आपण एरव्ही ज्या गोष्टी सहज करीत नाही किंवा ज्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आपल्याला वेळ नसतो त्या सर्व गोष्टी एन्जॉय करायलाच तर आपण हॉलिडेवर जातो नाही का? मग आनंद केवळ लहान मुलांपुरताच का मर्यादित रहावा? आपल्या मनामध्ये दडलेल्या त्या लहान मुलाची हौस पूर्ण करायला नको का?
फ्री आईसक्रीम! खरंच! म्हणजे आपल्याला हवे तेव्हा, हवे तेवढे आईसक्रीम खाता येईल का? वॉव! हा आहे खरा हॉलिडे. अकरा वर्षांपूर्वी चार वर्षाच्या साराला घेऊन मी क्रुझवर हॉलिडेसाठी गेले होते, तिथे आम्ही करिबियन आयलंड्सची सैर करीत होतो. करिबियन आयलंड समूहाला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे इथे ऑपरेट होणार्या अनेक लक्झरी क्रुझेस. आपल्या कल्पनेच्या पलिकडे उत्तम सोय, एंटरटेन्मेंट, अॅडव्हेंचर आणि लक्झरीची दुनिया या तरंगत्या लक्झरी हॉटेल्समध्ये बघायला मिळते. वास्तव्यासाठी लक्झरी रूम्स, स्विमिंग पूल्स, अनेक रेस्टॉरंट्स, थिएटर्स, स्पा ट्रीटमेंट्स अशा अन्य गोष्टींनी या क्रुझेस सुसज्ज असतात आणि इतके सगळे असूनसुद्धा आमच्या साराला त्या क्रुझवर काय आवडले तर तिथला आईसक्रीम स्टॉल. त्या आईसक्रीमचे पैसे द्यावे लागले असते तरी काहीच हरकत नव्हती पण कुठलीही गोष्ट न मागता मिळाली आणि तीसुद्धा हवी तेव्हा कितीही वेळा घेता आली तर त्याची मजाच काही और आहे, ह्याचा आनंद तिथलं आईसक्रीम खाताना मिळाला.
मला आठवते लहानपणी आईसक्रीम खायला मिळणे ही स्पेशल गोष्ट असायची. सिनेमा बघायला गेल्यावर मिळणारा चोकोबार, लग्नातला कसाटा आणि अगदी एखाद्या विशेष प्रसंगी मिळणारा आईसक्रीमचा कोन हे सर्व आज इतक्या सहजपणे मिळते की आईसक्रीम खाण्यातनं मिळणार्या त्या छोट्या आनंदापासून आपली मुलं वंचित राहत आहेत का असं सारखं वाटायचं. पण त्या क्रुझवर फिरताना लक्झरीचा अगदी उच्चांक असला तरी त्या सगळ्या गोष्टींमध्येसुद्धा मुलांना आजदेखील आईसक्रीमचे आकर्षण आहे हे पाहून मात्र गंमत वाटली.
आईसक्रीमविषयी असलेलं आकर्षण ही काही आजची गोष्ट नाहीय. आईसक्रीमचा शोध नक्की कधी लागला ह्यावर एकमत नाहीय, पण साधारण सातव्या शतकात चीनमध्ये शँग डायनॅस्टीच्या राजाने आपल्या दरबाराला आईसक्रीम बनवण्याचा हुकूम सोडल्याचे इतिहासात लिहिलेले आहे. काही रोमन साम्राज्यातील राजा आपल्या गुलामांना डोंगरावरून फ्रेश बर्फ आणण्यास पाठवायचे, त्यात नंतर अनेक फ्लेवर्स मिसळून आईसक्रीम बनवले गेल्याचेही ऐकीवात आहे. इटलीच्या एक्सप्लोरर मार्को पोलो ने चायनामध्ये तयार होणार्या या आईसक्रीम प्रकाराला बघून परत आल्यावर तेराव्या शतकात ईटलीमध्ये आईसक्रीमची ओळख करून दिली असेही म्हणतात. तर इंग्लंडच्या चार्ल्स I या राजाच्या दरबारात आईसक्रीमच्या पहिल्या प्रकारात मोडणारे क्रीम आईस दिले जाण्याच्या कथा आहेत. हेनरी II या फ्रान्सच्या राजाचे लग्न इटलीच्या कॅथरीन मेडिसिबरोबर झाले तेव्हापासून फ्रान्समध्ये आईसक्रीमचा शोध लागला असे म्हणतात. या सर्व कथांमध्ये किती तथ्य आहे आणि यातल्या किती काल्पनिक आहेत हे कळणे कठीण असले तरी आईसक्रीम ही नेहमीच एक रॉयल डिश होती हे मात्र नक्की. या राजेशाही पदार्थाची सामान्य वर्गाला ओळख फार उशिरा झाली. जेवण शिजविण्यासाठी आगीचा वापरच करायचा हे मनुष्य खूप आधी शिकला पण खाद्यपदार्थ बनविण्यासाठी आपण बर्फदेखील वापरू शकतो हे तसे आपल्या जरा उशिराच लक्षात आले नाही का?
आता तर जगभर आईसक्रीमचे अनेक प्रकार बघायला मिळतात आणि ज्या देशात जाऊ तिथे एकदातरी तिथले लोकल आईसक्रीम चाखल्याशिवाय हॉलिडे कसा पूर्ण होईल बरं. मग उन्हाळा असो की हिवाळा, त्याचा हे रॉयल डीझर्ट खाण्याशी काय संबंध आहे? आपण एरव्ही ज्या गोष्टी सहज करीत नाही किंवा ज्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आपल्याला वेळ नसतो त्या सर्व गोष्टी एन्जॉय करायलाच तर आपण हॉलिडेवर जातो नाही का? मग आनंद केवळ लहान मुलांपुरताच का मर्यादित रहावा? आपल्या मनामध्ये बसलेल्या त्या लहान मुलाची हौस पूर्ण करायला नको का? असाच काहीसा विचार करून मी इस्तानबुलमध्ये आईसक्रीम घ्यायला गेले. टर्कीमधलं आईसक्रीम फार छान असतं,असं मी ऐकलं होतं. इथल्या कार्हमनमराश याठिकाणी अतिशय सुंदर आईसक्रीम बनते. ऑर्किडच्या फुलांच्या देठापासून बनणार्या सालेप आणि मॅस्टिक या पदार्थांमुळे टर्कीमधल्या आईसक्रीमला एक वेगळाच चिकटपणा येतो. टर्कीमध्ये फिरताना तुम्ही स्थलदर्शन एन्जॉय कराच पण आईसक्रीम खाल्ल्याशिवाय नक्कीच परत येऊ नका. जितके हे आईसक्रीम छान लागते तितकीच मजा ते विकत घेण्यातसुद्धा आहे. आपल्या ट्रेडिशनल पोशाखात असलेल्या अशाच एका आईसक्रीम विक्रेत्याकडे आईसक्रीम मागताच तो गोड हसला आणि माझ्यासाठी आईसक्रीम कोन भरू लागला. त्याला पैसे देताच त्यानं कोन पुढे केला पण मी घ्यायच्या आतच त्याने तो कोन चक्क उलटा धरून माझी थट्टा करायला सुरुवात केली. टर्कीश आईसक्रीम बरेच चिकट असल्याने ते सहजासहजी पडत नाही आणि त्यापुढे पाच मिनिटे तरी तो आईसक्रीम विक्रेता, त्याची गाडी बघायला जमलेले इतर टूरिस्ट, लोकल्सची गर्दी आणि माझ्या आईसक्रीमसाठी आतुरलेली मी अशा सगळ्या मंडळींचा एक खेळ सुरू झाला. शेवटी त्याला माझ्यावर दया आली आणि मला माझे आईसक्रीम मिळाले आणि त्याला अनेक गिर्हईकं. टर्कीच्या आईसक्रीम विकणार्या या लोकांचा खेळकरपणा मनाला भावून गेला. आपले दैनंदिन जीवनातले काम कंटाळा न आणता अधिक इंटरेस्टिंग कसे बनवावे याचे तो टर्किश आईसक्रीम मॅन परफेक्ट उदाहरण आहे.
जगभरात आईसक्रीमसाठी प्रसिद्ध असलेल्या कोणत्या देशांपैकी जर एका देशाचे नाव घ्यायचे असेल तर पहिल्या क्रमांकावर असेल इटलीचे नाव. आपल्या आईसक्रीमचा ते इतक्या गहनतेने विचार करतात की इटालियन जेलॅटोला आईसक्रीम म्हणून संबोधले तर त्याचा अपमान होत आहे असेच काहिसे त्यांना वाटते. इतर आईसक्रीमपेक्षा अधिक दाट फ्लेवर्सने भरलेले जेलॅटो ही इटलीची जगाला मिळालेली भेट इटलीमध्ये गेल्यावर नक्कीच चाखून बघायला हवी. आपण हॉलिडेवर निघतो तेव्हा प्रवासात तिथल्या स्थलदर्शनाच्या जागा, म्हणजे जर रोममध्ये ट्रेव्ही फाऊंटन किंवा कोलोसियम बघणे गरजेचे असले तरी तिथल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे नाही का? केवळ ट्रेव्ही फाऊंटनला बघत तिथल्या शिल्पकाराचे कौतुक करण्यापेक्षा जर एखाद्या अस्सल जेलॅटोचा स्वाद घेत ट्रेव्ही फाऊंटनजवळ उभे राहिलो तर तो ठरेल खराखुरा रोमन हॉलिडे. हेच लक्षात घेऊन आज रोममध्ये मॉन्युमेन्ट्सच्या साइटसिईंग टूर्ससोबतच कॉफी,जेलॅटो अॅन्ड एसप्रेसो टूर्ससुद्दा घेऊ शकतो. या टूरमध्ये सहभाग घेताना फक्त कम्फर्टेबल वॉकिंग शूज आणि आपले अॅपेटाईट (पोटभर भूक) घेऊन या असे ते कळवतात. आणि मग सुरू होतो रोम या महान शहराच्या गल्ली बोळ्यातला संस्मरणीय ठरणारा प्रवास. इथे फिरताना इटालियन कॉफी व इटालियन आईसक्रीम म्हणजेच जेलॅटोचे टेस्टिंग करीत आपण इथले प्रसिद्ध डीझर्ट तिरामिसु चाखायला थांबतो. अशी टूर असेल तर घरातले छोट्यात छोटे आणि सर्वात मोठेसुद्दा टूर करायला नेहमीच तयार होतील नाही का? रोममध्ये तसे आईसक्रीमचे अनेक प्रकार आहेत. दुधाने बनविलेले दाट जेलॅटो, बर्फाचे रीफ्रेशिंग सॉरबे आणि त्यातले असंख्य फ्लेवर्स, मात्र अस्सल जेलॅटोची चव घ्यायला टूरिस्ट स्पॉटर्समधल्या दुकानांमधले रंगबिरेंगी आईसक्रीम न घेता छोट्या गल्ल्यांमध्ये लपलेल्या मूळ इटालियन जेलाटेरियांना भेट द्या.
एक अनोखे युरोपियन आईसक्रीम आपल्याला जर्मनीत चाखायला मिळते. पहिल्यांदा हे आईसक्रीम बघितल्यावर आपली ऑर्डर चुकवून रेस्टॉरंटने दुसर्या कोणाचे जेवण आपल्याला दिले का असा गैरसमज होणे साहजिक आहे. स्पगेटीस् हे जर्मनीचे आईसक्रीम चक्क स्पगेटी म्हणजे शेवयांसारखे दिसते. जसे स्पगेटीवर टोमॅटो सॉस आणि चीज घातलेले असते, तसे व्हॅनिला आईसक्रीमच्या या शेवयांवर स्ट्रॉबेरी सॉस आणि त्यावर व्हाईट चॉकलेट शिंपडलेले असते. अगदी हुबेहूब स्पगेटीसारख्या दिसणार्या ह्या आईसक्रीम संडेचा शोध अर्थातच जर्मनीत स्थायिक झालेल्या इटालियन माणसाने लावला होता. आईसक्रीमवर अनेक टॉप्पिंग्स् घालून त्याची अशी एक संपूर्ण डीझर्ट डिश बनवणे म्हणजेच आईसक्रीम संडे तयार करणे. एकेकाळी अशी ड्रिंकिंग सोडा घातलेली डिश देवाच्या वाराला म्हणजे रविवारी विकण्यावर चर्चने बंदी आणली तेव्हा चर्चचा टॅक्स लागू नये म्हणून संडेच्या इंग्रजी स्पेलिंगमधून Yकाढून तो Sundae करण्यात आला असे म्हणतात. स्पेलिंग कितीही बदलले तरी एखादी गोष्ट छान असली तर ती कधीही आणि कितीही वेळा घेता येते नाही का?
आईसक्रीमची हौस ही जगात वाढतच गेली आणि प्रत्येक देशात आपल्या चवीनुसार त्यात बदल होत गेले. मागच्याच वर्षी डिसेंबर महिन्यात भर थंडीत मी जपानच्या क्योटो शहरात फिरत होते. थंडी असली तरी ऊन कडक पडले होते. त्यावेळी जपानी ग्रीन टी म्हणजेच माचा टीच्या फ्लेवरमधले माचा आईसक्रीमचे ताजे सॉफ्ट कोन बघून राहवले नाही. मला तो फ्लेवर त्यावेळी खूप आवडला पण बर्याच लोकांना तो हिरवागार आईसक्रीम कोन त्याच्या रंगामुळे अगदी हातावरच्या मेहंदीची आठवण करून देत जिभेखाली उतरतच नाही असेही मी तेव्हा ऐकले. जपानमध्येच आणखी एक लोकल आईसक्रीम म्हणजे मोची, ज्या आईसक्रीमला जपानी तांदूळाच्या पिठाने बाहेरून गुंडाळलेले असते. थायलंडमध्ये सगळीकडे आईसक्रीमचे रोल्स मिळतात जे आता जगभर प्रसिद्ध होत आहेत. भारतात आईसक्रीमच्या दुनियेला देणगी म्हणजे आपली कुल्फी. गंमत म्हणजे आमचे इटालियन मित्र-मैत्रिणी भारतात आले की त्यांच्यासाठी मटका कुल्फीची सोय करावीच लागते. गेल्या आठवड्यातच माझी इटालियन मैत्रिण लिडिया भारतात आली तेव्हा तिसरी कुल्फी संपवत, या कुल्फीसाठी मी भारतात कितीही वेळा येऊ शकते असे म्हणत वितळलेल्या कुल्फीचा शेवटचा घास घेण्यात मग्न झाली. आईसक्रीमसाठी प्रवास करण्याची वेळ अजून भले आली नसेल पण जिथे हॉलिडेवर जाल तिथल्या आईसक्रीमचा आस्वाद नक्की घ्या. शेवटी अशा छोट्या छोट्या आनंदातूनच तर गोड आठवणी बनत असतात.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.