आपण नेहमी म्हणतो की ‘भूतकाळात अडकून पडूया नको, भविष्यकाळातील स्वप्नांमध्ये रंगूया नको, फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करूया’ अगदी बरोबर आहे. आपल्या सभोवती अशी अनेक माणसं आपण बघतो की जी स्वत:च्या भूतकाळातून कधी बाहेरच आली नाहीत. त्यामुळे वर्तमानावर - त्यांच्या ‘आज’वर त्यांना कधी विजय मिळवता आला नाही. दुसरी माणसं असतात ती ‘भविष्यकाळात मी असं करेन, मी तसं करेन’ ह्या स्वप्नरंजनातच इतकी मग्न होतात की वर्तमान क्षणाक्षणाला त्यांच्या हातून निघून जातोय हे त्यांच्या लक्षातही येत नाही. अगदी दूरचं कशाला माझ्या माहितीतली एक व्यक्ती म्हणत असायची, ‘कशाला एवढे कष्ट उपसायचे एक बॉम्ब पडला की सगळं बेचिराख होणारेय, कशा तर्हेचे बॉम्ब बनताहेत माहिती आहे का तुम्हाला?’ आणि असंच काहीसं नकारात्मक वक्तव्य करीत ह्या माणसाने आयुष्य ढकललं, काहीही केलं नाही आयुष्यात. आज चाळीस-पन्नास वर्ष झाली असतील, ना कुठे बॉम्ब पडला ना काही बेचिराख झालं. ह्या माणसाचं आयुष्य मात्र ‘उपजला-निपजला’ एवढ्याच कक्षेत राहिलं. अशा माणसांना हल्ली ‘टॉक्सिक पीपल’ म्हटलं जातं, ज्यांच्यापासून कायम दूर राहिलं पाहिजे आणि जर शक्य असेल तर त्यांना त्यांच्या त्या विषारी नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी काही करता आलं तर केलं पाहिजे आपल्याला, त्या नैराश्याची बाधा होऊ न देता. ह्याउलट काही माणसं भविष्याबद्दल प्रचंड आशावादी असतात. भविष्यात त्यांच्या पायाशी लोळण घेणार्या यशाचा-सुखांचा एखादा चलतचित्रपट त्यांनी स्वत:च त्यांच्या मनात चितारलेला असतो. आणि त्यात ते इतके मशगूल असतात की त्यासाठी आज हातपाय हलवायला पाहिजेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. ह्यांचं आयुष्य मानसिक सकारात्मकतेत पण वेगळ्याच वास्तविकतेत निसटून जातं, जेेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. जसं भविष्यकाळाबद्दल तसंच भूतकाळाबद्दलही. बघानं जी माणसं सतत ‘मी असं केलं, मी तसं केलं, आमच्यावेळी असं होतं’ ह्याचा पाढा वाचत बसतात तेव्हा त्या संभाषणातून बरीच मंडळी काढता पाय घेतात. आपल्या चित्रपटांमध्ये ह्या यशस्वी माणसांवर अनेकदा खूप मजेशीर सीन्स चित्रीत झालेले आहेत. दुसरी माणसं असतात ती भूतकाळातील अपयश, नुकसान किंवा सोडून गेलेली माणसं ह्यांच्या शोकातून बाहेरच येत नाहीत आणि त्यामुळे वर्तमानात त्याचे पडसाद उमटून आणखी गर्तेत अडकले जातात.
भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळाची सांगड घालता आली पाहिजे. ज्यांना ते जमलं त्यांनी आयुष्याची बाजी जिंकली. आणि अशी सकारात्मक, क्रियाशील माणसंही आपल्याला आपल्या सभोवताली दिसतात. अर्थात ह्या त्रिकालांचा समन्वय साधणं हे तेवढं सोप्पं नाही ह्याची कल्पना आहे कारण वर जे काही इतरांविषयी लिहिलंय ते कुणातरी दुसर्यांविषयीच आहे असं नाही तर आपण आपल्या स्वत:कडे जर दुरुन-अंतरावरून एखाद्या तिर्हाइताच्या नजरेतून पाहिलं (म्हणजे असं आपण आपल्याकडे नेहमी बघावं) तर आपल्या लक्षात येईल की वर कुणीतरी दुसरे म्हणून जे संबोधलंय ते कधी-कधी आपणही आहोत. आणि हे जेव्हा आपल्याला जाणवेल तेव्हा त्या टॉक्सिक स्टेटमधून बाहेर पडत आपण आपल्याला भानावर आणलं पाहिजे. अधूनमधून डी रेल झालेली आपली गाडी आपल्याला रूळावर आणता आली पाहिजे. आणि असं हे भानावर असणं फार महत्त्वाचं कारण भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ हे सतत आपला भयंकर गोंधळ उडवून देत असतात. कुटुंब असो किंवा संस्था किंवा संघटना किंवा देश, हे काहीही चालवताना प्रत्येक प्रमुखाला सतत वास्तवात- वर्तमानात असलं पाहिजे, भानावर असलं पाहिजे. ह्या त्रिकालांचा गोंधळ लक्षात घेऊनच आम्ही वीणा वर्ल्डमध्ये कॉर्पोरेट ऑफिसच्या एका वॉलवर लिहिलंय, ‘इतिहासापासून शिकूया, भविष्यकाळावर सतत नजर ठेवूया आणि वर्तमानकाळावरची पकड ढिली होऊ देऊया नको’. कुठेतरी ‘लॉर्ड कृष्णा सेज्’मध्ये वाचलेला हा विचार आम्ही आमच्या कार्यालयीन दिनचर्येमधला एक सुविचार ठरवून टाकला, त्याला समोर ठेवून दिला आणि इट हेल्पस्.
‘वीणा वर्ल्ड शून्यातून उभी राहिली. एक भक्कम संस्था म्हणून पर्यटनक्षेत्रात नावलौकिकाला आली’ पहिल्या दोन वर्षातच असा खूप उदो-उदो व्हायला लागला. आम्हालाही खूप बरं वाटायला लागलं, ओह! ‘वूई डीड समथिंग’चं मुठभर मांस आमच्या अंगावर चढलं. आम्हीच आमची पाठ थोपटायला लागलो. एक वर्ष असं आमचं छान-छान वाटण्यात गेलं. मुलाखती, भाषणबाजी, पुरस्कार, वृत्तपत्रात वा टीव्हीवर झळकणं ह्या सगळ्यांनी तर आम्ही हवेतच गेलो. म्हणजे जर वेळेत भानावर आलो नसतो तर उतरती कळाच लागली असती. सुदैवाने आम्ही अशा व्यवसायात आहोत की खूप प्रवास करायला मिळतो. भारतातल्या किंवा जगातल्या एकेका उद्योगधंद्याची किंवा त्यांच्या वाटचालीची व्याप्ती जवळून पहायला मिळते. पर्यटनक्षेत्रातच इतक्या अवाढव्य कंपन्या आहेत की आपल्याला अजून कितीतरी आणि खूप काही करायला हवंय ह्याची जाणीव होते. ती जाणीव आम्हाला वेळेत झाली हे आमचं भाग्य. तीन वर्ष झाल्यानंतर आम्ही आमच्या अॅन्युअल मीटमध्येच ठरवून टाकलं यापुढे आपल्या छोट्या पण गौरवशाली इतिहासाचा पाढा वाचणं बंद. त्यात रममाण होणं बंद. मुलाखती-भाषणबाजी बंद. जे काय आपण करायचं ठरवलंय, ज्या वाटेवरुन मार्गक्रमणा करायची ठरवलीय त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं, शांतपणे आवाज न करता प्रगतीपथावर रहायचं, आपलं इच्छित ध्येय गाठण्यासाठी अखंड मेहनतीवर व सकारात्मक प्रयत्नांवर भर द्यायचा. आणि पुढची तीन वर्ष आम्ही ते पाळलं. आमची मार्केटिंग टीम अधूनमधून डोकं वर काढायची. म्हणायची, ‘तुम्ही अगदीच लाइम लाईटपासून दूर गेलाय, अशी टोकाची भूमिका घेणं आपल्या ब्रँडसाठी चांगलं नाही. तुम्ही सतत वेगवेगळ्या माध्यमातून राहिलं पाहिजे लोकांसमोर’. थोडक्यात मार्केटिंग मंत्र समजावून सांगत होते. म्हटलं, ‘आपण ठरवलंय नं की आपल्या कामाने पुढे यायचं, आपण चांगली सर्व्हिस दिली तर लोकं आपल्या पाठी आहेत हे त्यांनी आपल्याला सुरुवातीपासून दाखवून दिलंय. लाइमलाइटमध्ये न राहताही गेल्या तीन वर्षांत सर्वांनी मिळून जी प्रगती केलीय ती निश्चितच क्रेडिटेबल आहे. म्हणजे आपले पर्यटकच आपल्याला सांगताहेत की ते का आपल्यासोबत असणार आहेत. लाइमलाइट हा काही काळापुरता असतो आणि जेव्हा तो बाजूला होतो नं तेव्हा तडफडणारी कितीतरी माणसं आपण अनेक क्षेत्रात बघतो. सो लगे रहो, दटे रहो, कीप गोइंग. ‘अराईज, अवेक, अॅन्ड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड्!’ स्वामी विवेकानंदांची ही शिकवण कधी विसरुया नको.
‘कीप गोइंग’ हे कधीही नव्हे एवढं आत्ताच्या काळात महत्त्वाचं झालंय. गेलं वर्ष तसं सर्वांनाच ‘नॉट सो गूड’ असं गेलं. पर्यटनक्षेत्राला तर जास्तच कटकटीचं. जागतिक आर्थिक मंदी, जेट एअरवेजचं अचानक अवकाशातून नाहिसं होणं आणि त्यात आमच्यासारख्या अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांचे कोट्यावधी रुपये अडकणं, ट्रॅव्हल कंपन्यांनी कोसळणं आणि संपूर्ण क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह उभं करणं, भारतातल्या दोन मोठ्या सुट्ट्या असतानाच दोन महत्त्वाच्या निवडणूकांचं असणं, ह्या सगळ्यांनी एअरलाईन्स-हॉटेल-ट्रॅव्हल कंपन्यांचा अगदी अंत पाहिला म्हणायला हरकत नाही. या मागच्या वर्षातून जे तावून सुलाखून निघाले त्यांनी स्वत:ची पाठ थोपटायला हरकत नाही, म्हणजे एखाद्यावेळी तसं करायला हरकत नाही, त्या कौतुकात अडकून पडायचं नाही एवढंच. जरी मागचं वर्ष आव्हानांचं गेलं तरी त्याने आम्हाला बर्यापैकी स्ट्रँाग बनवलं. ‘आव्हानांनो या आता आम्ही सज्ज आहोत अधिक क्षमतेने तुमचा प्रतिकार करायला’ अशी मानसिकता घेऊन आम्ही सज्ज झालो ट्वेन्टी-ट्वेन्टी च्या स्वागताला. वर्षाची सुरुवात छान झाली. ह्या लीप ईयरकडे आपण सगळेच मोठ्या अपेक्षेने बघत असताना कोरोना व्हायरसने चायनामध्ये धुमाकूळ घातला आणि ह्या महासत्तेकडे आतातरी जगाने पाठ फिरवली. ‘दरवाजा बंद’ चायनामध्ये जाणारे टूरिस्ट आणि त्यांच्यापेक्षा संख्येने जास्त असणारे बिझनेसवाले ह्यांनी तीथे जाणं तुर्तास थांबवलं. जेव्हा हे घडलं तो होता चायनीज न्यू ईयरचा सीझन. कोट्यावधी लोकं (वर्षाला दहा कोटींपेक्षा अधिक) चायनामधून जगभरात पर्यटनासाठी बाहेर पडतात. ह्यांना बाहेर पडायला चायना सरकारने बंदी घातली आणि इतर देशांनीही ह्या टूरिस्टना तूर्त स्थगिती देण्याचं जाहीर केल्यावर जगभरातील एअरलाईन इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री आणि ट्रॅव्हल कंपन्यांच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. जगात सर्वात जास्त संख्येने फिरणारे पर्यटक म्हणजे चायनीज. संख्येच्या बाबतीत ते फक्त नंबर वन वर नाहीत तर पहिले पाच नंबर्स त्यांनीच पटकावलेयत. युरोप-अमेरिकेत फिरताना आपण प्रत्येकाने त्यांच्या पर्यटकी लोकसंख्येचा आवाका पाहिलेलाच आहे. जिथे बघावं तिथे चायनाचे पर्यटक. म्हणजे कधीकधी आम्हा भारतीयांना हॉटेल्स मिळणं कठीण जायचं कुठेकुठे कारण चायनीज पर्यटकांसमोर जगाने रेड कार्पेट वेलकम दिलेलं. चायनाने आत-बाहेर जायची दारं सध्या बंद केली असली तरी ह्यानेे नुसत्या पर्यटनक्षेत्रावर नाही तर एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेसमोर प्रचंड मोठी आव्हानं उभी राहणार आहेत. चायनाने त्यांच्या देशावर जगाला इतकं अवलंबित केलं होतं की त्यांनी स्वत:ला ‘नो बडी कॅन अफोर्ड टू फेल चायना’ इतक्या उंचावर नेऊन ठेवलं होतं. आज मात्र चायना एका वेगळ्याच घोर संकटात आहे. एका छोट्या विषाणूपुढे त्यांनी नांगी टाकलीय आणि जगाची अर्थव्यवस्था कात्रीत सापडलीय. ‘काहीही होऊ शकतं’ ह्याचं ह्यापेक्षा वेगळं उदाहरण आणखी काय हवं? या सगळ्या भीषण वावटळीत एकच सिल्वर लायनिंग म्हणजे सगळ्या देशांनी खासकरुन स्वच्छ सुंदर देशांनी आपले देश अक्षरश: धुवून काढले. क्लीनलीनेसच्या बाबतीत ते आणखी सतर्क बनले. मी ही एकदिवस अक्षरश: बसल्या जागेवरून तरातरा उठले आणि घरातला सगळा कोपरानकोपरा साफसूफ करून टाकला. कुठेही अडगळ ठेवली नाही. डासांना ‘नो एन्ट्री’. प्रीकॉशन इज बेटर दॅन क्यूअर. एक विषाणू चायना सारख्या अल्ट्रामॉडर्न महासत्तेची ही हालत करुन टाकत असेल तर हम तो कीस पेड की पत्ती!
आता महिना होईल ह्या कोरोना उच्छादाला. आम्ही एअरलाईनशी संपर्कात राहून चायनाच्या सहली बेमुदत पुढे ढकलल्या किंवा पर्यटकांना कोरीया तैवान जपानचा ऑप्शन दिला. पर्यटकांनीही आलेल्या परिस्थितीला जाणून लागलीच सहकार्य केलं. साऊथ ईस्ट एशियाच्या म्हणजे सिंगापूर थायलंड मलेशिया बालीच्या सहली आनंदात सुुरू आहेत.
‘प्रवास करणं सेफ आहे का?’ असं पर्यटक विचारतात. सेफ्टीची गॅरंटी ब्रम्हदेवही ह्या जगात आता देणार नाही पण रोजच पर्यटक तीथे असल्याने फर्स्टहँड रीपोर्ट आहे की ह्या सर्व देशांमध्ये ‘बिझनेस अॅज युजवल‘ आहे. आमचंही पर्यटन सुरूच आहे. आमची दोन्ही मुलं म्हणजे नील आणि राज मागच्या आठवड्यात स्किइंंगसाठी जपानला गेलीयत ती उद्या परत येतील. सुनिला सिंगापूरमध्ये आहे तर मी कालच केरळहून परत आले तिथे गेलेल्या वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशलच्या पर्यटकांना भेटून. सुधीर निघालाय पुढच्या आठवड्यात फिजीला आणि वुमन्स डे सेलिब्रेशनसाठी मी जाणार आहे बँकॉकला येत्या सहा तारखेला आणि तिथूनच ‘वुमन्स वर्ल्ड कप’ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बघण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार्या आमच्या सख्यांना भेटायला. आणि आमचे टूर मॅनेजर्स तर आता आहेत अनेक देशांमध्ये आमच्या पर्यटकांसोबत, त्यांच्या दिमतीला.
येणारा भविष्यकाळ आता असाच प्रचंड आव्हानांनी भरलेला असणार आहे. चिंता न करता हिमतीने आत्मविश्वासाने त्याचा सामना करायला आपण तयार रहायचंय. आणि अशावेळी आपल्याला परवानगी आहे बरं का थोडंसं भूतकाळात शिरायला, भूतकाळातील याहीपेक्षा मोठ्या आव्हानांना आपण कसं सामोरे गेलो ते आठवून पुन्हा आपल्यात नवी उमेद जागवायला. वुई हॅव टू कीप गोइंग!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.