ग्लोबल वॉर्मिंगबरोबर जगातले हवामानसुद्धा प्रचंड वेगाने बदलतंय, याचंच सध्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्याच महिन्यात एरव्ही उन्हाळ्यातसुद्धा प्रसन्न असलेल्या युरोपात गर्मीची लाट आली होती. एकंदरीतच जगाचे हवामान बदलत चालले आहे. पण प्रवासासाठी पर्यटनस्थळ निवडताना आजकाल केवळ हवामान ही निर्णायक गोष्ट उरलीच नाही असे म्हणायला हरकत नाही. हवामानाबरोबर इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वपूर्ण ठरतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने मुंबई शहराला बेजार करून टाकले होते. रस्त्यावर साठलेल्या पाण्यात चालणार्या गाड्या, उशिरा चालणार्या ट्रेन्स व बसेस् या सर्व गोष्टींशी लढत आमची टीम ऑफिसमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करीत होती. तितक्यात आमच्या ऑफिसमध्ये दोन फॉरिनर्स मला दिसले आणि तेसुद्धा निर्धारित वेळेपेक्षा केवळ पंधरा मिनिटे उशिरा. गंमत अशी होती, की कर्ल आणि पीटर हे मला भेटण्यासाठी थेट साऊथ आफ्रिकेवरून आले होते. साऊथ आफ्रिकेला पर्यटन कसे वाढवावे या विषयासोबतच जेव्हा मुंबईच्या पावसाच्या गप्पा रंगल्या, तेव्हा हे भर पावसात बिझनेस मीटिंग्जसाठी मुंबईत का येतात हा मला पडलेला प्रश्न मी त्यांना बोलून दाखविला. तुम्ही मुंबईला जुलैमध्ये का येता? ही योग्य वेळ आहे का? इज इट द राइट टाईम?अशा माझ्या प्रश्नाचे उत्तर पीटरने हसत-हसत दिले, की या भेटीसाठी वर्षभरात कधीतरी परफेक्ट वेळ असणार आहे का? उन्हाळ्यात फार गरम असते, पावसाळ्यात पाणी भरते आणि हिवाळ्यात आलो तर उपयोग काय? तोपर्यंत तुमच्या सर्व साऊथ आफ्रिकेच्या टूर व हॉलिडे प्रोग्राम्स्ची आखणी झालेली असेल. मग हवा चांगली असली तरी आम्हाला उद्योगधंद्याच्या दृष्टीने भारतातून पर्यटन वाढविण्यासाठी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, त्यामुळे जुलै इज द राइट टाईम. आणि हो, आम्हाला असा पाऊस देखील इथेच तर बघायला मिळतो नं! पीटरच्या विचारात बरेच तथ्य होते. आणि मला त्याचा हा विचार पटला. जगभर उत्तर हेमिसफीयरमध्ये जून ते सप्टेंबर समर सीझन असल्याने शाळांना समर हॉलिडे असतो व अनेक पर्यटक यावेळी जगभ्रमंती करायला निघतात आणि बरेच जण भारतातसुद्दा येतात. त्यात गल्फ देशांमध्ये जिथे फार कमी पाऊस पडतो आणि पावसाळा अनुभवायलाच मिळत नाही अशा देशाच्या नागरिकांना तर मुंबईत मुद्दाम पावसाळ्यात यायला आवडते. गेल्या रविवारी वीणा वर्ल्डच्या सर्व सेल्स टीम्सची वार्षिक सेल्स मीट होती त्यावेळी देखील ही चर्चा झाली, की एखाद्या डेस्टिनेशनला भेट देण्याची योग्य वेळ कोणती? किंवा खरंच अशी योग्य वेळ आहे का?
पारंपरिकरित्या आपण एखाद्या पर्यटनस्थळी नक्की कधी भेट द्यायची हे ठरविताना सर्वप्रथम तिथल्या हवामानाचाच विचार केला जायचा. किंबहुना केवळ हवामानाचाच विचार केला जायचा असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मग उन्हाळ्याची सुट्टी असेल तर थंड प्रदेशात जाऊन उत्तम हवामानात काही दिवस विश्रांती घेऊन हॉलिडेचा आनंद घेतला जात असे. मग ते भारतातले काश्मिर, हिमाचल प्रदेश किंवा दक्षिणेकडे उटी-कोडाईकनाल असो किंवा युरोपचे स्वित्झर्लंड-ऑस्ट्रियातील आल्पस्च्या पर्वतरांगा. उत्तम हवामानासाठीच तर ब्रिटिशांच्या राज्यात भारतात अनेक हिल स्टेशन्स स्थापन करण्यात आले आणि आपल्याला पर्यटन करण्यासाठी उत्तम ठिकाणे तयार झाली. ग्लोबल वॉर्मिंगबरोबर जगातले हवामानसुद्धा प्रचंड वेगाने बदलतंय, याचंच सध्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्याच महिन्यात एरव्ही उन्हाळ्यातसुद्धा प्रसन्न असलेल्या युरोपात गर्मीची लाट आली होती. एकंदरीतच जगाचे हवामान बदलत चालले आहे. पण प्रवासासाठी पर्यटनस्थळ निवडताना आजकाल केवळ हवामान ही निर्णायक गोष्ट उरलीच नाही असे म्हणायला हरकत नाही. हवामानाबरोबर इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वपूर्ण ठरतात. आज जर आपण गूगलवर-बेस्ट टाईम टू व्हिझिट नॉर्वे असं सर्च केलं तर पहिलेच उत्तर कुठलीही एक वेळ किंवा एक महिना न सुचवता आपल्याला काय अनुभव घ्यायचे आहेत यावरून नॉर्वेला कधी भेट द्यावी हे सुचवते. जून ते ऑगस्ट हे आत्तापर्यंत स्कॅन्डिनेव्हियन देशांना भेट देण्यासाठी सर्वात योग्य महिने समजले जायचे कारण इतर वेळी इथे खूप जास्त थंडी असते. इथल्या उन्हाळ्यात दिवस अतिशय मोठे असतात व रात्र लवकर होत नाही आणि काही दिवस तर सूर्यास्तसुद्धा होत नाही. मग हा मध्यरात्रीचा मिडनाईट सन बघण्यासाठी जरूर आपण नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड या स्कॅन्डिनेव्हियन देशांना जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये भेट द्यावी. पण ऑक्टोबर ते मार्चमध्ये स्कॅन्डिनेव्हियाला भेट देऊन आलेल्या लोकांना कधी भेटलात तर ते तुम्हाला नक्कीच इथल्या हिवाळ्यात जाण्याचा सल्ला देतील कारण हिवाळ्यात इथे एक अद्भुत नैसर्गिक अनुभव आपण घेऊ शकतो तो म्हणजे नॉर्दन लाइट्स बघण्याची संधी याच महिन्यांमध्ये मिळते. सूर्यावरून घडणार्या काही स्फोटांमुळे ही सूर्यकिरणे पृथ्वीच्या मॅगनेटिक फिल्डशी येऊन आदळतात तेव्हा नॉर्थ व साऊथ पोल्स जवळ हिरव्या रंगाचे आकाशात जणू नाचणारे हिरवे लाईट वेव्हज् आपल्याला दिसतात. हे अरोरा बोरियालिस किंवा नॉर्दन लाइट्स अंधारातच आपल्याला पाहता येतात त्यामुळे स्कॅन्डिनेव्हियन विंटर सीझन हा या नॉर्दन लाइट्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे स्कॅन्डिनेव्हियाला जाण्याचा कुठला राइट टाईम आहे, हे आपल्याला आपल्या हॉलिडेवर कोणते अनुभव हवे आहेत यावरच ठरेल नाही का?
काही वेळा तर एखाद्या ठिकाणी परत परत वर्षातल्या वेगवेगळ्या महिन्यांमध्ये भेट दिली की एकाच ठिकाणी वेगवेगळे अनुभव घेता येतात. काश्मिरचे चारही सीझन्स काश्मिरचे सौंदर्य वेगवेगळ्या रूपात दर्शवितात. फ्रान्सच्या शॅमोनी या शहराला मी कामानिमित्त तीन वेळा तरी भेट दिली असेल. पहिल्यांदा उन्हाळ्यात गेले तेव्हा तिथे नदीमधल्या राफ्टिंगचा अनुभव घेतला. आणि जवळच्या अॅन्नेसीच्या लेकमध्ये आम्ही स्वतः बोट चालवत बोटिंगचा आनंदसुद्दा घेतला. डिसेंबरच्या महिन्यात जेव्हा परत एकदा या शॅमोनीमध्ये जाण्याचा योग आला तेव्हा ते शहर मला अगदी वेगळे वाटले. ते ओळखण्याच्या पलिकडे होते. बर्फाच्या पांढर्या-शुभ्र गालिच्यांनी सगळे डोंगर झाकलेले होते. घरांच्या छपरावर, झाडांवर बर्फ पडून अगदी पिक्चर पोस्टकार्डसारखी घरे, रस्ते व संपूर्ण शहर हे पांढर्या रंगात न्हाऊन अतिशय सुंदर दिसत होेते. शिवाय ख्रिसमसची तयारी सगळीकडे जोरदार सुरू होती आणि अंधार लवकर होत असल्याने ख्रिसमससाठी केलेली रोशणाई अधिकच उठून दिसत होती. डिसेंबरमध्ये जाण्याचा सर्वात मोठा फायदा असा की इथेच मला पहिला स्किइंग लेसन घेता आला. इथल्या टूरिझम ऑफिसच्या बारबराने मला स्किइंग शिकविण्याचे मनावर घेतले आणि त्याची पहिली तयारी म्हणजे कपड्यांचे शॉपिंग. एकावर एक कपड्यांचे लेयर घातल्यानंतर माझ्या लक्षात आले की कपडे जर व्यवस्थित असले तर थंडीचा काहीच त्रास होत नाही. स्कि जॅकेट, स्कि शूज्, स्किइंग पोल्स व स्किस् अशा जय्यत तयारीनिशी मी त्या नुकत्याच तयार होणार्या स्की स्लोपवर पोहोचले. सर्वात सोप्या स्कि स्लोपला मॅजिक कार्पेट म्हणून ओळखले जाते. त्या मॅजिक कार्पेटवर पुढचे काही तास स्कीस सांभाळत, धडपडत मी काही अंतर का होईना स्किइंगचा अतिशय रोमांचक अनुभव घेऊ शकले. चेहर्यावरचा घाम पुसत जेव्हा मी हवामान तपासले तर चक्क -11c मध्ये सुद्दा मी घामाघूम झाले होते. फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली सारख्या स्किइंगसाठी प्रसिद्ध असलेल्या देशांमध्ये एकदातरी विंटर हॉलिडे घेऊन बघा. लहानपणापासून बर्फात खेळायचे, लोळायचे आकर्षण आपणा सर्वांनाच असते. गरम कपड्यांची परफेक्ट तयारी केली तर हिवाळ्यातसुद्धा या देशांची विंटर मॅजिक आणि तिथल्या ख्रिसमसची मजा आपल्याला घेता येते.
युरोप म्हटले की अॅमस्टरडॅमचे ट्युलिप गार्डन्स आपल्या डोळ्यासमोर येतात. सिलसिला सिनेमातील,देखा एक ख्वाब... या गाण्याने अमर झालेल्या या ट्युलिप गार्डन्सना भेट देण्यासाठी मार्चच्या शेवटापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत योग्य वेळ असते. स्प्रिंग सीझन किंवा वसंत ॠतू आला, की ह्या गार्डन्समध्ये बहरलेले लाल, पिवळे, पांढरे ट्युलिप्सचे पट्टे एक अविस्मरणीय अनुभव ठरतात. निसर्गाची गंम्मत अशी आहे, की जर तुमच्याकडे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वेळ असेल आणि ट्युलिप्स बघण्याची इच्छा असेल तर ऑस्ट्रेलियाकडे वळा, दक्षिण हेमिसफियरमध्ये ॠतू उत्तरेपेक्षा उलट असल्याने ऑगस्ट-सप्टेंबर हा तिथला वसंत आणि याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा या राजधानीत फ्लोरियाड हे फुलांचे प्रदर्शन घडते. डिसेंबर-जानेवारीमध्ये हिवाळ्याच्या थंडीत फिरण्याचा जर आपल्याला कंटाळा आला असेल तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, साऊथ अमेरिका थोडक्यात साऊथ हेमिसफियरमध्ये नाताळात तुम्ही समर हॉलिडेचा आनंद घेऊ शकता.
तसे पूर्वी उन्हाळा आणि हिवाळा हे पर्यटनाचे दोनच सीझन्स होते. पण आता स्प्रिंग आणि ऑटम हे सीझन्ससुद्धा पर्यटनासाठी प्रसिद्ध ठरत आहेत. कॅनडा, जपान आणि कोरीयामध्ये जर हॉलिडे प्लॅन करत असाल तर कधी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाऊन पहा. पिवळे, तपकिरी, नारिंगीपासून गडद लाल रंगांच्या छटांची झाडे फारच सुंदर दिसतात. शिवाय या महिन्यांमध्ये पर्यटकांची फार गर्दी नसते आणि हवामान देखील प्रसन्न असते.
हल्ली आपल्यासाठी जगात कुठेही जाणे अगदी सोपे झाले आहे. आपण खरंच नशिबवान आहोत की आपण या पृथ्वीचा हवा तसा, हवा तिथे आविष्कार पाहू शकतो. आपल्या हॉलिडेचा प्लॅन करताना एखाद्या देशाला, एखाद्या ठिकाणाला भेटण्याची योग्य वेळ कुठली हे बघण्यापेक्षा आपल्या कुटुंबाच्या सोयींनी आपल्याला कधी वेळ आहे हे पाहणे जास्त योग्य ठरेल. कधी-कधी आपण स्थलदर्शनासाठी बेस्ट सीझनची वाट बघत प्रवास करू शकत नाही आणि ती वेळ निघून जाते. माझ्या मुलीचे शाळेचे कॅलेंडर हाती लागताच मी सुांची नोंद घेतली तेव्हा डिसेंबरच्या तिसर्या व चौथ्या आठवड्यात सुा दिसल्या. मग जगभर सगळीकडे यावेळी खूप थंडी असेल असा विचार उगाचच येऊन गेला. पण डिसेंबरमध्ये गेलो नाही तर पुढच्या वर्षापर्यंत एकत्र हॉलिडे एन्जॉय करण्याचे काही अमूल्य क्षण हुकतील असे वाटले. मग लागलीच,यावर्षी बर्फात स्किइंग शिकायला जाऊया का? असा मेसेज मी साराला पाठवला. इट्स द राइट टाईम आफ्टर ऑल!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.