त्या फाईन डाईन रेस्टॉरन्टमध्ये कदाचित चूळ भरणे योग्य वाटत नसावं म्हणून की काय ही आपल्याला ह्या नजरेने बघतेय असा विचार मनात घोळत असतानाच, तिने मला प्रश्न केला , ‘व्हॉट आर यू डुइंग?’. चूळ भरण्याला इंग्रजीत काय म्हणतात हे मला काही केल्या त्याक्षणी आठवेना. त्यामुळे तिच्या त्या प्रश्नावर मी पटकन प्रत्युत्तर केलं की, ‘‘जेे माझ्या आईने प्रत्येक जेवणानंतर करायला शिकवलय तेच मी आत्ता करून माझ्या आईची आज्ञा पाळतेय’’.
एका बिझनेस ट्रिपवर लंडनमध्ये प्रवास करीत असताना तिथल्या अगदी पॉश रेस्टॉरन्टमध्ये आमचे बिझनेस डिनर सुरू होते. डिनरनंतर तिथल्या रेस्टॉरन्टच्या बाथरूममध्ये अगदी अनावधनाने मी हात धुऊन चूळ भरत होते. जेवल्यानंतर चूळ भरणे ही आपली लहानपणापासून लागलेली सवय कशी बरं थांबणार. त्यात चायनीज जेवणानंतर तर चूळ भरल्याशिवाय चैन पडतच नाही. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की, आमची युरोपियन बिझनेस पार्टनर माझ्याकडे थोड्याशा तिरस्काराने बघत होती. त्या फाईन-डाईन रेस्टॉरन्टमध्ये कदाचित चूळ भरणे योग्य वाटत नसावे म्हणून ही आपल्याला ह्या नजरेने बघतेय असा विचार मनात घोळत असतानाच, तिने मला प्रश्न केला, ‘व्हॉट आर यू डुइंग?’. चूळ भरण्याला इंग्रजीत काय म्हणतात हे मला काही केल्या त्याक्षणी आठवेना. त्यामुळे तिच्या त्या प्रश्नावर मी पटकन प्रत्युत्तर केलं की, ‘‘जेे माझ्या आईने प्रत्येक जेवणानंतर करायला शिकवलय तेच करून आजसुद्दा माझ्या आईची आज्ञा पाळतेय मी’’. ती केवळ आमची बिझनेस पार्टनर नसून चांगली मैत्रिणही असल्याने आम्ही दोघीही माझ्या ह्या उत्तरावर खळखळून हसलो. ‘पण तू हे हाताने कशी करू शकते? चूळ भरायला तुला ग्लासची गरज नाही का लागत?’ ह्या तिच्या पुढच्या प्रश्नाने मला भारतीय असल्याचा अभिमान वाटला. ह्यामागे कारण होतं ते म्हणजे, ह्या युरोपियन, अमेरिकन व इतर देशांच्या बहुतेक परदेशी लोकांना हातांच्या आेंजळीत पाणी घेऊन साधी चूळही भरता येत नाही हा नव्यानं लागलेला शोध. पण म्हणूनच हॉटेलच्या बाथरूममध्ये ग्लासेस ठेवलेले असतात हे तिचे स्पष्टीकरण ऐकून गम्मतही वाटली. हॉटेलच्या बाथरूममधील ग्लासेस हे आपला टूथब्रश, टूथपेस्ट व इतर सामान ठेवण्यासाठीच असतात असा माझा समज होता. पण खरंच, बाथरूममधल्या त्या ग्लासचा उपयोग चूळ भरण्यासाठी केला जातो हा विचारच कधी मला सुचला नव्हता. तिथे दोन ग्लासेस ठेवलेले असतात कारण बहुतेक वेळी रूम्स ह्या ट्वीन शेअरिंगवर असतात. त्यात जर आपण इतर कोणाबरोबर रूम शेअर करीत असलो तर आपला ग्लास आपल्या वापरासाठी असणे कधीही उत्तम ठरते. काही फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये तर ‘हिस् अॅन्ड हर्स’ असे दोन वेगळे वॉशबेसिनसुद्दा असतात. काही हॉटेल्समध्ये ह्या ग्लासेस्जवळ चूळ भरण्यासाठी मिनरल वॉटरची बाटलीसुद्दा ठेवलेली असते. तसे बहुतेक युरोपभर टॅप वॉटर हे पिण्यासाठी योग्य
असल्याने अगदी बाथरूमचा नळ उघडून आपल्या वॉटर बॅगमध्ये पिण्याचे पाणी भरायला काहीच हरकत नसते.
हॉटेल बाथरूममध्ये अशा बर्याच अनोख्या गोष्टी असतात. इंग्लंडच्या बर्याच हेरिटेज हॉटेल्स्मध्ये, अगदी सुपर लक्झुरियस हॉटेल्स्मध्येसुद्धा काहीवेळा माझा बाथरूममध्ये चक्क संताप होतो आणि तेसुद्दा हात धुताना. ह्या हॉटेल्स्मध्ये आजसुद्दा जुन्या परंपरा जिवंत आहेत, ह्या वॉशबेसिनच्या नळामध्ये. गरम पाण्याचा वेगळा नळ आणि थंड पाण्याचा वेगळा नळ बघितला की, आधी थंड मग गरम पाणी आपल्या हाताच्या आेंजळीत मिक्स करण्यात माझी तारांबळ उडते. अशावेळी तो वॉशबेसिनवर ठेवलेला ग्लास फार उपयोगी पडतो. सगळीकडे आज टॅप मिक्सर्स आले आहेत पण ग्रेट ब्रिटनची ही काही हॉटेल्स् आजसुद्दा परंपरेला धरून आहेत ह्याची
गम्मत वाटते.
आपल्या सवयींप्रमाणे आपण अनेक गोष्टी अगदी गृहित धरलेल्या असतात आणि त्यातलीच एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जेट स्प्रे’. टॉयलेटच्या कमोड शेजारचा हा ‘जेट स्प्रे’ बहुतेक आशिया खंडात बघायला मिळतो पण अजून युरोपमध्ये मात्र ह्या ‘जेट स्प्रे’ने एन्ट्री केली नाही. पण इटली आणि फ्रान्सच्या काही भागात अर्थात मेडिटरेनीयन देशांत मात्र कमोडशेजारी दुसरे एक छोटेसे कमोड दिसते, त्याला ‘बिडेट’ म्हणतात. सतराव्या शतकापासून वापरात असलेले हे ‘बिडेट’ प्रातःविधीनंतर आवश्यक असणार्या शारिरीक स्वच्छतेसाठी वापरले जाते. पूर्वी केवळ राजमहालात वापरला जाणारा हा बिडेट बदलत्या काळानुसार सर्वसामान्य जनतेच्या घरीसुद्दा दिसू लागला. साधारण इ.स १९०० च्या जवळपास बिडेटला बेडरूममधून काढून बाथरूममध्ये जागा मिळाली. युरोपमधील हे बिडेट आवडले नाही तरी जपानचे टॉयलेट मात्र प्रत्येकाला आवडतात. कारण तिथे अगदी विमातळावरील बाथरूममध्ये कमोड सीटचे टेम्परेचर थंड-गरम करण्याची सोय आणि विविध जेट स्प्रेचे अनेक पर्याय आहेत व ते दर्शवण्यासाठी वेगवेगळया चित्रांचा वापर केलेला असतो.
मॉडर्न युरोपियन डिझाईनमध्ये अनेक बाथरूम्सना लॉक नसते,लॉक काय अनेक हॉटेल्सच्या बाथरूम्सना भिंतीऐवजी ग्लास लावलेली असते. रूममधून बाथरूममधला नजारा पाहण्यासाठी नव्हे तर बाथरूममधून रूममधला टी.व्ही किंवा बाहेरचे निसर्गसौंदर्य पाहता यावे, ही त्यामागची कल्पना खरंतर. अशा बाथरूममध्ये पडदे किंवा ब्लाइंड्स ओढून आपण आपली प्रायव्हसी सांभाळू शकतो. काही ठिकाणी तर बाथरूम्स हे आपल्या रूमच्या बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात दिसतात. अगदी केरळमध्येही अनेक लक्झरी हॉटेल्समध्ये बाथरूम हे ‘ओपन-एअर’ असते. तर केनियामधल्या ‘एलसा कोपये’ ह्या लक्झरी कॅम्पमधले कॉटेज हे दगडात कोरलेले असून इथल्या आऊटडोअर बाथटबमधून आपण जंगलात फिरणारे प्राणी पाहू शकता. ‘आंघोळ करताना निसर्गाचा आनंद पुरेपूर लुटता यावा’, ही ह्यांची कल्पना. असेच एक ‘ओपन टू स्काय’ बाथरूम दिसते ते मालदिवच्या कान्दोल्हू रीसॉर्टच्या ओशन पूल व्हिलास्मध्ये. हे बाथरूम्स या रूमच्या आऊटडोअर डेकवर बांधलेले असल्याने अगदी एक मिनिटसुद्दा आपला पॅनोरॅमिक ओशन व्ह्यु आपल्या नजरेआड होणार नाही. तसंच आंघोळ करताना समुद्र बघायची हौस असेल तर सेलिब्रिटी रीफ्लेक्शन या लक्झुरी क्रुझ शिपवरच्या रिफ्लेक्शन स्वीटमध्ये वास्तव्य करा. दोन बेडरूमच्या ह्या स्वीटचे बाथरूम शिपच्याबाहेर तरंगतेय असे वाटते. संपूर्ण ‘फ्लोर टू सीलींग’ ग्लास असल्याने आपल्याला इथून अतिशय सुंदर नजारा दिसत राहतो. खरंच, अशा बाथरूममधून बाहेर पडणे कठीणच ठरते. दुबईच्या ‘अटलँटिस द पाम’ रीसॉर्टच्या अंडरवॉटर स्वीटमधल्या बाथटबमध्ये आराम करताना सभोवतीच्या अॅम्बॅसेडर लगूनमधील ६५,०००हून अधिक मरीन अॅनिमल्स आपण बघू शकतो. दिवसभर स्थलदर्शन करून दमून-भागून थकलेलो जेव्हा आपण रूमवर परततो तेव्हा रीलॅक्सिंग टबबाथ घेऊन आपण ताजेतवाने होतो ह्यात वादच नाही. आपल्या बाथरूममध्ये जर मान्सून रेन शॉवर,एक भला मोठा मेटलचा टब, त्यावर छतावर चमचम करणारा शँडेलीयर आणि आरसा लागलेला असेल तर केवळ आंघोळ करूनच आपण दमून जाऊ. सिंगापूरच्या ‘ W ’ रीसॉर्टमधल्या एक्स्ट्रीम वॉव स्वीटच्या बाथरूममध्ये सोफासुद्दा ठेवलेला आहे, त्यामुळे इथे दमलो तरी बाथरूममध्येच आपण निवांत झोप घेऊ शकतो तर बर्मिंगहमच्या मालमेसन हॉटेलच्या निर्वाणा स्वीटमधील बाथरुममध्ये जॅकुझी बाथटबमुळे आपण डिस्कोची मजा घेऊ शकतो.
आपल्या सौंदर्यासाठी आणि बुद्धिमत्तेसाठी ओळखली जाणारी राणी म्हणजे ‘इजिप्तची राणी क्लीओपात्रा’. असे म्हणतात की, क्लीओपात्राचे अनेक बाथ विधीवत होते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विधी ती आंघोळ करताना वापरायची. त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि गाढवाचे दूधसुद्दा वापरले जायचे. हिमालयातल्या ‘आनंदा स्पा’मध्ये माझ्या बाथटबवरचा बाथ मेन्यू व त्यातल्या अनेक प्रकारच्या बाथ्स्ची लिस्ट बघून मला माझा ‘क्लीओपात्राज् बाथ’ मिळाल्याचा आनंद झाला होता. आपल्या हॉलिडेवर आपण कुठल्या प्रकारच्या हॉटेलमध्ये राहतोय, त्या हॉटेल रूमच्या सुविधा काय आहेत, तिथले बाथरूम कसे आहेत ह्याकडे आज आपले लक्ष असते. मग ते हनिमून असो किंवा बिझनेस टॅ्रव्हल. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आपण बाथरूमचे दार बंद करून जगापासून जेव्हा दूर होतो आणि अशाप्रकारचा आल्हाददायी अनुभव देणारा बाथ घेेतो, तेव्हा आपल्या हॉलिडेचा आनंद द्विगुणित होणार हे ठरलेलंच.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.