प्रत्येक सहलीत ही संख्या वाढू लागलीय आणि प्रत्येक सहल वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या भारतीयांचं एक आनंदी कुटुंब बनायला लागलीय. यामुळे केल्याने देशाटन मनूजा चातूर्य येतसे फार हे दोन अर्थानी साध्य होतेय. एकतर आपण सहलीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रदेशांना- देशांना भेट देतो त्यावेळी तेथील ऐतिहासिक- भौगोलिक-सांस्कृतिक-आर्थिक-राजकीय आदी गोष्टी आपल्या ज्ञानात भर टाकतात आणि तेथील वावर आपल्याला अनुभवसंपन्न करून टाकतो तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सहलीत जेव्हा भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांना आपल्याला भेटायला मिळतं तेव्हा आपलाच भारत आपण त्यांच्या माध्यमातून अधिक चांगल्या तर्हेने जाणू शकतो. बघानं किमान चार दिवस आणि कमाल चोवीस दिवसांच्या सहलीमध्ये प्रत्येक राज्याच्या रूढी- परंपरा-रितीरिवाज-शिक्षण-राजकारण अशा कितीतरी गोष्टी एकमेकांच्या अनुभव कथनामुळे आपल्याला कळतात. आमचे टूर मॅनेजर्स महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व पर्यटकांना एकत्रितपणे सहलीवर धम्माल करायला लावण्यात पटाईत आहेत. थोडक्यात आमची सहल ही नुसती सहल न राहता ती एक बहुभाषी-बहुआयामी भारतीयांचं एक मस्त अनोखं संमेलन बनून गेलीय.
आपल्या भारतातील पर्यटनप्रेमी राज्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातून पर्यटनासाठी देशविदेशात संचार करणारे पर्यटक सर्वात जास्त आहेत. त्यामुळे वीणा वर्ल्डचा मोठा वावर आपल्या महाराष्ट्रात असणार हे ओघाने आलंच. दुसरा नंबर लागतो तो वेस्ट बंगालचा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि पर्यटन ह्या त्यांच्या पाच प्राथमिक गरजा. आर्थिक स्तर कोणताही असो, येथील प्रत्येक कुटुंब त्यांच्या मिळकतीचा छोटा-मोठा हिस्सा पर्यटनासाठी बाजूला ठेवतं. त्यानंतर नंबर लागतो तो गुजरातचा, एकापाठोपाठ एक राज्य आणि देश पालथे घालणं ह्या पर्यटकांना खूप आवडतं. सुरतच्या एका महिला पर्यटकाने मला सांगितलं की येत्या दहा वर्षांत शंभर देश पूर्ण करायचे आहेत, मला तसा सगळा प्लॅन करून द्या. गुजरातनंतर येतं कर्नाटक. आमचं स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की, महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या आधी वेस्ट बंगाल आणि कर्नाटकच्या लोकांनी पर्यटन सुरू केलं त्यामुळे आज ह्या ठिकाणचे अनेक पर्यटक त्यांचे पन्नास-पंचाहत्तर-शंभर देश पूर्ण करताहेत. नॅचरली महाराष्ट्राबाहेरचं आमचं पहिलं पाऊल कोलकातामध्ये पडतंय आणि पुढच्या महिन्यात दुसरं कर्नाटकात बंगळुरुला. लवकरच बाकीच्या इतर काही राज्यांमध्ये आम्ही पर्यटकांच्या जवळ जाऊ. असो.
कोलकातामध्ये जातोच आहोत तर आईला घेऊन वाराणसीला जाऊया, असा विचार सुधीरने केला आणि चक्क आमच्या सासूबाई आणि त्यांच्या तीन मुलांचा पोस्ट टूर हॉलिडे त्यांनी निश्चितही केला. सुधीरचे मोठे भाऊ संदेश पाटील म्हणजे आमच्या घरातले विनोदवीर. प्रत्येक गोष्टीत छानसा जोक्स करून वातावरण हास्यमय करण्यात त्यांची हातोटी. त्यांना फोन करून विचारलं, तुम्ही-तुम्ही एकट्यांनीच ठरवलं आणि मला का बरं बोलावलं नाही? तर म्हणतात, आम्ही आधुनिक श्रावणबाळ आहोत, विमानाची कावड करून आईला काशीला घेऊन निघालोय. जे काही करायचं ते जिवंतपणी. नंतर पश्चाताप नको. आणि खूप दिवसांनी आई आणि तिची मुलं एकत्र निघताहेत, तुझी लुडबूड कशाला? आणि तसंही तुम्ही नेहमीच एकत्र असता, ह्या निमित्ताने तुमची म्हणजे सासू-सुनेचीही एकमेकींपासून सुटका. संदेश भाईंचं शेवटचं वाक्य महत्त्वाचं होतं. मी ही पडत्या फळाची आज्ञा घेऊन आय अॅम टू बिझी करत ह्या पोस्ट टूर हॉलिडेमधून सुमडित काढता पाय घेतला आणि माझं रीटर्न तिकीट कोलकाता-मुंबई करायला सांगितलं.
सध्या वाराणसी-काशीला जायच्या नुसत्या विचारानेच सासूबाई एकदम उत्साहीत झालेल्या दिसताहेत. नेहमीपेक्षा त्यांची चाल जरा फास्ट झालीय. अतिशय कष्टात, कधीही एका जागी स्थिर नसलेल्या, आयुष्यभर सतत काहीतरी करीत राहणार्या त्या सध्या बर्यापैकी घरीच असतात. आम्हीही आता ऐंशी वर्षांच्या तरुणाईत तुला हे झेपणार नाही, ते झेपणार नाही असं करीत जणू त्यांना नजरकैद केलंय. कधी वसईला जाऊन यायला वा झेंडा वंदनाला खाली जायला त्यांचा उत्साह मी म्हणत असतो. सुधीरने ह्या वाराणसीच्या सहलीत अयोध्येला जायचंही ठरवलंय त्यामुळे ते एक्स्टेंशन तर त्यांच्या आनंदावर चारचाँद लावतं झालंय. थोडक्यात अधुनमधून सुधीर संदेशला श्रावणबाळ बनणं अपरिहार्य करून टाकायला हवं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरातल्या ज्येष्ठांसाठी मनाला-विचारांना-हाताला-पायाला चालना देत राहणं फार महत्त्वाचं आहे.
जगातल्या अनेक देशांमध्ये माणसं शंभर वर्ष किंवा त्याहून अधिक जगतात. शंभर वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींना त्या देशांचे पंतप्रधान वा अध्यक्षांनी स्वत: अभिनंदन करण्याचीही प्रथा आहे. जास्तीत जास्त दीर्घायुषी लोकं जपानमध्ये आहेत. शुद्ध हवा-पाणी-आहार ह्या जपानमधल्या गोष्टी यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात ह्यात वाद नाही. पण ज्यावेळी या विषयाचा अनेकांनी अभ्यास केला त्यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ही दीर्घायुषी जपानी माणसं सतत कार्यमग्न असतात. बागेत वा शेतात काम करणं, मच्छिमारी करणं, सुतारकाम-रंगकाम काय वाट्टेल ते करीत राहण्याला ते प्राधान्य देतात. काम करणं, खेळणं, पोहणं, हसणं, नाचणं, गाणं, खिदळणं, चालणं, कमी खाणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दीनचर्येचा भाग असतात. अगदी जपानमध्येच कशाला जायला पाहिजे, आपल्या आजूबाजूला डोकावून पाहिलं तरी आपल्याला अशी अनेक ज्येष्ठ मंडळी दिसतील जी कार्यमग्न राहून साठ सालके बुढे या साठ सालके जवान या जाहिरातीतल्या धडधाकट ज्येष्ठ माणसासारखी असतात. मी ही जेव्हा घरातच डोकावून पाहिलं तेव्हा मला माझ्याच आईचं उदाहरण दिसलं. ही तर पंचाहत्तर वर्षांची अतिउत्साही तरूणी. तिची विचारमग्नता आणि कार्यमग्नताच तिला सतत सडपातळ आणि तरूण ठेवतेय बहुतेक. आमच्या अंगावर मात्र कायमच मुठभर मांस चढलेलं असतं आणि मग त्यासाठी डाएटिशियन, न्युट्रिशनिस्ट, लाईफ स्टाईल कोच, योगा, व्यायाम, ताय चि, पिलाटस, क्रॉसफीट, स्विमिंग अशा अनेक गोष्टी नव्हे नखरे हे सतत चालू असतात. पण आईला मात्र ह्या कसल्याचीही गरज लागत नाही. एकंदरीतच्या मला कुटुंबातच, दीर्घायुष्यासाठी सतत कार्यमग्न असलेल्या जपानी माणसांचं जीतजागतं उदाहरण आईच्या रुपात दिसतंय. आणखी इन्स्पिरेशनची काय गरज नाही का. काखेत कळसा आणि गावाला वळसा.
आम्ही सीनियर्स स्पेशल नावाच्या सहली आयोजित करतो रीटायर्ड बट नॉट टायर्ड अशा उत्साही तरुण-तरुणींसाठी. थायलंड, दुबई, युरोप, युएसए, जपान, स्कॅन्डिनेव्हिया, केरळ, राजस्थान, अंदमान अशा अनेक ठिकाणी वर्षभर ह्या सहली सुरू असतात. ह्यातील काही सहलींवर मी ही जाऊन पर्यटकांना गाला इव्हीनिंगला भेटत त्यांच्याशी संवाद साधत असते. सीनियर्सना भेटण्यासाठी युरोप आणि थायलंडला मला वर्षातून चार वेळा जावं लागतं. तुमचा विश्वास बसणार नाही पण या सहलीची लोकप्रियता एवढी वाढलीय की युरोपला गेल्यावर्षी चार वेळा जाऊन प्रत्येकवेळी स्वित्झर्लंडमध्ये सीनियर्स स्पेशलला आलेल्या दोनशे-तीनशे सीनियर्सना भेटत होते. आता तसं म्हटलं तर युरोपची सहल म्हणजे अंतरंगाला प्रफुल्लित करणारी, डोळे दीपविणारी पण पाय दमविणारी सहल. ज्या दिवशी मी आमच्या ह्या ज्येष्ठ पर्यटकांना भेटते त्या दिवशी सकाळी त्यांनी मांऊट टिटलीसची मोठी सफर केलेली असते. इथे असतो तर अशावेळी या सफरीनंतर आपला मिलाप गादीशीच झाला असता पण तिथे वेगळंच वातावरण असतं. माऊंट टिटलिसची बर्फाची सैर करून ही मंडळी ल्युसर्न शहरातलं लायन मॉन्युमेंट बघतात, सोवेनियर शॉपिंग करतात, हॉटेलला जातात आणि मस्त नटूनथटून गाला इव्हीनिंगला येतात. मला तर नेहमी असा फील येतो की ह्यांचा दिवस अगदी आत्ता आत्ता सुरू झालाय. हा एवढा सळसळता उत्साह येतो त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षात आलं ते म्हणजे, आपण युरोप बघितला ह्या स्वप्नपूर्तीचं समाधान आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्थलदर्शन करण्याचा जोश आपल्यात कायम आहे, ह्या आय कॅन डू इटचा आनंद. घरी सतत आपल्याला बिझी ठेवणारी पाठदुखी-डोकेदुखी- गुडघेदुखी अनेकांना इथे जाणवलेलीही नसते. एकतर लक्ष त्या युरोपच्या आनंदाकडे वळलेलं असतं आणि वेळ कुठे असतो ती रडगाणी गायला. अनेक मंडळींना मी भेटले आणि गप्पागोष्टीत जाणवलं की गेल्या दहा-बारा वर्षांत त्यांनी मुंबईबाहेर वा महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकलं नव्हतं, जमेल का? झेपेल का? ह्या भितीने. पण एकदा एक छोटी थायलंडची टूर केल्यावर आत्मविश्वास बळावला आणि ही मंडळी एकेका वर्षात दोन-दोन, तीन-तीन टूर्स करायला लागली. आत्मविश्वास वाढल्याने त्यांचं आयुष्य वाढलं आहे हे मी खात्रीने सांगू शकते. बिझनेस आहे म्हणून किंवा ज्येष्ठांसाठी असलेली श्रेष्ठ उत्कृष्ट सहल हे एक कमर्शीयल व्हेंचर आहे म्हणून नव्हे, पण सीनियर्सच्या अनेक सहली केल्यानंतरच्या अनुभवावरून मी सांगते की जरा डोकावूया आपल्या स्वत:च्या घरातील ज्येष्ठांकडे आणि किमान एक दिवसाची वा आठवड्याची एकतरी सहल त्यांना वर्षातून एकदा घडवूया. औषधांची गरज कमी भासेल हे निश्चित.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.