उपलब्ध साधनसामग्रीतून सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे आणि मन जिंकणारे राज्य म्हणजे केरळ. दक्षिण भारतामधील हे छोटंसं राज्य आज पर्यटनाच्या विश्वात एक महत्वाचं नाव होऊन बसलं आहे. केरळने केवळ आपल्या नैसर्गिक वैशिष्ट्यांच्या जोरावर आणि पारंपरिक वैशिष्ट्यांच्या मदतीने पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर आपली मोहर उमटवली आहे. केरळ टूरिझमची वेबसाईट दहा भारतीय आणि अकरा परदेशी भाषांमध्ये उपलब्ध आहे. काय आहे तरी काय केरळमध्ये की नॅशनल जिओग्राफिकने टेन पॅरेडाईझेस मध्ये केरळला स्थान दिलं आहे?
केरळ! सोन्याचा धूर जिथे निघतो ते राज्य. सोन्याचा धूर हे शब्दश: खरं करणारं राज्य. 2011 मध्ये केरळच्या रॉयल फॅमिलीच्या अखत्यारीत असलेलं आणि आता केरळ सरकारच्या ताब्यात असलेलं (अर्थात ह्या मंदिराच्या मालकी हक्काचे दावे कोर्टात सुरू आहेत) पद्मनाभस्वामी टेम्पल हे एकदम जगापुढे आलं ते तिथे सापडलेल्या प्रचंड मोठ्या सोन्याच्या साठ्यामुळे, केरळला सोन्याचं प्रचंड आकर्षण. केरळची वधू ही गोल्डन ब्राईड म्हणूनच ओळखली जाते. जगातल्या सोन्याच्या वापरात 30% भारताचा वाटा आहे तर भारतातल्या सोन्याच्या व्यापारातलं 20% सोनं हे एकट्या केरळमध्ये खपतं. पद्मनाभस्वामी मंदिरात आत्तापर्यंत उघडलेल्या तिजोरींमधून मिळालेल्या सोन्याच्या साठ्याची किंमत अंदाजे एक लाख कोटी इतकी वर्तवली जाते. एकावर किती शून्य हे मोजतानाच दमायला होतं. आपल्या भारतीयांचेच नाही तर जगाचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली हा सोन्याचा साठा बघून.
मागे आमीर खानच्या सत्यमेव जयते ह्या कार्यक्रमात स्त्रीभ्रुण हत्येमुळे मुलींच्या संख्येत होणारी घट आणि त्याचे दुष्परिणाम ह्यावर चर्चा झाली होती आणि सर्वश्रृत असलंं तरी पुन्हा एकदा हे जळजळीत सत्य आपल्यासमोर उभं ठाकलं. पण तुम्हाला सांगू केरळमध्ये हे प्रमाण उलटं आहे. 2011च्या जनगणनेनुसार 1000 मुलांपाठी 1084 मुली आहेत. केरळमध्ये असलेल्या मातृसत्ताक पद्धतीचं तर हे फलीत नसेल? वा! पण ह्या राज्यात असलेलं मुलींचं प्रमाण बघून हायसं वाटतं, एक आशेचा किरण दृष्टीपथात येतो. केरळच्या एक एक गोष्टी आपण ऐकल्या किंवा जाणून घेतल्या तर आपल्याला आपल्याच देशातलं एक राज्य म्हणून केरळचा अभिमान वाटेल. प्रत्येक गोष्टीला एक पुराणातला संदर्भ जोडलेलाच असतो त्याप्रमाणे केरळची उत्पत्ती ही समुद्रातून झाली. महाविष्णूंचे अवतार परशुराम ह्यांनी कन्याकुमारीच्या बाजूने समुद्रात बाण मारला आणि त्यातून हा जमिनीचा पट्टा निर्माण झाला, आत्ताच्या भाषेत सांगायचं तर रिक्लेम्ड लँड, तो पट्टा म्हणजे उत्तर पश्चिमेचं मालाबार, मध्यावरचं कोचीन आणि खाली दक्षिण पश्चिमेचं त्रावणकोर. पूर्वी व्यापारासाठी केरळच्या कोस्टलाईनचा खूप उपयोग झाला, आठव्या शतकात अरबांनी केरळ एक ट्रेड सेंटर म्हणून वापरलं. अर्थात, आजही अरब देशांचं आणि केरळचं एमॅयमेंटच्या माध्यातून एक अतूट नातं आहे, त्याची मुळं कदाचित आठव्या शतकात रोवली गेली असावीत. आता बघानं केरळमध्ये पन्नास टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत, ज्यामध्ये तांदूळ हा महत्वाचा घटक असून सहाशे प्रकारच्या तांदळांच्या जाती केरळमध्ये होतात. नारळ, चहा, कॉफी, रबर, काजू, मसाले, काळीमिरी, जायफळ, दालचिनी, सुगंधी वॅनिला... अशा अनेक गोष्टींनी केरळ सुजलाम सुफलाम झालेला आहे. केरळच्या छोट्याशा राज्यात वाहणार्या 44 नद्यांनी केरळ सुपीक बनवलं आहे. किती नशीबवान आहे हे राज्य, अतिशय सुंदर कोस्टलाईन ह्या राज्याला मिळाल्यामुळे राज्याच्या उत्पन्नात फिशिंग इंडस्ट्री किंवा मासेमारी 20% योगदान देते. तर मिडल ईस्ट किंवा अरबांच्या देशात जे केरळीय नोकरी निमित्ताने गेले आहेत त्यांनी तिथून पाठवलेल्या पैशाची आवक हे केरळच्या इकॉनॉमिचा 17 ते 20% भाग व्यापते. पूवीचं केरळ जसं तीन भागांध्ये विभागलं गेलं होतं तसं आत्ताचं केरळ हे कोस्टल लो लँड म्हणजे समुद्र किनारीलगतचा भाग, फर्टाइल मिडलँड म्हणजे मधला सुपीक पट्टा आणि तिसरं म्हणजे हायलँड हा टी ॅन्टेशनवाला मुन्नार पेरियारचा भाग.
स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1949 साली मालाबार, कोची आणि त्रावणकोर हे तीनही विभाग एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 1956 साली केरळ हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं. केरळ किंवा केरला हे नाव केरळमध्ये होणार्या नारळाच्या झाडांवरून आलं. केरा म्हणजे स्थानिक मल्याळम भाषेत कोकोनट किंवा कोकोनट पाम ट्री, लँड ऑफ कोकोनट असलेल्या ह्या राज्याला केरळ नाव पडलं. एकदा स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर केरळने मागे वळून पाहिलं नाही. अतिथंड किंवा अतिगरम असा अतिरेक नसलेली हवा, मोठ्ठी कोस्टलाईन, सुंदर समुद्रकिनारे, देखणी बॅकवॉटर्स आणि सभोवताली नारळाच्या झाडांची अप्रतीम स्कायलाईन, हिरवीगार अशी हिलस्टेशन्स, विपूल वन्य प्राणी जीवन, 44 नद्यांच्या वरदहस्तामुळे निर्माण झालेले मनमोहक वॉटरफॉल्स, डोळ्यांना गारवा देणारी वनराई, धरणीने हिरवा रंग पांघरलाय असं वाटायला लावणारी शेती, आयुर्वेदाचं टोटल रिज्युविनेशन, मोहिनीअट्टम-कथकली सारखे आर्ट फॉर्मस, उत्साहात साजरे केले जाणारे वेगवेगळे सण ह्या सगळ्यांमुळे केरळ अव्वल दर्जावर नेऊन ठेवायचं, भारताच्या राज्यांमध्ये नंबर वन वर आणायचं आणि जगाच्या नकाशावर केरळचं महत्व जाणवून द्यायचं हे केरळच्या राज्यकर्त्यांनी ठरवलं आणि केरळला भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर आणण्यात ते यशस्वी झाले. अर्थात 15 व्या शतकात पोर्तुगीजांनी आणि सोळा-सतराव्या शतकात ब्रिटिश आणि डचांनी केरळ मार्गे व्यापार केलाच होता. आता फक्त ते स्वतंत्र भारताचं एक यशस्वी राज्य म्हणून जगासमोर आलं. केरळ राज्याने किती गोष्टीत अप्रतीम कामगिरी केली बघानं, आजपर्यंत अगदी ज्याचा उहापोह केला जातो ते लँड रिफॉर्म बिल आणि एज्युकेशन रिफॉर्म बिल लागू करणारं केरळ हे पहिलं राज्य. केरळ हे भारतातलं एकमेव राज्य आहे जिथे प्रत्येक गावात एक हॉस्पिटल आहे, त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला, केरळमध्ये माणसाची आयुमर्यादा सर्वात जास्त आहे. केरळमध्ये बालमृत्यूचं प्रमाण अतिशय कमी नव्हे सर्वात कमी आहे. केरळ सारख्या छोट्याशा राज्यात तीन इंटरनॅशनल एअरपोर्टस् आहेत (कोचीन-कोझिकोडे-कन्नूर-तिरुअनंतपुरम) आणि अजून प्रायव्हेट फाईव्ह स्टार एअर पोर्टस येताहेत म्हणे, कुठे आहोत आपण? ट्रान्सपोर्टसाठी वॉटरवेज-रोडवेज- एअरवेजचा अतिशय चांगला वापर करण्यात केरळ अग्रेसर बनलंय. पूर्णपणे साक्षर अशा केरळ राज्याचा लिटरसी रेट 94% इतका आहे. केरळमधले लोक सतत वाचन करीत असतात. हायेस्ट रिडर्स इन द कंट्री आर फ्र्रॉम केरला, ह्याचाच परिपाक म्हणून आपल्याला केरळची माणसं ही नेहमी वेल इन्फॉर्मड-नॉलेजिबल आणि हुशार जाणवतात. शिकलेले आणि सुजाण नागरिक ही केरळची मोठ्ठी संपत्ती आहे असं मानलं जातं, नव्हे ती वस्तूस्थिती आहे. आपल्या भारतातच नव्हे तर आशियामध्ये महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण केरळमध्ये सर्वाधिक आहे. केरळमधले लोक स्वत:च्या आरोग्याबाबत आणि स्वच्छतेबाबतही खूप जागरुक असतात. हे सर्व लोक दिवसातून एकदा आंघोळ करतात अशी मजेशीर गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते, आणि दोनदा आंघोळ करण्याची पद्धत अनेक घरांमध्ये आहे. प्रकृती नीट रहावी म्हणून हे लोक सतत गरम पाणी पीत असतात.
आपल्या देशात पर्यटनाच्या दृष्टीने जी काही ऐतिहासिक- नैसर्गिक-भौगोलिक संपत्ती आहे तिचा हवा तसा वापर केला गेला नाही किंवा आपल्याला त्याचं महत्वच समजलं नाही. पण आपल्या देशातल्या दोन राज्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ह्या संपत्तीचं महत्व जाणलं आणि स्वत:ला जगाच्या ट्रॅव्हल मॅपवर आणलं, ती दोन राज्य आहेत राजस्थान आणि केरळ. राजस्थानने त्यांच्याकडच्या किल्ले-राजवाडे-लोकसंस्कृती- आदरतिथ्याने जगाला भारावून टाकलं तर केरळने त्यांच्याकडच्या नैसर्गिक-सांस्कृतिक-आयुर्वेदिक संस्कृतीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. पण हे असं अचानक आणि आपोआप झालं नाही, बरं का; वर नमूद केल्याप्रमाणे आपल्या राज्याला वेगवेगळ्या गोष्टींमुळे अव्वल दर्जा प्राप्त करून दिल्यावर त्यांचं लक्ष वळलं ते पर्यटनाकडे. आणि ते सुद्धा फक्त भारतातल्या इतर राज्यांतून येणार्या पर्यटकांकडे नव्हे तर परदेशी पर्यटकांकडे. केरळकडे पर्यटकांना हवं असलेलं काय होतं तर सन-सँड-सी फूड-स्पाईसेस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद भारताची नव्हे तर केरळची जागीर असल्याप्रत त्यांनी आयुर्वेदाला पुढे आणलं. कुणीतरी आयुर्वेदाचा प्रसार मनापासून केला हेही नसे थोडके. पर्यटकांना लागणारी दळणवळणाची साधनं त्यांनी निर्माण केली होतीच पण केरळीयन स्टाईलने तयार केलेल्या वेगवेगळ्या हॉटेल्स आणि रिसॉटर्सनी केरळची शान वाढवली. 1989 मध्ये केरळ टूरिझम बोर्डने वॉल्टर मेंडिस ह्या क्रिएटिव्ह आर्टिस्टच्या साह्याने केरळसाठी कॅची टॅगलाईन बनवली गॉड्स ओन कंट्री. जगातले सर्वात हुशार आणि सर्जनशील डिझायनर्स कोणत्या देशात आहेत असं विचारल्यावर पटकन उत्तर येतं इटली, तसं आपल्या देशात हे स्थान पटकवलंय केरळने. केरळच्या जाहिराती, ब्रोशर्स, टूर कंपन्यांचे किंवा हॉटेल्सचे कॅटलॉग बघण्यासारखे असतात. गॉड्स ओन कंट्री हे नामानिधान खरंतर न्यूझीलंडचं, थॉमस ब्रेकन नावाच्या कवीने 1890 मध्ये त्याच्या न्यूझीलंडवरच्या कवितेसाठी शीर्षक म्हणून हे वापरलं. 10 जून 1906 रोजी सिडनीहून न्यूझीलंडला जाताना न्यूझीलंडच्या त्यावेळच्या पंतप्रधान रिचर्ड सेडन यांनी त्यांच्या टेलिग्राममध्ये म्हटलं होतं, लिव्हिंग फॉर गॉड्स ओन कंट्री. अर्थात केरळने आपल्या अतिशय सुंदर आणि बोल्ड अशा जाहिरातींनी गॉड्स ओन कंट्री हे नामनिधान फक्त आपलं आणि आपलंच आहे असं जगावर ठसवलं. काय जाहिराती होत्या केरळच्या. परदेशात टीव्हीवर जेव्हा ह्या केरळच्या जाहिराती दिसायच्या तेव्हा अभिमान वाटायचा इतक्या त्या सुंदर होत्या. केरळने आंतरराष्ट्रीय पर्यटनक्षेत्रात असं काही मार्केटिंग केलं की विचारू नका. बाहेरच्या देशात भरवल्या जाणार्या कोणत्याही टूरिझम एक्झिबिशनमध्ये केरळचे प्रदर्शन लाजवाब असतं आणि त्यांनी वर्षानुवर्षे ते टिकवून ठेवलंय. 50 मस्ट सी डेस्टिनेशन्स ऑफ द वर्ल्ड आणि वन ऑफ द टेन पॅरेडाईझेस ऑफ द वर्ल्ड अशी शेखी मिरवत ठरवल्याप्रमाणे त्यांनी जगाच्या पर्यटन नकाशावर केरळला विराजमान केलं. केरळची 21 भाषांमध्ये असलेली टूरिझमची वेबसाईट भारतातली सर्वात जास्त व्हिजिट्स खेचणारी वेबसाईट आहे. तीन हजारपेक्षा जास्त व्हिडियोज असलेली- सतत अपडेट केली जाणारी इनोव्हेटिव्ह आणि अॅवार्ड विनिंग वेबसाईट केरळच्या यशात महत्वाचा वाटा उचलते. जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर तसा लो सिझन पण त्यांनी आयुर्वेदाच्या नावावर परदेशी पर्यटकांना ह्यावेळी आकर्षित केलं आणि ही गॅप भरून काढली. खरंच, आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याने कित्ता गिरवावा अशी कामगिरी केरळने केलीय. केरळच्या इकॉनॉमित टूरिझमचा वाटा साधारणपणे 10% आहे.
बघितलंत केरळने अतिशय हुशारीने आपल्याकडे असलेल्याच गोष्टींना आकर्षकपणे कसं पेश केलंय ते. पर्यटनात केरळने घेतलेल्या आघाडीचे रहस्य याच हुशारीत दडलेलं आहे. नारळाच्या बनांपासून ते चहाच्या मळ्यांपर्यंत आणि प्राचीन मंदिरांपासून ते पारंपरिक पदार्थांपर्यंत अगदी साध्यासाध्या वाटणार्या गोष्टी केरळने आक्रमकपणे आणि आकर्षकपणे जगापुढे मांडल्या आणि केरळ, मस्ट सी डेस्टिनेशन बनवून टाकलं. जगभरातील पर्यटकांच्या प्रशंसेला पात्र ठरलेल्या या केरळचा अनुभव तुम्ही वीणा वर्ल्डच्या सोबत घेऊ शकता. फॅमिली टूर्स, कस्टमाईज्ड हॉलिडेज, वुमन्स स्पेशल, सीनियर्स स्पेशल आणि हनिमून टूर्स असे प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी केरळचे ऑप्शन्स आहेत. मग आता विचार करू नका. या दिवाळी नाताळच्या सुट्टीत कोकोनट कंट्री केरळला भेट द्यायचे नक्की करा आणि वीणा वर्ल्डसोबत साजरा करा पर्यटनाचा उत्सव केरळच्या रमणीय प्रदेशात.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.