लाहौल स्पिती चंद्रतालची सहल आम्ही यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केली. दोन वर्षांपूर्वी सुधीरने ही सहल केली होती तेव्हापासूनचा त्याचा आग्रह आत्ता कृतीत उतरला. गेल्या आठवड्यात ही सहल पर्यटकांच्या उत्साहाने आणि आमचे टूर मॅनेजर्स प्रकाश पतंगे आणि तन्मय नाईकच्या अखंड मेहनतीने यशस्वी झाली. अद्भुत अफलातून अनुभव ह्या तीन शब्दात त्यांनी ह्या निसर्गसुंदर अप्रतिम ठिकाणांचं वर्णन केलं.
अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत, त्याची उकल करीत आपण सर्वजण आयुष्याला सामोरे जात असतो. जेवढे जास्त प्रश्न सोडवू तेवढं जगणं सुकर होऊन जातं, सुसह्य बनतं. खरंतर आपण आपली मानसिकताच प्रश्न शोधण्याची, त्यावर उत्तर मिळविण्याची, त्या प्रश्नातून बाहेर पडून दुसर्या प्रश्नांशी चार हात करण्याची ठेवायला हवी. सुदैवाने आम्हाला क्षेत्रच असं मिळालंय की इथे रोजचे मामूली प्रश्न तर असतातच पण त्या व्यतिरिक्त अशी काही आव्हानं समोर येतात की ती सोडवायला कुठून जाणे पण एक्स्ट्रा एनर्जी येते आणि ते आव्हान यशस्वीपणे पेलून सुटल्यानंतर वेगळंच आत्मिक समाधान मिळतं.
मागच्या आठवड्यात वुमन्स स्पेशल लेह लडाख कारगिलची सहल आमच्या सर्व सख्यांना घेऊन इथून निघाली खरी पण खराब हवामानामुळे विमान लेहला न पोहोचता श्रीनगरला उतरवलं गेलं, ह्या सर्व मैत्रिणी श्रीनगरपर्यंतची हवाई सफर करून मुंबईला परत आल्या. खराब हवा मी म्हणत होती त्यामुळे दुसर्या दिवसाचीही गॅरंटी नव्हती. आमची गेस्ट रीलेशन टीम सगळ्या मैत्रिणींच्या, एअरलाईनच्या आणि आमच्या संपर्कात राहून त्या अनिश्चिततेत उद्भवणार्या प्रत्येक प्रश्नाची उकल करीत होती. शेवटी एकमताने, हो तसंच म्हणावं लागेल कारण खराब हवा ही कुणाच्याही अखत्यारितली बाब नव्हती. आता घरी जा आणि हीच सहल पुन्हा आपण कधी नेतोय ते कळवतो आम्ही असं म्हणत सहल सुरू व्हायच्या आधीच आम्ही सहलीतल्या मैत्रिणींना निरोप दिला. अर्थात चार दिवसांनंतर ही सहल लेहला रवाना झाली आणि आता आमच्या ह्या वुमन्स स्पेशलच्या मैत्रिणी लेहमध्ये धम्माल करताहेत. आज कोणते प्रश्न आपल्यासमोर उभे ठाकणार आहेत ही मन:स्थिती घेऊनच आनंदाने आम्ही सर्वजण कार्यालयात प्रविष्ट होतो, आणि जर एखाद्या दिवशी कमी प्रश्न उपस्थित झाले तर प्रश्न सोडविण्यासाठीची त्या दिवसाची एक्स्ट्रा एनर्जी दुसर्या दिवसासाठी शिल्लक ठेवून समाधानाने घरी पोहोचतो.
आम्ही स्वत: होशो हवास में म्हणजे संपूर्ण विचारांती ठरवून ह्या क्षेत्रात आलोय, कुणी आमच्यावर जबरदस्ती केली नाहीये की तू ह्याच क्षेत्रात यायला पाहिजे म्हणून. त्यामुळे लग्नात जसं एकमेकांना वचन देतात तसं मान्य आहे, किंवा कबूल है। किंवा आय डू म्हणत आम्ही आम्हाला आणि पर्यटनक्षेत्राला एकमेकांमध्ये अडकवून घेतलंय. आता आयुष्यच जर ह्या क्षेत्रासोबत बांधायचं ठरवलं तर ह्या क्षेत्रात व्यवसायातील जे काही अधिक उणे आहे त्यासह त्याचा स्विकार केलाय. अरेरे! म्हणत भितीने त्यातील जोखमींचा सामना करायचा की अरे व्वा! लेट्स फेस इट अँड कम आऊट अॅज विनर असं म्हणत बाह्या सरसावायच्या हे आमच्यावर आहे. आम्ही अरेरे पेक्षा अरे व्वा!ची संस्कृती वीणा वर्ल्डमध्ये रुजविण्यात बर्यापैकी यशस्वी झालोय ही जमेची बाब.
सहा वर्षांपूर्वी माननीय श्री राज ठाकरे यांच्या हस्ते आम्ही वीणा वर्ल्डच्या पहिल्या सेल्स ऑफिसचं उद्घाटन केल्यानंतरच्या गप्पागोष्टीत त्यांनी दोन महत्त्वाचे मंत्र दिले, एक जगाला जग दाखवा! आणि दुसरा म्हणजे, तुमचा व्यवसाय हा सहा प्रश्नांमध्ये सामावलेला आहे तेवढं सतत लक्षात ठेवा. पर्यटकाला फक्त सहा प्रश्न आहेत आणि त्या सहा प्रश्नांची उकल जर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकलात तर तुम्ही जग जिंकलंच. ते म्हणाले, मला पर्यटनाची आवड आहे, मी स्वत: एक पर्यटक आहे आणि जेव्हा मी पर्यटनाला निघतो तेव्हा माझ्यासमोर सहा प्रश्न असतात आणि त्याची उत्तरं व्यवस्थित मिळवायचा मी प्रयत्न करतो, म्हणजे त्याची उत्तरं मला जर व्यवस्थित मिळाली तरंच मी पर्यटनाला निघतो. ते प्रश्न आहेत, मी कुठे जाणार? मी कधी जाणार? मी कसा जाणार? मी काय बघणार? मी काय खाणार? मी कुठे राहणार? अरे, खरंच की! आमच्या व्यवसायाचा फाफटपसारा त्यांनी एखादं सार सांगितल्यासारखा आमच्यासमोर उलगडवून दाखवला. जगाला जग दाखवा ही वीणा वर्ल्डची मार्गक्रमणा सुरू आहेच, आणि ह्या सहा प्रश्नांवर आम्ही आमच्या प्रत्येक ट्रेनिंग सेशनमध्ये चर्चा करतो. नवीन आलेले टीम मेंबर्स ह्या क्षेत्राची व्याप्ती बघून थोडेसे घाबरलेले किंवा बिचकलेले असतात, त्यांना जेव्हा हे सहा प्रश्न आणि त्याची उत्तरं सांगितली जातात तेव्हा त्यांच्यावरचं जगाच्या पर्यटनामुळे आलेलं अवाढव्य दडपण एकदम कमी होऊन जातं. माननीय श्री राज ठाकरेंचे आभार. त्यांच्या ह्या षष्ठ्य सुत्रीमुळे आमचं काम सोपं झालं आणि आज हे इथे जाहीररीत्या लिहील्यामुळे, पर्यटनक्षेत्रातल्या खासकरून नव्याने प्रवेश करणार्या सर्वांना त्याचा फायदा होईल.
कोणताही प्रोजेक्ट करताना आम्ही 6W+2H ही आठ प्रश्नांची कार्यप्रणाली वापरतो. खरंतर ही 5W+1H अशी आहे, ही शोधलीय ग्रीक तत्ववेत्ता अॅरिस्टॉटलने असं म्हणतात. आम्हाला त्यात आमचं काहीतरी घालायची थोडक्यात शहाणपणा दाखविण्याची फार हौस. 5W+1H म्हणजे व्हॉट? व्हेन? व्हेअर? हू? व्हाय? हाऊ?. काय करताय? कधी करताय? कुठे करताय? कोण करतंय? का करताय? आणि कसं करताय? हे ते मूळ जगप्रसिद्ध प्रश्न. जगातला छोटा, मोठा, सोप्पा, कठीण असा कोणताही प्रोजेक्ट ह्या सहा प्रश्नांमध्ये एकवटला आहे. एकदा ह्याची उत्तरं जर व्यवस्थित शोधली तर प्रोजेक्टची सुरुवात खूप चांगल्या तर्हेने होते. कुणाच्या मनात काही शंका रहात नाहीत. आम्ही त्यामध्ये घातलं ते हूम कुणासाठी तो प्रोजेक्ट केला जातोय आणि हर्डल्स ह्यात अडचणी काय येऊ शकतात. पास्ट हर्डल्स आणि प्रॉबेबल हर्डल्स. जुना रखडलेला प्रोजेक्ट नव्याने हातात घेतला असेल तर त्यात आधीच्या काही अडचणी असू शकतात त्याचा प्रथम परामर्श घेणं आणि त्याच प्रोजेक्टमध्ये किंवा नव्या प्रोजेक्टमध्ये वर्तमानात वा भविष्यात काही अडचणी आपल्याला येऊ शकतात का? ह्याचा अंदाज घेणे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच एक डब्लू आणि एक एच आम्ही वाढवला. ही कल्पना आम्हाला सुचली रुडयार्ड किपलिंगच्या द एलिफंटस् चाइल्डमधून. कोणताही छोटा मोठा प्रोजेक्ट अशातर्हेने जेव्हा हाती घेतला जातो तेव्हा तो चांगल्यातर्हेने मार्गी लागतोच पण वेळेत पूर्ण होतो हे ही आम्ही पाहिलंय. कधी कधी एखादा प्रोजेक्ट हाती घेतल्यावर घाईघाईत ह्या 6W+2H प्रणालीकडे दुर्लक्षही होतं आणि ते न करताच जेव्हा पुढे जातो तेव्हा काही ना काही अडथळ्यांना सामोरं जावं लागतंच. त्यामुळेच आम्ही एकमेकांना 6W+2H केलं का? अशी आठवण करून देत असतो.
वाढवलेला डब्लू म्हणजे कोणासाठी आणि आमचा वीणा वर्ल्डचा विचार केला तर तो पर्यटकांचा आहे. प्रोजेक्ट कसलाही असो, तो शेवटी पर्यटक केंद्रीतच असल्याने त्या पर्यटकाला काय हवंय हे महत्त्वाचं आणि ह्या पर्यटकाच्या बाजूने विचार करताना आजच्या शिर्षकात लिहिलेले हे सहा प्रश्न फार उपयोगाचे ठरतात. मागच्याच आठवड्यात इंटर्नशिपसाठी बेल्जियमची टेसा हॉपडेल वीणा वर्ल्डमध्ये जॉईन झाली. अमेरिकन स्कूलची विद्यार्थिनी तिच्या सुट्टीत पंधरा दिवस वीणा वर्ल्ड इनबाउंडच्या प्रोजेक्टवर काम करतेय. भारतात येणार्या तिच्यासारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना काय काय पाहिजे? त्यांच्या मनात काय प्रश्न पडतात ज्यावेळी ते भारतात यायचा विचार करतात? अशा अनेक संभाव्य प्रश्नांची यादी तिला सुनिलाने बनवायला सांगितली. एकदा का त्यांच्या मनातले प्रश्न कळले की त्यानुसार पुढची वाटचाल ठरवणं सोप्प जाईल. टेसा स्वत: एक इनबाउंड गेस्ट आहे आणि ती त्याच प्रोजेक्टवर टीम मेंबर म्हणून जेव्हा काम करते तेव्हा दुहेरी फायदा होतो.
यावर्षी लाहौल स्पिती चंद्रतालची सहल आम्ही पहिल्यांदाच आयोजित केली. दोन वर्षांपूर्वी सुधीरने ही सहल केली होती तेव्हापासूनचा त्याचा आग्रह आत्ता कृतीत उतरला. गेल्या आठवड्यात ही सहल पर्यटकांच्या उत्साहाने आणि आमचे टूर मॅनेजर्स प्रकाश पतंगे आणि तन्मय नाईकच्या अखंड मेहनतीने यशस्वी झाली. अद्भुत अफलातून अनुभव ह्या तीन शब्दात त्यांनी ह्या निसर्गसुंदर अप्रतिम ठिकाणांचं वर्णन केलं. ही नेहमीची फॅमिली टूर नसून खर्या अर्थाने एक साहसपूर्ण अशी सहल आहे, एक्स्पीडीशन म्हणता येईल. ह्या सहलीला जाऊन आलेल्या पुण्याच्या श्री. सतीश गोरे ह्यांनी इतकं छान पत्र पाठवलं की आम्हाला पर्यटकाच्या दृष्टीकोनातून ही सहल असा वेगळा सर्व्हे करायची गरजच पडली नाही. पॉईंट टू पॉईंट त्यांनी प्रत्येक गोष्ट मांडली होती. टूर मॅनेजरकडून लॉजिस्टिक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा आढावा मिळाला होताच, पर्यटकांचा दृष्टीकोन सतीश गोरे यांच्यामुळे मिळाला. आता लाहौल स्पितीची दुसरी सहल सुरू आहे. आम्ही अशा ह्या सहलींद्वारे पर्यटकांना सोपी सहल, थोडी कठीण सहल, खडतर सहल असं टप्याटप्प्याने अॅक्लमटाईज करतोय. विदेश सहलींना मुलभूत सुखसुविधांचा तेवढा प्रश्न नसतो. भारतातही पंच्याहत्तर टक्के सहली ह्या चांगल्यातर्हेने सुरू असतात. पण जेव्हा पर्यटक थोड्या अंडरडेव्हलप्ड ठिकाणांना किंवा कठीण भौगोलिक परिस्थिती असलेल्या लाहौल स्पिती, लेह लडाख, अरुणाचल प्रदेश-नॉर्थ ईस्ट, काही अंशी काश्मिर, अंदमान, भूतानसारख्या ठिकाणी जातात तेव्हा आम्हाला त्यांना ह्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रश्नांची जाणीव करून द्यावी लागते, त्यांची मानसिकता तयार करावी लागते ह्या ठिकाणच्या पर्यटनासाठी. यरोपहून नॉर्थ ईस्ट वा लेह लडाखला येणारा पर्यटक एकंदरीत तिथल्या परिस्थितीविषयी अनभिज्ञ असेल तर नाराज होऊ शकतो. अर्थात ह्या सर्वच ठिकाणी दरवर्षी आम्ही हजारोंच्या संख्येने पर्यटक घेऊन जात असतो, यशस्वी सहलींचं आयोजन करतो, त्यामुळे तशी काळजी करण्याचं कारण नाही.
प्रोजेक्ट करतानाचे (6W+2H) प्रश्न, पर्यटकांचे महत्त्वाचे सहा प्रश्न, त्यासोबत पर्यटन स्थळांचे काही प्रश्न असतात ते आम्हाला उत्तरासहीत पर्यटकांना सांगावे लागतात. एकूणच प्रश्नांची उकल करीत राहणे आणि मार्गक्रमणा सुरू ठेवणे. लेट्स कीप गोईंग! हॅव अ हॅप्पी रेनी संडे!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.