आज माहौल बर्यापैकी हेल्थकॉन्शियस झाला आहे. वेळ काढून फिजिकल चेक-अप करणं अंगवळणी पडायला लागलंय. ‘मला काय होणारेय?’ ह्यापेक्षा ‘प्रीकॉशन इज बेटर दॅन क्युअर’ कडे कल झुकलाय ही चांगली गोष्ट आहे. हेल्थ चेक-अप एवढाच महत्वाचा आहे सेल्फ-चेकअप, त्यासाठी वेळ काढायला पाहिजे. जगन्नियंत्याने ह्या पृथ्वीवर परफॉर्म करायला आपल्याला जो काही वेळ बहाल केलाय त्याचं आपण नक्की काय करतोय?...
मागच्या महिन्यात आमच्या प्रॉडक्ट डीझायनिंग टीमची हेड अश्विनी सामंत स्टडी टूरला पंधरा दिवसांसाठी साऊथ आफ्रिकेला गेली होती, ती नसताना डेप्युटी इनचार्ज हवा होता, ‘टू कॅच होल्ड ऑफ समवन केपेबल’. डिस्कशननंतर प्राजक्ता देवासकर चं नाव पुढे आलं. प्राजक्ताला बोलावलं आणि विचारलं, ‘‘तू ही जबाबदारी घेऊ शकशील असं तुला वाटतंय का? वीणा वर्ल्डच्या सुरुवातीपासून इथे आहेस, आपलं कल्चर तुला माहीत आहे, कामाबद्दलचं ज्ञान चांगल्यातर्हेने आत्मासात केलयंस. तुझे प्लस पॉईंट्स आम्हाला दिसले म्हणून आम्ही तुला इथे बोलावलं. आश्विनीलाही आम्ही तिचं मत विचारूच, पण तुझे मायनस पॉईंट्स आम्हाला माहीत नाहीत, तुला तरी माहीत आहेत का? कधी तू स्वत:ला चेक केलेयस का? जर आम्ही तुझं नाव टीमला सांगितलं तर ‘अरे वाह!’ अशी प्रतिक्रिया येईल की ‘ऑ गॉड, नो!’ असा पटकन रीमार्क येईल? काय तर्हेचा ऑरा तू तूझ्या व्यक्तिमत्त्वाभोवती निर्माण केला आहेस?’’ प्राजक्ताला प्रश्न नवीन होते. ‘अरे हे मी कधी चेक केलंच नाही’ हा भाव तिच्या चेहर्यावर दिसला. पण पहिल्यांदा तिने म्हटलं की, ‘मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे. मला वाटतं त्याप्रमाणे हे हे माझे मायनस पॉईंट्स वाटताहेत जे मी निश्चितपणे प्लसमध्ये आणीन’. मायनस पॉईंट्स कळणं ही चांगली बाब होती. प्राजक्ताला तिचा रोल सुपुर्द करून आम्ही दुसर्या कामांकडे वळलो. अचानक मी प्रश्न केला, ‘‘अरे प्राजक्ताला तर विचारलं पण आपण आपल्या स्वत:ला चेक केलंय का या बाबतीत?’’
वीणा वर्ल्डच्या दुसर्या वर्षीच्या अॅन्युअल कॉन्फरन्समध्ये आम्ही एका गोष्टीचा पाठपुरावा केला होता तो म्हणजे, ‘लेट्स बी अ गूड ह्युमन बिइंग फर्स्ट’. वीणा वर्ल्ड टीम मेंबर म्हणून आपण आधी एक चांगलं माणूस बनूया. आम्ही त्यासाठी आमच्या ‘टेन कमांडमेंट्स’ ठरवल्या होत्या. मधून मधून त्याच्या आधारे स्वत:च स्वत:ची परीक्षा घ्यायची. जे चांगलं असेल ते अधिक चांगलं करायचं आणि जिथे आपण कमी पडतोय तिथे प्रयत्न करून सुधारायचं. प्रत्येक माणूस वेगळा आहे. जसा सुखी माणसाचा सदरा शोधूनही सापडत नाही तसा हंड्रेड पर्सेंट परफेक्ट पर्सन असू शकत नाही. पण सतत चांगल्या वाटेवर मार्गक्रमणा करीत राहणं ही गरज आहे. आपण कितीही चांगले असलो तरी एकटे काहीच करू शकत नाही, पण आपल्यासारखी अनेक चांगली माणसं एकत्र आली तर चमत्कार घडवू शकतो ही वस्तुस्थिती आहे आणि ती सभोवताली आपल्याला बघायला मिळते. वीणा वर्ल्डचंच उदाहरण घेतलं तर बॅक एन्डला मुंबई कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सहाशे जणांची टीम कार्यरत आहे. आमच्या प्रत्येक सेल्स ऑफिसमध्ये किमान सहा ते पुणे सेल्स ऑफिसला साठ जणांची टीम आहे. जगभरातील सहलींवर वीणा वर्ल्डचा झेंडा डौलाने फडकवीणारे आमचे साडेचारशे टूर मॅनेजर्स आणि चेन्नईपासून आसामपर्यंत बुकिंगची सोय करून देणारे आमचे दोनशेहून अधिक प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स... ही यादी दर महिन्याला वाढत चाललीय. म्हणजेच दोन हजाराहून अधिक असा हा परिवार झालाय. इथे प्रत्येक ठिकाणी छोटं-मोठं नेतृत्व काम करतंय. आता ह्या मॅनेजर्स आणि इन्चार्जेसची संख्याच शंभरपर्यंत पोहोचलीय. पहिल्या पाच वर्षांत संस्था सुरू करणं, ब्रँड निर्माण करणं, सर्व्हिस देऊन पर्यटकांच्या विश्वासास पात्र ठरणं, जगभर सप्लायर्सचं नेटवर्क उभं करणं, काही चुका जर झाल्याच तर त्या सुधारणं हे करताना वेळ कसा गेला कळलंच नाही. एक महत्वाची गोष्ट आम्ही पाळली ती म्हणजे ह्या सगळ्या धावपळीत वीणा वर्ल्डमध्ये नैतिक मुल्यांना महत्व देणारी एका पारदर्शक संस्कृतीची रुजवात करू शकलो. संस्थापनेच्या दुसर्या वर्षी ठरविलेल्या टेन कमांडमेंट्स आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमधील एका भिंतीचा भाग झाल्या. पण पाच वर्षांनंतर आता पुन्हा त्याकडे नव्याने बघून आम्ही छोट्या मोठ्या टीम लीडर्सनी स्वत:ला चाचपलं पाहिजे. बर्याचदा भिंतीवर एखादी गोष्ट लटकवली की आपला कार्यभाग संपला अशी स्थिती होते. आज मी खूप दिवसांनी ह्या टेन कमांडमेंट्सकडे पाहिलं. स्वत:ला चेक केलं. नव्याने त्या भिंतीचा फोटो काढला जो इथे वर दिला आहे.
कोणतीही संस्था ही वेगवेगळ्या व्यक्तीमत्त्वांनी मिळून बनते. ही व्यक्तीमत्त्व त्यांच्या-त्यांच्या एक्स्पर्टीजने संस्थेचा कार्यभार चालवीत असतात, संस्थेला पुढे नेत असतात. त्यांची एक्स्पर्टीज ओळखणं हे काम संस्थाचालकाचं तसंच टीममधली अशी वेगवेगळी व्यक्तीमत्त्व ओळखणं हे काम त्या त्या मॅनेजरचं असतं. आमची मिटिंग संपल्यानंतर मी डिरेक्टर्स व मॅनेजर्सना व्हर्च्युअली नजरेसमोर आणून त्यांची वर्गवारी केली. ते करताना मला दिसलेला त्यांचा ऑरा विचारात घेतला. ही व्यक्ती जेव्हा त्यांच्या डीपार्टमेंटमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये वावरते तेव्हा काय तर्हेचा माहौल त्यांचं व्यक्तिमत्व निर्माण करतं हे बघणं हा माझ्यासाठी एक वैचारिक टाईमपास झाला. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटामध्ये स्पेनला कारमध्ये तीन मित्र एक गेम खेळत असतात, व्यक्तीचं नाव उच्चारायचं आणि दुसर्याने त्याला संबंधित शब्द पटकन म्हणायचा. तसंच काहीसं हे, व्हेरी इंटरेस्टिंग. व्यक्तीमत्वाचे किती वेगवेगळे प्रकार नजरेसमोर आले. ज्यांच्यामुळे सभोवतालचं वातावरण प्रफुल्लित होतं, माहौल हसरा बनतो, एक प्रकारचं मोटिव्हेशन मिळतं अशामध्ये पटकन नावं समोर आली ती सुधीर पाटील, सुनिला पाटील, संदीप जोशी, वैभवी सोमण, अशोक पेडणेकर. एखादा प्रॉब्लेम आला तर तो इथे हमखास सुटू शकेल असा विश्वास जर टीमला मिळत असेल तर तो कुणाकडून बरं म्हटल्यावर शिल्पा मोरे, अॅनी अलमेडा, विवेक कोचरेकर, भावना सावंत दिसले. मोस्ट कन्सर्न्ड काळजीवाहू सरकारमध्ये होते प्रणोती जोशी, प्रशांत चव्हाण, अमेय हजारे. ‘डोन्ट वरी, वुई विल मॅनेज’ हा विश्वास वाढत्या ऑर्गनायझेशनला देणारी टीम म्हणजे प्रमोद राणे, प्राची गुरव, अश्विनी जोगदंड, इशिता शाह, सुषमा कदम, विनेश शिरगावकर, मयूर नेरूरकर. अनॅलिटीकल आणि स्टॅटिस्टीक्सच्या अंगाने ऑर्गनायझेशनकडे बघून सूचना करणार्यांमध्ये होते नील पाटील व प्रियाका पत्की...सगळ्यांची नावं द्यायला एक वेगळं आर्टिकलच लागेल. आता ह्या सगळ्या व्यक्तींमध्ये जे काही गुण होते त्यामुळे त्यांना संबंधित कामांची जबाबदारी दिली गेली की त्यांच्यावर जबाबदारी पडली आणि त्यांनी त्याप्रमाणे स्वत:ला मोल्ड केलं की दोघांच्याही मिश्रणाने त्यांचा ऑरा बनत गेला हा प्रश्न आहे. पण प्रत्येक व्यक्तीमत्त्व अमूक एक ऑरा पटकन आपल्यासमोर उभं ठाकतं हे निश्चित.
आपण काय तर्हेचं वातावरण निर्माण करतो आपल्या घरात, आपल्या कार्यालयात, आपल्या मित्रसमुहात ही गोष्ट तपासून घेतली पाहिजे. म्हणजे सर्वांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण चांगलं वागावं हा भाव ह्यात नाही. तसं वागणं हे काही काळापुरतं टिकतं. ऑरा बनत असतो आपल्या नकळत. म्हणतात नं की, ‘कॅमेर्यासमोर किंवा सर्वांसमोर आपण जे वागतो ते खरं असतंच असं नाही’. जेव्हा कुणीही आपल्याकडे बघत नाही त्यावेळी आपण जे असतो ते आपलं खरं व्यक्तिमत्त्व. ऑरा हा त्याच व्यक्तिमत्त्वाचा भाग. तो खोटा असू शकत नाही कारण तो आपण बनविलेला नसतो तर तो आपल्या सातत्यपूर्ण वागणूकीतून इतरांच्या मनात तयार झालेला असतो. आपल्या व्यक्तीमत्त्वाभोवती काय तर्हेचा माहौल झालाय हे एकदा का ऑरा मीटरने आपण आपलं स्वत:च चेक केलं की जर तिथे कुठे काही निगेटिव्ह रीझल्ट आला असेल तर आपण आपलेच डॉक्टर बनून त्यावर प्रामाणिकपणे उपाययोजना करू शकतो. ‘गूड ऑरा’ही जर आपण आयडीयल कंडिशन मानली तर कुणाला त्या गूड ऑरामध्ये हेल्दी किंवा टोटली फिट बनायला आवडणार नाही? शारिरिक व्याधीसाठी आपण औषधोपचार करतोच नं, तिथे कुठे कमीपणा वाटतो? अमूक एक अभिनेता दिवसाला एवढ्या गोळ्या घेतो ह्या बातम्या अधूनमधून आपण चवीने वाचत असतो. मानसिक बाबतीत जरा काही असा औषधोपचार करायचा म्हटला की लागलीच चार भुवया वर उचलल्या जातात. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ‘आपल्या प्रत्येकाला आपण मानसिकरित्या टोटली फिट्ट आहोत’ह्या भ्रमात किंवा मृगजळात रहायला आवडतं, किंवा आपण स्वत: आपल्याभोवती तो ऑरा निर्माण केलेला असतो. ही अवस्था स्वत:ला आणि समुहालाही घातक. त्यामुळेच आपण प्रत्येकाने ऑरा मीटरचा सहारा घेतला पाहिजे जर आपल्याला आपल्या कुटुंबात कामात, उद्योगात, अगदी राजकारणातही यशस्वी बनायचं असेल तर.
आपण आपल्यातूनच स्वत: एक सुंदर व्यक्तिमत्त्व घडवू शकतो. इट्स नेव्हर टू लेट. इतरांना हवीहवीशी वाटणारी व्यक्ती आपण बनू शकतो का? आपण जिथे जातो तिथे सकारात्मक अशी उर्जा निर्माण करू शकतो का? आपल्या मनातील सगळ्या नकारात्मक गोष्टी आपण पळवून लावू शकतो का? कारण त्या पळवून लावल्या तरच चांगल्या गोष्टी आपल्या मनात वास करू शकतील. आपण आपल्या सभोवताली असणार्या व्यक्तींमध्ये चांगल्या गोष्टी शोधतो की तो कुठे चुकतो ह्याची वाट बघत बसतो हे चेक करणंही महत्त्वाचं. कारण आपण जर आपल्याला एक लीडर म्हणून बघणार असू तर दुसर्यांमधले चांगले गूण आपल्याला पटकन दिसले पाहिजेत. ते वाढण्यासाठी आपल्याला त्यांना शक्ती देता आली पाहिजे. आपणही अशा लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे जे आपल्यातून काही चांगलं घडवू शकतील. कितीही बिकट परिस्थिती आली तरी त्यातही आपल्याला संधी दिसली पाहिजे. लीडर्स चांगले बनू शकतात ह्यावर माझा विश्वास आहे. वीणा वर्ल्ड ही छोटी संस्था चालवताना मी ते अनुभवते आहे मात्र त्यासाठी प्रत्येकजण अशा अनेक स्वपरीक्षांना स्वत:च्या नजरेत खरा उतरला पाहिजे.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.