नूतन वर्षभिनंदन! हॅप्पी न्यू इयर! हे वर्ष आपणा सर्वांना आरोग्यदायी जावो! 2020 ने नव्या दशकाची सुरुवात झालीय. खूप आशा आहेत ह्या नव्या कोर्या वर्षाकडून आणि ह्या दशकाकडूनही. अर्थात आपल्या भरपूर अपेक्षा असल्या तरी हे वर्ष आणि हे दशक नव्या युगाची नवी आव्हानं आपल्यासमोर सतत उभी करणार आहे. त्यांना पेलायला आपल्याला एकदम खंबीर व्हायचंय, भक्कम बनायचंय. शारीरिक-मानसिक संतुलन अतिशय महत्त्वाचं असणार आहे येत्या काळात. आमचं एक बरं आहे आम्ही अशा व्यवसायात आहोत की प्रत्येक दिवशी काही ना काही कुठेतरी घडत असतंच. एकावेळी पाच ते सहा हजार लोकं भारताच्या व जगाच्या कानाकोपर्यात सुपरपीक सीझनमध्ये प्रवास करीत असतात तेव्हा विमान कॅन्सल होणं, बस ब्रेकडाऊन होणं, रोड ब्लॉक, मोर्चे, व्हिआयपी व्हिजिट अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्या आव्हानांचा मुकाबला करता करता, त्यातून तावून सुलाखून निघताना आम्ही दररोज स्वत:ला आणखी स्ट्राँग बनवतो. प्रत्येक अडचणीतून काही ना काही मार्ग निघतोच. देव सतत पाठीशी असतो असं म्हणायला हरकत नाही.
कधी कधी मात्र तोंडचं पाणी पळतं अशी अवस्था होते. गेल्या चोवीस डिसेंबरलाही अशीच काहीशी अवस्था झाली. जेव्हा सुपरपीक सीझन सुरू होतो तेव्हा सकाळी उठल्या उठल्या आधी मोबाईल चेक करायची सवय आहे. देशविदेशातल्या सगळ्या सहली व्यवस्थित सुरू आहेत नं, कुठे कुणाला काही प्रॉब्लेम तर नाही नं हे बघितलं की शांत मनाने दिवसाची सुरुवात करायला बरं वाटतं. त्यादिवशीही तसाच मोबाईल बघितला आणि गेस्ट रिलेशन्स इन्चार्ज इशिता शहाचा मिस्ड कॉल दिसला. काहीतरी मोठा प्रॉब्लेम दिसतोय त्याशिवाय इशिता, शिल्पा मोरे किंवा विवेक कोचरेकर फोन करीत नाहीत. मोठमोठ्या अडचणींवर फटाफट सोल्युशन्स काढण्यात त्यांचा हातखंडा. आणि तसंच ते व्हायला पाहिजे. आपल्याशिवाय आपल्या टीमला ऑर्गनायझेशन चालवता आली पाहिजे तर आपण लीडरशिपसाठी योग्य. इशिताला फोन केला तेव्हा कळलं की अंदमानला जाणार्या दोन टूर्सचं फ्लाइट कॅन्सल झालंय आणि सर्व पंचावन्न पर्यटक मंडळी एअरपोर्ट सोडायला तयार नाहीत. तो आठवडाच सर्व एअरलाईन्ससाठी कटकटीचा आणि नुकसानीचा गेला. विमानं लेट होणं ह्या गोष्टीने कळस गाठला होताच पण विमानं कॅन्सल होण्याचं प्रमाणही वाढलं होतं. रोज देशभरातली अनेक विमानं कॅन्सल होत होती, एका दिवशी एकुण पाचशे विमानं कॅन्सल झाली हा उच्चांक होता. आम्हालाही त्याची झळ पोहोचत होती पण एअरलाईन्सशी चांगले संबंध असल्याने आणि एकुण बिझनेसही मोठा असल्याने ते ह्या सर्व अडचणीतून सर्वतोपरी सहाय्य करून ऑल्टरनेटिव्ह देत होते, गुंता सोडवायला मदत करीत होते जरी पीक सीझन असला तरी. एअरलाइन्ससाठी धुकं, मोर्चे, रेग्युलेशन्स, क्रुच्या कामांचे तास हे सर्वच मुद्दे एकाच वेळी समोर आले होते. भारतातलं विमानांचं वेळापत्रक त्या आठवड्यात अक्षरश: कोलमडलं होतं. वृत्तपत्रांमध्ये ह्याविषयी मोठमोठ्या बातम्याही येत होत्या. असो.
तर त्या दिवशी म्हणजे चोवीस डिसेंबरला हे विमान कॅन्सल झालं आणि आमच्या डोळ्यापुढे अंधारी आली. आज काहीच होऊ शकत नाही, पर्यटकांना आपापल्या घरी परत जावं लागेल आणि तातडीने जसं शक्य तसं उद्या-परवा ह्या पर्यटकांना अंदमानला पाठवावं लागेल. हाच मार्ग होता. तसं बघायला गेलं तर विमान कॅन्सल होणं, त्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करणं हे काम आमची टीम करीत असतेच. ज्यांना त्याचा अंदाज होता ती मंडळी आपल्या घरी निघूनही गेली. पण आपल्या ड्रीम हॉलिडेवर असे विमानाच्या कॅन्सलेशनचे ढग आल्यावर पर्यटकांची उद्विग्नता शिगेला पोहोचणं नॅचरल होतं. सकाळी दहा वाजता एअरलाईन ऑफिस सुरू झाल्यावरच निर्णय मिळेल आणि तो कळवला जाईल हे हरप्रकारे पर्यटकांना सांगूनही कुणीही एअरपोर्ट सोडायला तयार नव्हतं. पर्यटकांचंही बरोबर होतं, आनंदाने उत्साहाने ते एअरपोर्टवर आले होते. अंदमानच्या सहलीकडे डोळे लावून बसले होते. अनेकांनी त्यासाठी सहा सहा महिने आधी बुकिंग करून ठेवलं होतं. आधीच अंदमानला जाणार्या एअरलाईन्स कमी, त्यांची नंबर ऑफ फ्लाइट्सही कमी. चोवीस डिसेंबर म्हणजे सुपरपीक डेट, फ्लाइट्स चोकोब्लॉक, हॉटेल्स हाऊसफुल्ल. पंचावन्न पर्यटकांसाठी अशावेळी विमानाचं आणि हॉटेलचं बुकिंग मिळवणं हा यक्षप्रश्न होता. बरं ह्या सुपरपीक सीझनमध्ये अंदमानसारख्या ठिकाणची हॉटेल्स शंभर टक्के कॅन्सलेशनच्या चॉर्जेसखाली येतात. आर्थिक नुकसान बाजूला ठेवलं तरी जिथे एक रूम मिळणं कठीण असतं तिथे ख्रिसमस न्यू इयर सेलिब्रेशनच्या काळात एवढ्या रूम्स मिळावायच्या कुठून हा प्रश्न होता. आधी एअरतिकिट्स मिळवूया, बाकीचं नंतर म्हणत आमची एअर रीझर्वेशन टीम म्हणजे प्रमोद राणे, सुनील पन्हाळे, दीप्ती नाईक कामाला लागले. पर्यटक एअरपोर्टवरून हलत नव्हते, प्रत्येक तासागणिक तिथला पेच वाढत होता. शेवटी पर्यटकांनी आमच्या ऑफिसला यायचं ठरवलं. आज त्यांचा प्रवास होणार नव्हता हे निश्चित होतं आणि पुढची व्यवस्था करण्यासाठी पूर्ण दिवस लागणार होता हे साहजिक होतं. इशिताने पर्यटकांची भेट घेतली. दीपक जाधव, विनायक नायक, मंदार शास्त्री आणि स्वप्निल आपटे हे चौघेही पर्यटकांशी संवाद साधत होते.
त्याच दिवशी सुधीरचा वाढदिवस होता आणि त्यामुळे बहुतेक सर्वच एअरलाईन्सची मंडळी केक घेऊन शुभेच्छा द्यायला ऑफिसमध्ये येत होती. त्यांना त्या दिवशी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वेगळंच दृश्य बघायला मिळत होतं आणि आम्ही त्यांना सांगत होतो, कृपया पुढच्या आठ दिवसांत फ्लाइट्स कॅन्सल करून पर्यटकांच्या आनंदावर विरजण टाकू नका. तुमचाही नाईलाज आम्ही जाणतो पण एव्हाना अंदमानला उतरून धम्माल करणारे आमचे पर्यटक अशा रुपात बघणं हे खूपच वेदनादायी आहे. ज्या एअरलाईनचं विमान कॅन्सल झालं होतं तीही मंडळी आली होती केक आणि सोबत लॅपटॉपही घेऊन. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत ते आमच्यासोबत होते आणि पुढच्या दोन दिवसांत कोलकाता-चैन्नई-मुंबईवरून पंचावन्न सीट्स त्यांनी मिळवून दिल्या. जशी तिकीट्स होत होती तशी आमची डेस्टिनेशन मॅनेजमेंट टीम तिथल्या लोकल सप्लायरसह हॉटेलच्या शोधात लागली होती. प्राची गुरव, आश्विन म्हात्रे ह्यांनीही पाच वाजता हॉटलेची अरेंजमेंट कशी कशी होतेय ते सांगितल्यावर मी पर्यटकांना भेटायला गेले. त्यांचा पहिला प्रश्न होता की, तुम्ही आधी का आला नाहीत भेटायला? रास्त होतं त्यांचं विचारणं. त्यांंना म्हटलं, मी ऑफिसमध्येच होते, तुमचा आवाज ऐकल्यावर एकदा दोनदा यावंसही वाटलं पण नाही आले कारण ह्या सुपरपीक सीझनमध्ये प्रथम एअर तिकिट्स आणि हॉटेल वास्तव्याची व्यवस्था करणं महत्त्वाचं होतं. तुम्ही इथे आला नसतात तरीही ते होणारच होतं कारण आमची टीम एक्सपर्ट आहे अशा इमर्जन्सी हँडलिंगमध्ये आणि तुमचा हॉलिडे यशस्वी करणं हेच तर आमचं आद्यकर्तव्य आहे आणि त्यासाठीच तर देशविदेशात सर्वत्रच वीणा वर्ल्डचे पर्यटक जास्त संख्येने दिसतात. मधेच मी आले असते तर कदाचित शब्दाने शब्द वाढला असता. तुमचा दोष नाही, आमचा नाही, एअरलाईनचाही नाही तसं म्हटलं तर, पण आलेल्या परिस्थितीला सामोरं तर जायला पाहिजे. आता माझ्या हातात पर्याय आहे आणि तुमचा हॉलिडे पार पडणार ह्याची खात्री, तेव्हा बरं वाटतंय. तुम्हाला भेटायचं नसतं तर ऑफिसलाच आले नसते. पण तुम्ही ऑफिसला येताय म्हणून आम्ही सर्वजण अधिक उत्साह भरून ऑफिसला आलो आणि हा गुंता सोडविल्यावर आता समाधानाने घरी जाऊ.
पर्यटकांसोबत नंतर बर्याच गप्पा झाल्या, फर्स्ट टेक द काऊ आऊट ऑफ द डिच हे आम्ही नेहमी वापरणारं प्रिन्सिपल आज मी कशातर्हेने वापरलं तेही सांगितलं आणि ज्या भिंतीवर हे काऊ प्रिन्सिपल विराजमान झालंय ती भींतही नेऊन दाखवली. त्यानंतर सर्वांनी मिळून सेल्फी व फोटोज्ही काढले. एकंदरीत दिवस खूप गडबडीचा गेला. ऑल इज वेल, दॅट एन्डज् वेल. सकाळी रागावून आलेले पर्यटक आनंदाने आपापल्या घरी गेले. आमच्या कार्यालयातल्या टीमला आज वेगळंच दृश्य बघायला मिळालं होतं पण शेवटी त्याच पर्यटकांना हसत हसत ऑफिसमधून बाहेर पडताना बघून त्यांना आश्चर्य वाटलं.
उत्साहाने ऑफिसला यायचं आणि समाधानाने घरी परतायचं हे एक वाक्य आम्ही नेहमी वापरतो, त्याचं प्रात्यक्षिक होतं चोवीस डिसेंबरचा हा दिवस. त्या दिवशी सकाळी घरून निघालो तेव्हा एवढी रीझर्व्हेशन्स मिळवायची कशी ही धास्ती होती, पण प्रॉब्लेमशी दोन हात करण्याचा उत्साह मोठा होता. पर्यटकांनी शेवटी प्रत्येकाने वीणा वर्ल्डसोबत किती टूर्स केल्या आहेत आणि त्यांना वीणा वर्ल्ड कसं आवडतं हे जेव्हा सांगितलं तेव्हा भरून पावलो. त्या दिवशी घरी जातानाचं समाधान वेगळंच होतं.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.